एखादे गाव आपसूक आपल्या ओंजळीत येऊन पडते आणि आपल्याही नकळत आपण त्या गावावर प्रेम करायला लागतो. १४ वर्षांपूर्वी असेच बेंगलोर माझ्या वाट्याला आले आणि आता ते माझे गाव झाले आहे; इतके जास्त प्रेमाचे की मला बेंगलोरचा जाज्वल्य अभिमान वाटतो. माझ्या या शहराच्या अस्मिता अतिशय अणकुचीदार आहेत. मुळात हे सगळे केव्हा होते; जेव्हा आपली नाळ त्या जागेशी – शहराशी- जोडली जाते तेव्हा. पूर्वी फक्त विवाहामुळे बायकांनाच घर, गाव बदलता यायचे किंवा बदलायला लागायचे; पण आता मात्र नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरे नित्याची झाली आहेत. एकाच गावातसुद्धा अनेक घरे बदलली जातात आणि नोकरीच्या निमित्ताने गाव, राज्य किंवा देश बदलणे तर आता सररास बघायला मिळते. अशीच आपल्या लग्नसंस्थेची लाभार्थी होऊन मी बेंगलोरला आले तेव्हा आडनाव सोडले तर माझा आणि कन्नड भाषेचा काहीच संबंध नव्हता. ते दिवस – ते आज कन्नड भाषेत सहज संवाद साधणारी मी – हा प्रवास करताना आधी या शहराने मला आपलेसे केले आणि मग मी त्याला !
बघून सवरून केलेल्या लग्नात या कन्नड घरात मराठी बोलतात ही गोष्ट माझ्यासाठी पुरेशी होती. उलट या अशा मराठी बोलणाऱ्या घरात आल्याने कदाचित आपल्याला आपली ‘मातृभाषा’ पुन्हा एकदा नव्याने शिकायला मिळेल हा माझा समज नव्याने कात टाकणाऱ्या बेंगलोरने मोडीत काढला. येथे ज्या सहजतेने हिंदी इंग्रजीमध्ये संवाद व्हायचे ते बघून मी कन्नड शिकायचा प्रयत्न सोडूनही दिला होता तो सुरू केला ते भारत सोडल्यावर! अमेरिकेत ज्या शहरात राहत होतो तेथे नवऱ्याचे अनेक जुने मित्र होते आणि त्यातील बहुसंख्य कन्नडीगा होते. बेंगलोर, मैसूरकडच्या या मित्र-मैत्रिणींमुळे कानडी हा योग्य शब्दप्रयोग नाही तर तो कन्नड असा आहे हा पहिला धडा शिकले आणि नंतर इतकी कन्नडीगा झाले की आता आपसूक त्यांच्याबरोबर कन्नडमध्येच बोलले जाते. अशीच नवी नवी ओळख असताना अचानक एक दिवस हे सर्वजण लाल पिवळ्या रंगाचे कपडे शोधू लागले आणि कर्नाटकाचा नकाशा, झेंडा यांबद्दल चर्चा सुरू झाली. मी विचारले, “हे काय असते नोव्हेंबरला?” तेव्हा ‘ये pspl नही जानती’ या जाहिरातीतल्यासारख्या सगळ्यांच्या माना माझ्याकडे वळल्या आणि सगळे एका सुरात म्हणाले, “कर्नाटका राज्योस्तव असतो १ नोव्हेंबरला!” मी आपली मुंडी हलवून गप्प बसले. मग तो आयताकार लाल पिवळा झेंडा हातात घेऊन बघत असताना एकदम नवऱ्याने विचारले ‘महाराष्ट्राचा झेंडा कसा आहे?’ आणि मी गोंधळात पडले. असा राज्याचा झेंडा असू शकतो हीच गोष्ट मुळात मला नवीन होती आणि हो, कर्नाटक हे भारतातील एकमेव राज्य आहे, ज्याचा स्वतःचा अधिकृत झेंडा आहे.
भाषावार प्रांतरचना झाली आणि १ नोव्हेंबर १९५६ रोजी मैसूर राज्याची रचना प्रत्यक्षात आली. कन्नड भाषिकांचे राज्य तयार झाले. अर्थात बेळगाव, निपाणी, बिदर यांसारख्या गावांचा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे; पण बहुसंख्य भाषिकत्वाचा विचार करून या राज्याची निर्मिती झाली आणि १९७३ साली मैसूर राज्याचे नामकरण ‘कर्नाटका’ असे झाले. त्यामुळे या वर्षी या नामकरणाची पन्नाशी साजरी करण्यात येत आहे. करूनाडू वरून पडलेले नाव कर्नाटका अशी लोकमान्यता आहे. करू म्हणजे काळी माती आणि नाडू म्हणजे जागा – काळी माती असलेला प्रदेश – असे जरी नावात असले तरी इथे काही फक्त काळी माती नाही; किंबहुना तुंगभद्रेच्या खाली लाल मातीच जास्त बघायला मिळते.
३१ जिल्हे व ४ विभाग यांत हे राज्य विभागलेले आहे. इथल्या प्रत्येक विभागातील कन्नड वेगळी आहे असे म्हटले तरी चालेल; पण कन्नड अस्मिता मात्र एकसारखीच आहे. ही कन्नड अस्मिता राज्याच्या झेंड्याच्या रूपातून दाखवली जाते. रिक्षेवर, रिक्षेच्या आत – बाहेर छोटे स्टीकर किंवा झेंडा नसला तर बहुतेक त्यांना त्यांच्या संघटनेचे सभासदत्व मिळत नसेल इतक्या मोठ्या प्रमाणावर रिक्षेमध्ये झेंडे बघायला मिळतात. या झेंड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे काही मानक नाही. आयताकार आणि वरचा भाग पिवळा आणि खालचा भाग लाल रंगांमध्ये रंगवला की झाले! या पिवळ्या-लाल रंगाचे वेड इतके भिनलेले असते की हारांपासून ते पताकांपर्यन्त सगळीकडे फक्त हे दोनच रंग भरून राहिलेले असतात. घरांवर, दुकानांवर, गाड्यांवर जिथे शक्य आहे आहे तिथे सगळीकडे हे पिवळे लाल रंग नोव्हेंबर महिनाभर दिसत असतात.
सरकारी पातळीवर हा दिवस मोठ्या झोकात साजरा होतो; शिवाय तो घराघरांत साजरा होतो; पण मला सगळ्यात जास्त आवडतो तो रिक्षास्टँडवर साजरा होणारा कोणताही सण. गणपती असो, सत्यनारायण पूजा असो किंवा कर्नाटका राज्योत्सव साजरा करणे असो – त्यातला उत्साह खूपच मोठा असतो – ती स्टँडची जागा सजवणे, छोटासा मंडप घालणे ,फुलांची सजावट, खाण्याची सोय करणे सगळे काही बिनबोभाट सुरू असते. भाडी नाकारणारे बहुतांश रिक्षावाले या अशा ठिकाणी मात्र अगदी घरचे कार्य असल्यासारखे वावरत असतात.
माझ्या येथील वास्तव्यात मला कळलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एखादा सण त्याच दिवशी करायचा असेही काही ठरलेले नसते. नाही जमले त्या दिवशी तर तो सण आपल्या सोयीने करायचा. म्हणजे गणपती भाद्रपद चतुर्थीलाच बसवायचा असे नसते. भाद्रपद महिन्यात जेव्हा जमेल तेव्हा सकाळी, दुपारी गणपती बसवायचा आणि संध्याकाळी विसर्जन करायचे इतके साधे सोपे नियम इथल्या सार्वजनिक ठिकाणच्या समारंभासाठी असतात. त्यामुळेच कर्नाटका राज्योत्सव हा फक्त १ नोव्हेंबरला साजरा करायचा असे काही नसते. हा महिनाभर ज्यांना जसे जमेल तसे ते साजरा करतात. कन्नडीगा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरीही ते हा दिवस साजरा करतातच. कन्नड भाषा तिच्या वेगवेगळ्या बोलींसह – बेळगाव, धारवाड, चामराजनगर, विजापूरपासून ते मेंगलोरपर्यन्त सगळ्यांना जोडून ठेवते. त्यात आमच्या बेंगलोरमध्ये या सगळ्यांचे प्रतिनिधित्व बघायला मिळतेच. त्याचबरोबर बाहेतरून येऊन इथे स्थायिक झालेले काही जण इथली भाषा शिकतात; तर काही जण भाषा न शिकताही या गावाला आपलेसे करतात. हे सर्वजण केवळ सुट्टी असते म्हणून नाहीतर कर्नाटकाच्या मिठाचे ऋण जाणण्याचा एक मार्ग म्हणून हा राज्योत्सव साजरा करतात .
