कामशेत   भाग १     

इसवी सन  – १९९३ 

वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव –  संपादक. 

  कामशेतपासून टमटम अथवा बसेस पकडून अंदरमावळ म्हणतात अशा दुर्गम भागात जावं लागतं. छोटी छोटी खेडी, वस्त्या आणि सर्वत्र हिरवंगार असलेला परिसर, अध्येमध्ये  इंद्रायणीचं होणारं दर्शन आणि इंद्रायणीच्याच नावाच्या  आणि आंबेमोहर भाताच्या  पिकाचा दरवळ . कामशेतला सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे . इंटर्नशिप इथे मिळाली आहे . बरोबर असलेले मित्र आपापल्या ध्येयात मग्न . एकजण  UPSC  देणार आहे . एकजण डॉक्टरकीत खूप  रस असल्याने तळेगावच्या एका इस्पितळात काम करतो आहे… 

आणि मी… 

मला शोधतो आहे – उत्तरं समाधानकारक नाहीयेत तरीही!

 इथले वैद्यकीय अधिकारी मुरलेले आहेत . त्यांना इथे शिकाऊ डॉक्टरांनी राहायला नकोच आहे . पहिल्याच दिवशी त्यांनी दमात घेऊन सांगितलंय की आता लावलेल्या वारी तुम्ही हजर नसाल आणि OPD पाहिली नाहीत;  तर तुमची वरती तक्रार करेन . 

मी बाहेरगावचा विद्यार्थी . घरी राहून काम करावं असं नाहीये . मेडिकल कॉलेज हॉस्टेल कागदावर सध्या संपलंय . याच टप्प्यावर येताना प्रचंड कंटाळा आलेला आहे . भव्यदिव्य स्वप्नेच नाहीयेत. 

 वाचन, सिनेमे ,नाटक ,कविता तेव्हाही अव्याहतपणे सुरू होतं अन् आताही! त्यामुळे मायबाप सरकार महिना १२०० रु. चा स्टायपेंड देतंय; तर राहून निदान डॉक्टर म्हणवण्याइतपत तरी काम शिकावं अशी इच्छा आहे . आजूबाजूला चिकार फिरावं , मध्येमध्ये चहा सिगारेट प्यावी, भरपूर वाचन करावं, नेमस्त काम करून आपली तक्रार होऊ नये हे पाहावं इतकंच काय ते उद्दिष्ट समोर आहे!   

     परंतु इथे वेगळंच घडलंय . मी दुसरे दिवशी माझे काम आटोपून मुख्य डॉक्टरांना भेटलो आणि म्हणालो, “सर, जरा काम होतं!” 

 सर : मला काम आहे. तुला थांबावं लागेल . लोकल चुकेलही तुझी आणि सुट्टीचं  काही म्हणणार असशील तर जमणार नाही . 

मी : नाही सर मला…       

….. थांब तिकडे नंतर बोलावतो . 

हा ‘नंतर’ यायला तासभर सहज  लागला . कंटाळलो तरी थांबलो. प्रश्नच जटिल होता. 

“काय रे?”

“सर, मी कुठे रहायचं?”

“पुण्याला, होस्टेलमध्ये नाहीतर घरी.”

“नाही सर मी पुण्याचा नाही आणि होस्टेलला आता कसं राहणार ? इथली काय व्यवस्था असेल ती मला चालेल.”

“अरे, इथे अशी व्यवस्था नाही.” 

“मग सर मला तसं  लिहून द्या. मी जातो आणि दाखवतो तुमचं पत्र.”

“अरे नाही, तसं नाही, बस की, ” असं म्हणून त्यांनी मला खुर्ची देऊ केली. 

“अरे हवं तर दोन आठवड्यांत एकदा ये; पण कशाला उगाच कटकट ?”

 ”नाही सर त्यांनाही समजू दे की सगळे लोक नुसतीच गम्मत करत नाहीत.”

शेवटी कां कूं करत माझे मनोधैर्य खचवत कोपऱ्यातले एक क्वार्टर उघडले.

   प्रचंड धूळ, कोळिष्टकं, उंदीर, फुटकी कौलं , वापरात नसलेले शौचालय, पाण्याचा अर्थातच प्रश्न आहेच! 

तरीही मी राहणार  म्हटल्यावर दोन लोक सफाईला दिलेत. थोडं साफसूफ करत ,धुळीने खोकत खोली आवरली, तशीच कडी घातली अन् मग उद्या सामान घेऊन येतो म्हणून परत पुण्याच्या होस्टेलवर आलो . अगदी घासूनपुसून मरमुराद अंघोळ आटोपली . डबेवाल्या मावशींना सांगितले, ‘मी आता काही दिवस नाही.’

 एका सूटकेसमध्ये कपडे , थोडी पुस्तकं, छोटा रेडियो आणि सॅकमध्ये उरलेले सामान भरून तयार झालो . एका बादलीत सटरफटर वस्तू भरल्या .  सकाळची ८ :२० ची पुणे लोणावळा लोकल घेऊ- त्याला गर्दी कमी असते. 

           वसतिगृहात आजूबाजूला पॅरासाईट म्हणून राहणारी मुलं चेष्टा करताहेत . परवा सकाळीच परत येणार म्हणून हसताहेत. मी चिडून सांगतोय की नाही मला राहायचं आहे तिथं . 

सकाळ झाली . सर्व आवरून निघालो . स्टेशनवर आलो . डब्यात चट्कन शिरलो; कारण सामानही होतं. शिवाजीनगर ,खडकी ,दापोडी ,आकुर्डी, देहूरोड ,घोरावाडी, तळेगाव,वडगाव अन् मग आलं कामशेत. उलट्या बाजूला सकाळी गर्दी कमी कमी होत गेली. उतरलो . चढण चढत एका हातात सूटकेस, दुसऱ्या हातात पिशवी, खांद्यावर सॅक लटकवत  पोचलो तेव्हा दहा  वाजत होते. मला बघून खिडकीत उभे असलेले तिथले डॉक्टर पटकन आत गेले . 

         खोली उघडली. लख्ख  उजेडात आणखीन भयाण वाटले . पोपडे पडणाऱ्या भिंती, गंजकी कॉट, भयानक डागाळलेली गादी आणि  भिंतींवरच्या छिद्रांत लपलेली ढेकणांची पिलावळ. हे बेटे काही पिच्छा सोडत नाहीत. आज काही माझा ओपीडी वार नव्हता. झट्कन शॉर्ट चढवून मळका टी शर्ट घालून  सफाईकार्य सुरू केले . अगदी तोंडाला नाकाला घरून  येताना वडिलांनी हट्टाने दिलेला पांढरा मोठा मऊ रुमाल बांधला. दवाखान्याच्या आवारातून आणलेला मोठा झाडू, खराटा, घेऊन सगळं स्वच्छ केलं.  बादलीभर पाण्यात सर्फ टाकून त्यानेच फरशी जोरदार धुऊन काढली. भिंती साफ केल्या.  बाथरूम आणि संडास धुऊन काढले. 

तिथे राहणारे लोक लांबून मजा  बघत होते. मदतीला कोणी आलं नाही; फक्त समोरच राहणाऱ्या पोक्त सिस्टर  डोकावून काळजीने सांगून गेल्या, “डॉक्टर, प्यायचं पाणी मी घरून देईन तुम्हांला, इथलं पाणी पिऊ नका बरं!” 

          तास दोन तासांत सगळं झालं. भिंतीची भोकं लांबीने बुजवली;  मग मात्र शिपायाला हाक  मारून कॉट अंगणात घेतली. अंगण म्हणजे अगदी आवारच ते. एव्हाना त्या दिवशीचे इंटर्न आले,शिकाऊ नर्सेस आल्या. मुख्य डॉक्टरसाहेब उग्र वासाचे  अत्तर लावून कटाक्षही न टाकता समोरून चालते झाले. मीदेखील मुलखाचा हट्टी होतोच. जुनी वर्तमानपत्रे आणवली , थोडे रॉकेल आणले आणि तो पलंग जाळायला घेतला. ढेकूण जळण्याचा घाण वास येऊ लागला; परत सर्व झटकून तुकारामच्या (शिपाईदादा ) मदतीने  कॉट आत घेतली  आणि लक्षात आले बापरे गादीचे  काय ?

“तुकाराम, अरे चांगली गादी  असेल ना ?” 

“त्ये सायबाला इचारावं लागन…” 

“मग विचार की”

“OPD संपू द्या नायतर सायेब खवळंल…”

“बरं मग तू विचारशील का?” 

“हो सायेब… सायेब… मच्छर लै हितं, 

कासवछाप आणली का?”

“नाही रे …” 

“मंग म्या आणतु पटकिनी …” 

” बरं बरं, अरे पन्नासची नोट आहे, चहा पण घे तू!”  

          थकून त्या कॉटवर तशीच चादर टाकून पडलो आणि जोरात गुंगी आली. घुमणाऱ्या पंख्याचा आवाज सोबतीला असताना एकदम लोकलच्या गर्दीत जोरदार लोटला जातोय असे स्वप्न पडून धसकून जाग आली. घड्याळात तीन वाजताहेत.  खिडकीतून बाहेर पडलेले उन्हाचे कवडसे , घशाला कोरड पडलेली. क्षणभर मी कुठे आहे, काय करतो आहे कळेना; मग लक्षात येऊन सगळं आवरून म्हणजे नीट शर्ट पँट घालून बाहेर आलो. हा तुकाराम कुठे गेला असेल? दोन  तास तर झाले. असाच चिंताक्रांत उभा असताना सिस्टर डोकावल्या. “का हो डॉक्टर, या चहा प्यायला.” 

“नको सिस्टर, मी तुकारामाची वाट बघतोय”

“अहो येईल तो. या जरा सकाळपासून खूप कामं केलीत. ” त्यांच्याकडे गेलो. त्यांना दोन  मुलं कॉलेजातली.

त्यातला एकजण घरी  होता- त्याची ओळख झाली. त्याच्याशी बोललो तेवढ्यात पट्कन त्या माउलीने चहा-पोहे, पाणी दिलं; संकोचल्यासारखं वाटलं; पण पोटात आग होती. परत तुकारामचा विषय निघाला. सोन्या- त्यांचा चिरंजीव- डोक्यावर हात मारत बोलला, “लावला थुका डॉक्टरला, का रे ? कितीची नोट पन्नास की शंभर?” 

“पन्नास!” 

“तो पडला असेल घेलारामच्या ठेल्यावर झोकून!” 

 कल्याण झालं! आता शिल्लक ५०० रु आणि आज बारा  तारीख! 

“डॉक्टर संध्याकाळी पण या जेवायला!” 

“नको आता!” 

“असू द्या हो, तुमचे बस्तान बसले की  चालू द्या तुमचं तुमचं!”

 बादली भरून घेतली; कारण पाणी दोनच तास येतं- तेही सकाळी! पिण्याचं पाणी जगात भरलं . खोलीत येऊन पडलो . झपाट्याने अंघोळ केली . भिंतीतल्या एकमेव कपाटात चार  कपड्यांचे ड्रेस रचले . मस्तपैकी पांढरा झब्बा पायजमा घातला अन् रेडियो लावला . मराठी भावगीते सुरू झाली . एकदम प्रसन्न वाटले . उदबत्त्या पेटवून मी इकडे तिकडे खोचल्या आणि मस्त लोळत पुस्तक हातात घेतलं. अक्षरचा दिवाळी अंक अन्  रत्नाकर मतकरींची Adam…  

बाहेर अंधारत गेलं आणि अचानक रेडिओकडे लक्ष गेलं तेव्हा “मैं जिंदगी का साथ निभाता चला गया …” चालू होतं . आधी छोटी गोल्ड फ्लेक स्पेशल पेटवली आणि देव आनंदचा विभ्रम आठवत साठवत गेलो. 

            मग अचानक सरसरून डोळ्यांत पाणी आलं. हे सगळं न आवडलेलं करत  आपलं आयुष्य नक्की  कुठे चाललं?… हे डॉक्टर व्हायला बघणं! अक्कल नसते त्या काळात खूप मार्क्स पडले, त्या व्यवस्थेत हुशार ठरलो .  पुढे फक्त दोन पर्याय असणाऱ्या मध्यमवर्गीय स्वप्नांनी भारलेल्या घरातून आलेलो आपण . त्या वेदना , त्या जखमा , ते मानवी शरीराचे आजार बरे करण्यासाठी आपण शिकलो; पण त्यात  थोडेतरी रमलो का ? बरोबरचे बहुसंख्य लोक आनंदाने सर्व करतात.  शिकायला बघतात.  टाके घालायला , प्रसूती करायला , झटके देणाऱ्या, निपचित पडलेल्या ,आक्रोश करणाऱ्या जीवांना धीर देऊ बघतात आणि आपण… 

त्या वेदना नको, ती तडफड नको, त्या बाळंत होणाऱ्या स्त्रीच्या आक्रोशाची भीती वाटते . अंगावर येतं  ते सर्व आणि आता त्या चक्राचा  भाग  असणाऱ्या क्रमात हट्टाने एकाकी उतरत गेलेल्या या रात्री डोळ्यांत फुकाचे पाणी आणून काय करतो आहोत ?

क्रमशः 

Author

2 thoughts on “कामशेत   भाग १     

  1. तिसरा ” अंतर्नाद” हातात…नाही, मोबाईलमधे आला. बरोबर अनिलची सुचना ….हरिशचा लेख आहे आत. प्रथम संपादकिय वाचायचा नेहमीचा शिरस्ता मोडला अन् हरिशचा लेख वाचला. नेहमीचा सतेतोड तरीही हळवा हरिश इथेही दिसला. त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले..पण मला वाटते या प्रश्नांना उत्तरे नाहीत. धरणीवरच्या देव- दानवांच्या या मिश्रकांत दानव काहीसे वरचढ असावेत! हरिशचे प्रश्न हे केवळ अरण्यरूदन !

  2. वा ! सुरूवात तर छान झाली.आता ग्रामीण वातावरण व ग्रामीण व्यक्तिमत्वे यांचा आस्वाद घ्यायचा.

Leave a Reply