रवींद्रनाथांची स्त्रीविषयक धारणा व भूमिका 

 

          रवींद्रनाथांची स्त्रीविषयक धारणा,भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या साहित्य रचना : कथा ,कादंबऱ्या, लेख ,पत्रं यांचा उपयोग होतो; शिवाय त्यांच्याच घरातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘भारती’ या मासिकात त्यांनी केलेल्या लेखनाचाही!  या भारती पत्रिकेची संपादक होती त्यांची ज्येष्ठ दीदी स्वर्णकुमारी देवी घोषाल. ती अत्यंत बाणेदार आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेली स्त्री होती. तिनेही वाङ्मयनिर्मिती केली होती. १८८९ साली पंडिता रमाबाई सरस्वती यांचं पुण्यात ‘स्त्री पुरुष समानता’ या विषयावर भाषण होतं. त्या भाषणाला रवींद्रनाथ आवर्जून उपस्थित राहिले होते.  ही सभा पुणेकरांनी उधळून लावली; तरीही स्त्री-पुरुष समानतेवर जे काही थोडं भाषण त्यांनी केलं  त्याविषयी किंवा  त्यावर रवींद्रनाथांनी एक निनावी पत्र लिहिलं आणि ते भारतीमध्ये प्रसिद्ध केलं. त्यावेळी त्यांचं वय होतं २८.  त्यांची अत्यंत लाडकी वहिनी- ‘कादंबरी देवी’ या जगात नव्हती(१८८४). कादंबरीदेवींनी आत्महत्या करण्यापूर्वी तीन-चार महिने रवींद्रनाथांचे लग्न भवतारिणी उर्फ मृणालिनी यांच्याशी झालं होतं. ऐन तरुण वयातल्या रवींद्रनाथांनी पंडिता रमाबाईंच्या भाषणाला उद्देशून जे पत्र लिहिलं होतं त्यावर खूप गदारोळ झाला. स्वतः स्वर्णकुमारी देवींनी त्यांच्या पत्राला सडेतोड  उत्तर दिलं. रवींद्रनाथांची भूमिका पंडिता रमाबाईंच्या विरोधातच होती. गर्भधारणा आणि मद्यपान सोडल्यास स्त्री- पुरुष समानच  आहेत या मताला त्यांनी विरोध केला होता. लिहिलं होतं, ‘स्त्रिया  पुरुषांची बरोबरी कधीही करू शकणार नाहीत. ‘गर्भधारणा जर नसेल तर,’ वगैरे जर- तरची भाषा म्हणजे निव्वळ वाचाळपणा! स्त्रियांनी पुरुषावलंबन करून राहणे हेच नैसर्गिक,’ वगैरे. रमाबाईंची सभा  उधळणे त्यांना बिलकूल आवडले नाही; पण रमाबाईंनी मांडलेला समानतेचा मुद्दाही पटला नाही. यावर तत्कालीन विदुषी डॉक्टर सुतपा भट्टाचार्य यांनी लिहिलं, ‘स्त्रिया केवळ पुरुषांच्या कामासाठीच जन्मल्या असून त्यांच्या आयुष्याला दुसरा काही अर्थ नाही,’ असं जे मत आहे ते असभ्य आणि  घृणास्पद  आहे. 

   याचा अर्थ त्या काळातही ‘स्त्री पुरुष समानता,’ ‘स्त्री शिक्षण’ ह्या विषयांवर भरपूर चर्चा आणि विचारमंथन होत होते.  ह्या पार्श्वभूमीवर रवींद्रनाथांची वाङ्मयनिर्मितीही जोरात चालू होती.  पत्नी , पाच मुलं आणि शिलाईदह इथल्या  जमीनदारीची , इस्टेटीची वडिलांनी टाकलेली जबाबदारी यांतून सतत  तऱ्हेतऱ्हेच्या  लोकांशी, शेतकऱ्यांशी ,गरिबांशी रवींद्रनाथांचा संबंध येत असे. त्याविषयी त्यांनी अनेक कथा लिहिल्या; तसेच गरीब ,मध्यमवर्गीय, जमीनदार आणि त्यांची कुळे यांच्या विषयीही कथा लिहिल्या. गरीब आणि मध्यमवर्गीय स्त्रियांच्या कुटुंबांच्या कथा लिहिताना तत्कालीन समाजातल्या रूढी, प्रथा, परंपरा लक्षात घेऊनच त्या बहुधा लिहिल्या असल्यामुळे त्यांची स्त्रीच्या बाबतीतली भूमिका रूढीकडे झुकणारी, पारंपरिक आहे असं वाटतं.  मुलगी वयात आली की तिला उजवलीच पाहिजे नाहीतर; ‘लोक काय म्हणतील!’ ही भीती!  ‘शुभा’  या कथेत शुभा ही  तरुण, सुंदर असली तरी ती मुकी  आहे.  वयात आल्यावर आईबाप तिचे  लग्न लांब कलकत्त्याला जाऊन करतात. वधू मुकी  आहे हे लक्षात आल्यावर तिचा त्याग करून नवीन “भाषाविशिष्ट”  बोलणारी कन्या आणली जाते. रवींद्रनाथ लिहितात, ‘वराने डोळे आणि कान यांच्याद्वारे परीक्षा करून ‘एक भाषा विशिष्ट’ अर्थात बोलणारी कन्या लग्न करून आणली.’ म्हणजे पालकांना वाटत असलेली लोकलज्जा आणि रूढी यांचीच  शुभा बळी ठरली.  

   याच काळात म्हणजे १८९१-९२ मध्ये लिहिलेल्या दोन कथा – ‘महामाया’ आणि ‘जिवंत मृत.’  शुभापेक्षा या कथा थोड्या वेगळ्या आहेत. ‘देना पावना’ हीदेखील त्याच काळातली. या कथेत तीन मुलांच्या पाठीवर झालेली कन्या – सुंदर तरुण ‘निरुपमा’ वरपक्षाचा धनलोभीपणा आणि गरीब बापाची अगतिकता यांना बळी पडते. पुन्हा ‘रावबहादुरांच्या सुनेचा अंत्यविधी काय इतमामानं पार पडला!’ अशी सर्वत्र द्वाही  फिरवणे – हाही खोट्या प्रतिष्ठेचाच भाग, त्याही पुढे जाऊन वरमाता पुन्हा आपल्या मुलाचे लग्न वीस हजार रुपये रोख देणाऱ्या बापाच्या मुलीशी  करण्याची तयारी करते- ही त्यावेळची सामाजिक स्थिती होती.  रवींद्रनाथांनाही स्वतःच्या मुलीच्या लग्नात वधूपिता म्हणून असा अनुभव आला होता . 

  ‘महामाया’मधली नायिका  महामाया तरुण, सुंदर, तडफदार! तरीही वडीलधाऱ्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं पाहिजे! त्याबाबतीत स्वतःचं मत नाही- वडील भावाला प्रेमविवाह मान्य नाही  म्हणून तो एका मरू घातलेल्या म्हाताऱ्याशी तिचं लग्न लावतो. ती विधवा होते. मग तिला  चितेत  ढकलतात; पण मुसळधार पावसानं  चिता विझते,  अर्धवट भाजलेली महामाया बंधन तोडून आपल्या प्रियकराकडे येते.  कधीही चेहरा न बघण्याच्या अटीवर तिथे राहते.   एक दिवस रात्री महामाया आपल्या खोलीत झोपलेली असते. तिच्या चेहऱ्यावर चंद्रकिरण पडलेले असतात. राजीव- तिचा प्रियकर विचारांच्या तंद्रीत आत येतो आणि महामायेच्या चिरपरिचित, सुंदर चेहऱ्याच्या जागी त्याला आगीनं  विद्रूप झालेला चेहरा दिसतो. त्याच्या तोंडून नकळत अस्फुटसा  चीत्कार बाहेर पडतो. महामाया ताड्कन उठते, चेहऱ्यावर घुंगट ओढून तडक घराबाहेर पडते. पुढे तिचा काही ठावठिकाणा लागत नाही.  जी निष्ठा तिला तिच्या प्रियकराला समर्पित करायची होती , ती त्याला विद्रूप चेहरा दिसल्यामुळे नष्ट झाली.  त्या साऱ्याचं पुन्हा एकदा दहन झालं होतं. अशी ही अचल ,निष्ठावान, चितेतून पावन होऊन आलेली; पण अखेरीस विधवेच्या  वाट्याला जे  येतं तेच महामायाचं  झालं. तर, ‘जीवित आणि मृत’ या कथेतील विधवा नायिका  कादंबिनी. तिच्या तर जिवंतपणीच  मरणभोग वाट्याला येतो! घडतं असं- काही कारणाने  बेशुद्ध पडलेल्या कादंबिनीला मृत समजून अग्निसंस्कारासाठी खाटेसगट स्मशानात आणतात. धुवाधार पावसात, दाह संस्काराचे सामान आणण्यासाठी दोघेजण जातात आणि दोघे खाटेपाशी थांबतात; पण भयंकर पाऊस आणि वारा यांमुळे कादंबिनीला शुद्ध येते. जवळ असलेल्या दोघांना वाटतं, ‘प्रेत हलतंय, कुशीवर वळतंय,’ म्हणजे तिचं ‘भूत’ झालंय असे समजून ते दोघे पळून जातात. दाह संस्कारासाठी कुणीच येत नाही. कादंबरी उठून चिखलपाण्यातून कशीबशी बाहेर पडते.  तिला जाणवतं की जगाच्या दृष्टीने आपण जिवंत नाही.  स्वतःला मृत समजून ती वाट फुटेल तिकडे जात असते .  अखेर  ती सासरच्या गावी कशी येते माहीत नाही; पण येते. एकुलत्या लाडक्या पुतण्याच्या आठवणी बहुधा तिला घरी परत आणतात. “काकी मा पाणी,” म्हटल्यावर ती त्याला पाणी देते.  तो म्हणतो, “काकी मा, तू मेली होतीस ना? पण आता पुन्हा नको मरूस.” मग त्याला ती प्रेमानं उराशी धरते.  तिला खूप चांगलं वाटतं . पण तिथे तिची जाऊ येऊन पाहते आणि ती बेशुद्ध पडते.  दासी सासरेबुवांना बोलवून आणते. सासरे म्हणतात, “सूनबाई, या संसाराचा तू त्याग  केलास ना, मग तोड ते पाश! तुझी काही इच्छा राहिली असेल तर आम्ही ती पूर्ण करू; पण आता तू जा पाहू!”  कादंबिनीला ते बोलणं जिव्हारी  लागतं . ती म्हणते “तुम्ही मला पाहून का घाबरताय? मी मेलेली नाहीये! खरंच मी जिवंत आहे हो, ” असं म्हणून हातापाशी असलेलीच एक मोठी काशाची वाटी घेऊन कपाळावर दणादणा आपटते. कपाळातून रक्त येतं तरीसुद्धा कोणालाही पटत नाही की ती जिवंत आहे.  असं जाणवल्यावर, “मी जिवंत आहे, मेलेली नाही हो,” असं ओरडत ती थेट गच्चीवर जाते आणि तिथून अंगणातल्या पुष्करणीत उडी मारते आणि मरते.  रवींद्रनाथ लिहितात, ‘कादंबिनीने मरून सिद्ध केलं की ती मेली नव्हती!’ मेल्यावर भूत होणं ही किती चुकीची वाईट अंधश्रद्धा समाजात  प्रसृत  आहे आणि त्याचीच कादंबिनी बळी आहे.

   ‘विचारक’ म्हणजे न्यायाधीश. १८९४ मध्ये लिहिलेली कथा. यातही एक तरुण सुंदर विधवा आहे.  तिचं नाव हेमशशी उर्फ क्षीरोदा. दिखाऊ वैभवाला भुलून अनोळखी तरुणाकडून ती फसवली जाते आणि मग पोटासाठी तिला वेश्याव्यवसाय करायला लागतो.  त्यात मूलही होतं! परिस्थिती इतकी वाईट होते की मुलाला दूध पाजण्याइतकेही पैसे तिच्याकडे नसतात . निराश,अगतिक  होऊन मुलासकट ती विहिरीत उडी मारते. लोक दोघांना वर काढतात परंतु मूल मेलेलं असतं . मग मुलाला जीवे मारण्याच्या आरोपातून तिची तुरुंगात रवानगी होते आणि तिला फाशीची शिक्षा सुनावली जाते.  शिक्षा सुनावणारा जज्ज – न्यायाधीश विनोदचंद्र उर्फ मोहित मोहन , ज्याने हेमशशी ऊर्फ क्षीरोदाला वयाच्या चौदाव्या वर्षी फसवलेलं  असतं. अशा अनेक मुलींना त्यानं फसवलेलं  आहे; पण शिकून तो जज्ज – न्यायाधीश बनतो. फाशीपूर्वी हा विनोदचंद्र ‘स्त्री बंदी शाळेत’ क्षीरोदाला  कृतकर्माचा पश्चात्ताप झालाय की नाही हे पाहायला आलेला असतो. त्यावेळी तिचं दारवानाशी भांडण चाललेलं  असतं;  कारण त्याने तिची अंगठी; जी तिला अत्यंत प्रिय असते, ती काढून घेतलेली असते.जज्जला वाटतं ‘उद्या फासावर जायचं आहे; तरी दागिन्याचा लोभ  सुटत नाही!’ म्हणून तो ती अंगठी बघायला मागतो.  तर त्या अंगठीवर ‘विनोदचंद्र’ असं नाव कोरलेलं असतं. ते पाहताच त्याला गत आयुष्यातील ती घटना आठवते. क्षीरोदा उर्फ हेमशशीचा कोवळा, भाबडा, सलज्ज,भयभीत  चेहरा आठवतो.रवींद्रनाथ लिहितात, ‘समोरची पतिता, कलंकिनी रमणी त्याला सुवर्णमय देवीप्रतिमेसारखी भासते.’ 

त्याकाळी बाल, तरुण विधवांचा गैरफायदा घेत पुरुष मात्र उच्च, प्रतिष्ठित म्हणून खुशाल वावरत असत. क्षीरोदा ही तशाच बेगडी , प्रतिष्ठापन्न ढोंगाला बळी पडलेली आहे. ‘उद्धार’ मधली गौरी तरुण, सुंदर, खानदानी मुलगी; पण तिचा वकील नवरा परेश संशयी असल्यामुळे पतिसहवास आणि सुखाला आचवलेली. चिडून ती एका संन्याशाच्या आश्रमात मनःशांतीच्या शोधात जाते, नवऱ्याला न जुमानता! मग परेश तिचा आणखीनच छळ करू लागतो.  तिला कोंडून ठेवतो.  भोंदू संन्यासी तिला चिठ्ठी पाठवून पुष्करणीच्या काठावर मध्यरात्री भेटायला बोलवतो आणि ‘मी तुझा उद्धार करू इच्छितो,’ असं सांगतो. ती चिठ्ठी परेशच्या हाती पडते.  गौरी चिठ्ठी शोधत परेशच्या खोलीत जाते; तर त्याला फीट येऊन तोंडातून फेस येतोय आणि एका  मुठीत ती चिठ्ठी असं  दृश्य तिला दिसतं.  गौरी डॉक्टरला बोलावते; पण ‘परेश मेलाय,’ असं डॉक्टर निदान करतो. लोक परेशचा  अंत्यविधी करण्यासाठी त्याचे कलेवर आणायला खोलीत जातात तर शेजारीच गौरीचा मृतदेह असलेला दिसतो.  रवींद्रनाथ लिहितात, ‘आधुनिक काळातलं ते विलक्षण सहमरण पाहून सगळे अवाक् होऊन गेले.’ १९०० साली लिहिलेली ही कथा, तुलनेनं प्रगत काळातली; पण गौरीपुढे सहमरणावाचून काय मार्ग होता? पोएटिक जस्टीसनुसार लेखकाने  तोच दाखवलाय; नाहीतर विधवेचं अपमानित जिणं  वाट्याला आलंच असतं !   

    १८९८  मध्ये लिहिलेली ‘पुत्रयज्ञ’ ही कथा.  यातील नायिका  विनोदिनी ही अशीच दुर्दैवी.  नवऱ्याच्या संशयखोरपणाचा बळी ठरलेली तरुणी. मूल होत नाही म्हणून सतत वांझोटी अशी निंदा होत असते.  मैत्रिणीकडे पत्ते खेळायला गेली असताना मैत्रिणीचा दीर  मैत्रीच्या नावाखाली विनोदिनीचा विनयभंग करतो आणि एक दासी विनोदिनीच्या नवऱ्याला भलतंच काही तिखट मीठ लावून सांगते आणि त्यांच्या संसारात वादळ उठतं.  त्यानंतर नवरा वैद्यनाथ तिला घरातून बाहेर काढतो. पुढे वैद्यनाथ पुत्रप्राप्तीसाठी चार लग्नं करतो. तऱ्हेतऱ्हेचे उपाय, गंडे – दोरे , मांत्रिक, जडीबुटी, ताईत असं खूप काही करतो; पण व्यर्थ! दहा वर्षे होतात मग एक महाखर्चिक यज्ञ करतो. त्यात सकाळ संध्याकाळ अन्नदान चालू असतं. एक दिवस नोकराचे लक्ष नाही पाहून एक दुबळी स्त्री एका लुकड्या छोट्याशा मुलाला घेऊन आत येते, म्हणते, “मला काही नको, या मुलाला दोन घास द्या हो,” पण वैद्यनाथाच्या सांगण्यावरून नोकर त्या दोघांना हाकलून देतो. तो भुकेला छोटा जीवच वैद्यनाथचा एकमेव पुत्र असतो. या कथेत कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सत्य न पडताळल्यामुळे नवऱ्याच्या – पुरुषाच्या संशयाला बिचारी विनोदिनी बळी पडते. शिवाय फालतू अंधश्रद्धांच्या आणि आचरट रूढीपरंपरांच्या आहारी श्रीमंत लोक सुद्धा कसे गेलेले असतात हे दिसते. अजूनही लोक पुत्र, संतान प्राप्तीसाठी तऱ्हेतऱ्हेचे   वेडे उपाय करताना दिसतात. मधल्या मध्ये स्त्रीचा बळी जातो! 

                 १८९१ मध्ये लिहिलेली ‘कंकाल’ ही गोष्ट विलक्षण कल्पनाविलासातून यातील नायिका ‘कनकचाफा’ हिच्या तोंडून रवींद्रनाथांनी सांगितली  आहे. कंकाल म्हणजे सांगाडा. कनकचाफाचा  सांगाडा शरीर विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलायला लागतो . खूप दिवसांनी कोणीतरी भेटल्यामुळे मन मोकळं करतो.  कनकचाफा नावाप्रमाणेच सुंदर, तरुण; पण लग्नानंतर दोन महिन्यांतच विधवा होते; तर ‘विषकन्या’ म्हणून तिची निंदा हेटाळणी करून तिला बापाच्या घरी पाठवतात.  भावाचा डॉक्टर मित्र अविवाहित तरुण  कनकचाफाला आवडतो आणि त्यालाही कनकचाफा आवडत असते; पण केवळ ती विधवा असल्यामुळे त्या दोघांचं लग्न होऊ शकत नाही.  तारुण्यातल्या इच्छा दाबल्या तरी मरत नाहीत, संपत नाहीत.  डॉक्टर दुसरीकडे लग्न करणार असतो; पण ते कनकचाफा होऊ देत नाही.  लग्नापूर्वीच्या पार्टीत डॉक्टरच्या मद्याच्या प्याल्यात विष घालते आणि स्वतःही विष घेऊन मरते.  वास्तविक पाहता तरुण डॉक्टर आणि तरुण विधवासुंदरी कनकचाफा यांचा विवाह व्हायला काय हरकत होती?  पण सामाजिक विरोधपरंपरा- त्यापुढे सारेच हतबल.  शेवटी विधवेला एक तर मरण; नाहीतर काशीमधल्या विधवाश्रमाचा नरक ! 

                १८९५ मध्ये लिहिलेली मानभंजन.  ह्यात गिरिबाला ही एक तरुण सुंदर खानदानी पतिव्रता स्त्री.  गोपीनाथ तिचा पती – नाटकवाला नट.  त्याचे ‘लवंग’ नावाच्या नटीबरोबरचे  संबंध. पुरुषांना पत्नीव्रताचे बंधन नसतेच ! गिरिबाला स्वतःच मग नाटकात काम करू लागते.  तिचं रूप, सौंदर्य आणि विलक्षण अभिनय यांमुळे कलकत्त्याच्या अवघ्या रसिक प्रेक्षकांकडून तिला भरभरून दाद मिळत असते आणि तेच नवरा गोपीनाथला सहन होत नाही.  तो तिला मारायला रंगमंचावर धावतो;  पण गिरिबालेच्या सुदैवाने प्रेक्षकच त्याला रंगमंदिरातून हाकलून देतात. गिरिबाला  गोपीनाथला हरवते ,पराभूत करते.  गिरिबालातील ही दुर्दम्य जिद्द रवींद्रनाथांची स्त्रीबद्दलची धारणा बदलू लागल्याचे  द्योतक  आहे. कुलीन, सुंदर, विवाहित तरुणीनं हे साहस  दाखवणं कौतुकास्पदच आहे.  

            आणखीही खूप  कथा रवींद्रनाथांनी  लिहिल्या.  त्यातली उल्लेखनीय लघुकादंबरी थाटाची ‘योगायोग.’ यातली नायिका  कुमुदिनी.  अभिरुचिसंपन्न ,संगीत- साहित्यप्रेमी, तरुण ,सुंदर;  पण भावाच्या कर्जापोटी एका हेकट संशयी स्वभावाच्या श्रीमंत माणसाशी लग्न करते. त्याच्याशी न पटल्यामुळे माहेरी येऊन राहण्याचे धाडसदेखील  दाखवते. भाऊही तिला साथ देतो.  पण काही दिवसांतच ती आई होणार असल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा रूढी आणि परंपरा आडव्या येतात आणि तिला नवऱ्याकडे पाठवलं जातं.  रवींद्रनाथांच्या लेखणीने अत्यंत संवेदनक्षम प्रतिभेने स्त्रियांच्या जीवनाचे सूक्ष्मातिसूक्ष्म पदर उघडून दाखवले आहेत याची किती उदाहरणे द्यावीत! ‘पोस्टमास्टर’मधली ‘रतन’- अबोध वात्सल्यासाठी आसुसलेली छोटी बालिका, तर ‘शास्ती’ मधली धाकटी जाऊ – स्वतःवर जावेच्या न केलेल्या खुनाचा आरोप घेणारी, ‘नष्टनीड’ मधली ‘चारुता,’ हिच्यात तर रवींद्रनाथांच्या वहिनीचा- कादंबरी देवींचा भास होतो. अगणित कथांतून समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार, रूढिग्रस्तता, स्त्रियांच्या गुणांची अवहेलना, पत्नीविषयी पुरुषांची असंवेदनशीलता, स्वार्थ ,लोभ, संशय, जीवनातल्या भल्याबुऱ्या वृत्तींची सरमिसळ, गाठी -निरगाठी किती सहजपणे सूक्ष्मतेने तरलतेने त्यांनी दाखवलेल्या आहेत. 

                 या सर्वांतून त्यांनी आत्मपरीक्षण करून आत्मपरिवर्तन करण्यापर्यंत त्यांचा दृष्टिकोन बदललेला दिसतो.  जून १९४१  मध्ये लिहिलेली ‘मुसलमानीर गौल्पो’ – मृत्यूपूर्वी महिना सव्वामहिना आधी लिहिलेली ही गोष्ट . हिंदू-मुस्लीम संबंध कसे होते आणि सच्चे किंवा अभिजात मुसलमान हे  खऱ्या ब्राह्मण धर्माला विरोध करत नाहीत हे त्यांना सुचवायचे आहे . त्या काळी डाकू येऊन वरातीमधून वधूला पळवून नेत आणि वर-वधू पक्षांना लुटत.  अशावेळी हबीब  खान- त्याला लोक पैगंबर म्हणायचे- त्याचे कोणाशीच वैर नाही, डाकूसुद्धा त्याच्या म्हणण्याला मान देत असा सच्चा माणूस.  अशाच एका डाकू हल्ल्यातून एका ब्राह्मण कन्येला – कमलाला वाचवतो आणि घरी आणतो. काका काकू, ‘ती बाटली,’ असं मानून घरात घेत नाहीत;  पण हबीबकडे निर्वेधपणे ती तिच्या धर्माचे पालन करते.  हबीबच्या एका मुलाचं आणि कमलाचं प्रेम जुळतं. कमला आपणहून  धर्म बदलते . तिला जाणवतं, ती  बोलूनही दाखवते, “मला धर्म नाही. ज्या धर्माने मला चिरकाल प्रेमाला वंचित केलं, अपमान निंदेच्या कचराकुंडीजवळ स्थान दिलं, त्या धर्मात मला देवतेची प्रसन्नता कधीच दिसली नाही. तिथली देवता सदैव इतका अपमान करत आली की तो मी आजही विसरू शकत नाही;” मग तिचं नाव झालं मेहेरजान.  तेवढ्यात तिच्या काकाच्या दुसऱ्या मुलीचे लग्न असतं . पुन्हा तशीच वधूची वरात.  पुन्हा तसाच डाकूंचा  हल्ला.  पण यावेळी शूर रमणी मेहेरजान उर्फ  कमला आपल्या बहिणीला सोडवते . त्याच हबीबखानच्या आदर्शाप्रमाणे वागते आणि बहिणीला काका-काकू म्हणजे आई-बापाकडे परत घेऊन येते, सांगते, “ही तुमची लेक पवित्र आहे. हे तिच्यासाठी वस्त्र,” हे  घरातही न जाता ,पादस्पर्शही न करता; कारण काका काकूची जात बुडेल! बहिणीला सांगते, “छोटी, तुला काही भीती नाही! मी ज्यांचा आश्रय घेतलाय ते सर्वांना आश्रय देतात. ते कोणत्याही जातीचा विचार करत नाहीत. कधीही गरज पडलीच, काही दुःख संकट आलं तर लक्षात ठेव तुझी एक मुसलमान बहीण आहे तुझं रक्षण करण्यासाठी!” 

   स्त्रीला एवढ्या उंचीवर नेण्याचा गुरुदेव रवींद्रनाथांचा हा दृष्टिकोन खरोखर असाधारण ,विलक्षण आहे. या कथेला हिंदू-मुस्लीम संबंधांची पार्श्वभूमी आहे.  एखादी हिंदू रमणी कमलाच्या ताकदीने  एखाद्या मुसलमान मुलीला असं वाचवू शकेल का? असा प्रश्न माझ्या मनात येतो; पण १९१४ साली प्रकाशित झालेली ‘स्त्रीर पत्र’ – पत्नीचे पत्र ही कथा इतर कथांपेक्षा खूप वेगळी आहे.  आतापर्यंत रंगवलेल्या विधवा, पतिव्रता, रूढीला बळी पडलेल्या स्त्रिया चितारून गुरुदेवांनी तत्कालीन सामाजिक वातावरणात स्त्रियांची काय स्थिती होती ते  दाखवले; पण त्यात एकतर स्त्री परिस्थितीला शरण जाते किंवा मरून जाते. ‘चोखेर  बाली’ मधली विनोदिनी  तडफदार, हुशार पण विधवा आहे; त्यामुळे शेवटी ती विधवाश्रमात जाते. ‘मुसलमानीर  गोल्पो’ मधली कमला ही खूप नंतरची आहे – वेगळीच आहे . ‘स्त्रीर  पत्र’  मधली मृणाल -मृणालिनी.  मृणालिनी हे नाव गुरुदेवांच्या सहधर्मचारिणीचं होतं.  ती कथा लिहिली तेव्हा मृणालिनीदेवींचे निधन होऊन बारा वर्षे होऊन गेली होती. पाच अपत्यांना जन्म देऊन वयाच्या अवघ्या २९  व्या वर्षीच त्यांनी इहलोक सोडला. गोष्ट वाचल्यावर असं वाटतं या पत्राची नायिकासुद्धा मृणाल हा काही योगायोग नसावा.  हीच मृणालिनी जणू या पत्रातून पुन्हा जन्माला आली आहे नव्या रूपात. अन्यायाविरुद्ध स्त्रियांनी कसा भक्कमपणे लढा दिला पाहिजे, प्रसंगी घर सोडावं लागलं तरी चालेल; पण माणुसकीला काळिमा  असणारं  वागणं आणि बोलणं सहन करता कामा नये.  प्रतिकार शंभर टक्के केला पाहिजे. मृणाल  तेच करते. ती सुंदर आहे; पण त्याहून जास्त ती बुद्धिमान आहे . तिच्या रूपसौंदर्यामुळे तिला सून करून आणली आहे . नवरा लवकरच तिचं रूप विसरतो; पण बुद्धीची चुणूक तर पदोपदी दिसते.  जावेची बहीण बिंदू आश्रयाला येते तेव्हा तिला मनापासून आधार एकटी मृणालच  देते. प्रेम देते.  घरातले बाकीचे सर्वजण मात्र तिला ‘कपाळकरंटी , खायला कहार,’ अशा विशेषणांनी जिणं नकोसं करतात.  शेवटी तर एका वेड्या माणसाशी तिचे लग्न लावून देतात.  तिथून ती पळून येते. मृणाल तिला पुन्हा आधार देते.  मृणालची सासू म्हणते, “कसाही असला तरी नवरा तो नवरा! स्त्रीला दुसरं  स्थान नाही,” आणि पुन्हा जबरदस्तीने तिला सासरी पाठवतात . त्याहीवेळी मृणाल खूप विरोध करते; पण तिचं काही चालत नाही. अखेरीस बिंदू स्वतःला जाळून आत्महत्या करते.  त्यावरही सासरचे लोक म्हणतात, “आजकाल जाळून घेण्याची फॅशनच निघालीय  बायकांत!”  बिंदूच्या बहिणीसकट सर्वांचं माणुसकीशून्य वागणं पाहून मृणाल आत्याबाईंबरोबर तीर्थयात्रेला जायचं ठरवते . नवरा अनुमती देतो. नवऱ्याच्या  आत्याबाईंबरोबर तीर्थक्षेत्री आलेली मृणाल तिथेच राहते; म्हणजे तसं ठरवूनच ती आलेली असते आणि तिथून हेच  पत्र ती नवऱ्याला लिहिते, ‘आता त्या घरात मी परत येणार नाही. डोळ्यांसमोर बिंदूचं जगणं आणि मरण मी पाहिलं. बाईमाणसाची काय किंमत आहे ते कळलं . कसलं क्षुद्र जिणं ते ! क्षुद्र नियम, ती बंधनं, रोज तेच तेच बोलत क्षुद्र गोष्टींसाठी मरमर मरायचं-दीनपणाच्या विळख्यात! ‘ शेवटी लिहिते, ‘आता मी तुमच्या त्या गल्लीला भीत नाही, माझ्यासमोर अथांग निळा सागर आहे आणि डोक्यावर आषाढातले मेघपुंज . जगाशी आणि जगदीश्वराशी माझा संबंध आहे हे आज मला पंधरा वर्षे तुमच्या घरात काढून या सागरतीरी आल्यावर उमगलं आणि तेच लिहिण्याची आणि सांगण्याची संधी या पत्रातून मिळाली; म्हणजे माझं कवच आता गळून पडलं.  मीरासुद्धा एक स्त्रीच.  ती तर विष पिऊनही  जिवंत राहिली. तिने म्हटले, “सोडून दे बाप, सोडून दे आई, जे जिथे आहे तिथेच राहो; पण मीराला आहे तुझ्याच  चरणांचा ध्यास! प्रभुचरणी लागून राहणं म्हणजेच वाचणं.” मीसुद्धा वाचणार, बचावणार! मी बचावलेय! तुमची चरणतलाश्रय छिन्न : मृणाल.’

   असं हे संपूर्ण पत्र (इथे थोडक्यात मांडले )म्हणजे पुरुषशासित  समाजाचे चित्र मृणालच्या प्रखर लेखणीतून उतरले आहे .  गुरुदेवांची पत्नी मृणालिनीदेवींनीच जणू मध्यमवर्गीय स्त्रियांच्या दुःखाला, कुचंबणेला बांध फोडून वाट करून दिली आहे.  मृणालने  दाखवलेले साहस आणि आत्तापर्यंतच्या कथांतून ज्या स्त्रिया आपण पाहिल्या त्यात मृणालचा धीटपणा वेगळा आहे.  आत्मसन्मान राखून ,कोणालाही न दुखावता, दीनपणाच्या नागपाशातून सुटका करून घेऊन स्वतःचं खरं अस्तित्व आणि स्वत्व आत्मसात करण्यासाठी स्त्रियांना हे  असंच मुक्त व्हावं लागणार आहे.  गुरुदेवांनी कोणत्याही युगातल्या स्त्रीला जणू योग्य असा संदेश दिला आहे. १८८९ साली  पंडिता रमाबाईंच्या भाषणाला निनावी पत्राने उत्तर लिहिणारे, त्यांना पूर्ण विरोध करणारे २८ वर्षांचे रवींद्रनाथ,  १९१४ साली ‘स्त्रीर पत्र’मध्ये मृणालच्या तोंडी पुरुषशासित समाज व्यवस्थेविषयी जी प्रखर भाषा वापरतात ती पाहून गुरुदेवांनी स्वतःत , स्वमतात कसं आणि किती विलक्षण परिवर्तन केलं याचाच प्रत्यय येतो आणि आदराने मन भरून येतं.  एवढं परिवर्तनशील, संवेदनशील मन असल्यामुळे ते विश्वासाठी महामानव झाले.  त्याही पुढे जाऊन १९३६ साली तर ‘नारी’ असा एक प्रदीर्घ लेख त्यांनी लिहिला. त्यामध्ये तर स्त्री हीच विश्वाची उद्धारकर्ती आहे असं म्हणून   त्यांनी स्त्रीशक्तीला आवाहन केले  आहे.  पूर्वापार चालत आलेल्या पुरुषशासित  समाजव्यवस्थेत राजकारण,अर्थकारण, शास्त्र, शासनपद्धती सारंच पुरुषशासित असल्याने एकांगी, एकतर्फी झालेले  आहे.  बायका घरकामात गुंतून जणू अंधार कोठडीत बंदिस्त झाल्यामुळे मानवी समाज व्यवस्थेतील सांस्कृतिक ऐश्वर्य पुरुषांनी कृपणपणाने कमी करून टाकलंय.   ते सांस्कृतिक ऐश्वर्य खरंतर स्त्रियांच्या हृदयभांडारात  बंदिस्त आहे.  आता ‘नवयुग’ आले आहे . भांडाराचे दार  उघडले आहे .  स्त्रियांच्या सहभागामुळे संस्कृतीला अधिक तेज प्राप्त होईल. घर – संसारातून बाहेर पडून स्त्रीने आता विश्वसंसारात पाऊल टाकले. या बृहत्संसाराची जबाबदारी आता तिच्यावरच आहे.  जुने अंधविश्वास, रूढींचा कचरा फेकून देऊन त्यांनी स्वतःचं मन मुक्त करावं,  बुद्धीचं तेज उजळावं! ज्ञानसाधना, तपस्येवर निष्ठा ठेवावी.  नवयुगावर अधिकार मिळवण्यासाठी रूढींचे मोहपाश  तोडून मन सर्वस्वी श्रद्धावान करून सर्व प्रकारची काल्पनिक आणि वास्तविक भीती अज्ञानजडता सोडून द्यावी.  ही अनाठायी भीती अधोगतीच्या गर्तेत  खेचून नेते.  त्यातून मन काढून उन्नत करायला हवं; तरच नवनिर्मिती होऊ शकते – फललाभाची गोष्ट नंतर! इतकेच काय फळ मिळेल न मिळेल; पण योग्यता प्राप्त करणे ही गोष्ट सर्वोच्च स्थानी आहे. १९३६  म्हणजे मृत्यूपूर्वी पाच वर्षं आधी स्त्रियांच्या संदर्भात एवढे प्रगत ,प्रगल्भ ,उदार विचार मांडणारे गुरुदेव रवींद्रनाथ विश्ववंद्य आहेत. आज मितीसही त्यांचं हे मत अवघ्या स्त्री समाजाला उत्साह देणारं , मनाला उभारी देणारं  आहे . त्यांचं हे मत पुरातन असूनही नवीन आहे. 

 लेखक :  अपर्णा झा  

Author

  • अपर्णा झा

    भाषाशास्त्र एम.ए,पीएचडी.
    बंगाली मराठी भाषाभ्यासक,
    पहिलामराठी बांग्ला शब्द कोष प्रकाशनाच्या मार्गावर,
    रवींद्रनाथ ठाकुरांच्या साहित्यात विशेष रस,गेली वीस वर्षे बंगाली भाषा अध्यापन.
    निखिल भारत बंग साहित्य संमेलन संस्थेकडून ' विद्याव्रती'मानपत्र.

    View all posts

Leave a Reply