‘आमच्या’ वेळी असे नव्हते! 

ही ‘आमची’ वेळ म्हणजे कोणती वेळ ?

‘आमची’ वेळ म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाची वेळ; पण लहान असलो तरी आजूबाजूचे व्यवहार समजण्याइतके तेव्हा मोठे होतो.  नंतर तरुण वयात   तर आम्हांला आणखी खूप काही दिसायला, समजायला लागलं. आजूबाजूला त्यावेळी आम्ही जे काही पाहत होतो त्या वस्तू, ती माणसं, त्यांचे व्यवहार आणि एकूणच जग आजच्यापेक्षा वेगळं होतं.

थोडक्यात ‘आमची’ वेळ म्हणजे पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा काळ. 

साठी-सत्तरीला आलेली पालक मंडळी आपल्या मुला-नातवंडांना अलीकडे सतत ऐकवत असतात, 

“आमच्या वेळी असे नव्हते बरे का!” 

तसं  पाहिलं तर खरं आहे ते. तो काळ आणि त्या काळच्या गोष्टी आता कशा असतील ?  काळाच्या ओघात पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते आणि कधीकधी तर पूलही वाहून जातो. 

मात्र काळाच्या ओघात केवळ चांगल्या गोष्टी नष्ट होतात असे नाही; तर  वाईट गोष्टीही नष्ट होतात. काळाने घडवून आणलेल्या कोणत्याही प्रकारच्या बदलाला आणि संक्रमणाला थोपवता येत नाही.

काळ बदलता किंवा थांबवता येतो का ? आहात का तुम्ही तेवढे सामर्थ्यवान ? नाही ना! मग काळाबरोबर स्वतःला बदला. गेले ते दिवस म्हणून हळहळ व्यक्त करण्यात अख्खा जन्म काढायचा हे काही शहाणपणाचे नाही.

काय आणि काय काय बदललेय ? यादीदेखील करता येईल. अगदी  साध्या साध्या घरगुती वापराच्या गोष्टी घेऊ.

स्वयंपाकासाठी पूर्वी वाटण वाटण्यासाठी पाटा वरवंटा या वस्तूंची  आवश्यकता असायची. कालांतराने या पाटा-वरवंट्याची जागा मिक्सरने घेतली. ज्यांची हयात पाट्यावर वाटण वाटण्यात गेली ते मिक्सरच्या वाटण्याला आज नाके मुरडतात. जी चव पाट्यावरच्या वाटण्याला ती चव मिक्सरच्या वाटण्याला येत नाही म्हणतात. पाट्यावर वाटताना कमरेतून वाकावे लागायचे. त्या कामामुळे पाठीला रगही यायची; दमायला व्हायचे. उभ्याने मिक्सरवर सहज काम करता येते. बटन दाबले की मिक्सर कामाला लागतो. शारीरिक श्रम कितीतरी कमी होतात. केवढा तरी वेळ वाचतो. पण या बाबी लक्षात घेतल्या जात नाहीत.

कोळशाची इस्त्री जाऊन इलेक्ट्रीकची इस्त्री आली तेव्हा जुन्या जमान्यातले पालक म्हणायचे,  ‘कोळशाच्या इस्त्रीने  जशी इस्त्री होते तशी या इलेक्ट्रीकच्या इस्त्रीने होत नाही.’  हे बोलताना त्यांना कोळशाची इस्त्री करताना जळल्यामुळे   कपड्यांना पडणारी छिद्रे आठवत नाहीत.  

पन्नास-साठ  वर्षांच्या कालावधीत बरीच स्थित्यंतरे घडली- लहानशी औद्योगिक क्रांती म्हणता येईल अशी स्थित्यंतरं . गरम पाण्यासाठीचा बंब जाऊन हीटर आले. घरातलं चित्र बदललं आणि बाहेरचं चित्रही बदलत गेलं.   बैलगाड्या, टांगे  ट्राम ही वाहने गेली;  रस्त्याने मोटारी, रिक्षा आणि बसगाड्या धावू लागल्या. नोकरी  करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली. सामान्य माणसांचे नुसते पोशाख बदलले नाहीत; तर त्यांच्या जीवनशैलीतही फरक पडत गेला. 

एकेकाळी आजची पालक मंडळी विद्यार्थिदशेत होती. ती शाळेतून परत येईस्तो  दिवेलागण व्हायची. दिवे लावताना मुले दिव्याला नमस्कार करून प्रार्थना म्हणायची. त्यानंतर पाढे म्हणणे वगैरे प्रकार असायचा. आजचे विद्यार्थी असले काही करत नाहीत.  वयस्क लोक चरफडतात. त्यांना हा संस्काराचा भाग वाटतो; पण अशा गोष्टींसाठी मुलांपाशी आजकाल वेळ असतो कुठे? शाळेतून आल्यावर बिस्कीट, शिरा, वेफर्स असले काहीतरी घशाखाली घालून त्यांना क्लासला पळावे लागते. शाळेतून  गृहपाठ दिलेला असतो,शिवाय टीचरने कसल्या कसल्या प्रोजेक्ट्सचे लचांड मागे लावलेले असते. कॅल्क्युलेटर नव्हते आपल्या पालकांच्या काळात! तेव्हा पाढे पाठ करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसायचे.

” आम्ही तुमच्यासारखे बाहेरून आल्या आल्या टीव्हीसमोर बसत नव्हतो,” असे वडीलधारे म्हणतात. 

किती वेडगळ विधान आहे हे! कसे बसणार? टीव्ही होता कुठे त्या काळात ?  रेडिओ ही एकमेव करमणूक! त्यामुळे जेवताना टीव्हीऐवजी पुढ्यातल्या ताटाकडे बघून निमूट जेवायला लागायचं. गंमत म्हणजे त्या काळात रेडिओ ऐकण्यात रंगणारे  आणि रमणारे पालक आज स्वत:च टीव्हीला डोळे चिकटवल्यासारखे बसलेले असतात. सिरीयल बघत बघत जेवतात. त्याशिवाय  घास उतरत नाही त्यांच्या घशाखाली. 

थोडा मोकळा वेळ मिळताच आजकालची पोरे मोबाईलवर व्हॉट्सअप उघडून एकमेकांना मेसेज पाठवत असतात;  किंवा व्हिडीओ गेम खेळत असतात. घराघरांतले चित्र आहे हे. अशा प्रकारचे अॅडिक्शन बरे नाही हे मान्य! 

पण, ‘आमच्या काळी आम्ही असे तुमच्याप्रमाणे दिवसरात्र मोबाईल घेऊन बसत नव्हतो,’ असे जेव्हा पालक म्हणतात तेव्हा मात्र हसू येते. जसे काही तेव्हा घरोघरी मोबाईल असायचे आणि मोबाईलचे व्यसन नको म्हणून हे थोर लोक मोबाईल कपाटात बंद करून अभ्यासाला लागायचे शहाण्या मुलासारखे!

ऐकावे ते नवलच!

आज चित्र काय आहे ? मोबाईलसारख्या नवनव्या जादुई चिजांनी मुलांइतकीच वडिलधाऱ्यांनाही भुरळ घातली आहे. मोबाईलचे आकर्षण मुलांपेक्षा मोठ्या मंडळींना अधिक आहे असे एका पाहणीत आढळून आले आहे. पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे त्यांच्या लहान वयात अशा गोष्टी नव्हत्या हे उघड आहे. ‘तेव्हा आपण मोबाईल-बिबाईलच्या आहारी गेलो नाही’ अशी फुशारकी मारणं हे काही खरं नाही.  

काळाच्या प्रवाहात नवनवे शोध लागले. कितीतरी अद्भुत नवी उपकरणे निघाली. आनंदाची, सुखप्राप्तीची नवनवी दालने उघडली. मूलगामी शोध वडील पिढीने लावले कबूल; पण नव्या पिढीतल्या तरुणांनी त्या शोधतत्त्वांचा वापर करून उपयुक्त यंत्रे आणि व्यवहारसुलभ उपकरणे तयार केली याची नोंद न घेऊन कसं चालेल ?  ही नवी उपकरणे  करमणुकीची साधने आहेत आणि  अभ्यास आणि संशोधनाला साहाय्यभूत ठरणारी साधनेही आहेत. आजचे तरुण ही दोन्ही साधने  वापरताना दिसतात. आजच्या पालकांनी हे समजून घेतले पाहिजे.

 नव्या तंत्राने माणसाच्या नित्यकामात गती आणली, व्यवहारातील यातायात आणि शारीरिक श्रम कमी केले आणि वेळेची बचत करण्यासाठी हातभार लावला तो वेगळाच! 

कॉंप्युटरसारखी साधने आजची पिढी केवळ सिनेमे पाहायला, गेम खेळायला वापरते हा गैरसमज आहे. माहितीची कक्षा वाढविण्यासाठी अभ्यासाला मदत म्हणून ही साधने वापरणारेही तरुण आहेत. ‘आमचा समीर बघावे तेव्हा  कॉंप्युटरसमोर बसलेला असतो,’ अशी कुरकुर करताना आपली मुले कॉंप्युटरसारख्या नव्या साधनांचा विधायक वापरही करतात हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही? 

खरोखर, किती बदलले आहे समाजचित्र  नव्या तंत्रज्ञानाने!

जुने दिवस आठवा! दुसऱ्या शहरात नोकरीला गेलेल्या आपल्या मुलाशी संपर्क साधायचा असेल तर ट्रंककॉल बुक करायला लागायचा. लाईन  क्लिअर असेल तर तासाभरात तो फोन लागायचा. आता परदेशी वास्तव्य करणाऱ्या आपल्या मुला-नातवंडांशी सेकंदात संपर्क साधता येतो. मोबाईलवर त्याचा आवाजच नाही तर चेहराही दिसायला लागतो. केवढी विलक्षण सुविधा! 

आमच्या वेळी असे नव्हते बोलताना आमच्यावेळी जे नव्हते ते आज आहे हे भान असायला नको का? आमच्या वेळी पितळी बिल्ला घेऊन पैसे काढायला बँकेच्या काउंटरवर रांग लावायला लागायची; आता मशीनमध्ये कार्ड सरकवले की नोटा हातात येतात. कॉंप्युटरवर ऑर्डर देऊन पुस्तकांपासून वॉशिंग मशीनपर्यंत वस्तू घरपोच मिळवता येतात. तिकीट खिडकीसमोर क्यू न लावता घरातल्या घरात कॉंप्युटरसमोर बसून गाडीची तिकिटे काढता येतात.

आता हे खरे आहे की काही चांगल्या चांगल्या गोष्टी काळाच्या उदरात गडप झाल्या . 

उदाहरणार्थ:  संगीत नाटके नावाचा अद्भुत  रंगमंचीय आविष्कार लयाला गेला.  हळहळ वाटावी अशीच ही गोष्ट आहे, मान्य; पण आज रंगभूमीवर जी नाटके येताहेत ती संगीतप्रधान नसली तरी प्रेक्षणीय आहेत, रंगभूमीच्या वैभवात भर टाकणारी आहेत, सादरीकरणाच्या नव्या परंपरा निर्माण करणारी आहेत, नवे विषय धिटाईनं मांडणारी आहेत; पण सौभद्र, संशयकल्लोळ, मानापमान या जुन्या नाट्यकृतींबद्दल भारावून बोलणारे आमचे पालक आजची नाटके फारशी पाहत नाहीत.

आजचे नाट्यलेखन किती सकस आहे, किती वैविध्यपूर्ण विषय तरुण पिढीचे रंगकर्मी मंचावर आणताहेत हे आमच्या आई-वडिलांना, आमच्या आजोबांना दिसत नाही,  त्याला काय करायचे ? जुन्या अजरामर नाट्यकृतींचे पुनरुज्जीवनदेखील आजचे तरुण नव्या उत्साहाने करताहेत. अनंत दामले, राजा गोसावी, राजा परांजपे यांचा सिनेमा विस्मृतीत गेला त्याबद्दल दोन अश्रू गाळू या;  पण त्या  बुजुर्ग कलावंतांबद्दल आदर बाळगून आजचा सिनेमा कालच्या सिनेमापेक्षा सकस आहे हे मान्य करावे लागेल. काही मराठी सिनेमांनी तर ऑस्कर स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. केवळ देशातल्याच नाही तर परदेशातल्या फेस्टिव्हलमध्येही आजचे दिग्दर्शक लहानमोठे पुरस्कार मिळवू लागले आहेत; याची नोंद आमचे ज्येष्ठ नागरिक घेणार आहेत की नाही? 

 ‘ ओल्ड इज गोल्ड ‘ म्हणून जुन्याला कवटाळून बसणे आता पुरे झाले!  नव्यांच्या नव्या धडपडीचे स्वागत करू या. टीव्हीवरल्या ‘ सारेगम’सारख्या कार्यक्रमात जी लहान मुले शास्त्रीय संगीत आणि भावगीते, सिनेगीते, कोळीगीते गाताहेत ती आजच्या संगीताबरोबरच  काल परवाच्या संगीताचा वारसाही पुढे नेताहेत हे जाणून  त्यांचे मोकळ्या मनाने कौतुक करू या. पाडगांवकर, बापट, कुसुमाग्रज हे श्रेष्ठ कवी होते यात शंका नाही; पण त्यांचे गोडवे किती काळ गात राहणार आपण?  आजच्या तरुण कवींनी मराठी कविता कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे! त्यांच्या नव्या रचनांकडे आपण गांभीर्याने पाहणार आहोत की नाही? 

आजच्या प्रतिकूल वातावरणातही विविध विषयांना वाहिलेल्या कितीतरी कादंबऱ्या, कथासंग्रह प्रकाशित होताहेत. समाजातल्या सर्व स्तरांचे जीवनदर्शन घडवणारे, पूर्वीपेक्षा अधिक मोठे विश्व कवेत घेऊ पाहणारे हे साहित्य आहे. आपल्या साहित्यकृतीतून लेखनशैली आणि आशय यांत आजचे तरुण जे प्रयोग घडवताहेत ते पाहण्याजोगे आहेत .

किरण येले, नीरज शिरवईकर, अतुल पेठे , प्राजक्त,दासू वैद्य, योगिनी राऊळ या साहित्यिकांची आणि नाटककारांची नावं कालच्या पिढीच्या कानांवर आली आहेत का ? त्यांनी त्यांची नाटकं , कविता आणि इतर साहित्य   चुकूनमाकूनतरी नजरेखालून घातले आहे का ?

ज्येष्ठ नागरिकांतला मोठा वाचकवर्ग आज पुलंच्या बाहेर यायला तयार नाही याला काय म्हणावे ?

बदलत्या काळाने आपल्या भौतिक आणि सांस्कृतिक विश्वाचा कायापालट केला आहे हे आपण सर्व पाहत आहोत.   सांस्कृतिक विश्वाबरोबर समाजाच्या  नैतिकमूल्यांच्या प्रदेशातही बरीच उलथापालथ झाली आहे. 

सर्वच बदल चांगले आहेत  असं कोण म्हणते?  या संक्रमणाच्या परिणामी थोडीफार पडझडही झाली आहे; मान्य! पण जे चांगले बदल आहेत ते थक्क करून सोडणारे आहेत – त्यांची नोंद घ्यायला नको? 

वाहनात ड्रायव्हींग सीटवर बसल्यावर कुठे कसे जायचे यावर विचार करत बसायची पाळी आता येत नाही. मोबाईलवर गूगल मॅप सुरू केले की लागलीच एका बाईचे धावते निवेदन सुरू होते. ती बाई आपल्याला इच्छित स्थळी पोचण्यासाठी कोणते रस्ते वापरावेत,  कोणती वळणे घ्यावीत याचे  मिनिटामिनिटाला  मार्गदर्शन करत राहते. 

म्हटलं तर ही लहानशी क्रांती आहे;  पण दहा वीस वर्षांपूर्वी आपण कल्पनाही केली नसेल असे हे परिवर्तनकारी तंत्रज्ञान आहे. 

स्मरणरंजनाला आपल्या जीवनात असलेले   महत्त्वाचं  स्थान मान्य करूनही सांगावसं वाटतं… 

 ‘आमच्या वेळी हे असं नव्हतं,’ असं अभिमानानं बोलणं आमच्या बापलोकांनी आता थांबवावं. वडीलधाऱ्यांचा आदर राखून नम्रपणे आणि तरीही काहीशा आगाऊपणे  बोलायचं तर – अभिमानाऐवजी   ‘आज जे आहे ते आमच्या वेळी असते तर…’ अशी हळहळ त्यांनी व्यक्त  केली; तर ते अधिक शहाणपणाचे  नाही का होणार! 

========================

Author

Leave a Reply