गोष्ट अफगाणिस्तानची

इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले, भारताला लुटले, भारताची शिक्षणपद्धती बदलून आपल्याला बौद्धिक गुलाम केले. (ज्या गुलामगिरीतून आपण अजून पूर्णपणे मुक्त झालेलो नाही.) आपल्यावर अत्याचार केले वगैरे सर्व गोष्टी अगदी पूर्णत: खऱ्या असल्या; तरी आपल्याला इंग्रजांच्या साहस व अभ्यासूवृत्ती या दोन गुणांचे कौतुक करावेच लागेल; किंबहुना त्यांच्या या दोन गुणांमुळेच ते आपल्यावरती १५० वर्षे राज्य करू शकले असे मला वाटते. इंग्रजांनी भारताच्या भूगोलाचा, इतिहासाचा,जातिधर्माचा, चालीरिती, रूढी व भाषा यांचा सखोल अभ्यास करून ह्या अभ्यासाचा उपयोग  आपली राज्यव्यवस्था बळकट     करण्यासाठी केला; परंतु त्यांच्या   अभ्यासाचा  भारताला अपरोक्षपणे फायदाही झाला. उदा. : जेम्स प्रिन्सेप याने ब्राह्मी व खरोष्ठी लिपी उलगडून दाखवल्याने इतिहासाचे नवीन दालन उघडले गेले. पुरातत्त्व खात्याचा प्रमुख जॉन मार्शल याने मोहेंजोदडो व हडप्पा यांचा काळ ठरविल्यामुळे भारताचा इतिहास ५५०० वर्षे जुना आहे हे सिद्ध झाले.  समाजात जेव्हा अभ्यासू लोकांची संख्या वाढते तेव्हा त्या समाजाचा आणि राष्ट्राचा उत्कर्ष होतो असे मला वाटते. भारतीयांनी इंग्रजांच्या या गुणांचे फारसे अनुकरण केल्याचे दिसून येत नाही; परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. यापुढे मी अशा एका अपवादाचीच आपल्याला ओळख करून देणार आहे.

मी ज्या पुस्तकाची व त्याच्या लेखकाची गोष्ट सांगणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे ‘सिंहाला शह’ किंवा ‘द चेकमेटेड लायन.’ लेखकाने या पुस्तकाचे असे नाव का ठेवले आहे? त्याचे स्पष्टीकरण लेखाच्या शेवटी देणार आहे. या पुस्तकाचा विषय कोणता? तर तो आहे ‘अफगाणिस्तान  व वायव्य सरहद्द प्रांत (नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर प्रॉव्हिन्स) यांचे ऐतिहासिक व वर्णनात्मक विवेचन.’ 

या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीपाद रामचंद्र टिकेकर. श्री. टिकेकरांनी पुण्याच्या केसरी व मद्रासच्या हिंदू या वर्तमानपत्रांचे प्रवासी प्रतिनिधी म्हणून १९२८-२९ साली वरील भागाचा प्रवास केला. तेथील परिस्थिती स्वत: बघून त्या प्रदेशाच्या इतिहासाचा, ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाचा अभ्यास करून, त्याला नकाशांची जोड देऊन त्यांनी हे पुस्तक सिद्ध केले. या पुस्तकाला नकाशे जोडले आहेत आणि ते या पुस्तकासाठीच बनवले आहेत ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते; कारण इंग्रजीत एक समर्पक वाक्य असे आहे की,

 ‘The History without geography is like a picture without canvas.’ 

सर्वसाधारण भारतीयांना नकाशांचा अभ्यास करावयाचा असतो हीच गोष्ट ठाऊक नसते. असो! हे पुस्तक १९३० साली प्रसिद्ध झाले. या पुस्तकाला केसरीचे तेव्हाचे संपादक न. चिं. केळकर यांची, या पुस्तकाचे व लेखकाचे महत्त्व सांगणारी प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर लेखकाने अनेक अडचणींवर मात करून एक सर्वांगसुंदर पुस्तक कसे सिद्ध केले याची सविस्तर हकीकत दिली आहे.

मुळात १९२८ साली एका मराठी माणसाच्या मनात अफगाणिस्तानसारखा आपला शेजारी (कारण त्यावेळी भारताची फाळणी होईल ही शक्यता कोणालाच वाटत नव्हती.) त्याची राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक परिस्थिती भारतीय चष्म्यातून प्रत्यक्ष जाऊन जाणून घेतली पाहिजे, असा विचार येणे हीच मोठी कौतुकाची गोष्ट आहे. या संदर्भात न. चिं. केळकर प्रस्तावनेत म्हणतात की अफगाणिस्तानबद्दल सांगोपांग माहिती देणारा, अफगाणांच्या राजकीय धोरणाची हिंदी दृष्टीने छाननी करणारा आणि आजमितीपर्यंतचा इतिहास संकलित रूपाने एकत्र आणणारा ग्रंथ इंग्रजीत नसतानासुद्धा तो मराठीत प्रसिद्ध होत आहे ही वाङ्मयवृद्धीच्या दृष्टीने आणि हिंदी राजकारणाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. अपवादाने का होईना साहस आणि अभ्यास या दोन्ही बाबतींत इंग्रजांच्या तोडीचा एक मराठी माणूस निघाला ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते.

१९२८ साली काबूलमध्ये एशियाटिक लीग ऑफ नेशन्सची बैठक भरणार होती. ‘केसरी’तर्फे पत्रकार म्हणून उपस्थित राहून परिषदेची बातमीपत्रे व अफगाणिस्तानची स्थिती यांचे वृत्तान्त काबूलला जाऊन केसरीसाठी पाठवावे असे टिकेकरांनी स्वतःच ठरविले आणि न. चिं. केळकरांना ही कल्पना सांगून त्यांची अनुमती मिळवली. अशी अनुमती देण्याचे कारण सांगताना केळकर म्हणतात की ‘केसरीच्या संपादकाला तरी हिंदुस्थानच्या सरहद्दीपलीकडील वस्तुस्थिती कळलेली असावी, ही लोकमान्य टिळकांची भूमिका होती किंवा धोरण होते.’ या धोरणाला अनुसरून लोकमान्य टिळकांनी काही व्यक्तींना अफगाणिस्तान, नेपाळ व काश्मीर (काश्मीर त्यावेळी स्वतंत्र संस्थान होते.) येथे जाण्यास मदत केली होती. परंतु या व्यक्तींना राजकीय दृष्टी नसल्याने त्याचा  विशेष फायदा झाला नाही. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला अनुसरून मी टिकेकरांना मदत करण्याचे ठरविले. परंतु दुर्दैवाने लीग ऑफ नेशन्सची परिषद रद्द झाली. त्यामुळे माहिती मिळविण्याची मोठी संधी हुकली याचे दोघांनाही दुःख झाले; परंतु अफगाणिस्तानात  जाण्याचा टिकेकरांचा दृढ निश्चय असल्याने त्यांनी खटपट करून अफगाणिस्तानला जाण्यासाठी पासपोर्ट मिळवला; परंतु परत दुर्दैव आड आले. काबूलमध्ये अफगाणिस्तानचा अमीर अमानुल्ला याच्याविरुद्ध बंड झाल्याने अफगाणिस्तानात जाण्याचे सर्व मार्ग बंद केले गेले. एवढे होऊनसुद्धा टिकेकर निराश झाले नाहीत. ते पेशावरला गेले व कराचीमार्गे इराण व मेसापोटेमियाला (हल्लीचा इराक) गेले. या दोन्ही राष्ट्रांच्या सीमा अफगाणिस्तानला लागून असल्याने अफगाणिस्तानची वस्तुस्थिती कळण्यासारखी होती. शिवाय पहिल्या महायुद्धात तुर्की साम्राज्य कोसळल्यामुळे मध्यपूर्वेत ब्रिटिशांचा हस्तक्षेप वाढत होता; त्यामुळे मेसापोटेमियात ब्रिटिशांच्या कशा हालचाली चालू आहेत याचाही आढावा घेता येईल, या विचाराने टिकेकरांनी सीमोल्लंघन केले. येथे केळकरांनी एक सुंदर वाक्य लिहिले आहे, ‘जो आपल्या देशाच्या सरहद्दीवरून मान उंच करून पलीकडे पाहणार नाही त्याचा पाय स्वदेशातही जागी टिकणार नाही.’ हीच चूक देवगिरीच्या रामदेव यादवाने केली. दिल्लीतील सुलतानांच्या हालचालींकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्याचा सपशेल पराभव झाला. टिकेकरांच्या सीमोल्लंघनाबाबत सविस्तर लिहिण्याचे कारण टिकेकरांची जिद्द व केसरीकारांची दूरदृष्टी याची वाचकांना स्पष्ट कल्पना यावी हे  आहे. 

टिकेकरांनी तिकडून पाठवलेली वार्तापत्रं इतकी रंजक असत  की, ‘केसरीचे वाचक या वार्तापत्रांची वाट पहात असत,’ असे केळकर मुद्दाम नमूद करतात. वार्तापत्रे रंजक होण्यामागील एक कारण म्हणजे टिकेकरांची सूक्ष्म विनोदबुद्धी. अफगाणांच्या नाचाबाबत ते लिहतात की आनंदोत्सव साजरा करण्यासाठी केलेला नाच इतका भयंकर व क्रूर वाटतो की त्याचे स्वरूप लढाईपेक्षा भीषण आहे; कारण तो खऱ्या नंग्या तलवारी व गोळ्या भरलेल्या बंदुका घेऊन केला जातो. इतिहास, भूगोल, समाजरचना व धार्मिक आचारविचारांचा पगडा या सर्वांचा परिणाम देशाच्या राजकारणावर कसा होतो हे टिकेकरांनी समर्पकरित्या मांडले आहे.

या लेखाच्या सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे या पुस्तकाचे नाव आहे, ‘सिंहाला शह.’  टिकेकरांनी या पुस्तकाला असे कोड्यात टाकणारे शीर्षक का दिले असावे याचे विवेचन करून हा लेख संपवितो. या शीर्षकातील ‘सिंह’ म्हणजे ब्रिटन! बरेच वेळा काही राष्ट्रांचे उल्लेख प्राण्यांच्या सांकेतिक नावाने करतात. उदा. चीन म्हणजे ड्रॅगन, रशिया म्हणजे अस्वल अशाच स्वरूपात टिकेकरांनी ब्रिटनचा उल्लेख सिंह म्हणून केला आहे. टिकेकर या पुस्तकातून ब्रिटन अफगाणिस्तानात कसे राजकारण खेळत होते. (द ग्रेट गेम ) याचे विवेचन करतात. ही  माहिती मी पुढील लेखात देणार आहे.  ब्रिटिशांच्या या   राजकारणाची फलश्रुती काय होते; तर इंग्रजांना शेवटी, ‘अफगाणिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र आहे;’ हे मान्य करावे लागते हाच तो सिंहाला दिला गेलेला शह. टिकेकर हे टिळकप्रेमी असल्यामुळे अफगाणिस्तानात  इंग्रजांची ही  जी पिछेहाट झाली त्याचा आनंद टिकेकरांना झाला आणि त्यातून ‘सिंहाला शह’ हे नाव त्यांना सुचले असावे असे मला वाटते.

Author

One thought on “गोष्ट अफगाणिस्तानची

  1. यूऐसऐसआर, अमेरिका ह्यांच्या आधी अफगाणिस्ताननी सिंहाला शह दिला होता हे आपल्या लेखामुळे समजले व अफगाणिस्तानबद्दल कुतूहल अजून वाढले …खूप छान लेख …टिकेकारांसारख्या व्यक्ती समजल्या ..अभिनंदन व धन्यवाद

Leave a Reply