Lives of great men all remind us,
We can make our lives sublime,
And, departing, leave behind us,
Footprints on the sands of time.
(श्रेष्ठ अमेरिकन कवी हेन्री वॅड्सवर्थ लॉन्गफेलो याच्या दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या अजरामर ओळी)
मॅजेस्टिक शब्दाचा अर्थ आहे भव्य, दिव्य, नेत्रदीपक. ते विशेषण सामान्यतः एखाद्या खूप मोठया वास्तूला उद्देशून वापरले जाते. मुंबईच्या गिरगावमधील मॅजेस्टिक थेटरला ते तसे लागू पडणारे होते, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या त्या काळात तशी भव्य इमारत गिरगावात दुसरी नव्हती. पण त्याच थेटरलगत थाटलेल्या आपल्या टीचभर तीस चौरस फुटांच्या पुस्तकांच्या दुकानालादेखील ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ हे भव्य नाव देण्यात केशवराव कोठावळे यांचा जबरदस्त आत्मविश्वास दिसून येतो. आपल्या नंतरच्या आयुष्यात केशवरावांनी तो आत्मविश्वास सार्थ ठरवला. कुटुंबात साहित्याची कसलीच परंपरा नसताना, पुरते शालेय शिक्षणही झाले नसताना केशवराव कोठावळे (२१ मे १९२३ ते ५ मे १९८३ ) यांनी मराठी साहित्यविश्वावर उमटवलेली नाममुद्रा आज इतक्या वर्षांनंतरही अगदी ठसठशीत आहे. मुंबईत गिरगावात औदुंबराच्या एका झाडाखाली फुटपाथवर पुस्तके विकण्यापासून ते पुण्याच्या नारायण पेठेतील औदुंबर आळीत उभ्या असलेल्या तीन मजली वास्तूपर्यंतचा त्यांचा प्रवास तसा बहुपरिचित आहे पण तरीही त्यांच्या नुकत्याच झालेल्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या त्या प्रवासाचा धावता आढावा घेताना थक्क व्हायला होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव हे त्यांचे मूळ गाव. वडील एक छोटे हॉटेल चालवत पण ते फारसे चालत नव्हते. त्यामुळे केशवराव शिक्षणासाठी मुंबईत आले आणि मुगभाटात आजीकडे राहू लागले. एका शाळेत नाव नोंदवले. पण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षक देत असलेली शिक्षा सहन करणे नाकारून आणि आपले दप्तर वर्गातच सोडून रागारागाने ते वर्गातून बाहेर पडले ते पुन्हा कधीच शाळेत जायचे नाही या निर्धाराने. त्यानंतर त्यांनी आजीचे घरही सोडले; खऱ्या अर्थाने ते रस्त्यावर आले. पोटासाठी हॉटेलात कपबशा विसळल्या, मवाली मुलांच्या संगतीत ब्लॅकमध्ये सिनेमाची तिकिटेही विकली, अनेक उद्योग केले. पण वर्गात मागे सोडलेली पुस्तके त्यांचा पिच्छा सोडणार नव्हती. लवकरच त्यांनी आधी दादर रेल्वे स्टेशनसमोर आणि नंतर गिरगावात एका औदुंबराच्या झाडाखाली सावलीची जागा बघून, तिथेच फुटपाथवर गोणपाट पसरून पुस्तके विकायला सुरुवात केली. रात्री तीच पुस्तके गोणपाटात भरून ठेवायची आणि जवळच्या एखाद्या चाळीत जिन्याखाली पथारी पसरून झोपी जायचे. कधीकधी जवळच्याच खटाववाडीत प्रसिद्ध मौज छापखान्यातही झोपण्यासाठी आसरा घ्यावा लागे. अशी फुटपाथवर तीन वर्षे काढल्यानंतर १५ जून १९४२ रोजी, एकोणिसाव्या वर्षी, गिरगाव नाक्यावर ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ या भव्य नावाने एक चिमुकले दुकान उघडले. त्याच औदुंबराच्या छायेत, मॅजेस्टिक थेटरजवळ. जपानच्या बॉम्बहल्ल्याच्या भीतीने तेव्हा अनेक मुंबईकर मुंबई सोडून गेले होते. त्या पळापळीत ही जागा त्यांना मिळून गेली होती. केवळ २५-३० रुपयांत. ती जागा इतर कोणी का घेतली नाही? याचे उत्तर ते एकच देत; केवळ दैवयोग!
केशवराव विकत ती पुस्तके बहुतेकदा रद्दीच्या दुकानांतून अगदी स्वस्तात, चक्क वजनाच्या हिशेबात मिळवलेली असत. त्याकाळी सेकंड-हँड पुस्तकांचा व्यापार जोरात होता, शाळकरी मुलेही जुनी पुस्तके सर्रास वापरत. आजही रद्दीच्या दुकानात काही साहित्यरत्ने अवचित हाती लागतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘माझी जन्मठेप’ या गाजलेल्या आत्मकथनपर पुस्तकाच्या तब्बल चार हजार प्रती अशाच एकदा केशवरावांच्या हाती अगदी योगायोगाने लागल्या. त्याबद्दल स्वतः केशवरावांनी विस्ताराने लिहिले आहे (नवनीत, मे १९७२). ही घटना १९५४ सालची आहे. त्यांच्यापासून भांडून दुरावलेला आणि पाचसहा वर्षे तोंडही न दाखवलेला वासुदेव दातार नावाचा एक जुना मित्र एकाएकी त्यांच्या दुकानात दाखल झाला. ‘वीरकर नावाच्या एक गृहस्थाकडे माझी जन्मठेप पुस्तकाचा मोठा लॉट बरीच वर्षे पडून आहे, अगदी स्वस्तात मिळेल’ अशी बातमी त्याने दिली. दोघे लगोलग जवळच राहणाऱ्या वीरकरांकडे गेले. वीरकर स्वतः पुस्तकविक्रेते नव्हते. एकाला दिलेल्या कर्जाऊ रकमेच्या बदल्यात ती पुस्तके त्यांच्याकडे आली होती; पण जंग जंग पछाडूनही ती विकली जात नव्हती. “चार हजार रुपये द्या, लॉट घेऊन जा” वीरकर म्हणाले. केशवराव घरी गेले. पत्नी लक्ष्मीबाईंनी अडीअडचणीला उपयोगी पडतील म्हणून साठवलेल्या सोळाशे रुपयांतले पंधराशे रुपये घेतले, आगाऊ रक्कम म्हणून ते वीरकरांना नेऊन दिले आणि पुस्तके ताब्यात घेतली. थोड्याच दिवसांत उरलेले पैसेही फेडले. अवघ्या चार हजार रुपयांत चार हजार प्रती हाती आल्या. त्यांची थोडीफार डागडुगी करून, नवे वेष्टन चढवून त्यांनी ती पुस्तके भरपूर जाहिरात आणि मेलिंग करून विकायला काढली. पण पहिले तीन महिने एकही प्रत विकली गेली नाही. केशवराव अगदी खचून गेले. एका श्रेष्ठ लेखकाच्या श्रेष्ठ पुस्तकावरदेखील असा प्रसंग, वाचनसंस्कृती भरात असलेल्या त्या काळातही, ओढवावा ही घटना खूप खिन्न करणारी होती. पण नोव्हेंबरच्या २९ तारखेला एकाएकी ग्रह पालटले. रोजच्या रोज मनीऑर्डर्स येऊ लागल्या आणि सगळ्या प्रती धडाधड संपल्या. अशक्य वाटणारे काम केशवरावांनी करून दाखवले होते. आपल्या लेखाच्या शेवटी केशवरावांनी लिहिले आहे, “त्या पुस्तकाने मला पैसा दिला एवढंच नव्हे तर दातारने न सांगितलेली एक मोठी गोष्ट दिली; ती म्हणजे आत्मविश्वास!”
इतरांची पुस्तके विकता विकता स्वतःही पुस्तके प्रकाशित करावी या विचाराने १९५२ साली त्यांनी मॅजेस्टिक प्रकाशन सुरू केले होते. ‘विवाहानंतर’ या मालतीबाई दांडेकर यांच्या पुस्तकापासून. दुकानात येणारा माणूस कुठली पुस्तके विकत घेतो याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. त्यामुळे सत्तान्तर, स्मरणगाथा, मोगरा फुलला, चक्र, माहीमची खाडी, हत्या, वैखरी, आनंदीगोपाळ, मुंबई दिनांक यांसारख्या उत्तम साहित्यिक मूल्य असलेल्या पुस्तकांबरोबरच वाचकांना हवी होती अशी इतरही उपयुक्त पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. उदाहरणार्थ, एस. जी. गुप्ते यांचे मॅजेस्टिक इंग्लिश टीचर. त्याचे खरे लेखक होते प्रा. स. गं. मालशे. पण ‘लेखक म्हणून माझं नाव नको. माझी एस.जी. ही इनिशियल्स घेऊ आणि नाव गुप्त ठेवायचं म्हणून गुप्ते!’ असे त्यांचे म्हणणे होते. त्या पुस्तकाचा प्रचंड खप झाला; अजूनही त्याच्या आवृत्त्या निघत असतात. त्यांच्या ‘विकास पुस्तके’ मालिकेत पुढे संभाषणकला, व्यवहारचतुर कसे व्हावे, सभेत कसे बोलावे अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांतलेच एक म्हणजे श्रीपाद जोशींचे ‘कुठे कसे वागावे’ हे अप्रतिम पुस्तक. आठ-दहा वर्षांचा असताना आईने वाढदिवसानिमित्त ते मला भेट दिले होते आणि मला ते खूप आवडले होते, पुनःपुन्हा मी ते वाचत असे. अशा पुस्तकांची उत्तम विक्री करून घवघवीत व्यावसायिक यशही केशवरावांनी संपादन केले. आजही मॅजेस्टिकच्या सुमारे दोन हजार प्रकाशनांतील वैविध्य लक्ष वेधून घेते. भरपूर खप असणारी विद्यार्थ्यांसाठीची क्रमिक पुस्तके मात्र त्यांनी का काढली नाहीत याचे कधीकधी नवल वाटते.
आयुष्यात खूप गोष्टी योग असेल तेव्हाच घडतात, मुद्दाम ठरवून त्या घडत नाहीत हे केशवरावांचे एक अनुभवसिद्ध मत. पन्नासच्या दशकातील रशिया-अमेरिका शीतयुद्धाच्या काळात असाच एक अनपेक्षित योग आला. साहित्यविश्वातील अनेक घडामोडींमागे निखळ साहित्यिक कारणे नसतात; त्यांमागे अनेक व्यामिश्र सामाजिक-राजकीय-आर्थिक कारणेही असतात आणि त्यांचे स्वरूप कधीकधी आंतरराष्ट्रीयदेखील असू शकते. अगदी आजचे उदाहरण म्हणजे पुस्तकाच्या अगदी थोड्या प्रती छापणेही सुलभ करणाऱ्या प्रिंट ऑन डिमांड तंत्रज्ञानाचा आपल्या प्रकाशनविश्वावर झालेला प्रचंड परिणाम. शीतयुद्धाच्या त्या काळात भांडवलवादी अमेरिका आणि साम्यवादी रशिया या दोन्ही महासत्ता तिसऱ्या जगात आपापल्या विचारधारांचा प्रसार करण्यासाठी खूप प्रयत्न करत असत. आपापल्या देशातील साहित्याचा स्थानिक भाषांत अनुवाद करून ते वितरित करणे हा त्याचाच एक भाग. लेखक हे विचारवंत आणि म्हणून समाजावर खोलवर परिणाम करणारे मानले जात. सोव्हिएट प्रकाशने मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोचत होती. गॉर्की, डोस्टोवस्की, टॉलस्टॉय, चेकॉव्ह, पुष्किन वगैरे रशियन लेखक त्यातूनच आम्हाला परिचित झाले. अमेरिकन्सदेखील याबाबत मागे नव्हते. युसिस (युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस) ही मोठी संस्था त्यासाठी प्रयत्नशील होती. अनेक लेखकांना अमेरिकेचा किंवा रशियाचा फुकट दौरा करता आला. चित्रपटव्यवसायातही या शीतयुद्धाचे पडसाद उमटत होते; जुलमी सावकाराविरुद्ध पिचलेल्या कष्टकऱ्याने दिलेला लढा हा गल्ला जमवून देणारा हुकूमी विषय होता. त्याचवेळी फुलब्राइट आणि रॉकफेलर स्कॉलर्स अमेरिकेत बघितलेल्या वैभवाचे, आमच्या बुद्धिमान तरुणांना भारून टाकणारे चित्रणही करत होते. युसिसमध्ये रमेश मंत्री, मंगेश पाडगावकर, जयवंत दळवी यांच्यासारखे नामांकित साहित्यिक वेळोवेळी नोकरीला होते. त्यांच्यातील दळवींकडे गाजलेल्या अमेरिकन पुस्तकांचा मराठी अनुवाद करून घेण्याचे काम १९५६ सालापासून होते. अनुवादासाठी युसिस देत असलेले पैसे तत्कालीन प्रकाशक देत असलेल्या पैशांपेक्षा खूपच अधिक होते. साहजिकच गंगाधर गाडगीळ, जी. ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, शान्ता शेळके अशा अनेक प्रतिभाशाली साहित्यिकांनी युसिससाठी हे अनुवादाचे काम केले. वेगवेगळ्या प्रकाशकांमार्फत युसिस ही पुस्तके प्रकाशित करून घेत असे व त्यांच्यातील अनेक पुस्तके दळवींशी असलेल्या स्नेहामुळे कोठावळेंकडे जात. यात भरपूर व्यावसायिक फायदा होत गेला.
गळ्याभोवती रंगीत रुमाल आणि अंगावर अर्धी चड्डी व बनियन हा वेष आणि चार गुद्दे द्यायचे तर चार खायचे ही रीत असलेल्या फुटपाथवरच्या वर्तुळातून सुसंस्कृत पांढरपेशा माणसांच्या वर्तुळात केशवराव प्रकाशन व्यवसायामुळे आले आणि तो बदल त्यांना मनापासून भावला. एकलव्याप्रमाणे त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला. डिक्शनरीचा सतत आधार घेत इंग्रजीही वाचू लागले. रात्री उशिरापर्यंत वाचत बसत. एकेकाळी त्यांनी लहान मुलांसाठी पाच पुस्तकेही लिहिली होती आणि केशव कोठावळे प्रकाशन या नावाखाली ती प्रकाशितही केली होती. पण आपण लेखक नाही हे त्यांनी लगेचच स्वीकारले आणि प्रकाशन व विक्री यांवरच लक्ष केंद्रित केले. बेचाळीस साली घेतलेल्या ३० चौरस फुटांच्या टीचभर जागेतून ६० फुटांच्या गोवर्धनदास बिल्डिंगमधील जागेत १९५६ मध्ये आणि १९६३ साली त्याहून बऱ्याच मोठ्या अशा सुरतवाला बिल्डिंगमधील जागेत मॅजेस्टिकने आपला व्याप विस्तारला. केशवराव मितभाषी होते पण सुरतवाला बिल्डिंगमध्ये जमू लागलेला लेखकांचा अड्डा त्यांना सुखावत असे. चहा आणि शेजारच्या कुलकर्ण्यांच्या हॉटेलातली भजी यांच्यासोबत नेहमीच गप्पा रंगत. आपल्या समूहाला ते ‘ग्रंथप्रेमी मंडळ’ म्हणत. त्यातूनच लेखकांच्या सहली काढायची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. पवईजवळ विहार लेकला गेलेल्या अशाच एका सहलीत ‘ललित’चा जन्म झाला. त्याबद्दल मधु मंगेश कर्णिक लिहितात (अंतर्नाद, दिवाळी २००५) :
“त्या दिवसांत आम्ही लेखक मंडळी एखाद्या शनिवार-रविवारी मुंबईबाहेर खंडाळा, लोणावळा, अलिबाग, कर्नाळा, दहिसर अशा ठिकाणी पिकनिकसाठी जात असू. सर्व खर्च व सरंजाम कोठावळे यांचा. त्यांना लेखकांच्या सहवासात अपार आनंद व्हायचा. क्रिकेट, पत्ते, गप्पा, टिंगलटवाळी या साऱ्याला ऊत येई. अशीच एक पावसाळी सहल १९६३मध्ये मुंबईजवळच्या विहार लेकवर गेली होती…. जयवंत दळवी, वसंत सरवटे, पुरुषोत्तम धाक्रस, श्री. ज. जोशी, पंढरीनाथ रेगे, चंद्रकांत काकोडकर, उमाकांत ठोमरे, ज्ञानेश्वर नाडकर्णी व मी एवढेजण होतो. या सहलीमध्ये आपणा सर्व साहित्यिकांचे एक वाङ्ग्मयिन मासिक असावे, असे ठरले. या बैठकीचा कार्यवृत्तान्त माझ्या हस्ताक्षरात लिहिलेला होता. मला वाटते, उपस्थित सर्वांनी त्यावर सहमतिदर्शक सह्या केल्या होत्या. ‘ललित’ या नावाचं मासिक १९६४च्या प्रारंभापासून काढायचा निर्णय त्या सहलीमध्ये ठरला.”
लेखकांबरोबर अशा प्रकारच्या सहली काढण्याइतकी जवळीक किती प्रकाशक साधू शकतील हा प्रश्नच आहे. आणखी एक निरीक्षण इथे नमूद करावेसे वाटते; कर्णिकांनी दिलेल्या यादीत प्राध्यापक कोणीही नाही! एकूणच केशवरावांवर प्राध्यापकीय वर्तुळाचा फारसा प्रभाव नव्हता. एक गंमत म्हणजे ‘ललित’च्या पहिल्या अंकाचे संपादकीय ‘मौज’च्या राम पटवर्धनांनी लिहिले होते! जयवंत दळवी यांनी ठणठणपाळ नावाने ‘घटका गेली पळे गेली’ या दोन दशके चालवलेल्या खुमासदार सदराची साहित्यिक वर्तुळात कायम चर्चा असायची. साहित्यसंस्कृतीसाठी अशी ट्रेड जर्नल्स आवश्यक असतात. ‘ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार व ग्रंथसंग्रह यांना वाहिलेले मासिक’ हे ललितचे स्वरूप आजही कायम आहे.
त्यांच्यासारख्या प्रकाशकाचा लॉटरीसारख्या क्षेत्राशी संबंध येणे हा एक अकल्पित योगायोगच म्हणायचा; तसे घडायचे कुठलेही तार्किक कारण देता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने १९६९ साली लॉटरी सुरू केल्यावर त्याची एजन्सी केशवरावांनी घेतली. तो खरे तर त्यांच्याहून बरेच लहान असलेल्या भावाचा, तुकारामअण्णा यांचाच पुढाकार होता. राम-लक्ष्मण अशीच त्यांची जोडी होती. वसंत देशमुख आणि मधु मंगेश कर्णिक या सरकारी नोकरीत असलेल्या साहित्यिक स्नेहयांनी लॉटरीची सगळी योजना त्यांना समजावून सांगितली होती. के. व्ही. कोठावळे असा शिक्का ते विकत असलेल्या लॉटरीच्या तिकिटावर असे व त्यामुळे ते नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले. एक वैशिष्ट्य म्हणजे असंख्य अंध व्यक्तींना त्यातून रोजगार मिळाला. त्यात अनेक मुलीही होत्या. ‘जो आमच्याबरोबर चालतो त्याचे भाग्य चालते’ हे केशवरावांनी तयार केलेले घोषवाक्य प्रचंड लोकप्रिय होते. साधारण १९८३-८४ सालापर्यंत हा व्यवसाय जोरात होता. त्यानंतर अन्य राज्यांच्या लॉटरीची तिकिटे महाराष्ट्रात विकायला सुरुवात झाली आणि तो कमी होत गेला. लॉटरीचा व्यवसाय मोठाच भाग्ययोग ठरला. अशोक कोठावळे म्हणतात त्याप्रमाणे “लॉटरीमुळं पैशाची चणचण कधी भासली नाही, कर्ज काढावं लागलं नाही, हाती पैसा खेळता राहिला.” (‘मॅजेस्टिक कोठावळे’ या पुस्तकातील मुकुंद टाकसाळे यांना दिलेली मुलाखत)
यशासारखे दुसरे यश नाही म्हणतात. मॅजेस्टिकची कमान सातत्याने चढती राहिली. पुण्यातही बाजीराव रोडवर १९५९ साली त्यांनी दुकान घेतले आणि पुढे १९७० सालीतर नारायण पेठेतील औदुंबर आळीत सध्याची तीन मजली इमारत बांधली. विशेष जवळिकीतल्या लेखकांचा सन्मान करायचा म्हणून तेथील दोन दालनांना गो. नी. दांडेकर आणि जयवंत दळवी यांची नावे दिली. १९७३ साली तेथे मॅजेस्टिक गप्पा सुरू झाल्या आणि लौकरच साहित्यिक वर्तुळात त्या खूप लोकप्रिय झाल्या. दीनानाथ दलाल यांनी १९४५ साली स्थापन केलेले दीपावली १९७७ पासून केशवरावांनी ताब्यात घेतले. त्या गल्लीला औदुंबर आळी हे नाव नंतर महानगरपालिकेने दिले आणि त्यासाठी केशवरावांनी बरीच खटपटदेखील केली होती. गिरगावातल्या औदुंबरापासून पुण्यातल्या औदुंबराकडे झालेली ही वाटचाल म्हणजे मराठी साहित्याच्या वसंतऋतूची कहाणी आहे.
आपल्या वाणिज्यधर्माशी केशवराव कायम प्रामाणिक राहिले. आजही वाचकांपर्यंत पुस्तके पोचवण्यासाठी प्रकाशकांना मॅजेस्टिकचा आधार घ्यावाच लागतो. मुंबई-ठाण्याचा विचार केला तर आजही मॅजेस्टिक बुक डेपोला पर्याय नाही. अर्थात केशवराव केवळ पुस्तकेविक्रेते नव्हते, केवळ प्रकाशकही नव्हते; ते सर्वार्थाने ग्रंथप्रसारक होते. ग्रंथयात्रा, ग्रंथप्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून त्यांनी पुस्तके अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचवली. अन्य कुठल्या मराठी प्रकाशनाने न केलेले दोन महत्त्वाचे साहित्यिक उपक्रम केशवरावांनी जिद्दीने चालवले; ललितसारखे ट्रेड जर्नल आणि मॅजेस्टिक गप्पा. त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विशिष्ट प्रकारचे साहित्य हेच अभिजात साहित्य असे त्यांनी कधीच मानले नाही. कॉलेजात जाऊन वाङमयाचा अभ्यास केलेला नसल्याचा हा एक मोठाच फायदा!
आमची पहिली भेट झाली एप्रिल १९७८ मध्ये. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कादंबऱ्या मराठीत लिहिल्या जाव्यात म्हणून त्यांनी कादंबरीस्पर्धा जाहीर केली होती व त्यात माझी तिसरी चांदणी कादंबरी पुरस्कारप्राप्त ठरली. स. गं. मालशे परीक्षक होते. पुरस्काराची तीन हजार ही रक्कम त्या काळात घसघशीत होती. त्या संदर्भातच आमची ती भेट होती. ऑपेरा हाऊस येथील हिरेविक्रेत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रसाद चेंबर्समध्ये. त्या इमारतीत कार्यालय घेणे ही मराठी प्रकाशकासाठी फारच मोठी उडी होती. अन्य कुठल्याच मराठी प्रकाशकाने असे धाडस केले नव्हते. आमच्या तेव्हा छान गप्पा झाल्या होत्या. डिसेंबर १९७८ मध्ये दादरला भवानी शंकर रोडवरच्या ब्राह्मण सेवा मंडळात माझ्या लग्नालाही केशवराव आवर्जून हजर होते. पण तेथील कौटुंबिक वातावरणात त्यांचा जीव बहुधा रमला नसावा. अर्ध्याएक तासाने अहेराचे पाकीट बळजबरीने माझ्या हाती कोंबून शेजारीच असलेल्या दळवींच्या घरी ते गेले होते हे माझ्या लक्षात आहे! पुढे त्यांच्या नावाने मॅजेस्टिकने ठेवलेले ११,१११ रुपयांचे केशवराव कोठावळे पारितोषिक माझ्या बदलता भारत पुस्तकाला मिळाले होते ही त्यांच्या संदर्भातली आणखी एक व्यक्तिगत आठवण.
केशवराव गणपतीचे निस्सीम भक्त होते. दैवयोगावर त्यांचा अढळ विश्वास होता. आपल्या हाताला यश आहे ही त्यांची श्रद्धा होती. अनेक जणांनी आपापला व्यवसाय सुरू करताना त्यांच्याकडून केवळ शुभसंकेत म्हणून पैसे उसने घेतले होते. त्यांची धाकटी कन्या चित्रा हिचे पुढील उद्गार लक्षणीय आहेत; “बाबांना पाच हा आकडा प्रिय होता. ते गेले पाच तारखेला. ‘मे’ म्हणजे पाचव्या महिन्यात नि सायंकाळी पाच वाजतानाच.”
केशवरावांचे जीवन म्हणजे ग्रंथव्यवहाराची गौरवगाथा आहे. अन्य कशातच त्यांना रुची नव्हती. आर्थिकदृष्ट्या सहज शक्य होते तरी पहिला परदेशप्रवासही त्यांनी १९७६ साली, म्हणजे आयुष्यात खूप उशीराच केला. त्यांना तीन मुलगे आणि चार मुली होत्या; पण कौटुंबिक जीवनात ते कधी रमले नाहीत. जयवंत दळवी लिहितात, “घराबाहेर यशस्वी आणि घरात अयशस्वी, असे त्यांचे द्वंद्व होते. त्याचा ताप त्यांच्या घरच्या मंडळींना खूप झाला. त्यांचा स्वभाव, ईर्ष्या आणि धंद्याच्या वेळा या सगळ्या गोष्टी घरच्यांसाठी जुळून-जमून आल्या नाहीत. ते सकाळी नऊ वाजता झोपून उठत. त्यावेळी मुले शाळेत गेलेली. ते रात्री दहा-अकरा वाजता घरी येत त्यावेळी मुले झोपलेली. त्यांचा मुलांशी संबंध येत नव्हता… १९६४ नंतरची महत्त्वाची वर्षे त्यांनी ललितमय करून टाकली. पत्नी आणि मुले दूर पडताहेत याची जाणीव त्यांनी ठेवली नाही.” (कोठावळे आणि मी, ललित, जुलै १९८३, केशवराव कोठावळे श्रद्धांजली अंक)
१९८३ साली ललित मासिकाला वीस वर्षे, मॅजेस्टिक बुक स्टॉलला चाळीस वर्षे आणि केशवरावांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने मुंबईत दहा दिवसांचा भव्य साहित्योत्सव भरवण्यात येणार होता. उद्घाटक पु. ल. देशपांडे असणार होते. लक्ष्मणशास्त्री जोशी, श्रीराम लागू, ना. धों. महानोर, माधव गडकरी वगैरे अनेक दिग्गज सहभागी होणार होते. लेखकांनी केलेला एका प्रकाशकाचा हा आगळा सत्कार असणार होता. जून महिन्यात कोठावळे गौरव अंक काढायचीही जवळच्या मित्रांची इच्छा होती. दुर्दैवाने आपल्या साठाव्या वाढदिवसाच्या केवळ दोन आठवडे आधी केशवरावांचे निधन झाले. गौरव अंक पुढे श्रद्धांजली अंक म्हणून प्रसिद्ध झाला. केशवरावांचा नितांत विश्वास असलेला दैवयोग हा प्रकार खूप विचित्र असतो हेच खरे.
शनिवार, २० मे २०२३ रोजी मुंबईच्या प्रभादेवी येथील कोहिनूर हॉलमध्ये त्यांची शताब्दी थाटात साजरी झाली. केशवरावांचे अगदी निकटचे स्नेही मधु मंगेश कर्णिक अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख वक्ते होते भालचंद्र नेमाडे. साहित्यिक वर्तुळातील अनेक नामवंत आवर्जून कार्यक्रमाला हजर होते. मॅजेस्टिकने यंदा आयोजित केलेल्या कादंबरीस्पर्धेतील तीन विजेत्यांना त्याच समारंभात पुरस्कार प्रदान केले गेले. मॅजेस्टिक हे आज मुंबईतील एकमेव मोठे पुस्तकविक्रेते आहेत, मॅजेस्टिक प्रकाशनही उत्तम सुरू आहे आणि ललित मासिकही आपल्या क्षेत्रात एकमेवादित्य आहे. केशवरावांच्या मृत्यूनंतर चाळीस वर्षांनीदेखील त्यांची परंपरा पुढच्या पिढीने, म्हणजे त्यांचे चिरंजीव अशोक आणि नातू आशय यांनी, किती उत्तम प्रकारे चालू ठेवली आहे हेच यावरून दिसते. याहून मोठी आदरांजली केशवरावांना कुठली असू शकेल? केशवरावांच्या स्मृतीला त्यांचा एक जुना लेखक या नात्याने माझे विनम्र अभिवादन.

केशवराव कोठावळे (२१ मे १९२३ ते ५ मे १९८३ -)
