संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला – भाग २
‘संतकवी तुकाराम’
‘भगवद्भक्ति कराया बहु जड जीवांसी जो तुका शिकवी|
त्याच्या दुसरा धरणीवरि येइल कोण हो तुकासि कवी?’
‘तुकारामांनी आपल्या अभंगांतून जडजीवांना शिकवण दिली; त्याच्या तुकासी – त्यांच्याशी कोणत्याही कवीची तुलना होऊ शकणार नाही.’
तुकारामांच्या कार्याचं आणि कवित्वाचं हे यथार्थ वर्णन!
‘नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें|
सवें पांडुरंगें येऊनियां|
सांगितलें काम करावे कवित्व|
वाउगे निमित्य बोलों नको||
मनात उमटले तसे विचार त्यांच्या काव्यातून प्रवाहित होत राहिले. उपमा उत्प्रेक्षादी अलंकारांचे जाणीवपूर्वक कोंदण रचून त्यांनी काव्याचे सुशोभीकरण केले नाही.
‘नव्हे कवित्व टांकसाळी नाणे!’
‘ट ला ट री ला री’ अशा प्रकारे लिहिलेलं त्यांचं काव्य नव्हे. वाणीचा ‘झरा आहे मूळचाचि खरा!’ म्हणून त्यांच्या ओघवत्या काव्यातून निरनिराळे काव्यविभ्रम अनुभवता येतात.
या लेखात आपण त्यांच्या काव्यवैशिष्ट्यांचा, चमत्कृतिपूर्ण रचनांचा आस्वाद घेणार आहोत.
वर्णमालेतील ‘क’ या व्यंजनापासून सुरुवात करून ‘ह’ पर्यंतची व्यंजने गुंफत विणलेल्या ‘एकाखडी’ची छोटीशी झलक!
‘करावा कैवाड| नाहीं तरी आला नाड/
खचविलें काळे|उगवा लवलाहें जाळें|
गजर नामाचा|करा लवलाहें वाचा|
घरटी चक्रफेरा| जन्ममृत्यूचा भोंवरा|…’
बाळक्रीडा अभंगांत त्यांनी वेगळी मौज आणली आहे. श्रीकृष्णाच्या लीळांचं वर्णन चित्रदर्शी आहेच; पण त्यातही पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द, ती पुढच्या ओळीची सुरुवात, अशी रचना आहे.
‘जगाचा हा बाप दाखविले माये|
माती खातां जाये मारावया|
मारावया तिनें उगारिली काठी|
भुवनं त्या पोटीं चौदा देखे|
देखे भयानक झाकियेले डोळें|
मागता तो खेळे तियेंपुढे|
पुढे रिघोनियां घाली गळां कव|
कळो नेदी माव मायावंत||….
साक्षीभावातून स्फुरलेली कविता म्हणजे साक्षी > साखी! दोहरा छंदातली ‘साखी’ हे गेयता आणि अर्थगर्भता यांचं अनोखं मिश्रण आहे.
तुका पंखि बहिर न मानूं|वोई जानवर बाग |
असंतनकु संत न मानू |जे वर्म कु दाग||
बहिरी ससाण्याला आम्ही इतर पक्ष्यांप्रमाणे, वाघाला इतर प्राण्यांप्रमाणे मानणार नाही; तसंच असंतांनाही संत मानणार नाही. उपमेचा नकारात्मक उपयोग करत तुकाराम असंतांची जागा दाखवून देतात.
उधानु काटीवरी चोपडूची आस |
नवरा राजस मिरवतसे |
हा क्षेपकाचा अभंग- तुकोबांचा आहे का याबाबतीत शंका असलेला. यातील उधानु काटीवरी चोपडू हे नंद भाषेतील सांकेतिक शब्द आहेत. उधानु म्हणजे तीन, काटीवरी म्हणजे वीस, चोपडू म्हणजे चौदा. व्यापारी लोक हे शब्द गिऱ्हाइकाला कळू नये म्हणून वापरत असत. स्वतः व्यापारी असल्याने तुकोबांनीच हा अभंग या भाषेत लिहिला असावा असे वाटते.
तुकोबांची काव्यरचना कधी दोन चरणांची;
ज्याचा संग चित्तीं |१| तुका म्हणे तो त्या याती |२|
कधी चार चरणांची!
नाही संतपण|१| मिळत तें हाटीं/२|
हिंडता कपाटीं |३| रानीं वनीं ||४|
तर कधी मध्येच यमक असलेली!
ब्रह्मरस घेईं काढा | तेणें पीडा, वारेल|
पथ्य नाम विठोबाचें |आणिक वाचे न सेवीं ||
त्यांची भुजंगप्रयातातlली आर्त रचना अंतर्मुख करते.
धना गुंतले चित्त माझे मुरारी |
मन घेउनी हिंडवी दारदारी |
मन हिंडता ना पुरे यासि कांही |
मही ठेंगणी परि ते तृप्त नाही ||
‘अल्ला देवे, अल्ला खिलावे, अल्ला दारू’ अल्ला हेच औषध! अधोगतीला जाऊ नकोस; नाहीतर पार्श्वभागावर रट्टा मिळेल अशा आशयाचे मुसलमानी अभंग वाचले की अवाक व्हायला होतं. कैकाडी, अहंकाराचा धूप जाळणारे गोंधळी, ‘आत्मस्वरूपी जागा, जागा’ सांगणारे जोगी, दृष्टीवर आलेल्या भ्रमाच्या पडळामुळे झालेला आंधळा, हात-पाय नसल्याने मनावर बसून मन भरकटेल तसा भरकटणारा पांगुळ – ही रूपके आरसा दाखवणारी!
तुकारामांच्या रचनेत न्यायांची पेरणीही आढळते.
माकडमुठीसी धरिले फुटाणे –
हात अडकले तरी माकड फुटाणे सोडत नाही. फुटाणे सोडून द्यावे आणि मोहाच्या सापळ्यातून मोकळं व्हावं हे त्याला उमजत नाही. शुकनलिका न्यायाचं असं वेगळंच उदाहरण ते देतात.
‘दीप घेऊनियां धुंडिती अंधार’
म्हणत तमोदीप न्याय स्पष्ट करतात.
पावलो हा देह काकतालीयन्याये!
‘आंधळ्याच्या टाळीत अचानक कावळा सापडावा तसा हा देह मिळाला आहे, हा विशेष योग सांगून मानवी देहाची दुर्लभता दाखवून देतात.
अशा रंजक रूपकांमुळे त्यांचे अभंग रसनिष्पत्ती आणि ज्ञान यांचं अभूतपूर्व मिश्रण ठरतात.
आक्रमकता हा तुकारामांचा मोठा विशेष!
अंगी लावूनियां राख|
डोळे झांकुनि करिती पाप|
जळो अशांची संगती असं म्हणत ते धिक्कार करतात!
कधी ठणकावून सांगतात :
नाठाळाचे काठी हाणू माथा!
अहंकाराने भरलेल्या, अल्पज्ञानी, अभिमानी अशा या लंडांचे, ‘हाणोनि फोडा तोंड’ असेही तुकोबा सुनावतात.
व्यवहारातून मिळालेला अनुभव, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कल्पकता, मनुष्यस्वभावाचे आकलन यांतून आलेल्या उपमा हा दीर्घ लेखाचा विषय आहे.
भोरप्यानें (बहुरूपी) सोंग पालटिलें वरी |
बकध्यान धरी मत्स्या जैसें |
बहुरूप्याने धारण केलेले सोंग, बगळ्याचे ध्यान, टिळे माळा घालून लबाडाने केलेला थाट हे लुटण्याचे फासे जगाला दिसत नाहीत. मीही लोकांमध्ये तसा चांगला सभ्य वाटतो; पण आतले विकार देवा, तुम्ही जाणून आहात!
साधनकाळातील त्यांची अंतर्मुखता अशा उपमांमधून स्पष्ट होत जाते.
वांझेने दाविलें गऱ्हवार लक्षण |
चिरगुटे घालून वाथयाला |
पोटावर घड्या बांधून गर्भार असण्याचे नाटक करणारी स्त्री आणि शब्दांची पोपटपंची करत ज्ञान विकणारे शब्दज्ञानी सारखेच!
तुकोबा म्हणतात,
बोलाचीच कढी बोलाचाच भात |
जेवुनियां तृप्त कोण झाला ||
फोलपण दाखवण्यासाठी वापरलेल्या या उपमेला म्हणीचं रूप आलेलं आहे. सुख पाहता जवापडे, कुणी निंदा कुणी वंदा, लहानपण दे गा देवा, चणे खावे लोखंडाचे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आले देवाजीच्या मना, असाध्य ते साध्य, नाही निर्मळ जीवन…
तुकारामांची अशी कितीतरी वचनं आपण सुभाषितं, म्हणी म्हणून सहज वापरत असतो.
कवी म्हणून केलेली चमत्कृती, निरनिराळे प्रयोग, दृष्टान्त यांबरोबरच महत्त्वाची ठरते रसनिष्पत्ती. रस्यते इति रसः|
हास्य, जुगुप्सा, क्रोध, भयानक, वीर, बीभत्स असे विविध रस तत्त्व बिंबवण्याचं कार्य वाचकाच्या नकळत करत असतात.
दुर्जनांचा संग नको हे सांगताना तुकोबा म्हणतात,
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी|
देखोनियां दुरी व्हावें तयां |
दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ |
वाणी रजस्वला स्रवे जैसी ||
कधी म्हणतात,
कुंभ अवघा एक आंवा | पाकीं एक, (स्वयंपाकाला) एकीं गू फेडावा!
शरीराच्या पात्राचा कसा उपयोग करावा: चांगल्या कार्यासाठी की… हे बीभत्स रसातून ते पुरेपूर गळी उतरवतात.
कालियारूपी दुर्गुण ठेचताना वीररसाची साथ घेत म्हणतात,
निघतां आपटी धरूनी धांवांमधीं |
एकाचेचि वधीं माथें पाय ||
‘कानडीने केला मऱ्हाटा भ्रतार’ असं मिस्कीलपणे सांगत, एकमेकांचे बोलणे समजत नसणाऱ्या पतिपत्नींचे शब्दचित्र ते रेखाटतात. बायको बोलावते, ‘इल बा!’ त्याला वाटतं, ती ‘बाबा’ संबोधते आहे आपल्याला, म्हणून तो पळून जाऊ लागतो.
त्यांच्या हास्यरसातही अंतर्मुख करण्याची विलक्षण शक्ती आहे.
एका धनगराचा बोकड मेला आहे. धनगर फार दुःखी आहे. पुराण ऐकायला तो येऊन बसतो. पुराणिकबुवा पुराण सांगताना त्यांची दाढी हलत असते. ती बघून तो रडू लागतो. लोकांना फार कौतुक वाटतं त्याच्या भाववश होण्याचं! पण याला आठवत असतं, ‘अरे, माझ्या बोकडालाही अशीच दाढी होती. गेला तो!’ म्हणून हुंदके देत असतो.
‘१ पुरुष १ प्रकृती’, अशी बोटांनी खूण करत पुराणिक २ आकडा दाखवतात. हा म्हणतो, “हो हो, माझ्या बोकडालाही दोन शिंगे होती.”
‘ प्रेम खरें दिसे जनां|
भिन्न अंतरी भावना||’
असं सार तुकोबा स्पष्ट करतात.
उपहासातून मनुष्यस्वभाव उलगडणारे काही मजेदार अभंग आहेत.
‘आवा चालली पंढरपुरा|
वेसीपासुनी आली घरा|’ आपल्याला माहीत आहेच. असाच एक बुवा –
‘जातो वाराणसी |निरवी घोडे गाई म्हैसी |’ तो सांगतो, ‘माझ्या पश्चात पेवातले धान्य काढू नका, ताकात पाणी जास्त घालून प्या. मला उलटी व्हायला लागली तरी मी दमडीची सुंठ खाल्ली नाही…’ हिमटेपणा दाखवून देणारा हा अभंग म्हणजे संसारात रुतलेल्या पायाचं शब्दशः वर्णन आहे.
नपुंसक योद्धा म्हणतो, ‘ढालतलवारे गुंतले हे कर |’ आता मी लढू तरी कसा? ‘बैसविलें मला येणें अश्वावरी,’ आता मी पळू तरी कसा?
आपल्या अंगीच परब्रह्म असूनही आपण त्याला जाणत नाही; हे अशा उपहासात्मक रचनेतून तुकोबा खुबीने दाखवून देतात.
कलियुगाचे करुण वर्णन करताना तुकोबा येत्या भयावह काळाची पावले दाखवतात.
भेणें मंद झाली मेघवृष्टि |
आकांतली कांपे सृष्टि
अपीकें धान्य दिवसें दिवसें /
गाई म्हैसी चेवल्या गोरसें /
ऐहिकाचे पाश तोडण्याविषयी सुचवताना ते म्हणतात,
‘मीचि मज व्यालो| पोटा आपुलिया आलो|
झालो बारा बळी |गेलो मरोनी ते काळीं |
गूढ रसातील हा अभंग. मूळ रूपाची जाणीव झाली म्हणजे माझ्याच पोटी मी जन्माला आलो. जन्मल्या दिवसापासून बारा दिवसांचे विधी पूर्ण झाले आणि मरून गेलो म्हणजे देहात्म बुद्धीने मेलो.
तुकोबा कधी वैगुण्यावर हल्ला चढवतात, चुकांवर आसूड ओढतात, तळमळीने उपदेश करतात. उपमा देतात, दृष्टान्त मांडतात, रूपकं योजतात. या पंतोजींच्या भूमिकेमागे भक्तिरसात नाहून निघालेला तुका आपल्याला भेटत राहतो.
‘विठ्ठला रे वाचे बोला बहू रस |
विठ्ठला रे सोस घेतला जीवें |’
पंढरीसी दुःख न मिळे ओखदा |
प्रेमसुख सदा सर्वकाळ !
ही त्यांची अंतर्बाह्य व्यापलेली अनुभूती आहे.
धालिया ढेकर येती आनंदाचे |
वोसंडले वाचे प्रेमसुख ||
हे प्रेमसुख – आनंद त्यांच्या तनमनांत मावत नाही. आनंदाचे डोहीं आनंद तरंग असे आनंदरसाचे पाझर फुटत राहतात.
‘आजी आनंदु रे एकी परमानंदु रे |’
‘विठोबाची वेडीं आम्हां आनंदु सदा |
गाऊ नाचों वाहूं टाळी रंजवू गोविंदा/’
‘आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्नें शब्दांचीच शस्त्रे यत्ने करूं’ म्हणणारे तुकाराम शब्दांच्या चिमटीत सापडणारे नव्हेत. हजार शब्दांच्या अवकाशातही मावणारे नव्हेत.
त्यांचेच शब्द उसने घेऊन समारोपाकडे वळते…
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी|
मस्तक चरणीं ठेवीतसें||
