आज सकाळी अचानक ‘ओ माझी रे …’ ची सुरावट कानावर आली . तसे हे गाणे अनेक वेळा ऐकलेले आहे; पण आज त्यातल्या शब्दांकडे जरा जास्तच लक्ष गेले .
‘ओ माझी रे अपना किनारा नदिया की धारा है|
साहिलो पे बहनेवाले कभी सुना तो होगा कही
कागजोकी कश्तियोंका कहीं किनारा होता नहीं
ओ माझी रे माझी रे…
कोई किनारा जो किनारे से मिले वो अपना किनारा है
ओ माझी रे…….
पानियो में बह रहे हैं कई किनारे टूटे हुए
रास्तो में मिल गए हैं सभी सहारे छूटे हुए
कोई सहारा मझधारे में मिले जो अपना सहारा है
ओ माझी रे, अपना किनारा नदिया की धारा है….
‘प्रवाहालाच किनारा मानायचा!’ काय कल्पना आहे! आपल्या भवतालच्या ज्या सगळ्या सीमारेषा आहेत त्या खरोखर मानसिक असतात . कागदाच्या नावेला किनारा नसतो ही अशीच एक संकल्पना. आपल्या मनाच्या किनाऱ्याला जो किनारा येऊन मिळतो तो आपला, हे आणखी एक रूपक; पण विचार करायला लागलो तर यात थोडासा एक अंतर्विरोध आहे असे वाटू लागले. जर प्रवाह हाच किनारा तर कागदाच्या नावेलाही किनारा आहेच की !
हे गाणे ‘खुशबू’ या गुलझार दिग्दर्शित चित्रपटातील आहे; त्यामुळे गाण्याची पटकथेतील जागा काय आहे त्यावर हा अर्थ अवलंबून असायची शक्यता मनात आली; मग लक्षात आले की आपण हा चित्रपट पाहिलेलाच नाही. हा चित्रपट मिळवून पाहिला . त्यानिमित्ताने गुलझार यांच्या दिग्दर्शक म्हणून केलेल्या कामगिरीचाही थोडा धांडोळा घेतला. गुलझार यांनी १९७१-१९९९ या कालावधीत एकंदरीत २७ चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलंय. त्यात आँधी , परिचय, कोशिश , खुशबू , माचिस, लेकिन, इजाज़त, नमकीन, अंगूर ,मीरा या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे . आँधी चित्रपटावर काही काळ बंदी घातलेली होती याचीही यानिमित्ताने आठवण झाली. पुन्हा खुशबूकडे वळू या . शरतचंद्र चटर्जी ऊर्फ चटोपाध्याय यांच्या ‘पंडितमाशाय’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे . वर्ष १९७५ . त्याच वर्षी मौसम व आँधी हे दोन यशस्वी चित्रपट गुलझार यांनी दिले. खुशबूचा नायक एक डॉक्टर आहे . त्याचे हे डॉक्टर असणे कथा पुढे सरकण्यात महत्त्वाचे आहे . सिनेमाची निर्मिती जरी १९७५ साली झालेली असली तरी शरतबाबूंची गोष्ट १९३६ पूर्वीची आहे . त्या काळात भारतात प्लेगचे थैमान असायचे. त्या काळातील भारतातील प्लेगचे थैमान चित्रपटात प्रभावीपणे दाखवले आहे. चित्रपटात प्लेगच्या लशीचाही उल्लेख आहे. एखाद्या घरात प्लेगने मृत्यू झाला तर दारावर फुली मारली जायची हेही दाखवले आहे. ही फुली पाहून पुण्याचा प्लेग व रँडचे अत्याचार आठवले (१८९७) . गुलझार यांनी एके ठिकाणी डॉक्टरच्या स्टेथोची तुलना गलोलीशी केली आहे.
…तर कथानायक अत्यंत हताश, निराश व काहीसा वैफल्यग्रस्त असताना हे गाणे दाखवलेले आहे. एका प्रकारे एका प्रवाहपतित माणसाचे हे स्वगत आहे. नदीचे दोन किनारे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत; त्यामुळे प्रवाहाबरोबर वाहत जाणे हेच माझे गंतव्य आहे आणि तोच माझा किनारा आहे असे नायक सांगतोय; त्यामुळे सुरुवातीला मला वाटले तशी ही दार्शनिक कविता नसून ही एक ‘विराणी’ आहे. त्याला किनारा मिळतो का नाही याचे उत्तर सिनेमात आहे . दिग्दर्शक व गीतकार एकच असला व तो संवेदनशील असला की काव्य काय उंचीला जाऊ शकते ते अनुभवायचे असेल तर हे गाणे दोन-तीनदा ऐका…! किशोरकुमार, आर. डी. व गुलझार यांनी अक्षरश: चमत्कार जन्माला घातलाय!! याच सिनेमात ‘बेचारा दिल क्या करे’ व ‘दो नैनों में आँसू भरे हैं’ ही आणखी दोन अप्रतिम गाणी आहेत. तीही सुश्राव्य आहेत.
१९७५ साली हेमामालिनीची प्रमुख भूमिका असलेले दोन चित्रपट आले : शोले व खुशबू ! या दोन टोकांच्या दोन भूमिका हेमाने अतिशय उत्तम वठवल्या आहेत . बसंती व कुसुम : दोन्ही भूमिकांचा वेगवेगळा बाज तिने छान सांभाळला आहे .
जाता जाता एक प्रश्न … या सिनेमाला ‘खुशबू’ असे नाव का बरे दिले असावे? यात हेमाने साकारलेल्या मुख्य पात्राचे नाव कुसुम आहे याच्याशी त्याचा (बादरायण ) संबंध जोडून याचे उत्तर मिळवले पाहिजे ! या सिनेमासाठी आणखी अर्थगर्भ असे दुसरे नाव तुम्हांला सुचते आहे का?
हे नितांतसुंदर गाणे ऐकण्यासाठी दुवा :

अतिशय सुंदर विवेचन. चित्रपटाचे नांव खुशबू का आहे ते मलाही पडलेले कोडे आहे.