उच्च शिक्षणाचा गाभा – भाग १ – रेड इंडियन
परदेशी आलेल्यांपैकी बरेच जण मूलत: उच्च शिक्षणासाठी परदेशात येतात. यावर आपण एक मूलभूत प्रश्न विचारू या – उच्च शिक्षण – मग ते मायदेशात असो वा परदेशात, आपल्याला नक्की कशासाठी उच्च शिक्षण हवं आहे? त्या मागचा आपला उद्देश काय आहे?
खरं सांगू का, हा प्रश्न मी स्वत:ला कधीही विचारलेला नव्हता. अहो, त्यात विचारायचं काय? शिक्षण म्हणजे आपण कसलाही विचार न करता करत राहण्याची गोष्ट आहे की नाही! Nike कंपनी म्हणते तसं – Just do it! आई-बाप सांगतात, शिक्षक सांगतात, समाज सांगतो, प्रथा सांगतात म्हणून आपण आपलं शिक्षण पूर्ण करतो! बिगरीपासून सुरू झालेल्या शिक्षणाच्या बोगद्यात पोरांना एकदा सोडलं की तिकडे पदवीधर होऊन बोगद्याबाहेर पडेपर्यंत बोलायचं काम नाही! नाही, म्हणजे त्यात वाईट काय आहे?
शिक्षणात वाईट काय आहे? त्याचा उपाय जरी नाही झाला तरी अपाय तर होणार नाही म्हणून हे ‘शिक्षण’ नावाचं औषध घ्या! शिवाय उच्च शिक्षण झालं की ज्ञान मिळतं, डिग्री मिळते, नोकरी मिळते, छोकरी मिळते, पैसा मिळतो, अमेरिकेसारख्या परदेशात गेल्यास ग्रीन कार्ड मिळायला सोपं जातं, कोणत्याही समाजात मानाचं स्थान मिळतं; मग आणखी काय हवं माणसाला?
पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही! उच्च शिक्षण घेतल्यामुळे जे काही व्यावहारिक जगात मिळतं ते उच्च शिक्षणाचे फायदे नक्कीच आहेत; पण तो उच्च शिक्षणाचा मूळ उद्देश नाही! मग काय उद्देश असू शकतो? तर दोन प्रसिद्ध अमेरिकन शिक्षणतज्ज्ञांच्या मते (पार्कर पामर आणि आर्थर झाजोंक) उच्च शिक्षणाचा उद्देश ‘परिपक्व माणूस घडवणे’ हा आहे!
आता ह्या दृष्टिकोनातून विचार करा – तुम्ही विद्यापीठात पाऊल ठेवलं ते परिपक्व होण्यासाठी का? मी अमेरिकेत रॉबर्ट मॉरिस विद्यापीठात शिकवतो ते परिपूर्ण माणसं घडवण्यासाठी का? आई-बाप प्रचंड पैसे खर्च करतात, कष्ट करतात ते स्वत:ची मुलं सुजाण माणूस व्हावीत म्हणून का? खोलवर विचार केलात तर तुम्हांला पटेल की ह्याचं उत्तर चक्क ‘हो’ असं आहे! पण असं कोणी बोलत नाही – कारण हा ‘छुपा’ अभ्यासक्रम (hidden curriculum) आहे! तुम्हांला डॉक्टर, इंजिनीयर वगैरे असा काहीतरी ठळक, नीट शिक्का असलेला अभ्यासक्रम करायचा आहे, त्याला बाजारात भाव आहे, त्याची ओळख आहे; पण मग जबाबदार नागरिक, चतुरस्र व्यक्तिमत्त्व विकसित झालेले सुजाण नागरिक कोण आणि कसे घडवणार?
एक सुजाण , परिपक्व माणूस म्हणजे काय? वर उल्लेखित शिक्षणतज्ज्ञांच्या मते सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे माणसाचे दोन भाग झाले आहेत: एक वरपांगी दिसणारा माणूस (outer self) आणि दुसरा माणसाचे अंतरंग. पहिल्या माणसाला पदवी हवी असते, ज्ञान हवं असतं, सत्ता, संपत्ती, सुबत्ता हवी असते. त्यासाठी उच्च शिक्षणाचा फायदा होतो म्हणून हा सगळा खटाटोप करण्यात येतो; पण दुसऱ्या प्रकारच्या माणसाला काय हवं असतं? त्याला हवे असतात मित्र, समाज, कुटुंब, शांती, प्रेम, समाधान, आयुष्याचा अर्थ, उद्देश आणि दिशा ह्यांचं ज्ञान, भान आणि मार्गदर्शन. ह्या गोष्टी कशा मिळवायच्या त्याचं ज्ञान सध्याचं उच्च शिक्षण अजिबात देत नाही! म्हणून असे दुभंगलेले, आतून कमकुवत असलेले पदवीधर आता बाहेर पडत आहेत. वरकरणी व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी असलेले पदवीधर आतून मात्र व्यथित, गोंधळलेले, एकाकी, निराश असू शकतात आणि म्हणूनच ह्या शिक्षणतज्ज्ञांच्या मते उच्च शिक्षणाचा गाभा ‘पूर्ण माणूस’ घडवण्याचा असायला हवा.
शिक्षणामुळे माणूस माणसाच्या, समाजाच्या, प्रत्यक्ष जीवनाच्या, अत्यंत जवळ यायला हवा. गरिबीवर कितीही पुस्तकं लिहिली आणि वाचली तरी त्या गरिबीची दृश्यं, वास आणि पोटातला भुकेचा जाळ अनुभवल्याशिवाय शिक्षण पूर्ण होणार नाही. संशोधन करताना शास्त्रज्ञाच्या भावना गुंतायला हव्या आणि कविता करताना कवीचं गणित पक्कं असायला हवं! अशा तऱ्हेने ज्ञान पूर्णत्वाला नेऊन पूर्ण माणूस घडवणारा उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम असायला हवा!
१७७४ साली म्हणजे अमेरिका हा देश निर्माण व्हायच्याही आधी मेरिलँड आणि व्हर्जिनिया वसाहतींनी रेड इंडियन्सना १६९३ साली स्थापन झालेल्या ‘William and Mary College’ मध्ये त्यांची तरुण मुलं शिक्षणासाठी पाठवा असा फतवा काढला . त्यावर रेड इंडियन्सच्या टोळी प्रमुखांनी पाठवलेलं उत्तर फार विशेष आहे. ते म्हणाले,”तुमच्या शास्त्र शिक्षणाची संधी आम्हांला दिल्याबद्दल धन्यवाद! परंतु आमचा पूर्वानुभव असा आहे की तुमच्या कॉलेजमध्ये शिकून आलेली मुलं अत्यंत कुचकामाची (totally good for nothing) ठरतात! कारण त्यांना रस्ते माहीत नसतात, त्यांना धड पळता येत नाही, जंगलात राहायचं कसं ह्याचं ज्ञान त्यांना नसतं, ते ना शिकारी होऊ शकतात, ना योद्धे होऊ शकतात, ना मार्गदर्शक (Counsellors) होऊ शकतात. त्यापेक्षा तुम्हीच तुमचे डझनभर तरुण मुलगे आमच्याकडे पाठवा आणि आम्ही त्यांना शिकवून, परिपक्व करून परत तुमच्याकडे पाठवून देऊ!!”
विंदा करंदीकर म्हणतात त्या प्रमाणे:
शब्दांत भाव नाही,
ना वेध अनुभवाचा;
रचना सुरेख झाली!
उपयोग काय त्याचा?
उच्च शिक्षणासमोरचं हे खरं आव्हान आहे. परिपूर्ण माणूस तयार करणे हा त्याचा गाभा आहे. बाकीचे सारे दिशाभूल करणारे गळ आहेत – त्यांच्यापासून जपून राहा!
ह्या दृष्टीने विचार केल्यास भारतीय शिक्षणपद्धतीवर अनेक आक्षेप घेतले गेले आहेत – भारतीय शिक्षणपद्धत कितपत चांगली / योग्य / यशस्वी / उपयोगी आहे? यात गुण चांगले मिळतात; पण ज्ञान मिळतं का? पुस्तकी ज्ञानाचा व्यवहारात उपयोग किती होतो? आणि फारसा उपयोग होत नसला तर इतके कष्ट करून ते शिक्षण घ्यायचं कशाला? आणखी काही वेगळी ज्ञानाधिष्ठित शिक्षणपद्धती उपलब्ध आहे का? पगार कमी असल्यामुळे शिक्षकी पेशाकडे चांगली माणसं ओढली जात नाहीत; त्यामुळे शिक्षकांचा दर्जा चांगला नाही असे पूर्वी समजले जायचे. आता परिस्थिती बदलली आहे. एकंदरीत शिक्षक वर्गाचा पगार समाधानकारक आहे; त्यामुळे सद्यःस्थितीत शाळेत चांगलं शिक्षण कसं मिळेल? उद्याचे नागरिक घडवण्याचं उच्च कार्य करण्यापेक्षा ‘पोट भरण्याचं साधन’ म्हणून ह्या पेशाकडे पाहिल्यामुळे शिक्षकांची प्रवृत्ती शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकडे नसते, अशा वेळी ह्यातून पुढे जाण्याचा काय मार्ग असू शकतो?
ह्याचबरोबर अमेरिकन शिक्षणपद्धतीला असेच अनेक प्रश्न विचारता येतील – चांगला माणूस घडवणे हे प्राध्यापकाचे काम असल्यास त्याला विद्यापीठ व्यवस्थापनाकडून पाठिंबा मिळतो का? एखादा नवा प्राध्यापक संशोधन करणार, विद्यार्थ्यांना शिकवणार, हे करताना तो आपली नेमणूक कायम व्हावी हे पाहणार की ‘पूर्ण माणूस’ घडवण्याच्या मागे लागणार?
ह्याचं उत्तर काही प्राध्यापक असं देतील की ‘सुजाण माणसं घडवणं हे आमचं काम नाही! तशी ही कल्पना वाईट नाही; पण आमच्याकडे ह्यासाठी द्यायला अजिबात वेळ नाही, नाहीतर विचार केला असता!’ मग ही ‘inner journey’ ची जबाबदारी कुणाची आहे? शाळेतल्या शिक्षकांनी काय काय करायचं – शिकवायचं, चांगल्या सवयी लावायच्या, संस्कार करायचे, मनुष्यधर्म, समाजधर्म शिकवायचा, चालीरिती शिकवायच्या, विद्यार्थ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं, त्यांच्याकडून होमवर्क करून घ्यायचा… मग पालकांनी काय करायचं? फक्त पोरांना जन्म देऊन शाळेत अडकवायचे एवढंच? पुन्हा अमेरिकन शाळेत ‘देव’ हा शब्द उच्चारायचासुद्धा नाही; कारण देव आणि शाळा ह्या संपूर्ण वेगळ्या संस्था मानल्या गेल्या आहेत. म्हणजे माणूस घडवायचं ‘धर्म’ नावाचं एक अस्त्र अमेरिकेत काढून घेतलेलं आहे. त्यात अमेरिकन कुटुंबपद्धती मोडकळीला आली आहे . त्यामुळे मुलांच्या विकासाची सर्वांगीण जबाबदारी शिक्षणपद्धतीवर पडते आहे – हे प्रचंड कामाचं ओझं शाळांना झेपण्यासारखं नाही.
किती वेगवेगळे प्रश्न आहेत ना? परिपूर्ण शिक्षणपद्धती तर कोणतीच नाही – ज्या त्या समाजाच्या आर्थिक, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक संस्थांमधून शिक्षण संस्था निर्माण होत असतात. काळाप्रमाणे शिक्षण संस्था आणि शिक्षणपद्धती बदलतात. चांगलं शिक्षण मिळणं ही कुणा एका घटकाची जबाबदारी नाही- प्रत्येकाने त्यांचा त्यांचा कामाचा वाटा उचलला पाहिजे – मुलं, पालक, कुटुंब, शिक्षक, समाज, पुढारी – सगळ्यांचीच गुंतवणूक ह्यात असली पाहिजे. ‘घोका! घासा! घोटा! गिरवा! रट्टे मारा! तोंडपाठ करा! गप्प बसा! नसते प्रश्न विचारू नका! निमूटपणे असं लिहून घ्या!’ ही भाषा कमी व्हायला पाहिजे.
‘हा प्रयोग करा! हा चित्रपट बघा! तुम्हांला काय वाटतं ते तुमच्या शब्दांत लिहा! चला आपण सगळे सहलीला जाऊन प्रत्यक्ष बघून येऊ या! हा धंदा चालवून दाखवा! गरीब लोकांसाठी पैसे मिळवा! एकाकी लोकांना तुम्हांला जमेल ती मदत करा! तुमची कल्पनाशक्ती वापरून पुढे काय होईल त्याचा विचार करा! हवे तेवढे प्रश्न विचारा! प्रश्न विचारायला घाबरू नका! प्रश्न विचारला तर मला लोक हसतील का असा विचार करू नका; कारण ‘न विचारलेला प्रश्न’ हाच सगळ्यात खुळा प्रश्न असतो हे लक्षात ठेवा! एकमेकांचा आदर राखायला शिका!’ ही भाषा वाढायला पाहिजे.
आता शेवटी एक गोष्ट सांगतो. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली ह्या अत्यंत नामवंत विद्यापीठात गणित विभागात घडलेला हा किस्सा. युरी ट्राइसमन ह्या प्रोफेसरच्या वर्गात गोरे अमेरिकन, काळे अमेरिकन आणि एशियन/भारतीय वंशाचे विद्यार्थी होते. गणिताच्या परीक्षांमध्ये काळ्या अमेरिकन्सची वाट लागायची, गोरे अमेरिकन धडपडायचे तर एशियन/भारतीय चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण व्हायचे. असं वारंवार होऊ लागलं. युरीचे मित्र त्याला म्हणाले,”अरे, काळजी करू नकोस! हा आमचा नेहमीचा अनुभव आहे. काळ्या अमेरिकन्सना गणिताची भीती वाटते तर एशियन/भारतीय मुळातच गणितात चांगले असतात; त्यामुळे हे असंच घडणार असं धरून चाल;” पण युरीने हे गृहीतक मानलं नाही. त्याने ह्याचा आणखी अभ्यास करायचं ठरवलं. त्याने काही इतर विद्यार्थ्यांना वर्गाच्या दाराबाहेर उभं राहून वर्ग संपला की बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारायला सांगितले,”का हो, तुम्हांला आज जे वर्गात शिकवलं गेलं त्यातलं कितपत कळलं?” आणि आश्चर्य म्हणजे जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याने एकाच प्रकारचं उत्तर दिलं,”कळलं थोडफार; पण बरंच डोक्यावरून गेलं!” असं जर होतं तर मग अंतिम निकालात इतका फरक का पडत होता? ह्याचं उत्तर ती मुलं पुढे काय करतात ह्यात त्याला मिळालं. कृष्णवर्णी अमेरिकन मुलं एकेकटी धडपडत बसली; कारण त्यांच्या संस्कृतीत अभ्यासासाठी दुसऱ्याची मदत घेणं कमीपणाचं मानलं जायचं. काही गोरी मुलं दोन-चार मुलांचे अभ्यास गट करीत; तर काही मुलं एकटीच अभ्यास करीत. ह्याच्या उलट एशियन/भारतीय वंशाचे विद्यार्थी लगेच कॉफी शॉप किंवा कुठेतरी बसून एकत्र अभ्यास करून गणिताची कोडी सोडवत असत! हे रहस्य कळल्यावर युरीने लगेच वर्गातल्या सर्वांचे अभ्यासगट तयार केले आणि त्याचा चांगला परिणाम त्याला लगेच दिसून आला!
‘गणितातलं यश रक्तात किंवा वंशात नसून अभ्यास करण्याच्या पद्धतीत आहे,’ ह्या शोधाबद्दल त्याला शिक्षण क्षेत्रातलं ‘मॅकआर्थर जिनियस अवार्ड’ मिळालं! ‘विद्यार्थी एकमेकांना चांगलं शिकवू शकतात,’ अशा तऱ्हेची रहस्यं डोळ्यांसमोर असूनही आपल्याला कधी कधी ती नीट उमगत नाहीत.
शेवटी ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!’ हाच मूलभूत संदेश आहे ना शिक्षणाचा? शिक्षणाचे गळ असे रंगीत, मैत्रीपूर्ण, आकर्षक करायला हवेत म्हणजे उच्च शिक्षणाच्या गाभ्यापर्यंत आपल्याला सहज पोचता येईल असं मला वाटतं.
(क्रमश: … )
******************************************
