मित्र नावाचा नातलग…

ना जवळचा ना लांबचा…

पण  हाकेच्या अंतरावरचा… 

 मित्र नावाचा नातलग… ना जवळचा ना लांबचा…पण  हाकेच्या अंतरावरचा…

एकेकाळचा अनोळखी पण आता जिवलग

ना जातीचा ना पातीचा

ना रक्ताचा ना वंशावळीचा

मीही तोच, तोच तूही

मीपणाच नाही कुठे… 

वयं वाढली… बुद्धी वाढली…  तशी इयत्ताही वाढत गेली…

बालवाडीची झाली शाळा… शाळेचं झालं विद्यालय.. तिचं झालं महाविद्यालय…  मित्र नावाच्या नातेवाइकांत नवी भर पडली…मिशी आली 

…दाढी वाढली… खांद्याखांद्यावर जबाबदारी वाढली…

रोटी कपडा और मकान… काळानुरूप  गरजा बदलल्या… 

बदलल्या सुखाच्या कल्पना…त्याच्या शोधासाठी पायाला भिंगरी…. झाल्या दिशा वेगवेगळ्या … झाल्या वेगवेगळ्या वाटा…काही स्वत:च्या… काही वहिवाटा…

पण वाटेच्या प्रत्येक वळणावर मागे वळत एकमेकांना अडीअडचणीला ‘मैं हूँ ना’ चा आशावाद देत संसाराची सप्तपदी चालणारे मित्र…

 पोटाची भूक ज्यांनी कधीकाळी वाटून खाऊन भागवली ते आता  झाले एकमेकांच्या भावनिक भुकेचे वाटेकरी…

हक्काने बोलवता येईल असा सुखदुःखातील सहकारी…

लग्नं,बारसं, बर्थ डे,पूजा,

दहन,दफन,दहावा,तेरावा…

कुणी कारने, कुणी दुचाकीने तर कुणी बसने …पण येणार हमखास ‌..नातलगांपेक्षा आधी पोहचणारा तोच मित्र नावाचा नातलग…ना लांबचा ना दूरचा… हाकेच्या अंतरावरचा… 

गेल्या ५० वर्षांत कितीतरी वेळा आला गेला…दु:खात आणि सुखात…कधीतरी सहज…वाटलं भेटावं म्हणून आलेला… वयाने  साठी गाठली तरी चवीपुरतं बालपण अजूनही  गाठीला जपलेला..

कष्टाने मिळवलेली सुबत्ता आणि दैवाने दिलेली सुखदुःखं भोगलेली पिढी .. 

काहींनी मोजता येणार नाही इतकं मिळवलं तर कुणी सहन होणार नाही इतकं गमावलं…  कुणाची सुखं मुठीत सामावलेली… तर कुणाची मिळकत बॅंकेच्या पासबुकातील पानावर मावलेली…

पंखांत बळ भरलेल्या पाखरांनी आपापलं आभाळ शोधलं… कुणी लोकल तर कुणी ग्लोबल झालं.

कोणी आजोबा केलं तर कोणी ग्रॅंडपा… मोबाईलच्या पडद्यावर नातवाने दिला पा…

पोटाचा घेर सुटला…गुढग्यांचा भार वाढला

केसाने रंग सोडला…डोक्याने केस सोडले…

बीपी, शुगर, संधिवात… सकाळ दुपार संध्याकाळ.

जेवणाच्या जागी औषधं आली…

तरीही

मित्रांचा कुंज तोच

तीच मैत्रमोहिनी

माझ्या ६१ व्या वाढदिवशी एका हाकेला जमला… कुणी कारने, कुणी दुचाकीने; तर कुणी चालत…पद, प्रतिष्ठा अन् सुबत्तेपायी साठलेलं मीपणाचं ओझं  उंबरठ्यावर सोडून… 

तोच उत्साह तीच निरागसता…

बालसवंगडी ते शाळकरी… वर्गात पहिल्या दिवशी एकाच सुरात रडलेले ते तमाम सुदामा… सवंगड्याच्या अनेक सुखात हसलेला आणि प्रत्येक दुःखात पाणावलेला   सुदामा…  

तांबेकर,घारे,नारंग,झानपुरे,सोमण…

घाटणेकर,सानप, चव्हाण,आठवले…

किती नावं किती आडनावं…  

ना जात ना पात 

ना भेद ना भाव..

आता ना फडक्यातील भाकरी उरली ना डब्यातील तूपसाखर पोळी…उरले आहेत जग नावाच्या बंदीशाळेतील शेवटचे काही तास 

आणि प्रत्येक सुदाम्याने जपलेले पोहे खास…

शाळा संपल्याची घंटा वाजण्याआधी आनंदाने वाटून खा ते उरलेसुरले चविष्ट घास..

मित्र नावाच्या नातलगाचे…..

ना जातीचा ना पातीचा

ना रक्ताचा ना वंशावळीचा

ना जवळचा ना लांबचा…पण  हाकेच्या अंतरावरचा…

Author

Leave a Reply