बचत आणि गुंतवणूक

भारतीयांची मानसिकता पूर्वापारपासून बचत करण्याची आहे. बचतीचे महत्त्व  अगदी ऋग्वेदापासून ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रापर्यंत आणि नीतिशास्त्रापासून ते अगदी आत्ताच्या वर्तमानपत्राच्या अर्थविषयक पुरवण्यांपर्यंत सगळीकडे चर्चिलेलं आढळून येतं. 

    भारतीय लोक जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांच्या रक्तात भिनलेली ही बचतीची वृत्ती तसूभरही कमी होत नाही आणि एवढंच नाही तर ती पुढच्या पिढ्यांमध्ये आपसूक पाझरते. २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या ‘बचत वर्तनाचे सांस्कृतिक मूळ’ (The Cultural Origin of Saving Behaviour) या अभ्यासादरम्यान या संदर्भात निष्कर्ष काढण्यात आला तो असा: 

    संस्कृती हा बचतीच्या वृत्तीमधला एक दुवा आहे. युरोपात स्थायिक असलेल्या भारतीयांची मुले व नातवंडे आपल्या वडीलधाऱ्यांच्या बचत करण्याच्या सवयीने प्रभावित होतात. तसेच हा प्रभाव तीन पिढ्यांपर्यंत कायम राहतो, असंही या अभ्यासातून निदर्शनास आल्याचं म्हटलं आहे. युरोपातील भारतीयांच्या बचतीचे प्रमाण हे त्यांच्या मूळ देशातील लोकांच्या तुलनेत समान असल्याचेदेखील (एकूण उत्पन्नाच्या ३०% च्या आसपास) या अभ्यासात दिसून आले. 

    तर बचत ही गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. मुलांचे शिक्षण, स्वतःचे घर, गाडी, कुटुंबाची, भविष्याची तरतूद अशी या बचतीच्या वृत्तीमागची कारणे म्हणता येतील. बचतीच्या बाबतीत थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीला भारतीयांनी अगदी आपल्या रक्तात भिनवलं आहे. याचा प्रत्यय रिजर्व बँकेच्या तिमाही अहवालावरून नक्कीच येतो. या अहवालानुसार मार्च २०२२ अखेर भारतीयांच्या बँक, म्युच्युअल फंड, जीवनविमा यांसारख्या साधनांमधील गुंतवणुकीचा आकडा २,२०,००० अब्ज इतका भला मोठा आहे. 

अर्थव्यवस्थेसाठी चांगलं काय? बचत की खर्च?

जगभरातल्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये या बाबतीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. खर्च केल्याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही; कारण खर्च केल्याशिवाय उत्पादन वाढू शकत नाही; तसेच एकाचा खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न असते. खर्च कमी म्हणजे पर्यायाने उत्पन्न कमी हा एक मतप्रवाह आहे; तर दुसऱ्या मतप्रवाहानुसार अविरत खर्च हा अर्थव्यवस्थेला मंदीच्या गर्तेत लोटण्यासाठी कारणीभूत ठरतो. याच्या समर्थनार्थ हे अर्थशास्त्रज्ञ अमेरिकेतील मंदीची उदाहरणं देतात. प्रसंगी खिशात पैसे नसताना पतसंस्थांकडून होणाऱ्या मुक्त वित्त पुरवठयाच्या जीवावर खर्च करत सुटल्यावर जेव्हा कर्जाची परतफेड करण्यासाठी हातात काही शिल्लक नसते. अशा परिस्थितीमध्ये कर्जाची परतफेड करता न आल्याने अर्थव्यवस्था दोलायमान होते असा प्रतिवाद हे तज्ज्ञ करतात. 

आर्थिक मंदीच्या काळात व्यक्ती अधिक बचत करण्याचा प्रयत्न करतात; ज्यामुळे एकूण मागणी कमी होते आणि अशी परिस्थिती एकंदर आर्थिक वाढीलादेखील बाधा आणते. अशी परिस्थिती प्रत्येक घटकासाठी हानिकारक आहे. कारण गुंतवणुकीला पायबंद बसतो आणि गुंतवणूक केली तरी ती सामान्य स्थितीपेक्षा कमी परतावा देत असते असे काटकसरीच्या विरोधाभासाचा सिद्धांत सांगतो. तर याला विरोध करणाऱ्यांच्या मते व्यक्तिगत बचत / गुंतवणूक या फक्त व्यक्तिगत पातळीवर नाहीत तर राष्ट्रीय पातळीवर देखील महत्त्वाच्या आहेत व त्या अर्थव्यवस्थेला कोणत्याही धक्क्यातून लवकर सावरण्यास मदत करतात. तात्पर्य काय?  तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट. खर्च आणि बचत / गुंतवणूक यांचा योग्य समतोल हा अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. 

गुंतवणूक

आता आपण या लेखात व्यक्तिगत गुंतवणुकीबद्दल चर्चा करणार आहोत. ही गुंतवणूक करताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार करतो? गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा आपण प्रामुख्याने विचारात घेतो. मात्र गुंतवणूक करताना आपलं ध्येय काय आहे? त्या ध्येयपूर्तीसाठी जो परतावा आपल्याला मिळतो आहे तो पुरेसा आहे का? आपण करत असलेली बचत व गुंतवणूक आपल्या ध्येयपूर्तीसाठी पुरेशी आहे का? आपण करत असलेली गुंतवणूक आपल्या जीवनशैलीच्या तुलनेत पुरेशी आहे का? किंवा ज्या साधनांमध्ये आपण गुंतवणूक केली आहे ती सुरक्षित आहेत का? उपलब्ध साधनांमधून कोणती साधने आपल्याला अपेक्षित परतावा देऊ शकतात? काही कारणास्तव भविष्यात काही दुर्घटना झाल्यास आपल्या गुंतवणुकीच्या ध्येयावर याचा काय परिणाम होईल? या परिणामांचे गांभीर्य कमी करता येऊ शकते का? असल्यास त्याचे उपाय काय? परताव्याव्यतिरिक्त अशा इतर अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचारदेखील गुंतवणूक करताना करणे आवश्यक आहे. 

परताव्याचा विचार करायचा झाल्यास जो व्याजदर आपल्याला गुंतवणुकीवर मिळतो तो परतावा पुरेसा आहे की नाही हे ठरवण्यासाठी मदत करतो. ढोबळमानाने हा व्याजदर प्रचलित महागाई दरापेक्षा जास्त असावा. अन्यथा आपल्या गुंतवणुकीची भविष्यातील किंमत ही त्यावेळच्या बाजारमूल्याशी सुसंगत राहणार नाही व पर्यायाने आपल्याला नुकसान सोसावे लागेल. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू : 

आज एखाद्या गोष्टीची किंमत बाजारात १०० रुपये आहे. भारतात महागाई दर हा साधारण ७.५% च्या आसपास आहे. म्हणजेच दरवर्षी वस्तूंची किंमत ७.५% नी वाढते. यानुसार साधारण दर १० वर्षांनी वस्तूंची किंमत दुप्पट होते; म्हणजे आपण आज गुंतवलेल्या १०० रुपयांवर किमान ७.५% व्याजदर मिळाल्यास आणखी १० वर्षांनी आपल्याजवळ ती वस्तू खरेदी करण्याएवढे पैसे असतील. गुंतवणुकीवरचा व्याजदर अथवा परतावा ७.५% पेक्षा कमी असल्यास आणखी १० वर्षांनी ती वस्तू आपण खरेदी करू शकणार नाही; कारण आपण गुंतवलेली रक्कम व त्यावरील परतावा हा दुप्पट होणार नाही. याव्यतिरिक्त, परतावा करपात्र असेल तर त्यावरील करदेखील विचारात घ्यावा लागेल. करामुळे परताव्याच्या दरावर परिणाम होतो. आज आयकराचा किमान दर १०.४०% व कमाल दर ३१.२०% आहे. म्हणजे ७.५% व्याजातून कर वजा करता शिल्लक परतावा हा कमाल ६.७२% व किमान ५.१६% इतकाच राहील. अशा परिस्थितीतदेखील गुंतवणुकीवरील व्याजदर महागाई दराइतकाच किंवा अधिक असूनही आपल्या गुंतवणुकीची भविष्यातील किंमत ही वस्तूच्या बाजारमूल्यापेक्षा कमीच असेल. याचा निष्कर्ष असा की गुंतवणुकीवर करवजावटीनंतर मिळणारा परताव्याचा दर हा महागाई दरापेक्षा अधिक असावा. अन्यथा तो भविष्यातील बाजारभावाच्या तुलनेत पुरेसा ठरणार नाही. 

आता वर चर्चिल्याप्रमाणे व्याजदराव्यतिरिक्त इतर बाबींचा अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला हवा. यात आपल्याला प्रमाणित आर्थिक सल्लागार (Certified Financial Planner), सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (SEBI Registered Investment Advisor), सनदी लेखापाल (Chartered Accountant) असे अनेक व्यावसायिक सल्लागार मदत करू शकतात. आंतरजालावर (इंटरनेट) अशा सेवा पुरवणारी अनेक संकेतस्थळे (website) देखील आहेत. मात्र त्यांच्याकडून अशा प्रकारची सेवा घेण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षिततेची, आपण देत असलेल्या माहितीच्या गोपनीयतेची खातरजमा करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

गुंतवणुकीचे पर्याय:

आज आपल्याकडे गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायांबरोबरच इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या लेखात आपण यातील वित्तीय साधनांचा (financial instruments) विचार करू या. मुदत ठेवी (Fixed Deposits), आवर्ती ठेवी (Recurring Deposits), पोस्ट ऑफीसमधील ठेवी, मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत योजना (National Saving Scheme), किसान विकास पत्र, भविष्य निर्वाह निधी, सरकारी रोखे, सोने इत्यादी पारंपरिक गुंतवणुकीची साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना, विविध प्रकारच्या म्युचुअल फंड योजना, खाजगी कंपन्यांमधील मुदत ठेवी, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond Scheme), भारतीय तसेच परदेशी शेअर बाजारातील गुंतवणूक असे नवीन पर्यायदेखील उपलब्ध आहेत. प्रत्येक साधनांची जोखीम वेगवेगळी आहे. सर्वसाधारणपणे परतावा आणि जोखमीचे प्रमाण हे सम असते. जास्त परतावा म्हणजे जास्त जोखीम असे समीकरण असते. तसेच प्रत्येक साधनांची तरलतादेखील (Liquidity) वेगवेगळी असते. तरलता म्हणजे गुंतवणुकीच्या साधनांची किंमत कमी न होता रोखीमध्ये रूपांतरित होण्याची सहजता. ही सहजता रोखीत रूपांतरित होण्यासाठी लागणाऱ्या वेळानुसार ठरवली जाते. उदाहरणार्थ १५ वर्षांचा गुंतवणूक काळ असलेली भविष्य निर्वाह निधी योजना कमी तरल आहे; तर 3 वर्षांसाठी बँकेत ठेवलेली मुदत ठेव ही तुलनेत अधिक तरल आहे.

त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवश्यकतेनुसार व जोखीम पत्करण्याच्या तयारीनुसार गुंतवणुकीचे पर्याय निवडावेत. अधिक जोखमीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ / जाणकारांचा व्यावसायिक सल्ला घेणे हे कायमच शहाणपणाचे ठरते. गुंतवणुकीच्या या विविध पर्यायांची जोखीम, परतावा, करपात्रता, तरलता, सुरक्षितता अशा विविध निकषांवर खालीलप्रमाणे तुलना करता येऊ शकते. 

गुंतवणुकीचे साधन जोखीम सर्वसाधारण व्याजदर व्याज / परताव्याची करपात्रता तरलता (Liquidity)सुरक्षितता 
बँक मुदत ठेव कमी ६.००% ते ७.५०%करपात्रमध्यमअधिक 
पोस्ट ऑफीस मुदत ठेव कमी ६.००% ते ७.५०%करपात्रमध्यमअधिक 
बँक आवर्ती ठेव कमी ५.५०% ते ६.५०%करपात्रअधिक अधिक 
पोस्ट ऑफीस आवर्ती ठेव कमी ५.५०% ते ६.५०%करपात्रमध्यमअधिक 
खाजगी कंपनी मुदत ठेव मध्यम७.५०% ते ९.५०%करपात्रमध्यममध्यम
पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजना कमी ७.४०%करपात्रकमी अधिक 
राष्ट्रीय बचत योजना (NSC)कमी ७.७०%नाही कमी अधिक 
किसान विकास पत्र कमी ७.५०%करपात्रकमी अधिक 
भविष्य निर्वाह निधी कमी ७.१०%नाही कमी अधिक 
सुकन्या समृद्धी योजना कमी ८.००%नाही कमी अधिक 
ज्येष्ठ  नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)कमी ८.२०%करपात्रकमी अधिक 
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)मध्यम ते अधिक ९.००% ते १२.००%*आंशिक करपात्र कमी मध्यम
सार्वभौम सोने रोखे योजना कमी ९.००% ते १५.००%*करपात्र @मध्यममध्यम
विविध म्युचुअल फंड योजना मध्यम ते अधिक ९.००% ते १५.००%*करपात्र #अधिक मध्यम ते कमी 
शेअर बाजारातील गुंतवणूकअधिक बाजारभावाशी निगडित करपात्र #अधिक कमी 
* अंदाजित आणि बाजारभावाशी निगडित तसेच योजनेच्या प्रकारावर अवलंबून. 
# एक लाख रुपयांपेक्षा अधिक लाभावर दीर्घकालीन भांडवली लाभ कर (Long Term Capital Gain Tax) @ १०.४०% 
@ व्याज करपात्र. मुदतअखेरीपर्यन्त न विकल्यास दीर्घकालीन भांडवली लाभ कर नाही.

विविध विमा योजना – एक गुंतवणूक पर्याय?

सर्वसाधारणपणे जीवनविम्याकडे आपण एक गुंतवणुकीचे साधन म्हणून बघतो. विम्याच्या हप्त्यांना आयकरामधून मिळत असलेल्या वजावटीमुळे आयकरातून सूट मिळवण्यासाठी अनेकजण याकडे करातील सूट मिळण्याचे साधन आणि गुंतवणूक अशा दुहेरी चष्म्यातून बघतात. मात्र खरंच विमा योजनांकडे गुंतवणुकीचे साधन म्हणून बघणे योग्य आहे का? माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. विमा आणि गुंतवणूक या परस्पर भिन्न; पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करता कामा नये. विमा म्हणजे गुंतवणुकीच्या आपल्या ध्येयात भविष्यात कोणतीही बाधा आल्यास त्याचे निराकरण करणारी आपत्ती व्यवस्थापन योजना! या तत्त्वानुसार विमा योजनांकडे बघून आपल्या गुंतवणूक ध्येयातील आपत्ती व्यवस्थापनासाठी योग्य विमा योजनेची निवड करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने अधिक विमा रक्कम (Sum Assured) पण कमी हप्ते असलेल्या शुद्ध विमा योजनांचा (Basic Term Insurance Plan) समावेश आपल्या नियोजनामध्ये करावयास हवा. गुंतवणूक म्हणून जर विमा योजनांचा विचार करावयाचा झाल्यास अधिक परतावा देणाऱ्या यूलीप (ULIP – Unit Linked Insurance Plan) योजनांचा विचार करता येऊ शकेल. मात्र गुंतवणुकीचे प्राथमिक साधन म्हणून विमा योजनांचा विचार करणे योग्य ठरणार नाही. 

तर अशाप्रकारे आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी, आपल्या निवृत्तीनंतरच्या सुखकर आयुष्यासाठी आणि कोणावरही अवलंबून न राहता आपले आर्थिक स्वातंत्र्य जपण्या वा मिळवण्यासाठी आपण कष्ट करून साठवलेल्या पैशांची गुंतवणूक नियोजनपूर्वक करणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी ही आर्थिक साक्षरता अंगी बाणवण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा.

Author

Leave a Reply