चारी बाजूंना दूरवर पसरलेला पिवळा शुष्क माळ. त्यावर एकट्याने संकटांना झुंज देत वाढलेला धीरगंभीर विस्तीर्ण वड! एकाकी!
कधीतरी वार्याच्या इवल्या झुळुकेवर भुरभुरत एक बीज येऊन पडलं. कोवळा गुलाबी-तपकिरी कोंब तरारला. स्वत:त निमिषानिमिषानं होत जाणारा बदल पाहून चकित होणारा. मश्गूल…
आणि एका तिन्हीसांजेला मंद-मंजूळ संगीत त्याच्या कानावर आलं. अंगावर सुखद रोमांच उठले. अनावर उत्सुकतेनं त्यानं सभोवार पाहिलं. सगळं मोकळं मैदान – दूरवर उभा एक फक्त वड. कबर्या आभाळावर अधिकच गूढ दिसणारा. ‘हे जादुई संगीत याचं थोडंच असणार आहे!’
कोंबाला हसूच फुटलं – त्यालाही कळण्यापूर्वी पहिलीवहिली दोन रसरशीत, लुसलुशीत पानं उमलली. तेवढ्यात वारा पुन्हा झुळझुळला. वडाच्या पानांच्या सळसळीची नवी लाट पोपटी कानांपर्यंत पोचली. त्या इवल्या जीवात आश्चर्य, कौतुक मावेना.
वडानं रात्रभर अधूनमधून ते जीवघेणं संगीत दिलं आणि ताठ मानेच्या त्या इवल्या कोंबानं पहिल्यांदाच स्वत:ला विसरून, अपूर्वाईनं ते सगळं गोळा केलं. सकाळपर्यन्त दोघांची पार गट्टी जमून गेली.
वडाचं वर्षांनुवर्षांचं एकाकीपण असं अचानक हरवलं. उन्हात चमचमणारं, जीवनरसानं ओथंबलेलं ते पोपटी कौतुक त्याला कमालीचं आवडलं. पहिल्यांदाच वय विसरून तो मुक्त हसला. सूर्यकिरणात न्हाणारं ते पोर त्या हसण्यानं पार वेडावून गेलं. मान आणखी उंचावून त्या सोनसळी प्रकाशात ते वेड लावणारं विशाल रूप सगळंच्या सगळं एका नजरेत साठवण्याचा भाबडा प्रयत्न त्यानं केला. आपला आवाका उमगून त्याला खुद्कन हसू फुटलं आणि खळ्कन आणखी दोन पानं उमलली.
गुजगोष्टींना दिवस कमी पडत होते. दिवसामासानं फुलत जाणारं रोपटं वड अपार प्रेमानं पाहत होता. मधूनच कधी वाटायचं, आपल्यातलाच हा अंश असा नजरेसमोर बहरतो आहे – आपलं बालपण, आपलं तारुण्य, सगळं अवखळपण. ही ऊर्मी मन सुखानं ओसंडून टाकायची. गात्रागात्राला तृप्तीची जाणीव व्हायची…
कडक ऊन पडलं की रोपटं कोमेजायचं. कधी सोसाट्याचा वारा-पाऊस त्याला विकल करायचा. आमवास्येचा अंधार बागुलबुवा होऊन यायचा; पण वड खंबीर उभा होता. सगळ्या पारंब्या पाळामुळांसकट जमिनीत खोल रोवून. तिथूनच तो रोपट्याला समजवायचा-धीर द्यायचा. संगीतानं आसमंत भारून टाकायचा. वडाची स्निग्ध नजर, वाहतं गाणं सापडलं की रोपट्याचं दु:ख – भीती क्षितिजापलीकडे पळायची.
वड मनोमन सुखावायचा. कुणीतरी त्याच्यावर सर्वतोपरी अवलंबून होतं. क्षणाक्षणाला आधार मागत होतं. इतकं छोटं, इतकं नवथर, इतकं छान. बावरलं की चटकन जवळ घेऊन शांत करावंसं वाटायचं. मोठ्या निग्रहानं वड ही ऊर्मी दूर सारायचा. हा अंतरावरचा सहवास – एवढाही विरंगुळा आजवर सोसलेल्याचा निचरा करायला पुरेसा होता. एकमेकांच्या संगतीत जीवन सुसह्य होत होतं.
…आणि एक दिवस उजाडला. चांगला की वाईट- ठाऊक नाही; पण आला. भिरभिरत. रोपट्याची वाढीला लागलेली हुरहुर शिगेला पोचत होती. इतक्या लांबून जर एकमेकाला इतका दिलासा देता येतो; मग जवळ का नाही यायचं? हे अंतर कशासाठी? वडाच्या सावलीत मला शांतता मिळेल. याच्या अंगाखांद्यावर खेळायचं आहे मला. सुखानं किती काठोकाठ असेल तो क्षण!
वडाला लांबूनही ही चलबिचल समजत होती; पण शेवटी सत्ता होती माळाची. त्याच्या मर्जीविरुद्ध काही करायचं म्हणजे शिक्षा एकच – मृत्यू! वडाला तर कधीचे उमाळे येत होते, त्या इटुकल्याला आपले सगळे जमिनीतले हात सोडवून घेऊन जवळ बोलवावं – पसरलेल्या बाहूत आलेलं ते सोनुलं आवेगानं छातीशी धरावं – हृदयाशी जपून ठेवावं…
पण हे मान्य होण्यासारखं नव्हतं. एका ओझरत्या अपूर्वाईच्या क्षणापाठोपाठ सगळं स्वप्नच मातीमोल झालं असतं. अंतरावरून मिळेल तेवढ्यावर समाधान मानणं भाग होतं . आतून भरून येत होतं; तरीही गंभीरपणे हे सगळं त्या रोपट्याला समजावत वृक्षराज उभा होता; पण त्या अनावर जीवाला ते काही केल्या उमगत नव्हतं… हट्टाला पेटून त्यानं जमिनीतून जीवनरस शोषणंही सोडून दिलं . पोपटी रंग निस्तेजत चालला. वडानं काकुळतीनं विनवून पाहिलं; पण रोपट्याला दुसर्या कशातच गम्य नव्हतं. ती जवळीक- तेवढाच ध्यास…
आणि वड हताश होऊन उभा होता. कितीही अनावर झाला तरी त्याची मुळं खाली खोल गेलेली होती. पारंब्यांनी जमीन धरलेल्यालाही वर्षं लोटली होती. स्वत:च गुंफलेल्या विस्तीर्ण गुंत्यात पूर्णपणे जखडलेला वड रोपट्याला गोंजारायलाही असमर्थ होता. नि:शब्द हतबल … बधिर…

अलवार नात्याची गोष्ट!