कविता – गोविंदा

थरावरी थर गगनी चढले

‘गोविंदें’ कान्हाला स्मरले

उंच उभा तो तोल सावरी

कंपित मन ते दहाव्या थरी ।।१।।

हात पित्याचा यंत्रे गिळला

मायमजुरी न पुरे भुकेला

मातपित्यांच्या थरथर मनिची

जाणवली चिमण्या जीवाला ।।२।।

वय अवघे त्या थरांएवढे

घरचि आपदा करी बापुडे

खारीचा वाटा उचलाया

पोर गोजिरे बहू धडपडे ।।३।।

मातीचा घट नजरेपुढती

आशा त्याच्यासह हिंदळती 

घटास छोटे हात शोधिती

नोटा त्या वाकुल्या दाविती ।।४।।

लोटत झुंडी बघण्या हंडी

गोविंदांच्या त्या उतरंडी

राजकारणी, कधी तारका

स्ववैभवे ती सजवित हंडी ।।५।।

माय तात गर्दीत उभे ते

देखित आपुल्या लहानग्या ते

मायेच्या ती मनिची थरथर

परमेशाला त्या आळविते ।।६।।

करुनि दूर मनिची कातरता

स्मरुनि क्षुधेची कासाविसता

हातां स्थिर करुनि थरथरत्या

माय मनी आणी कणखरता ।।७।।

पोर घेतसे वेध हंडिचा

हाती श्रीफल कल्पतरुचे

जोम लावुनी फोडत हंडी 

प्रश्न सोडवी चार भुकांचे ।।८।।

जीवन का ते चार भुकांचे?

दिन, महिने अन् किति वर्षांचे!

फोडुनि हंडी भुकेस भिडण्या

जीव कोवळा सरावलासे! ।।९।।

Author

One thought on “कविता – गोविंदा

  1. करुण वास्तव मांडणारी – चित्रदर्शी कविता.

Leave a Reply