श्रीशिवछत्रपतींचे संपूर्ण जीवन अवघ्या महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान आहे आणि त्यांच्या जीवनकालातील वेगवेगळ्या घटनांवर विपुल प्रमाणात लेखन आणि संशोधन झाले आहे. त्यांच्या जीवनातील परमोच्च बिंदू म्हणजे त्यांचा राज्याभिषेक आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्या दिवसापासून सुरू झालेला राज्याभिषेक शक.
शिवराज्याभिषेकाविषयी मराठीत विपुल संशोधन आणि लेखन झाले आहे; परंतु ते सर्व लेखन वेगवेगळ्या लेखकांनी त्यांच्या लेखांत किंवा ग्रंथांत शब्दबद्ध केले आहे. शिवछत्रपतींच्या अभ्यासकांना शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ किंवा त्यांचे विविध पैलू समजण्यासाठी त्या पुस्तकांचे वाचन आणि मनन करणे आवश्यक आहे. जेथे सुसज्ज ग्रंथालये फारशी अस्तित्वात नाहीत अशा ग्रामीण भागातील शिवप्रेमींना मात्र वाचन ही गोष्ट अतिशय अवघड होते.नेमकी हीच खंत लक्षात घेऊन श्री. अनिल पवार या तरुण शिवप्रेमीने असंख्य वाचनालये पालथी घालून त्यांतील पुस्तके, लेख आणि अप्रकाशित वाङ्मय यांचा अभ्यास करून एक अप्रतिम ग्रंथ साकारला आहे आणि
‘शिवराज्याभिषेक: भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या नावाने महाराष्ट्रापुढे सादर केला आहे.
डॉ. सदानंद मोरे सरांनी संपादित केलेल्या या ग्रंथाच्या सुरुवातीची त्यांची अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना ग्रंथाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.
वाचकांच्या सोयीसाठी ग्रंथ चार भागांत विभागला आहे,
१ शिवराज्याभिषेक इतिवृत्त व अन्वयार्थ
२ राज्याभिषेकाचे विविध पैलू
३ स्वराज्य: संकल्प, संकल्पना व प्रेरणा
४ शिवरायांची महती
छ्त्रपती संभाजी महाराज, न्या. म. गो. रानडे, वि. का. राजवाडे, वा. सी. बेंद्रे, आ. ह. साळुंके, सेतुमाधवराव पगडी, डॉ. जयसिंग पवार, ग. भा. मेहेंदळे, त्र्यं. श. शेजवलकर, राजारामशास्त्री भागवत, नरहर कुरुंदकर, सर यदुनाथ सरकार, डॉ. बाळकृष्ण, रियासतकार सरदेसाई आदी मान्यवर विद्वानांनी शिवराज्याभिषेकाच्या विविध पैलूंवर केलेले लिखाण अत्यंत नेटकेपणाने संपादित करून सामान्य वाचकांसमोर ठेवल्याने राज्यभिषेकासंबधी माहितीचा खजिनाच वाचकाला विनासायास उपलब्ध झाला आहे.
सर्वसामान्य जनतेला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि ते राजे झाले ही गोष्ट माहिती असते; पण असे करण्याची गरज त्यांना का वाटली याचे नेमके उत्तर ह्या ग्रंथातील लेख देतात. वास्तविक राज्याभिषेक आणि राजेपण या दोन्ही गोष्टी वैयक्तिकदृष्ट्या महाराजांच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या नाहीत आणि हीच बाब राज्याभिषेकानंतरच्या राजांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत आपणांस दिसून येते. या सहा वर्षांत राजांनी राज्यविस्तार, प्रजाहित, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करणे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले आहे. विलासीपणा किंवा राज्योपभोग या गोष्टी राजांच्या आयुष्यात औषधालाही सापडणार नाहीत.
राज्याभिषेकाची निकड समजण्यासाठी त्या काळातील लोकमानसाचा विचार करता पुढील तीन मुद्दे लक्षात घ्यावे लागतात : पहिले म्हणजे तत्कालीन लोकमानसानुसार राजाला त्याच्या धर्माची मान्यता असणे गरजेचे असे. अगदी युरोपातील राजे पोपची मान्यता घेत; तर मुस्लीम राजे खलिफाची. या न्यायाने लोकमानसात मान्यता ठसविण्यासाठी राजांना हिंदू धर्माची मान्यता असणे आणि त्यासाठी तत्कालीन शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक करणे गरजेचे होते. दुसरे कारण म्हणजे महाराज राजे झाल्याशिवाय त्यांनी जारी केलेली आज्ञापत्रे, सनदा, तह यांना कायदेशीर मान्यता मिळणे शक्य नव्हते आणि तिसरे कारण म्हणजे महाराज राजे झाल्याशिवाय इतर राजे त्यांना बरोबरीचा सन्मान देणे अवघड होते. कुतुबशहाच्या भेटीच्या वेळी त्यांनी राजांच्या केलेल्या आदरसत्काराचे ग्रंथातील वर्णन याची साक्ष देईल.शहाजीमहाराज बंगलोरमधे वास्तव्याला असताना त्यांचा दिनक्रम एखाद्या राजाप्रमाणेच असायचा, याचे सविस्तर वर्णन जयराम पिंड्ये या तत्कालीन लेखकाने करून ठेवले आहे; परंतु शहाजीराजे अभिषिक्त राजे नसल्याने अधिकृतरीत्या त्यांनी राज्य स्थापन केले नाही इतकेच! ही उणीव शिवाजी महाराजांनी अभिषिक्त राजा बनून दूर केली.
आणखी महत्त्वाची बाब म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक होण्याआधी येथील जनतेने एतद्देशीय व्यक्तीचा राज्याभिषेक बघितला या गोष्टीला जवळजवळ चारशे वर्षांचा काळ लोटला होता. जनतेने बघितले होते ते सर्व सम्राट, शहा परदेशी होते. स्थानिक जनतेची पराभूत मनोवृत्ती नष्ट करून त्यांच्या मनात नवीन ईर्षेची ज्योत पेटवण्याचे महान कार्य या राज्याभिषेकामुळे झाले.
अल्लाउद्दीन खिलजीने फक्त एक किल्ला आणि एक लढाई जिंकल्यावर यादव साम्राज्य लयाला गेले; परंतु शेकडो किल्ले आणि शेकडो लढाया जिंकूनसुद्धा औरंगजेबाला महाराष्ट्रात पराभव नशिबी आला, त्याचे कारण म्हणजे राजांनी निर्माण केलेले स्वराज्य राखावयाचे आहे याबाबत जनमानसात निर्माण झालेली ईर्षा! हे वास्तव डॉ. सदानंद मोरे यांनी प्रस्तावनेत यथार्थ वर्णन केले आहे.
या ग्रंथाचा विशेष म्हणजे कोणताही अभिनिवेश न बाळगता राज्याभिषेकासंबंधी समग्र माहिती वाचकासमोर सादर केली आहे. उदा: गागाभट्टकृत शिवराज्याभिषेकाचे मराठी भाषांतर तसेच निश्चलपुरी गोसावींनी केलेल्या तांत्रिक विधींनी पार पडलेल्या दुसर्या अभिषेकाचेही मराठी भाषांतर परिशिष्ट म्हणून ग्रंथात समाविष्ट केले आहे.सदर ग्रंथात केवळ राज्याभिषेकाची वर्णने नसून शिवरायांची राजमुद्रा, त्यांचे सिंहासन, त्यांनी निर्माण केलेले चलन, त्यांची अर्थनीती, राज्यव्यवस्था, स्वराज्याची मालमत्तादी विषयांवरचे सामान्य वाचकाला सहसा उपलब्ध नसलेले लेखही समाविष्ट केलेले आहेत.या ग्रंथातील लेख वाचताना काही रोचक माहितीही वाचकांच्या हाती लागते: जसे महाराजांनी राज्याभिषेकाबाबत बाळगलेली गुप्तता. इंग्रजांचा वकील नारायण शेणवी जो राज्याभिषेकापूर्वी तीन महिने रायगडावर महाराजांच्या भेटीला गेला होता, तो लिहितो की जून महिन्यामध्ये राज्याभिषेक करण्याच्या उद्देशाने राजे भव्य सिंहासन करत आहेत; पण राज्याभिषेक त्यांचा स्वत:चा आहे की एखाद्या राजकुमाराचा हे स्पष्ट होत नाही; कारण निजामशाही वंशाचा एक राजकुमार त्यांच्या ताब्यात आहे असे समजते.
इंग्रजांचा राजदूत (ऑक्झिंडन) रायगडावर गेल्यावर तेथील लोकांच्या आवडीच्या पदार्थावर म्हणजे खिचडीवर त्याचे भागेना म्हणून त्यांनी राजांना त्यांच्या लोकांना पुरेल एवढे मांस देण्याची विनंती केली आणि राजांनी ही विनंती मान्य करून खाटकाला आज्ञाही केली. एवढे मांस खाणाऱ्या पाहुण्यांना पाहण्यासाठी तो खाटीक गड चढून वरती आला.
प्रस्तुत ग्रंथ आहे ५७० पानांचा. त्यामुळे ग्रंथातील सर्व मुद्द्यांचा परामर्श घेणे शक्य नाही; परंतु ग्रंथातील वेगवेगळ्या लेखांचा गोशवारा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तो यशस्वी झाला की नाही हे तपासण्यासाठी ग्रंथ वाचणे अतिशय आवश्यक आहे.
ग्रंथाची मांडणी, छायाचित्रे, मुद्रितशोधन यांकडे संपादक मंडळाने अतिशय बारकाईने लक्ष दिले आहे; त्यामुळेच इतका देखणा आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध ग्रंथ आपल्यासमोर आला आहे; त्याबद्दल श्री अनिल पवार, श्री. चेतन कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन आणि इतके नेटके संपादन केल्याबद्दल डॉ. सदानंद मोरे सरांचे आभार.
शेवटी ‘मऱ्हाटा पातशहायेवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही,’ हे खरेच!
पुस्तकाचे नाव: ॥शिवराज्याभिषेक॥
भारताच्या इतिहासातील असामान्य घटना
संपादन व प्रस्तावना: डॉ. सदानंद मोरे
संकल्पना व संकलन: अनिल निवृत्ती पवार
प्रकाशन: कृष्णा पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या: ५७०
किंमत: रुपये ६९९/-
पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक: चेतन कोळी ९२८४७५१२१६
