मी टू

काकू बाहेरगावी गेल्या होत्या. काका घरी एकटेच होते. 

आईने राणीला सांगितलं, “जा, त्यांना जरा हा शिरा देऊन ये. ” 

दहावीचा अभ्यास बाजूला ठेवून राणी त्यांना शिरा द्यायला गेली. वाटी घेताना काकांचा हात तिच्या दंडावरून फिरला. 

… चुकून झालं असेल!

दुसरे दिवशी ‘थोडं दूध देता का,’ म्हणून काका विचारायला आले. 

आई म्हणाली, “थांबा, मी पातेलीच देते.” 

तिने दिलेली गरम दुधाची पातेली घेऊन राणी काकांकडे गेली. दूध सांडू नये म्हणून वर धरलेलं पातेलं तिच्या हातातून घेताना काकांचा हात तिच्या वरच्या भागांवरून फिरला. 

हे चुकून नाही झालं, तिला लगेच कळलं. 

तिसऱ्या दिवशी मात्र तिने आईला सांगितलं, ‘मी नाही जाणार त्यांच्याकडे!’ 

आतापर्यंत नीट वागणारी मुलगी आज असा आडमुठेपणा का करते आहे? आईला कळेना. 

त्यांची वादावादी ऐकत समोरच्या मावशी उभ्या होत्या. त्या मध्ये पडल्या, “का ग नाही जाणार?” 

“मला त्यांचं वागणं आवडत नाही.” 

मावशींनी तिच्याकडे रोखून पाहिलं. 

‘मला पण गं!’… मनातच म्हणाल्या. 

ही खूप खूप पूर्वी घडलेली कथा आहे.    

कथा नाही, ती एक वैश्विक व्यथा आहे.

हेच ते ‘मी टू’. अमेरिकेतून भारतात आलेलं नाही; तर भारतातही मुळापासून असलेलं. संत एकनाथांच्या भारुडातही आढळून येणारं ‘मी टू…’

‘बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा 

भल्याभल्यास लावील बट्टा अशी ही थट्टा 

थट्टा दुर्योधनाने हो केली 

द्रौपदी सभेत गांजिली ‘

रस्त्यातल्या अनोळखी माणसापासून आपण सावध राहतोच पण ‘ओळखीचा चोर जीवे न सोडी’ असं होतं, तेच ‘मी टू’.

लपाछपी खेळताना समोरच्या तिशीतल्या दादाने, “थांब, तुला मी मस्त लपवतो, कोणाला कळणार पण नाही, ” म्हणावं आणि गुदमरून टाकणाऱ्या मिठीत त्या मुलाला किंवा मुलीला लपवावं … असं की कधी एकदा आपण शोधले जातो आणि ‘राज्य’ मिळतं असं वाटावं …. तेच ‘#मीटू.’ 

‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटात पाऊस (मान्सून) आहे, लग्न(वेडिंग) आहे आणि एक भयंकर घटना आहे. एरवी आदरस्थानी असलेल्या आपल्या मेहुण्याने एका अल्पवयीन मुलीवर (पुतणीवर) आपली वासनांध दृष्टी वळवली होती, हे लक्षात आल्यावर नासिरुद्दीन शहा म्हणतो, “These are my children and I will protect them from myself, if I have to.” (ही माझी मुलं आहेत आणि वेळ पडली तर मी स्वतःपासूनदेखील त्यांचं संरक्षण करीन). या कुंपणाला कोणीही -अगदी कुंपणही – शेत खाऊ शकतं याची तीव्र जाणीव आहे त्या जाणिवेतून तो हे पोटतिडिकीने म्हणतो.   

२०१७ साली #metoo हा हॅशटॅग जगभर वणव्यासारखा पसरला. “काय ते अमेरिकेतलं ‘मी टू’ इथेही आलंय,” हे वाक्य वेगवेगळ्या भाषांतून आणि भाषणांतून ऐकू येऊ लागलं. हे म्हणजे, ‘आता आमच्याकडेही हापूस आंबे होतात’ म्हटल्यासारखं झालं! अचानक सगळीकडे जोम धरणारं ते पीक नाही; तर तो एक वणवा आहे. त्या दोन शब्दांमागची ह्रदयद्रावक कहाणी अशी…. 

टॅराना बर्कचा जन्म सप्टेंबर १९७३ साली ब्रॉंक्स, न्यूयॉर्कमध्ये झाला. दारिद्र्य, अज्ञान यांनी ग्रासलेल्या वस्तीत वाढणाऱ्या टॅरानाला खूप लहानपणी लैंगिक अत्याचारांना व बलात्काराला तोंड द्यावं लागलं; पण तिची आई धीराची होती. तिने मुलीला आधार तर दिलाच; तसेच पुन्हा स्वत्व मिळवण्यासाठी मदत केली. ‘तू आजूबाजूच्या मुलींना मदत कर, तुझे दुःख कमी नाही होणार पण त्यातून काहीतरी सकारात्मक निष्पन्न होऊ दे!’  विशेषतः कृष्णवर्णीय अथवा अल्पसंख्याक मुलींना आधार देऊन त्यांना मार्गदर्शन करणं, पुढे शिकायला उत्तेजन देणं या व्यापक हेतूंनी तिने काम करायला सुरुवात केली. कालांतराने एक मुलगी आली. तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढाच तिने वाचला, आपली भळभळणारी जखम उघडी केली… स्वतःच डोंगराएवढे दुःख उराशी बाळगणाऱ्या टॅरानाला कळेना की तिला उपदेश तरी काय करावा आणि सांत्वन कसे करायचे ते! तिने तिची कर्मकहाणी ऐकून घेतली. तिच्यावर कोसळलेल्या प्रसंगांचेच पडसाद ऐकू येत होते आणि मनातल्या मनात ती म्हणाली, ‘हे तर माझेच भोग आहेत गं!’… आणि त्यातून आकाराला आला ‘Me too’ हा हॅशटॅग. मग तिने ‘जस्ट बी’ ही संस्था काढली. आधी जे काम अनौपचारिक पातळीवर करत होती ते आता नियमितपणे सुरू झाले. तेव्हापासून सरकारकडून, परोपकारी कंपन्यांकडून अनुदान मिळवून पंख छाटलेल्या या मुलींना ती नवे पंख आणि उडण्याचे बळ देते आहे. इतकंच नाही तर ‘मी टू’  (‘मी सुद्धा या अत्याचारांना बळी पडले आहे’) हे छोटे सामर्थ्यशाली शब्द वापरून विविध क्षेत्रांतील अनेक महिलांनी (आणि क्वचित पुरुषांनीदेखील) कार्यालयीन वातावरणात अथवा वरिष्ठांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आहे. 

एक खूप जुनी घटना आठवली – डॉ. आनंद नाडकर्णींच्या पुस्तकातली. ते गर्दच्या विळख्यात सापडलेल्याना बाहेर यायला मदत करायचे. समुपदेशनाचा मार्ग अवलंबून ते रुग्णांशी (हे केवळ व्यसन नाही; तर तो एक रोग आहे हे मान्य करणं ही पहिली पायरी.) मोकळ्या गप्पा मारीत, त्यासाठी दर आठवड्यात एक सभा भरवत (group therapy). तिथे जमून सर्वजण आठवड्यातील घडामोडींबद्दल गप्पा मारत असत, मन मोकळं करीत असत. अशीच एक सभा संपल्यावर ते म्हणाले, “चलो फिर अगले हप्ते मिलेंगे, हम लोग, इसी वक्त इसी जगह …” 

ते ऐकल्यावर एक मनुष्य सद्गदित झाला, म्हणाला, “हम लोग! डॉक्टर, तुम्ही हम लोग म्हणालात, ‘तुम लोग’ नाही…” 

ते हसून म्हणाले, ‘हो तर. हम सब साथ हैं …’ 

#Metooच्यामागची प्रेरणा तीच आहे. हा लढा तुझा नाही, माझाही आहे! फक्त तुमचा नाही, आमचादेखील आहे! चोरी, खून हे गुन्हे सरळसरळ उघडकीस येतात पण लैंगिक शोषण हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो.  दुर्दैवाने हे शोषण कुठेही आणि कोणाहीकडून घडतं. अल्पवयीन मुलामुलींच्या निरागसतेचा फायदा घेणारा परका नसतो, शेजारी असतो /असते.   हातात सत्ता असलेल्या वरिष्ठांच्या दबावाखाली आलेले तरुण व तरुणी हतबल होतात. ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा?’ म्हणायची वेळ यावी अशी एक अत्यंत घृणास्पद आणि खळबळजनक घटना अमेरिकेत घडली – खास खेळाडूंसाठी नेमलेल्या एका डॉक्टरांनी तपासणीच्या नावाखाली अनेक तरुण महिला खेळाडूंचा बंद दरवाजामागे गैरफायदा घेतला. 

जर शोषक कोण आणि शोषित कोण हे सरळसरळ दिसतं तर हा अत्यंत घृणास्पद विषय वादाच्या भोवऱ्यात का सापडावा?

अनेकांच्या तोंडून पहिली प्रतिक्रिया ऐकायला येते ती, ‘हल्ली मुली वाट्टेल ते कपडे घालतात! मग काय, कोणीतरी वाईट वागला तर नवल नाही!’ 

हे इतके हीन दर्जाचे वक्तव्य आहे! एक तर विचित्र कामकोंडीत तरुण मुलगेही सापडले जाऊ शकतात आणि दुसरं म्हणजे, समजा आपण धरून चालू या की कमी कपडे घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या मुलींवर ही आपत्ती कोसळते. याचा अर्थ तिच्या सहवासात येणारा पुरुष एक नराधम पशू असून स्वतःवर तो अजिबात ताबा ठेवू शकत नाही असं मानायचं का? आणि उत्तान कपडे जर कारणीभूत आहेत तर किशोरवयीन बालिकेवर बळजबरी करायचं कारण काय? सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजात हे घडतं मुळात शरमेची गोष्ट आहे आणि त्याचं समर्थन केलं जातं हे तर लांछनास्पद आहे.

चांगला स्पर्श म्हणजे काय हे कळायच्या आतच वाईट स्पर्शाने होरपळलेले मन आणि शरीर घेऊन पुढे जगायचे कसे? या तीव्र वेदनेला वाचा फोडणारी चळवळ म्हणजेच ‘मी टू’. हे खूप व्यापक शब्द आहेत. एकोशी रस्त्यावर असहाय महिलेवर होणारा बलात्कार हा तर अमानुष आहेच; परंतु घरोबा, माया जिथे मिळेल ही अपेक्षा आहे तिथल्या ज्येष्ठ व्यक्तीने कोणी बघत नाही हे पाहून केलेले वासनामय स्पर्शसुद्धा तितकेच हानिकारक आहेत. 

****

राणीने दहावीचा अभ्यास केला त्याला आता अनेक दशकं लोटली. तिची आई, शेजारच्या मावशी आणि ते काका आता या जगात नाहीत. तिच्यावर झालेला अन्याय कधी पुसून नाही निघणार. तिच्या तक्रारींवर कोणी विश्वास ठेवेल की नाही या भीतीने तिने आपलं दुःख गिळलं, त्या दुःखाला आता वाचा फुटते आहे. ही प्रगती नाही पण निदान जागृती तरी आहे. हेही नसे थोडके! 

ज्यांना या चळवळीच्या सद्यस्थिती विषयी अधिक माहिती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी दुवा :

https://time.com/6221110/tarana-burke-me-too-anniversary/

Author

4 thoughts on “मी टू

  1. Excellent piece Jyotsna! Beautiful writing on a very important and difficult subject. Keep writing. More power to you.

  2. डॉ. आनंद नाडकर्णींच्या? की डॉ. आनंद अवचट यांच्या?

    1. नाही, डॅा. आनंद नाडकर्णी. ते drug rehabची सत्र चालवायचे. त्यांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे.

Leave a Reply