जफरनामा छन्द

(आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये  गुरु गोविंदसिंगांचे विचार किती मोलाचे आहेत हे सुजाण वाचकांच्या लक्षात यावे, गुरुगोविंदसिंगांच्या उदात्त, प्रभावी प्रबोधनाची, त्यांच्या अविचल श्रद्धेची आठवण जागी व्हावी, या हेतूने त्यांनी औरंगजेबाला लिहिलेल्या दोन्ही पत्रांचे मराठी  अनुवाद इथे वाचकांसमोर ठेवते. जो समाज आपल्या इतिहासाला विसरतो आणि त्याने दिलेल्या शिकवणीकडे काणाडोळा करतो, त्याला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा धोका संभवतो. या दृष्टीने पाहता आपण या पत्रांतील संदेश पुरतेपणाने समजून घेऊन काय पाळायचे आणि काय टाळायचे याचे भान जागवू या.       सुखमणी रॉय ) 

फतहनामा 

१. कुऱ्हाड, बाण, वा भाला आणि ढाल नि तलवार

    प्रकट होतसे या रूपांनी तो अमुचा ईश्वर 

२.घोड्यावरती मांड ठोकुनी वाऱ्यावरती जे स्वार 

  नांदे सदैव वीरांसोबत त्या, तो अमुचा ईश्वर 

३.त्या ईश्वरेच सोपवले मज काम धर्म राखायाचे

   ज्याने दिधले असे तुला  ते तख्तही  सत्तेचे

४.तू तर गुंग असशी खोट्या भानगडी अन कृत्यांत 

   मी सदैव निमग्न राहतो शुद्धी अन सत्त्कार्यात 

५.`औरंगजेब’ तुला ना साजे मुळीच अभिधान 

    कारण गौरववृद्धी टाकून तू तर करशी दुर्वर्तन

६.जपमाळ तुझी निव्वळ धागा, आणि लाकडी मणी

   सापळ्यात ओढशी प्रत्येका, एकेक मण्यासरशी 

७. पार धुळीला मिळवलेस तू अपुल्या बापाचे नाव

    कुकर्मात भर घातली करूनी  भावांनाही  ठार 

८. स्वपिता आणिक भावांची करून निर्घृण हत्या 

    केलेस स्वत:  रे डळमळित तू आपुल्याच तख्ता

९ . मी तर ईश्वरकृपया केले अमृत पाण्याचे 

    तुझ्या शिरावर झेल आता आघात प्रपातांचे 

१०. प्रवाहात याच्या  पुरते आता धुऊन जायाचे 

     तुझे कुशासन पवित्र  भूवरी आता नाही  उरायचे

११. आलास दक्षिण पर्वतांतुनी तू होऊन तृषार्त  

      मैदानीं मग  प्यावाच लागला तुला विषारी घोट 

१२. तुझी वाकडी नजर आता पडली आमच्यावरती

      इथेही तुझी तहान  बाबा मुळीच नाही भागायाची

१३. खचितच पसरीन इथे  तुझ्या अंगार पावलांखाली

      घोटही ना मिळणार इथे जीभही करावया ओली 

१४. लांडग्यापरी डाव साधूनी कवळलेस छावे दोन  

     यात कोणते शौर्य  तुझे, काय करावे गुणगान  

१५. जोवरी असे भूवरी इथे हा सिंह प्राणवान 

      बदला निश्चित,  अटळच होणे आहे शिरकाण

१६. कळला मज पुरताच आता तुझा खुदा लटका 

      मुळीच  भरवसा ठेवणार ना त्याच्यावर आता

१७. कसल्याही वचनावर तुझिया आता नाही विश्वास 

      तलवार उचलण्याखेरीज नाही मार्गच दुसरा खास 

१८.लांडगाच तू, तुझ्या सापळ्यापासून  सारे दूर  

     सुसज्ज माझे ठेवीन सारे शेर बहादूर 

१९. येशील इथे जर मोकळेपणे करण्या वार्तालाप 

     दाखवीन तुज मार्ग शुद्धीचा आणि काय सत्य 

२०. सैन्ये दोन्ही बाजूंची व्हावी रणभूमीवर सिद्ध

      स्वच्छपणे सारे समजावे कोणाचे कोणाशी युद्ध

२१. दोनच फरलांगांचे अंतर हवे दोन्ही  सैन्यांत 

     अशा प्रकारे रणभूमीवर उभे राहू दे सैन्यांस 

२२. मग मी सरसावेन  माझिया दोनच स्वारांसमवेत 

     तुझ्या सैनिकांबरोबरीने मुकाबला करण्यास 

२३. येथवरी तू चाखलीस ती  फळेच सुखशांतीची 

     अद्यापि पडलेली नाही तुझी गाठ आमच्याशी 

२४. शस्त्रांच्या समवेत ये आता इथे युद्धभूमीवरती

     थांबव छळणे  प्रजेस ती  तर  देवाची निर्मिती 

जफरनामा छन्द भाग १ 

१. प्रकटतो पूर्ण परमात्मा आपल्याच किमयेमधून

  कृपावंत दयामय आम्हा सोडवी इहजगतातून

२.दातार शरण शांतिचा  दयामय देतो आम्हां हात 

प्रिय, क्षमाशील अमुचा भर्ता, आवडतो आम्हां नित्य 

३ कृपाळू राजाधिराज दावि सकळांना मार्ग सदैव 

  तो निर्गुण,अतुल,अमूर्त ,तरीही करी कृपेचा वर्षाव्

४.नाही साधनसामग्री अन्  सैन्यबळही त्याच्यापाशी

   तरी तो समर्थ दयामय वर्षवी स्वर्ग-सुखाच्या राशी

५. तो सर्वोपरि, विश्वात फाकते अमित तयाची प्रभा

    कितीक देई लेणीदेणी, उपस्थितच सर्वत्र  सदा 

६. दयामयाच्या कृपेस नाही काहीच  पारावार

    तोच  पूर्ण जगताचा भर्ता, तोच आमुचा दातार

७. तो स्वामी अखिल विश्वाचा स्नेहशील सकळां 

    तुलना काही नसेच त्याच्या ऐश्वर्या – विभवा 

८. वर्णवेच ना, प्रबुद्ध तोच तो, सदैव अंतर्यामी

   गरिबाचा रखवाला, दुष्टांचे करी निर्दालन स्वामी 

९  काही न त्याच्या दृष्टिआड तो न्यायी सर्वगुणी

   त्याचीच प्रेरणा स्वतःच वदवी पोथीपुस्तकाही 

१०.तो  सर्वज्ञ सहज ओळखे कोण असे प्रज्ञावंत 

    आहेच नांदतो पहा अरे तो साऱ्या चराचरात 

११. ठाऊकच त्याला सारे हो  जे जे येथे विश्वात

     तो स्वामीच तोडून बंधनां करी सर्वां मुक्त 

१२. कबीर जाणे सारे काही चराचराचा तोच नियंता

      चालक तो विश्वाचा आणिक तोच ज्ञान दाता   

१३ भरवसा नाहीच अता मज  तुझ्या प्रतिज्ञेचा 

     ईश्वर नांदे सर्वत्र एक, तो आमुच्या साक्षीचा

१४. थेंबाचाही/कणभरही नाही तुझिया दिवाणांवरी विश्वास

      शपथेवरती  सत्य त्यागुनी  खोटेच वागतात  

१५. शपथेवरती अरे तुझ्या जे विसंबतील कुराणाच्या

     ओढवेल दुर्दैवच खचित, सर्वनाश होईल त्यांचा

१६.महाश्येन सावली धरि ज्यावर, अभया तो तर पावतसे

     कावळा तयाच्या केसालाही इजा कधी ना करू शके 

१७.आश्रयास जो गेला आहे वनराज केसरीच्या 

      बकऱ्या, हरिणे  धजावती  ना आसपास त्याच्या

१८.केले असते छद्म मीही जर खोट्या वचनांचे 

     ओढवते न दुर्भाग्य माझिया शूर सैनिकांचे 

जफरनामा भाग २.

चमकोरच्या लढाईचे वर्णन 

१९.करतील काय सैनिक चाळीस, तेही भुकेजलेले,

    तुटून पडती त्यांवर अवचित दहा लाख हल्ले

२० परजून तलवारी, बंदूका,आणि बाण जेधवा

     विश्वासाचा घात  करूनी चाल केली तेधवा

२१. नाईलाज झाला माझा, मी आलो रणमैदानीं

    निग्रह करूनी लढायचा, सामग्री गोळा करूनी

२२ जेव्हा  सोडविण्यास समस्या पर्यायच ना उरत 

    अखेर हाती समशेरच घेणे होते आम्हां क्रमप्राप्त 

२३. विश्वासून तव  वचनावर मी  काय करू शकतो

     अन्यथा कशाला हाती हे मी शस्त्र आज घेतो 

२४. ठाउक नव्हते माणूस हा आहे, कोल्ह्याहुनी धूर्त 

     आलो नसतो तिथे  सोडूनी मी आपला प्रांत 

२५.अनुचितच बळी घेणे वा बंदीत टाकणे ऐसे सैन्य 

      आले होते जे कुराण-शपथेवरी  विश्वासून                         

२६. आले ते तर घोंगावत जणू थवाच  माशांचा

      काळेकभिन्न कपडे घालून हल्ला झाला त्यांचा 

२७.कुणी भिंतीआडून सामोरे होताच झणी तत्क्षणी 

     घायाळ,रक्तबंबाळच  झाला  शर माझा लागूनी 

२८. दडून राहिले मग ते अन्य, सामोरे  ना झाले 

      बाण चुकवुनी त्यांनी केवळ जीवच वाचवले 

२९.नाहर झाला भिंतीआडून सिद्ध लढाईला

    माझ्या  बाणाने सत्वर त्याला इंगा दाखवला 

३०. वल्गना करीत शौर्याच्या ऐसे कितीक अफगाण

      त्यांनीही रणभूमी सोडुनी अखेर  केले पलायन

३१.चाल करूनी आले मग पुष्कळ दुसरे अफगाण 

    त्यांनी जणू मांडिला प्रलय, बाण अन्  बंदूका झाडून

३२.कितीक हल्ले केले त्यांनी कधी नीट योजुनी बुद्धी 

    आणिक माथेफिरूंसारखे भलत्या आवेशात कधी 

३३. फैरी झडल्या चकमकी-हल्ल्यांच्या त्यांच्याहीकडून

     दोन सैनिकां माझ्या टिपुनी  झाले ते गतप्राण

३४. भेकड ख्वाजा दडून राहिला भिंतीआड खुशाल

       तो वीरासम रणांगणावर नाहीच कधी भिडणार 

३५. अरे तोंड दावता मज तर खचितच मी सत्वर

      दिधला असता प्रसाद म्हणूनी शर अणकुचीदार 

   ३६. आणि अखेरी जखमी होऊन कित्येक तरी वीर

      दोन्ही बाजूंचे मृत्युमुखी, केवळ तलवारींची भर

 ३७. वर्षावच  गोळ्या-बाणांचा, रणभूमी झाली लाल

      जणू की शेतच लालेलाल फुलांचे पसरवले भूवर 

३८. रणभूवर तुटलेले पाय अन्  मस्तकेही कितीक

      भासले जणू `पोलो’मधले काठ्या अन्  कंदूक

३९. सणसणते बाण नि  टणत्कारही  किती कमानींचे

      रणभूवर कल्लोळ माजले हो- हाय- हू  स्वरांचे 

४०. खणखणाट शस्त्रांचा तुंबळ, वीरही झाले बेभान

     भासले जणू  की तोल सूटूनी हारपली त्यांची जाण

४१. वीर मोजके माझे चाळीस अपार जरी त्यांचे शौर्य 

     असंख्य अफगाणांच्या माऱ्या  ते कसे पुरे पडणार 

जफरनामा भाग ३ 

४२. अस्तंगत तो झाला दिनमणि आकाशवस्त्र  वेढून 

      निशानाथ अंधतमाची स्वारी आली चाल करून   

४३.मार्ग दावितो ईश्वर त्याला मनीं ज्याच्या विश्वास

     कुराणसाक्षीने  दिल्या वचनावर विसंबून खास 

४४. म्हणून पहा तू ,ओरखडाही नाही माझ्या देहावर 

     केसाही ना धक्का,नि:पात शत्रूचा,कृपाच बलवत्तर 

४५. ठावे नव्हते मजला की तू तर खोटारडाच देवापाशी 

      बुडवितोस आपलाच धर्म द्रव्याच्या लोभापाठीं 

४६. शिकवण धर्माची उपेक्षिसी, तू न जाणसी त्याचे मर्म

      महंमदाचे  मार्ग वेगळे, तुला आडवे तुझेच कर्म 

४७. अचल अढळ राहे प्रत्येक  ज्याला वचनीं विश्वास

      नेमून दिलेले काम करी तो जागुनिया वचनास

४८. धरू नाही कणभरही कधीही त्याच्यावरती विश्वास

      वाचे विटाळितो जो कोणी स्वतःच कुराणा वा देवास

४९. म्हणून आता शतवार जरी  घेशिल आण  कुराणाची 

     टिपूसभरही  कधी न आता मजला मुळी ती पटायाची  

५०. असला जर विश्वास खरा, तर स्वतःच ये सामोरा 

       कंबर बांधून रणभूमीवर, कर  तू माझा मुकाबला

 ५१. `ईश्वरास स्मरुनी शपथ घेत मी’ म्हटले होतेस 

      आठवून दिल्या वचनाला  तू आता  जागावेस 

५२. निवाडाही झाला असता राजा, जर आला असतास

      सगळे सोडविले असते गुंतेही  चर्चेतून खास 

५३. बांधील तू होतास कराया हातींच्या कार्याची पूर्ती 

      जे काही लिहिले पत्रातून ते ते आचरण्यासाठी 

५४. निरोप पावला मला तुझा, आणि समजलो संदेश

      आतातरी तो पालन करूनी शांती स्थापावीस  

 ५५. दिला शब्द पाळावा खचितच नेक  माणसाने 

     `ओठीं  एक अन् पोटी  भलते’ असे नसावे जिणे

५६. प्रस्ताव तुझ्या काजीने आणले, करीनही मी मान्य 

     जर नेकीने सामोरा होशील, नातर मुळीच ना मान्य  

५७.हवीच तर पाठवीन मी तुज प्रत ती  कुराण ग्रंथाची

     ज्यावर तू लिहिलेस वायदे खोटे अन नाटकी 

५८. महाराज, जर  दिलीत मज इथे कांगड्यात भेट  

      आमना-सामना होइल दोघांचा,सर्वस्वी थेट 

५९.इथे न होईल काही कोणता  तुला दगा फटका

     हमी घेतो मी  बिराडाँची, ते माझे अंकित असता 

६०. येऊन इथे तू स्पष्ट बोल की मोकळेपणाने  सारे 

      उदार होईन, जर सामोरा स्वतः तूच आलास अरे 

६१.लिहिलेस असे : नजर करावा घोडा हजारमोलाचा

    आणि घ्यावा आम्ही सुखाने आनंदपूर आमुचा 

६२. हुकूम मी पाळीन देवाचा, येईन ना तुझिया दारी  ,

     मी असे दास देवाचा,मज तोच तो एकच कैवारी 

६३.होईल जैशी आज्ञा त्याची, मी तसाच वागेन

      त्याची इच्छा पालन करण्या जिवाभावाने भेटेन 

६४.असशील तू सद्भक्त, तर टाळाटाळ न करशील 

     त्याच्या हुकुमानुसार येऊन मला भेटशील 

६५. श्रद्धा ठेव केवळ देवावर, त्याला स्मरून वाग 

      इतरांच्या सल्ल्याने छळू वा पीडू नको लोकांस

६६.त्यानेच दिले ते तख्त तुला पण  झाले विपरीत 

     दुर्गुणीच तू, न्याय ना पाळणे, हीच तुझी रीत

६७. न्यायच विपरीत तुझा, आणखी विचित्र धर्मपालन 

     धिक्कार तुझ्या सत्तेचा शतदा, दयनीय तुझे कर्म 

६८. विचित्रच तुझे धार्मिक फतवे, हे कसे  धर्मपालन 

    बरळतोस काहीच्याबाही वंचना  स्वतःची करून  

६९. थांबवी तुझा हा रक्तपात जो असे विनाकारण 

      देवाचा होईल वार शिरावर, असू दे ही जाण

७०. ध्यानी धर हे, होईल त्याची अवकृपा मोठी

      त्याला नाही कमतरता, त्यास नको स्तुती खोटी

७१.त्याला नाही भीती कशाची, पृथ्वी-स्वर्गाचा तो स्वामी  

     खरे पाहता एका त्याचीच  सत्ता नित्य, असे सार्वभौमी 

७२. स्वामी साऱ्या विश्वाचा, त्यानेच निर्मिले सकळांना

      कर्ता भर्ता  तोच, निवारा पुरवितसे  बा त्यांना 

७३. मुंगीपासून हत्तीवेरी लहानथोरांचा निर्माता 

     अश्रद्धांना शासन करी तो,  तो दीनांचा त्राता 

७४.दीनानाथच बिरूद त्याचे, त्याला नाही काही कमी

     अपेक्षाही  स्तुतीची नाही  त्याला कधी कुणाकडूनी

७५.निराकार तो, त्याला नाही  काही  रंग वा रूप 

      जाणता  अरे तो सर्वांसाठी सदैव  पथदर्शक 

 ७६. तुझ्या शिरावर  कुराण  शपथेचा असताना  भार

       सर्वार्थाने तुझेच वचन,अता तुला पाळणेच भाग 

७७. शीक जरासे शहाणपण अन वापर थोडी सुमती 

      मग  करावीस तू खऱ्याखुऱ्या निज कर्तव्याची पूर्ती 

७८.  इथवर मारून चार सुपुत्र  तू  काय साधलेस 

        वेटोळून तुझा कंठही  आवळेल अवचित  फास   

७९. गाजवलीस काय मर्दुमकी विझवलेस काही अंगार

      उठेल आता अधिकच तेजस्वी ज्वाळा विकराल 

८०. फिरदौसीचे मधुर कवन  ते सांगून गेले सार 

      अविचाराने केले काज सैतानाचे (अहिरमनाचे) काम खरोखर 

८१. या दरबारी  होईल जेव्हा गाठभेट आपली 

    साक्षी  तू असशील स्वत:च्या दुष्कृत्यांचा भारी

८२.हेळसांड या कामाची तू अजूनही  जर करशील

    तुझीही अखेर दखल तो ईश्वर मुळीच ना घेईल 

८३.कबूल होऊन येशील जर हे करावया काम 

      देईल ईश्वर भरभराट तुज  हे नक्की जाण  

८४. हे काजच होईल तुझे पहा तू खरीखुरी भक्ती 

      थोर कार्य, ओळखणे ईश्वर, ठेव हेच चित्ती 

८५. मला न माहीत जाणतोस का खरेच सत्ता त्याची

      तुझ्या जुलूमजबरीला नाही मुळीच काही मिती 

८६. कृपादयाळ  तो, नाही तुजला    ओळखीत-गणत

     धनसंपत्ती थोर तुझी त्याला निव्वळ  क:पदार्थ   

८७. शतावधी जरी घेशील आता शपथा कुराण ग्रंथाच्या

     क्षणाचाही तुझा भरवसा मी आता नाही धरायाचा 

८८.यायचाच ना तव दरबारी, ना त्या वाटेला जाईन

     म्हणशील तेथे येऊन मी कधीही  तुला न भेटेन 

८९. शहेनशाह औरंगजेब म्हणे की  आहे धनवान 

      चपळ, कुशल चाबुकस्वार तो गाजवी तलवार 

९०. मदनाचा पुतळाच, म्हणे की आहे अति तल्लख

      अवघ्या राज्यावरी हुकूमत चाले त्याची देख 

९१. असे शहाणा अन् विद्वान तलवारबाजीमाजी कुशल 

      सैन्यबळावर गाजवी सत्ता पुरवी  लोकांना सकळ 

९२. मूर्तिमंत देखणा असे, तो आहे फार हुशार

      सढळपणे वाटे संपत्ती, म्हणे की राज्यात आलबेल                

९३. थोरवी तयाची भारी,  तो  असे पर्वतच जणू रणभूवर 

      देवदूतांचे गुण त्यापाशी, तो कृत्तिकेसम दिमाखदार 

९४. राजाधिराज तो जगताचा आहे अपार धनवान 

      परंतु त्याला तिळही नाही धर्म उपदेशाची जाण

९५.मला मान्य संहार तयांचा पार्वतक जे  मूर्तिपूजक

      सामील तुला जे,जाती ते  खऱ्या  धर्माच्याच  विरोधात 

९६. बेईमानी पहा दुनियेची, कशी उलटली ती कोणावर   

      दुखापती अन्  इजा करीत ती  वार करी वारंवार 

९७. सामर्थ्य देवदयाळाचे  बघ कसे  पोचते  सर्वदूर 

      दशलक्षां यमसदनास  पाठवी एकच कर्तबगार 

९८. असेल देवाची मर्जी तर  होतो दुष्मन लाचार 

       तो उदार  सर्वत्रच आहे, सर्वदा क्षमाशील 

९९.आम्हांला तो वाट दावितो  जगतातून मुक्तीची 

      कृपावंत गाववून घेई आम्हांकरवी स्तुती त्याची 

१००. गरज पडे  तर दुष्मनास तो करी दृष्टिविहीन

       काटाही ना बोचू देता राखे तो दुबळ्यांचे त्राण

१०१.कोणीही जो सदैव चाले सत्याच्या रस्त्यावरती 

       कृपा वर्षवी सदाच ईश्वर ऐशा व्यक्तीवरती 

१०२. प्रार्थीतसे जो कुणी ईश्वरा श्रद्धेने परिपूर्ण 

       ईश्वर त्याला खासच देई शांति-सुरक्षेची देण

१०३. कुणी कसे ठकवतील कधी मग दुष्मनही त्याला

       ईश्वर-आश्रय असे सर्वदा उपाय  हो ज्याला 

१०४. लाख वीर जरी तुटून पडले एका सद्भक्तावरती

      इजा न होऊ देई त्याला,तो  करी रखवाली पुरती

१०५.सत्ता, संपत्ती अन् शक्तीचा गर्व असे तुजला 

       मी आभारी देवाचा, तोच तो असे भरवसा मजला

१०६. तुज अभिमान साम्राज्यशक्तीचा आणिक संपत्तीचा 

       नित्य दिलासा मला पुरेसा,कालातीत वाली भक्ताचा 

१०७. जग हे केवळ असे सराई आठा-दिवसांची 

        पथिक एक सोडून जाई, दुसरा जागा घे त्याची

१०८. बघ चक्रनेमिक्रम जगताचा, घातच  चाले  येथे 

       अटकावच ना, बळकावी कुणीही  खुशाल परद्वाराते

१०९. थांबव शक्तिप्रदर्शन, सतावू नको दीन दुबळ्यांना, 

       खोट्या शपथा घेऊन  तू ठकवू नको बिचा-यांना 

११०. सत्यच ज्याचा असतो साथी, कुणी काय करील त्याला

        शत्रूने शेकडो धाडले जरी  त्रास तया  द्यायला 

१११. हजारही जरी पाठवी शत्रू एकाच्या नि:पाताला 

       ईशच  राखील, कधी न त्याच्या धक्का केसाला 

टीप : 

१ जफरनामा छंद  भाग १ अनुक्रम १२ व १४ 

कबीर व  दिवाणांवरी याबाबत खुलासा : 

इथे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की मूळ फारसी छंदांमध्ये कबीर आणि दिवाण  हे शब्द अनुक्रमे श्रेष्ठ वा सम्राट आणि कारभारी या अर्थाने वापरले गेले आहेत. याविषयी मी सुनेकडून खात्री करून घेतली आहे.अद्यापही हे शब्द  याच अर्थाने फारसीत प्रचलित आहेत म्हणून हे शब्द मराठीमधे तसेच ठेवले आहेत. येथे संत कबीर हा संदर्भ  आणि दिवाण म्हणजे बैठक हे अर्थ अभिप्रेत नाहीत. संत कबीरांचे अभिधान ‘कबीर’ झाले,त्यामागे कदाचित हा अर्थ असू शकेल.

Author

  • सुखमणि रॉय

    एम् ए, एम् फिल्, पंडित
    एक्स रीडर व विभागाध्यक्ष, इंग्रजी विभाग, पी एन् दोशी कॉलेज,घाटकोपर, मुंबई

    संशोधन क्षेत्र: उत्तर-आधुनिकतावादी व स्त्रीवादी साहित्य व विचार

    View all posts

One thought on “जफरनामा छन्द

Leave a Reply