विक्रम वेताळ आणि संपादक

भानू काळे यांनी’ अंतर्नाद’ इ-आवृत्तीची धुरा सोपविली. छापील आवृत्ती ते इ आवृत्ती ही वाटचाल कशी झाली ते त्यांनी या अंकाच्या संपादकीयात सविस्तरपणे दिले आहे.  सुरुवातीला ही  धुरा मिळाल्यानंतर बरे वाटले परंतु नंतर ‘ घी  देखा लेकिन बडगा नही देखा’ अशी काहीशी अवस्था झाली.

                     इ- आवृत्तीचा पहिला अंक प्रसिद्ध होताना  समोर अंतर्नादचा  दीपस्तंभ आहे. त्यामुळे कोठे जायचे आहे ते माहिती आहे.  कसे जायचे ते सांगायला भानुदा आहेत.  परंतु खांद्यावरती जबाबदारीचा वेताळ आहे.  त्यामुळे सुरुवातीला तरी वाटचाल धीमी होणार हे उघड आहे. 

                    या अंकात वैविध्य देण्याचा प्रयत्न केला आहे.  मुखपृष्ठ केरळच्या रेखा श्रीजीत  यांचे आहे.  त्याबाबत  त्यांचे सविस्तर विचार सोबत दिले आहेत.  विनया जंगले यांचे अनुभवकथन, ज्योत्सना दिवाडकर यांचा स्त्री प्रश्नांबाबतच्या जाणीव अधोरेखित करणारा लेख,  सुखमणी रॉय  यांचा गुरुगोविंद सिंग यांचेवरचा अभ्यासपूर्ण प्रदीर्घ लेख,  असे बरेच काही वाचकांना वाचायला मिळणार आहे.  संत-पंत-तंत परंपरा हे मराठीचे वैभव आहे. या सूत्राला केंद्रस्थानी ठेवून सुषमा जोशी एक विशेष लेखमाला लिहित आहेत त्यातील ज्ञानेश्वर हा पहिला लेख या अंकात आहे.  याखेरीज महेंद्र वांटे , सुधीर  दांडेकर, मोहन देवकर यांचे लेख , नयना निगळे  यांची कविता व रागिणी थत्ते  यांनी केलेले पुस्तकपरीक्षणदेखील अंकात आहे . 

                    आहिताग्नी राजवाडे हे गेल्या शतकातील एक अग्रणी विद्वान.  त्यांच्या अचंबित करणाऱ्या बुद्धीवैभवाचा आढावा शैला मुकुंद दोन भागांत घेत आहेत.  त्यातला पहिला भाग या अंकात घेतला आहे. 

                    विनोबांनी मानवी जीवनात विज्ञान व आत्मशोध याबरोबरच साहित्यालाही महत्त्वाचे मानले.  त्यांचे याबाबतचे विचारही मुद्दाम  उद्धृत केले आहेत. या माध्यम बदलाचे  काही फायदे देखील आहेत.  दृकश्राव्य स्वरूपात मजकूर पोहोचवता येतो.  त्यामुळे भानू काळे यांच्या नव्या जगाची सुरुवात या गाजलेल्या लेखमालेचे उमाताई खोलगडे यांनी केलेले अभिवाचन देखील अंकात समाविष्ट आहे .                    

 आपल्या  प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

Author

2 thoughts on “विक्रम वेताळ आणि संपादक

  1. स्वागत आहे. आणि शुभेच्छा तर आहेतच.

  2. अंतर्नाद सुरु होतोय हे पाहून अतिशय आनंद झाला. शुभेच्छा!

Leave a Reply