‘Politics is a dirty game,’ असे म्हणतात. सामान्य माणूस साधारणपणे राजकारणापासून दूर असतो. पण याच राजकारणात आपले भवितव्य आहे असे मानून पूर्णवेळ फक्त राजकारण हीच आपली कारकीर्द असे मानणारे अनेक जण आपण बघत आहोत.तीनशे पासष्ट दिवस/ चोवीस तास राजकारण खरेच कष्टप्रद गोष्ट आहे आणि जरा जरी दुर्लक्ष झाले किंवा गाफील राहिले गेले तर ‘नजर हटी तो दुर्घटना घटी|’ अशी अवस्था! त्यामुळे सतत सतर्क,जागृत राहणे गरजेचे! म्हणून राजकारण हे चांगले की वाईट हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन. एकूणच बघायला गेले तर राजकारणात पुरुषांचे वर्चस्व जास्त आहे/ असते.त्या मानाने महिलांचा सहभाग कमी; पण काही स्त्रिया अशा आहेत की त्यांनी आपल्या देशाचा कारभार तर बघितलाच; पण जागतिक पातळीवरील राजकारणात देखील ठसा उमटविला आहे. प्रकर्षाने उल्लेख करण्यासारख्या – आपल्या इंदिरा गांधी,इस्रायलच्या गोल्डा मायर, ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर, जर्मनीच्या मर्केल वगैरे.
आपल्याकडील राजकारणात ठसा उमटविणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख करायचा झाला तर अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, जयवंतीबेन मेहता, शीला दीक्षित, मार्गारेट अल्वा, ममता बॅनर्जी, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन ही नावे डोळ्यासमोर लगेचच येतात. यांतील काही राज्य पातळीवर अत्यंत यशस्वी झाल्या; तर काही राज्यपातळी बरोबरच केंद्रपातळीवरपण यशस्वी झाल्या.
त्यांतीलच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व सुमित्रा महाजन!आपल्या संपूर्ण ४० – ४२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणाबरोबरच समाजकारण करणाऱ्या आणि सन्मानाने बाहेर पडणाऱ्या पद्मभूषण सुमित्राताई महाजन – ज्यांना इतर सर्व पक्षांतील – विरोधी पक्ष नेते मंडळीसुद्धा आदराने संबोधतात. अशा व्यक्तिमत्त्वाचा परिचय( व्यक्तिवेध) ‘मेधा किरीट’ यांनी ‘ताई’ या पुस्तकाद्वारे करून दिला आहे.
कोकणातील चिपळूण गावातील एका सर्वसामान्य ‘ साठे ‘ कुटुंबातील मुलगी, जिची जडणघडण झाली तीच मुळी संघ व राष्ट्र सेविका समितीच्या मुशीतून. आईवडिलांचे छत्र लवकरच हरपले. त्यामुळे सर्व भावंडांनी कुठल्या काकाकडे राहा, नोकरी करत शिक्षण घे, असा संघर्ष करत शिक्षण पूर्ण केले. सुमित्राताईंनीही नोकरी करत शिक्षण पूर्ण केले. त्या A.G. ऑफिसमध्ये नोकरी करत होत्या.
श्री.जयंत महाजन यांच्याशी विवाह होऊन इंदोरला गेल्यावर दैवाने सर्व सुखाची बरसात केली. हौशी, प्रेमळ, वकिली करणारा जोडीदार, प्रेमळ सासू – सासरे यांच्या आधारे ताई द्विपदवीधर झाल्या. घरातील सर्वांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे ताई इंदूरमध्ये सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या. इथे समाजकारण करताना ताई राजकारणात आल्या.त्यांच्या अंगावर सर्वप्रथम महत्त्वाचे काम पडले ते आणीबाणीमध्ये. त्यानंतर त्यांचा भाजपमार्फत राजकारणात प्रवेश झाला. इंदूर नगरपालिका निगममध्ये ‘ज्येष्ठ सभासद’ म्हणून नियुक्त झाल्या आणि त्यानंतर उपमहापौर म्हणून निवडल्या गेल्या. या सर्व घडामोडीमध्ये सासूबाईंचा एक नियम होता – ‘जयंत’ म्हणजे ताईंचे यजमान कोर्टातून घरी यायच्या वेळी घरात असलं पाहिजे. हा नियम पाळण्याचा ताईंनी काटेकोर प्रयत्न केला. ताईंनी राजकारण आणि कौटुंबिक जबाबदारी यांची कधी सरमिसळ होऊ दिली नाही.
राष्ट्रसेविका समितीची त्रिसूत्री : ‘मातृत्व, कर्तृत्व,आणि नेतृत्व.’ ही त्रिसूत्री ताईंनी स्वतःच्या अंगी बाणवली.
या संदर्भात ताईंच्या धाकट्या मुलाने, “आईच्या हातचेच लाडू हवेत,” असा हट्ट त्या दौऱ्यावर निघताना केला आणि तो त्यांनी कसा पुरा केला याचा छान छोटा प्रसंग नमूद केला आहे. तसेच संसदेच्या कर्मचारी वर्गाच्या सुखदुःखाशी समरस होऊन योग्य मार्गदर्शन आणि मदत करायच्या. त्यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे त्या केवळ व्यक्ती हे एकक मानत नसून कुटुंब हे एकक मानत.
ताईंच्या बाबतीत कर्तृत्व आणि नेतृत्व हातात हात घालूनच होते. ताईंनी लोकसभा अध्यक्ष होण्याच्या आधी इंदूर नगरपरिषदेच्या महापौर, मनुष्य विकास मंत्रालय, दूरसंचार, तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याच्या राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. मनुष्यविकास मंत्रालयात काम करताना ताईंनी अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मानधन दुप्पट केले, त्यांच्यासाठी राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर पुरस्कारांची निर्मिती केली.
राजकारणाला स्वच्छ रूप द्यायचे असेल तर जास्तीत जास्त महिलांनी या व्यवस्थेत यायला पाहिजे, असे सुमित्रताईंचे मत आहे. त्यासाठी ताईंनी दिलेल्या पायऱ्यांची नोंद उत्तम आहे. या पायऱ्यांचे अनुकरण केले तर खरेच स्त्रिया सर्व आघाड्यांवर पुढे येतील. लोकसभा अध्यक्षा झाल्यावर त्यांनी देशातील महिला जनप्रतिनिधींना – खासदार – आमदार यांना या क्षेत्रात तरबेज करण्यासाठी कसून प्रयत्न केले.
पुण्यश्लोक ‘अहिल्याबाई होळकर’ त्यांचे श्रद्धास्थान. अहिल्याबाईंची न्यायप्रियता, त्यांनी केलेले स्वच्छ राजकारण, हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात ‘आसेतुहिमाचल’ सर्व धर्मस्थळांवर त्यांनी केलेले निर्माणकार्य याचा वेगळाच ठसा ताईंवर उमटला आणि त्यातूनच ‘मातोश्री’ नाटकाची संहिता तयार झाली. मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ‘मातोश्री’चे प्रकाशन झाले. १९८१ मध्ये त्यांनी अहिल्या समितीच्या कार्यकर्त्या म्हणून महिला संमेलनाची जबाबदारी घेतली,मग महिला प्रतिनिधी झाल्या. १९८४ ते १९८६ सहसचिव ,१९९४ पासून त्या अहिल्या उत्सव समितीच्या अध्यक्षा झाल्या.
अशा या सुमित्राताई महाजन तब्बल आठ वेळा इंदूरमधून भाजप तर्फे खासदार म्हणून निवडून आल्या. ताई म्हणजे इंदूरचा चालता बोलता व्यक्तिनिष्ठ गूगल मॅप आहेत. तेथील जनतेने त्यांना उदंड प्रेम दिले. त्यामुळे इंदूरचे कार्यालयही लोकांच्या समस्यांसाठी खुले असायचे; म्हणूनच लोकसभा अध्यक्षा झाल्यानंतरसुद्धा अधिवेशन असेल त्या व्यतिरिक्त त्या शुक्रवारी संध्याकाळी इंदूर आणि सोमवारी सकाळी दिल्ली असे अखंड काम करायच्या.
त्या जून २०१४ मध्ये एकमताने लोकसभा अध्यक्षस्थानी निवडून आल्या. भूतपूर्व लोकसभा अध्यक्ष ‘सोमनाथ चॅटर्जी’ यांचा ताईंवर खूप प्रभाव होता आणि त्यांच्याबद्दल खूप आदर होता. ताई सांगतात, ‘सोमनाथ दादांकडून दोन गोष्टी शिकले.ज्या पदावर आपण आहोत ते फार उच्च आहे. आपल्या निर्णयानंतर न्यायालयात अपील करता येत नाही. त्यामुळे त्याची बूज आपण न्यायबुद्धीने राखायची.’
लोकसभेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी त्यांनी सर्वप्रथम सर्व खासदारांचा अभ्यास केला. फक्त नाव आणि पार्श्वभूमीच नव्हे; तर राज्य,पक्ष,विचारधारा
वय,कौटुंबिक स्थान,आर्थिक परिस्थिती, शिक्षण,
आवडीचे विषय असा सर्वंकष विचार. तसेच अध्यक्षाची कर्तव्ये,अधिकार काय, त्या काय काय करू शकतात याचा परिपूर्ण अभ्यास करून कार्याची रूपरेषा ठरविली. या संदर्भात – बांगलादेश – भारत सीमारेषा ठरविणे, श्री.राहुल गांधी यांनी संसदेत मा.पंतप्रधान यांना दिलेली ऐतिहासिक झप्पी आणि ‘आँख मिचौली’ करून जागेवर बसणे,आधारकार्ड संदर्भातील बिल, नोटबंदी या आणि अशा अनेक प्रश्नांवर, प्रसंगांवर ताईंनी आपल्या अनुभवाने, अभ्यासाने,परिश्रमाने चर्चा घडवून आणली आणि ती सफलतेने तडीस नेली. वेळप्रसंगी खासदारांना खडसावले आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणून अनेक समित्यांच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळावी लागते. ताईंनी एकाचवेळी अनेक पदे लीलया सांभाळली.
आपल्या व्यक्तिमत्त्वात,आचारविचारांत अत्यंत पारदर्शकता ठेवून,आपल्या मृदू स्वभावाने आणि समतोल वर्तनाने सर्वांना आपलेसे करून भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे संसदीय कामकाज निर्वेधपणे चालविणाऱ्या पद्मभूषण ‘सुमित्राताई महाजन ‘ यांची व्यक्तिरेखा नक्कीच वाचनीय आहे.
पुस्तक वाचताना ताईंच्या अंगी असणाऱ्या अनेक गुणांची ओळख होते.उत्तम प्रकृती,साहित्य – संस्कृतीशी जपलेली नाळ, तर्कशुद्ध बुद्धी, समतोल विचार करायची पद्धत,प्रशासकीय अनुभव,भाषांवर प्रभुत्व,उत्तम वक्तृत्वकौशल्य, त्यांच्या विषयी पक्षात अत्यंत आदर असे सर्व गुण असूनसुद्धा त्यांना कधी ‘cabinet दर्जाचे मंत्रिपद’ मिळाले नाही किंवा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतले गेले नाही. अर्थात याची ताईंना खंत आहे अशातला भाग नाही. राजकारणात दुसऱ्याला धक्का देऊन पुढे जाण्याचा त्यांचा स्वभाव नाही.
त्यांचे एकच तत्त्व : पक्षाने दिलेले काम अत्यंत निष्ठेने,प्रामाणिकपणे करायचे आणि लोकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. या त्यांच्या गुणांमुळेच त्या भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील लोकसभेच्या अध्यक्षा झाल्या. ताईंनी ४० – ४२ वर्षे राजकारणात कसे असावे, वागावे याचा परिपाठ घालून दिला आहे. ताईंसारखे सातत्याने ८ वेळा खासदार म्हणून निवडून येणे आणि पारदर्शक राजकारण करणारे या पुढे मिळणे कठीण. आता पक्षनिष्ठा, नैतिक तत्त्वे हा विषय पण थोडा वेगळा होऊ लागला आहे. एकूणच राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. पण एक नक्की की राजकारण करणे सोपे नाही. त्या ठिकाणी ‘तेथे पाहिजे जातीचे’ हीच उक्ती लागू पडते.
या पुस्तकाद्वारे त्यांच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा बहुपदरी आढावा एकूण सोळा प्रकरणांतून घेतला आहे.यातील प्रत्येक प्रकरण सुटे – सुटेसुद्धा वाचता येईल. प्रत्येक प्रकरणात त्या त्या विषयाशी संबंधित समर्थ रामदास यांची वचने उद्धृत केली आहेत. देश-परदेशांत त्यांना आलेल्या हृद्य आठवणी आहेत. भारत – बंगला देश सीमारेषा ठरविण्यासाठी संविधानिक सुधारणेबरोबरच आंतरराष्ट्रीय नीतीबद्दल विवेचन आहे. श्री. इ.अहमद यांचे संसदीय कामकाज चालू असताना निधन झाले तेव्हा निर्माण झालेला पेच प्रसंग आणि त्यातून काढलेला मार्ग याचे विवेचन आहे.
तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा; राजकारणी असा किंवा नसा; एक उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणून आदरणीय ताईंविषयी असणारे हे पुस्तक वाचनीय आहे.
मा. सुमित्रा महाजन यांचे ‘ताई’ या पुस्तकाद्वारे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविले त्या मेधा किरीट सोमय्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व! व्यवसायाने प्राध्यापक. त्यापण ‘राष्ट्र सेविका समिती’च्या संस्कारात वाढलेल्या असून १९७५ पासून लेखन करत आहेत. त्यांनी डॉ.सलीम अली,अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी आणि आता सुमित्रा महाजन यांच्यावर छोटेखानी चरित्र लिहिली आहेत. त्याचप्रमाणे ‘सखीसूत्र’ , ‘निर्धार यात्री’ यांसारखी पुस्तकेही लिहिली आहेत.
पुस्तकाला प्रस्तावना अशी नाही. स्वतः ताईंनी मनोगत व्यक्त केले आहे. मेधा किरीट यांनी या पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली आहे. ताईंचे दासबोधावर असणारे प्रेम जाणून पुस्तकाचे संपादक श्री.चंद्रशेखर कुलकर्णी यांनी ‘मनाचे श्लोक’ या शीर्षकाखाली ताईंविषयी असणारा आदर व्यक्त केला आहे.
‘मातोश्री’चे प्रकाशन करताना मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, एका खेळीमेळीच्या प्रसंगी राजनाथ सिंग, आंतरिक स्नेही आणि सहयोगी असणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या समवेत असणारे सुमित्राताईंचे फोटो आणि इतर काही प्रासंगिक फोटो ताईंच्या प्रवासातील आठवणी म्हणून समाविष्ट केले आहेत.
प्रकाशक- आनंद लिमये
इंकिंग इनोव्हेशन
किंमत – ₹३५०/-
