रम्य ते बालपण ,रम्य त्या आठवणी

माझा जन्म देवासला झाला. हे शहर भारतातील मध्य प्रदेश ( पूर्वीचे  मध्य भारत), ह्या राज्यामध्ये असून माझ्या बालपणी ह्या संस्थानात पवार घराण्याचे राज्य होते. माझे पूर्वज दक्षिण भारतातील तंजावरच्या भोसले राजांच्या वंशातले. आमचे आडनावदेखील भोसलेच होते. पवार महाराजांच्या इच्छेनुसार आम्ही देवास येथे येऊन स्थायिक झालो. सुरुवातीला आमच्या पूर्वजांकडे महाराजांच्या देवस्थानाच्या कारभाराची देखरेख करण्याचे काम दिल्यामुळे ‘देवकर’ या आडनावाने ओळखले जाऊ लागलो. 

माझ्या आठवणीतले देवास एका ३०० फूट उंच टेकडीभोवती वसलेले व तुरळक वस्ती असलेले निसर्गरम्य शहर आहे. त्या काळी देवास संस्थानाचे दोन भाग होते : देवास मोठी पाती (Senior) व देवास छोटी पाती (Junior). या संस्थानाच्या दोन्ही भागांचे राजे, नगरपालिका, अग्निशमन दल, कैदखाने, चित्रपटगृह, दवाखाने, शाळा इत्यादी सर्व सोयी वेगवेगळ्या होत्या. या दोन जुळ्या राज्यांच्या मध्यावरून जाणारा एक रस्ता असून  त्याचे नाव ‘सामलात सडक’ असे  आहे .  त्याकाळी  तो  नेहमी  खराब अवस्थेत असे; कारण त्याची  देखरेख  संस्थानाच्या दोन्ही भागांपैकी कोणाच्या नगरपालिकेने करावयाची हा वादविवादाचा विषय असे. टेकडीवर जाण्यासाठी मार्ग देखील दोन होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आता मात्र सर्वांचे विलीनीकरण झाले आहे. 

निसर्गरम्य देवास 

                 १९३९ साली देवास महाराजांनी दिलेल्या जागेवर बांधलेला आमचा बंगला मोठ्या पातीत आहे. सध्या तेथे माझ्या भावाचा मुलगा व त्याचे कुटुंबीय  राहतात. माझी आई मशिदीचे-रांजणगाव (खानदेश-महाराष्ट्र) येथून वडिलांशी लग्न झाल्यावर देवासमधे येऊन स्थायिक झाली. रांजणगावासारख्या लहान खेड्यातून जरी ती आली होती तरी तिने देवासच्या राजेशाही वातावरणात आपल्याला व्यवस्थित सामावून घेतले होते. तिचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ होता. त्यामुळे आमच्याकडे जवळचे व लांबचे नातेवाईक अत्यंत आपुलकीने येत व आमच्या घरी मनसोक्त राहत. तिला निरनिराळे पारंपरिक व विशेषतः नवीन गोड पदार्थ करण्याची व इतरांना शिकवण्याची अतिशय आवड होती. सणासुदीला त्याकाळी सर्व मिठाई घरीच करत. तिच्या हातच्या रुचकर गोड पदार्थांची (उदा. करंजी, अनारसे, बेसन व रव्याचे लाडू इत्यादी) चव अजूनही माझ्या आठवणीत आहे. कच्चे कुरड्या-पापडसुद्धा घरीच केले जात. माळव्याचे प्रसिद्ध पदार्थ दाल-बाटी व चुरमा-लाडू हे आहेत. गव्हाच्या पिठापासून बनवले जाणारे हे चविष्ट पदार्थ मध्य प्रदेशातील खेड्यांत व शहरांत अतिशय आवडीने खाल्ले जातात. आमच्या घरी पाहुणे आले की आई हे पदार्थ आवर्जून करत असे.    

लहान मुलामुलींची (विशेषतः तान्ह्या बाळांची) तिला खूप  आवड होती.   स्त्रीच्या गरोदरपणापासून बाळंतपणानंतरच्या सर्व अवस्थांत मदत करण्यास ती सदैव तत्पर असे. ही मदत घेणाऱ्यांमध्ये राजघराण्यातील महिलांचा, नात्यातील स्त्रियांचा व मोलकरणींचादेखील समावेश होता. हे सर्व ती अत्यंत आपुलकीने व आत्मीयतेने करत असे. 

          आम्हां  सर्व भावंडांना मात्र कडक शिस्तीत ठेवण्यावर तिचा कटाक्ष होता. त्यासाठी वेळप्रसंगी रागावून किंवा हात उगारूनदेखील त्याचा अंमल करण्यास ती मागे पुढे पाहत नसे. मी सर्व भावंडांत लहान असल्यामुळे माझ्यावर जास्त प्रेम व मला त्यातून बऱ्यापैकी सूट असे. 

दर मंगळवारी राजवाड्यावर सरदारांच्या निवडक महिलांना राणीसाहेबांकडे निरनिराळे खेळ खेळण्यासाठी येण्याचे निमंत्रण असे. त्यासाठी प्रत्येकाच्या घरून राजवाड्यावर जाण्या-येण्यासाठी वाहनाची खास सोय देखील असे. माझ्या आठवणीप्रमाणे अगदी लहान असताना मीदेखील आईबरोबर राजवाड्यावर जात असे. तेथे महिला पत्त्यांचा डाव, बॅडमिंटन अथवा निरनिराळ्या अंतरावरून काठीने चेंडू एका खळग्यात ढकलण्याचा (मिनी-गोल्फच्या खेळासारखा) खेळ इत्यादी खेळत असत. आम्ही जमलेली मुले-मुली मात्र आपआपसांतच खेळत असू. 

देवासचा राजवाडा 

                आईला तिच्या विस्तृत व्यासंगामुळे, देवासच्या राणीसाहेबांकडे खूप मान होता. बहुतेक व्यवहारात त्या सल्ला घेण्यासाठी तिला राजवाड्यावर बोलावीत. कित्येक वेळा त्यासाठी त्या आमच्या घरीसुद्धा येत. राजकुमारींच्या लग्नानंतर त्यांची सोबत करण्यासदेखील आईला त्यांच्याबरोबर जावे लागे. अशा प्रेमळ, गुणसंपन्न व अष्टपैलू आईची आठवण माझ्या हृदयावर नेहमीसाठी कोरली गेली आहे.   

            माझे वडील अत्यंत प्रेमळ, शांत स्वभावाचे,  धर्मभोळे व मृदू बोलणारे व्यक्तिमत्त्व होते. दररोज प्रातःकाळी नियमित देवपूजा करून मगच त्यांच्या दिवसाची सुरुवात होत असे. आमच्या घरी वर्षभरातील सर्व सण शास्त्रीय पद्धतीने व धार्मिक चालीरीतींनुसार केले जात. वडिल सर्वांत ज्येष्ठ असल्यामुळे समस्त देवकर परिवाराचा त्यात सहभाग असे. त्यावेळी  आमच्याकडे  गोरखपूरहून  प्रसिद्ध  होणारे ‘कल्याण’  हे नियतकालिक  येत  असे.  दररोज  रात्री सर्वांचे  जेवण  झाल्यावर ते या नियतकालिकाचे व इतर पौराणिक पुस्तकांचे वाचन करीत असत व माझी आई अतिशय शांतचित्ताने त्याचे श्रवण करीत असे. आम्ही भावंडं मात्र तिच्या मांडीवर डोके ठेवून पेंगत असू. 

गोपाल  मंदिर 

दर दिवाळीला राजवाड्यातून सर्व सरदारांच्या घरी सुगंधी तेल व उटण्याचे वाटप करण्यात येत असे.  राजवाड्यावरचा एक सेवक ते साहित्य कावडीतून घेऊन देण्यासाठी घरोघरी येत असे. राजवाड्यावर रंगपंचमीदेखील उत्साहात साजरी होत असे व देवासमहाराज सर्व सरदार-मानकऱ्यांबरोबर मनमोकळेपणाने त्यात भाग घेत. देवास राज्यात सर्व सणांमधे अतिशय भव्य व दिमाखदार सोहळा होता गोकुळाष्टमीचा! हा सोहळा सप्ताहभर खूप थाटात व पद्धतशीरपणे धार्मिक विधींसह शहर-राजवाड्यातील गोपालकृष्ण मंदिराच्या सभागृहात साजरा केला जाई. त्यात निरनिराळ्या संघांचे चोवीस तास भजन व चार वेळा आरती-प्रसाद होई. यात सर्व जनतेचा सक्रिय सहभाग असे. राज्यातील सर्व सरदार व अधिकारीवर्ग यांचे संघ होते व ते ठरलेल्या तासात आपापले भजन  गोपालकृष्णासमोर सादर करीत. संघ ओळखण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या रंगांचे फेटे राजवाड्यावरून घरपोच दिले जात. देवासच्या महाराजांचा संघदेखील लाल रंगाचे फेटे घालून रात्री आठ ते नऊ ह्या लोकप्रिय वेळेत भजन गात असे. सर्व जनतेला ह्या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून भाग घेण्याची मुभा होती. मंदिराच्या आवारात जाण्यासाठी मात्र सर्वांनाच धोतर घालणे अनिवार्य होते. बालवीर असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळेतर्फे मी देखील जात असे. दररोज मंदिराचे सभागृह वेगवेगळ्या सजावटीने सजविले जाई.  उदा. : फुले-फळे, विविध खेळांची साधने, शस्त्रांचे प्रकार इत्यादी. अंतिम दिवशी रात्री बारा वाजता  कृष्णजन्माचा  सोहळा  धार्मिक  विधिपूर्वक,  महाराज व त्यांच्या परिवाराच्या उपस्थितीत  साजरा  केला  जाई.  त्यात  सहभागी  होण्यासाठी  सरदार-मानकऱ्यांबरोबरच देवासची समस्त जनता लोटत असे.  दुसरा दिवस गोकुळाष्टमीचा. त्या दिवशी दुपारपासून सभागृहात कृष्णाचे विविध खेळ खेळण्यात येत व त्यानंतर मुख्य मार्गावरून मिरवणूक निघत असे. ह्यात सर्व भजन संघ भाग घेत. सर्वांना अनवाणी चालणे अनिवार्य असे. महाराजांचा संघदेखील त्यात  भाग घेई व स्वतः महाराजदेखील आपल्या संघाबरोबर काही अंतर भजन गात अनवाणी चालत असत. सर्वच संघ आपआपल्या संघाचा रंगीत फेटा बांधून सामील झाल्यामुळे व दुतर्फा जमलेल्या असंख्य लोकांच्या गर्दीमुळे मिरवणुकीचे दृश्य अतिशय मनोहारी असे. हा आनंद लुटण्यासाठी परिवार आपल्या मित्रमंडळींसह रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या आपआपल्या घरांच्या सज्जांत दाटीवाटीने जमलेले असत. पाच सहा तास चाललेल्या ह्या मिरवणुकीचे विसर्जन येथे असलेल्या तलावाच्या किनारी करण्यात येई.

देवासला त्यावेळचे राजे होते विक्रम सिंह पवार. माझ्या वडिलांना राज्यात ‘सरदार व जहागीरदार’ हा बहुमान बहाल केलेला होता. त्यामुळे तेथून त्यांना  नियमित राजदरबाराचे व  इतर  समारंभांचे  निमंत्रण येत असे. निरनिराळ्या  कार्यक्रमांसाठी  वेगवेगळा  पोशाख ठरलेला होता व त्यांना अनुक्रम  दिलेला  होता.  निमंत्रणाबरोबरच  पोषाख  क्रमांकदेखील  कळविण्यात येई व तोच घालून जावे लागे. त्यांना ‘जरीपटकेदार’ हा जादा सन्मानदेखील असल्यामुळे दसऱ्याला व इतर राजकीय मिरवणुकींत ते हत्तीवर बसून व राज्याचे निशाण धरून अग्रस्थानी असत.

राजे विक्रमसिंह पवार 

त्या काळी रेडिओ सिलोनद्वारा दर बुधवारी प्रसारित होणाऱ्या ‘बिनाका गीतमाला’ ह्या लोकप्रिय कार्यक्रमाने सर्वच भारतीय अतिशय भारावलेले होते. गावात रेडिओंची संख्या मोजकीच होती. आमच्या घरी तो असल्यामुळे आसपासची सर्व मित्रमंडळी तो ऐकण्यासाठी आमच्या घरी येत. माझ्या वडिलांना हा कार्यक्रम खूप आवडायचा व त्याबरोबर सर्व मित्रांचे येणेदेखील.  त्यादिवशी जर एखादा मित्र गैरहजर राहिला तर त्याच्या न येण्याच्या कारणाची चौकशी ते आस्थेने करीत.

आपल्या पूर्ण जीवनात राजेशाही वातावरण अनुभवलेल्या परंतु मला अतिशय लहान वयात सोडून गेलेल्या माझ्या परमपूज्य पित्याला वरील चार ओळींची भावपूर्ण आदरांजली.

माझे शालेय शिक्षण देवासलाच झाले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी शाळेत झाले व इंटर सायन्सचे कृष्णाजी पवार महाविद्यालयात इंग्रजी माध्यमातून झाले. त्याकाळी पंचम जॉर्जच्या व देवासच्या राजांच्या वाढदिवशी तसेच  धार्मिक  सणासुदीला  सुट्टी  दिली  जाई.  महाराजांच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांना पेढे वाटले जात. तसेच टेकडीवर स्थित तोफा डागून मानवंदना दिली जाई. माध्यमिक शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन – त्याला गॅदरिंग म्हणत – असायचे. त्या दरम्यान एक दिवस सर्वांना मोफत जेवण दिले जाई. त्यात एक मिठाई, एक शेव-चिवड्यासारखा तिखट पदार्थ व मठ्ठा असा आटोपशीर बेत असे. पण सर्वकाही पोटभर!  सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येई. त्यात सर्व विद्यार्थ्यांचाच सहभाग असे. 

उन्हाळ्यात येणाऱ्या वार्षिक सुट्टीमध्ये आमचा विविध खेळ खेळण्याचा भरगच्च कार्यक्रम असे. ह्यात प्रामुख्याने प्रातःकाळी व दुपारी विहिरीवर पोहण्यास जाण्याचा असे. एखाद्या दिवशी पहाटेच आम्ही मित्रमंडळी देवीच्या टेकडीवर पळण्यास देखील जात असू. एका पहाटे असेच तेथे गेलो असता आम्ही सर्वांनी नेहमीच्या रस्त्यावरून न जाता उभ्या कड्यावरून वर चढण्याचा निर्णय घेतला. माझे मित्र नेमके त्या दिवशी कडा चढून पुढे जाऊन दिसेनासे झाले. देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पक्क्या रस्त्यावर पोचण्यास कड्याचा आठ दहा फुटांचाच भाग चढावयाचा उरलेला असताना  माझी पावले तेथे असलेल्या दगडांमधल्या वाळूवरून अचानक घसरू लागली.  कसंबसं मी एका लहानशा झुडपाच्या आधाराने स्वतःला सावरलं; पण मला काही वर चढता येईना व मी अगदी रडकुंडीला आलो. वर असलेल्या रस्त्यावरून एक दोन इसम चालताना दिसले व मी जोरजोराने ओरडू लागलो, “ओ भैय्या मुझे बचाओ, ओ भैय्या मुझे बचाओ;” पण कदाचित माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत नसावा किंवा त्यांचे लक्ष दुसरीकडे असावे; त्यामुळे त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मी खूपच घाबरलो; पण करणार तरी काय? तशाच स्थितीत मनातल्या मनात देवीमातेचे स्मरण करत, झुडपाला धरून थांबून राहिलो. अचानक वरून आवाज आला, ‘मनू, काय झाले? काळजी करु नको. आम्ही आलो आहोत.’ बराच वेळ झाला होता.  मी न दिसल्यामुळे माझे मित्र परत आले होते. त्यांच्याच मदतीने मग मी वर चढलो व सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. ही आठवण माझ्या मनाच्या कप्प्यात अविस्मरणीय झाली आहे.

तुळजा भवानी मंदिर 

दुपारच्या वेळी मात्र देवासमध्ये अतिशय कडक ऊन असल्यामुळे पत्ते, व्यापार इत्यादी बैठे खेळ खेळण्याचा कार्यक्रम असे. पत्त्यांत ‘सत्ती लावणी’ हा सर्व मित्रांना जास्त आवडत असे. वर्षभर ऋतूप्रमाणे गोट्या, भोवरा, लगोरी, विटीदांडू, पतंग उडविणे इत्यादी मैदानी खेळांची रेलचेल होती. क्रिकेट, कबड्डी व फुटबॉलसारख्या सांघिक खेळांचा देखील त्यांत समावेश होता. त्यावेळी मुलांमध्ये बालवीर चळवळ खूप लोकप्रिय होती. त्या अंतर्गत सांघिक कवायत व आसपासच्या गावी शिबिरासाठी जाण्याचा कार्यक्रम समाविष्ट होता. तसेच मला पुस्तक बांधणी, दोरीच्या निरनिराळ्या उपयुक्त गाठी, गवताच्या काड्यांपासून टोपली बनवणे इत्यादी कलादेखील शिकण्यास मिळाल्या. 

एकदा आम्ही देवासजवळच असलेल्या सिया या खेड्याच्या परिसरात पायीच शिबिरासाठी गेलो होतो. तेथे एका तलावाशेजारी मोकळी जागा बघून तेथे तळ ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही त्या काळी, आयते तंबू मिळत नसल्यामुळे, जाड चादर, सतरंजी, बांबू व दोरीच्या साहाय्याने  तो बनवत असू; पण त्या दिवशी खूप वारा असल्यामुळे आम्हांला तो बांधणे जमत नव्हते. अशातच संध्याकाळ होऊन अंधार पडण्यास सुरुवात झाली व आम्ही सर्वच  वयाने लहान असलेले बालवीर  हवालदिल झालो होतो. त्याचवेळी अचानक माझे मोठे भाऊ सायकलीवरून माझी खुशाली बघण्यासाठी तेथे आले. त्यांना बघून मी सुटकेचा निःश्वास सोडला व माझ्या मित्रांनादेखील आनंद झाला. मग त्यांच्या मदतीने सगळ्यांचेच तंबू, अंधार पडण्याअगोदर, उभे राहिले. त्यानंतर सर्वांनीच सियाहून माझ्या भावाला सहर्ष निरोप दिला.

त्यावेळी नुकतेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे राष्ट्रीय नेत्यांची देवासमध्ये सारखी ये-जा असे. अशावेळी येणाऱ्या मुख्य पाहुण्यांना त्यांच्या कारपासून व्यासपीठापर्यंत धीम्या गतीने चालत घेऊन जाण्याची जबाबदारी बालवीर असताना माझ्या व माझ्या एका मित्रावर असे.देवासपासून तीन मैलांच्या अंतरावर बिलावली येथे महादेवाचे देवस्थान आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी सर्व लोक दर्शनासाठी तेथे जात. त्या दिवशी शाळेला अर्धा दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही सर्व मित्र चालत दर्शनासाठी जात असू.

अशा बालपणीच्या रम्य आठवणींची शिदोरी गाठीशी बांधून १९५५ साली मी पुढील शिक्षणासाठी देवास जवळ जवळ कायमचे सोडले. शिक्षण संपल्यावर नोकरीनिमित्त  मुंबईला गेलो.  आता  सेवानिवृत्तीनंतर मुलांसोबत  अमेरिकेत अरिझोनाला रहातो आहे. आता फक्त नातेवाइकांकडे लग्न समारंभानिमित्त किंवा  नैमित्तिक  भेटीगाठींसाठी  देवासला जाणे होते.  आता मात्र औद्योगिकीकरणामुळे  देवासची काया पूर्णतः पालटली आहे.  मागील दशकात  शहराची झपाट्याने प्रगती झाली असून स्वच्छतेच्या दृष्टीने ते मध्य प्रदेशातील एक उत्तम शहर म्हणून गणले जाऊ लागले आहे. टेकडीवर बऱ्याच  सोयी करण्यात आल्या आहेत व वर जाण्यायेण्यासाठी बहुतांश मार्ग कॉंक्रीटचा करण्यात आला आहे.  वयस्क व विकलांग लोकांसाठी झुलत्या पाळण्याची व्यवस्थादेखील केली आहे.  वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाद्वारे असंख्य झाडांची लागवड करण्यात आली आहे; त्यामुळे  भरपूर हिरवळ  दिसण्यात येते; परंतु टेकडीवरील  मंदिर व  परिसर मात्र पूर्णतः व्यावसायिक झालं आहे. पूजासामग्रीची अनेक दुकाने थाटली गेली आहेत.  नवरात्रीत लाखो लोक  दूरदूरहून  येऊन दर्शनाचा लाभ घेतात. 

झुलता पाळणा 

        माझ्या लहानपणी प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व यांचेदेखील वास्तव्य देवासमध्येच होते.  मला शास्त्रीय संगीत कळत व आवडत नसल्यामुळे परिचय होण्याचा योग आला नाही. त्यांच्या प्रथम पत्नी भानुमती कोमकली या कन्याशाळेत मुख्याध्यापिका  होत्या. अध्यापकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत आमचे काही वर्ग  घेण्यास त्या येत असत. त्यामुळे फक्त त्यांची ओळख होती.  

          देवासमध्ये मिळणाऱ्या मिठाईचा जोपर्यंत उल्लेख करत नाही तो पर्यंत माझ्या आठवणींच्या प्रवासाला थांबवता येणार नाही. त्याकाळी शुद्ध तुपाच्या व माव्याच्या अनेक प्रकारच्या मिठाया येथे मिळत. त्यात विशेष उल्लेखनीय होत्या : दूध-मलाईचे लाडू, खोपरापाक, गुलाब-जाम, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी इत्यादी आणि  आजूबाजूच्या   परिसरात  कुठेच न मिळणारी ‘रसभरी!’ माव्याच्या गोल व चपट्या आवरणात, मध्यभागी साखरेच्या पाकात चारोळ्या व  बेदाणे  बुडवून  ठेवून  केलेली ही मिठाई अलौकिक, लोकप्रिय व अतिशय प्रसिद्ध होती.  कित्येक वर्षं मुंबईला येणाऱ्यांबरोबर  आम्हीदेखील रसभरी आयात करत असू. काळाच्या ओघाबरोबर आता देवासमध्ये ही मिठाई आता इतिहास जमा झाली आहे. 

माझ्या बालपणीच्या काही रम्य आठवणी आपणा सर्वांबरोबर वाटून घेताना मला खूप आनंद होत आहे.

Author

One thought on “रम्य ते बालपण ,रम्य त्या आठवणी

  1. प्रिय मानू, आज तुझा “बालपण” लेख वाचून देवास क्या लहानपणीच्या आठवणी उफाळून आल्या. वाचता वाचता त्या काळात संपूर्ण बुडून गेलो. आता आपल्या लहानपणीचे बोटावर मोजण्या इतके मित्र राहिले आहेत..खूप छान वाटलं लेख वाचून . आपलं वय अजून वाढल्या सारखं वाटतय. बाळ अभ्यंकर पुणे.

Leave a Reply