झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. २०

रेल्वेच्या प्रत्येक मंडलात (Division) वरिष्ठ, अतिवरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या दरतीन-चार वर्षांनी बदल्या होत असतात. कधी-कधी तेच पद उन्नत (Upgrade) करून पुढील पदाचा कालावधी त्याच ठिकाणी वाढवला जातो आणि हे सर्व नियमात बसवून केले जाते.

बदली झाल्यावर मग प्रश्न येतो, त्या पदाला शोभेल अशा ऑफिसचा आणि ‘सरकारी’ निवासस्थानाचा! आणि मग ‘नूतनीकरण’  या गोंडस नावाखाली जुन्या-नव्या वस्तू व वास्तूंची तोडफोड आणि सरकारी पैशाची उधळपट्टी सुरू होते. यात वास्तुशास्त्राचे वर्चस्व कितपत असते, हे तर गौणच; पण एक वेगळीच ‘उच्च कोटीची अधिकारी प्रवृत्ती’ पदोपदी दिसून येते. या लेखात आपण असेच काही गमतीशीर प्रकार पाहणार आहोत.

असेच एक अधिकारी होते. ते जिथे जातील तिथले रेल्वेचे जुने फर्निचर (वेटिंग हॉलमधील टेबल, खुर्च्या, बाके, कपडे अडकवण्याचे लाकडी हँगर्स  किंवा लाकडी चौकटीतील मोठे आरसे) पाहून त्या खात्याच्या सुताराला सांगायचे, “या जुन्या लाकडाचे असे-असे फर्निचर तयार कर आणि या ठिकाणी आपण नवीन फर्निचर आणू या.” अतिशय उत्तम दर्जाचे शिसम किंवा सागवानाचे ते जुने रेल्वेचे फर्निचर असायचे. “आपल्याला छोट्या स्टेशनावरील कार्यालयीन कामाकरिता हे जुने फर्निचर उपयोगी होईल,” असे सांगून असे तयार केलेले फर्निचर एका सोयीस्कर स्टेशनावर पाठवले जायचे. काही दिवस वापरल्यावर ते फर्निचर त्या अधिकाऱ्याच्या मूळ गावी पाठवले जायचे!

माझ्या सुदैवाने माझे ऑफिसचे टेबलही असेच मजबूत होते. त्यावर ‘GIPR 1923’ असे कोरलेले होते. (GIPR म्हणजे Great Indian Peninsular Railway. Peninsula म्हणजे द्वीपकल्प किंवा जमिनीचा समुद्रात घुसलेला मोठा भाग). त्या टेबलातील गुप्त कप्पा खूपच गुप्त होता – कुलूप न लावता तो उघडता येत नसे. या  मेजावरसुद्धा त्या अधिकाऱ्याची नजर होती! ते टेबल वाचवण्यासाठी मी एक शक्कल लढवली. “त्याच्यापेक्षा वरच्या अधिकाऱ्याने मला याची Antique टेबल म्हणून काळजी घ्यायला सांगितली आहे,” असे खोटे बोलून मी त्या टेबलाचे रक्षण केले. अशी उचलेगिरी करण्यासाठी मागील लेखात उल्लेख केलेले सेवालाल नेहमी तयार असायचेच.

   हे सगळे सर्वांना कळायचे, पण सगळे मूग गिळून चूप बसायचे. सत्तेपुढे शहाणपण उपयोगाचे नसतेच. जोपर्यंत अशा व्यक्ती अधिकारावर असतात, तोपर्यंत त्यांचे सगळे कुटुंबच  ‘अधिकारी’ असते!

अशाच उत्तम दर्जाच्या अँटिक (Antique) वस्तू, उदा. भिंतीवरील प्राचीन  टेलिफोन किंवा गाणी-संगीत ऐकण्यासाठीचा ग्रामोफोन – ह्या वस्तूंची विशेष काळजी घेण्यास माझ्या आधीच्या प्रमुखांनी सांगितले होते. अशाच एका लोभी अधिकाऱ्याने माझ्या भांडाराच्या (Stores) तपासणीदरम्यान वरील वस्तू पाहिल्या. त्या वस्तूंची त्याला आधीच कुणकुण लागली असावी, असे मला त्याच्या देहबोलीवरून वाटले. माझे आणि त्याचे शीतयुद्ध सुरू झाले आणि शेवटी तोच जिंकला! अशा उत्तम दर्जाच्या अँटिक वस्तू त्या अधिकाऱ्याच्या दिवाणखान्याची शोभा वाढवू लागल्या. खाली दाखवलेल्या ह्याच त्या, मी प्राणपणे जपलेल्या  रेल्वेच्या काही वस्तू आहेत.

    अशाच एका डिव्हिजनमध्ये एक अधिकारी होता. त्याला  पोहण्याचे खूप वेड होते. त्या डिव्हिजनमधील मोकळे मैदान, बाग आणि एक जुनी कर्मचारी राहण्याची क्वार्टर यांची लांबी-रुंदी कमी करून त्याने मनासारखा जलतरण तलाव  तयार करून घेतला होता! अशा वेगळ्या कामाचा खर्च सरकारी कामे दाखवूनच केला जातो. परिणामी, रेल्वेचे मुख्य काम निकृष्ट दर्जाचे होते आणि कधीकधी स्टेशनावरील प्रवाशांच्या डोक्यात कुठलातरी नामफलक किंवा फाॅल्स  सीलिंग कोसळते. अशा ‘शापित’ जलतरण तलावाचा फायदा ठरावीक वेळेत फक्त तो आणि त्याचे कुटुंबच घेणार; इतर कोणी कनिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी तिथे जाणारच नाही! मग तिथे पार्ट्या, क्लब इव्हनिंग्स आणि मुलांचे वाढदिवस होणार आणि हे सर्व रेल्वेच्या खानपानसेवा देणाऱ्या (रेल्वेतील पाणचट चहा आणि सुमार दर्जाचे जेवण देणाऱ्या) कंत्राटदारांच्या सौजन्याने चालणार! 

  अशा वेळी मला आयन रँड (Ayn Rand) यांच्या ‘वी द लिव्हिंग’ (We The Living) या पुस्तकातील तांब्याच्या खाणीतील कामगारांवर लिहिलेले वाक्य आठवते : ‘सत्तेतून/अधिकारातून पैसा निर्माण होतो आणि त्या पैशांतून परत सत्ता निर्माण; हे  असे चक्र तयार होते.’ हे चक्र तोडण्यासाठी क्रांतीचीच गरज भासते. असो!

आणखीन एक असाच सरकारी सत्तेचा प्रकार सांगितल्याशिवाय राहवत नाही. एका सरकारी अधिकाऱ्याची लाडाची मुलगी! लग्न अतिशय थाटात होणारच. पूर्ण रेल्वे कामाला लागली. आता प्रश्न होता वऱ्हाडी मंडळींच्या राहण्याच्या सोयीचा. तो अधिकारी प्रशिक्षण विभागाचा  प्रमुख होता. त्याने एक अलिखित फतवा काढला – त्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी होणारे प्रशिक्षण एक आठवडा पुढे ढकला! … आणि तेथील वसतिगृहात वऱ्हाडी मंडळींची सर्व सोय केली गेली. तेथे लांबून येणारे प्रशिक्षणार्थी आणि इतर उमेदवार यांचे सगळे वेळापत्रक धुळीस मिळाले.

यातील जमेची बाजू ही, की त्या निमित्ताने वसतिगृहाच्या भिंतींची रंगरंगोटी झाली, पलंग आणि त्यांवरील गाद्या बदलल्या, कूलर आणि ए. सी. बसवले गेले आणि नुकत्याच सुरू झालेल्या वायफायचीसुद्धा सोय झाली! त्या प्रशिक्षणार्थींपैकी मी एक होतो. तेथील केटरिंग व्यवस्थापकाशी बोलताना बऱ्याच ‘अंदर की बातें’ मला कळत गेल्या, पण त्याचे अनुकरण करण्याची हिंमत मला कधीही झाली नाही. माझ्या विभागाशिवाय इतर विभागांची ‘अंदर की बात’ अशी कळेल, असे वाटले नव्हते. शेवटी मी नेहमीप्रमाणे मनाशीच म्हणालो, “मला काय त्याचे, जाऊ द्या!” आणि मी ज्या ‘टेंडर, कॉंट्रॅक्ट आणि ॲग्रीमेंट’ या १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी आलो होतो, त्या अभ्यासाला लागलो.

Author

Leave a Reply