मोरोपंत : ‘विबुधप्रिया, सवया रामायण’

बुद्धिमंतांना प्रिय असं विबुधप्रिया वृत्त. 

यातही मोरोपंतांनी त्यांच्या भाषाप्रभुत्वातून रामकथा खुलवली आहे. मोरोपंत विबुधप्रिया वृत्ताला हरिनर्तन छंद म्हणतात. (गालगालल गालगालल गालगा) 

गेयता असलेल्या या वृत्तातील प्रत्येक ओळीत एकेक घटना गुंफत मोरोपंतांनी  कथेला वेग दिला आहे.

२६२/४/ 

शंभुच्या धनुचे, पळांत चि ओढितां   तुकडे करी

जानकी, पणसिद्धि पाहुनि, हर्षुनि, प्रभुतें वरी

दे  तिघांसि सुता तिघी, जनकासि कीर्ति मिळे बरी 

या दोन वाक्यांत रामाचा विवाहही होऊन जातो.

कथेचे वृत्तबद्ध काव्यात्म रेखाटन आणि त्यातही दामयमकाची अर्थवाही गुंफण कथानकाची श्रीमंती वाढवते. 

२६४/१५/१६

दे प्रभो! अभया मला, घन दे तसें खगपा वनां; (चातक) 

पाव; नाम यशस्वि हो; द्रवलासि बा! गजपावना

पावना तव कीर्ति मोहिति,

जेंवि जंतुसि आसरा (अप्सरा)

आ सरा करिती तुला जन; दे नताप्रति आसरा

एकीकडे शब्दांच्या वेधक रचना गुंफताना कथानकाची वीण सरसर पुढे न्यायची, त्यातही मनुष्यस्वभावाचे आडवे उभे धागे विणत एक भव्य, दृश्यात्मक पातळीवरचं नाट्य जिवंत करायचं ही लीला वाचकाला खिळवून ठेवते. 

या विबुधप्रिय रामायणात रामाचे असेच वेगळे रूपही दाखवले आहे.

सीता नसलेला आश्रम बघून श्रीराम व्याकूळ झाला आहे. २६६/३२

येवुनि द्रुत, शून्य आश्रम पाहुनि प्रभु ‘हा!’  वदे, 

तो नगांस हि मोह आत्तवियोगिमानवभाव दे. 

रामाने वियोगाचे, विरहाचे नुसते सोंग घेतले आहे. अंतर्यामी तो स्थिर आहे. 

प्रत्येक रामायणात अशी एखादी वेगळी बाजू मांडत मोरोपंत कथानकाला कल्पकतेने नटवतात. सगुणात आला म्हणून काही तो स्वतःचं मूलस्थान तो विसरला नाही. अंतर्यामी तो स्थिर आहे. या पडावावर आपण वाचकांनीही थांबून विचार करायला हवा. मोरोपंत इथे हे वाचकांना उद्बोधन करत आहेत.  ‘आपण  कोण आहोत, कुठून आलो आहोत’ इतकंच नव्हे तर हे जगाच्या रंगभूमीवरील नाटक चालू आहे या आध्यात्मिक जाणिवेकडे नेणारे हे  भाष्य ठरते. 

वृत्त, अलंकार, घटना, नाट्य अशा वेगवेगळ्या संकल्पनांमधून हिंडताना अनेक अवघड शब्दांचं जंजाळही सोडवावं लागतं. 

२६६/२८

श्री म्हणे, ‘निघ रे! कधीं हि न कर्म हें शुचि, राक्षसा! 

भस्म होसिल; देखिला न तुवां जगीं रुचिराक्षसा

हे कर्म योग्य नाही हे सीता सांगत आहे, पण भस्म होणे आणि ‘रुचिराक्षसा’ याचा संबंध काय? 

रुचिर +अक्ष+सा

अक्ष म्हणजे डोळे, डोळ्यांना विसावा, शांतता देणारा म्हणजे अर्थातच श्रीराम. रामाला पाहताच भस्म होशील असे सीता सांगत आहे. 

राक्षस आणि रुचिराक्षसा हा संधी आणि अंत्यानुप्रासास दाद घेऊन जातो. 

पान २६७/३५- दुसरी ओळ

केंवि पाहिल वज्रभृत्कपिलावराज्यप दीनता

इंद्राच्या गाईचे म्हणजे कामधेनूचे उत्तम तूप सेवन करणारा

२६८/४३

संस्कृत प्राकृत शब्दांची वेणी  गुंफत मोरोपंतांचं  काव्य अधिकाधिक विनटत जातं. वाचकालाही कथा माहीत असूनही पुढे ती कशी रंगवली जाईल अशी उत्सुकता वाटत राहते. 

पान२६८/४३,४४

क्षिप्र गोष्पदसा पयोनिधि लंघिला शतयोजनें

हर्षले बहु अंगदादि जसे सुधारसभोजनें

अशा सुघड मराठीनंतर

जानकी हुडकावयास्तव धाडिलीं

अशी अगदी बोली मराठी येते.

लगेच पुढे 

आपले मधुसंज्ञ जें वन

तें तिहीं लुटिलें बळें

अशी मजेशीर रचना कंथा म्हणजे गोधडीतून येते  आणि अतिअवघड नाही किंवा अतिसोपी नाही अशा सर्वसामान्य रसिकांसाठी आणि विद्वानांसाठी पूरक ठरते. 

विबुधप्रिय रामायणात रसही जोमाने दर्शवला आहे. 

२७०/५४ वीररस 

अंगदें गगनी उडोनि महाबळें भुज झाडिले;

पाडिले मदमत्त च्यार यमाकडे जड धाडिले

साम सोडुनि, मांडिलें, नय धर्म लंघुनि उद्धतें,… 

असं वर्णन करत म्हणतात :

आंत बाहिर वीर, वीररसें निरंतर रंगले. 

पुढे यातून भयानक रस   उगम पावतो. २७०/५६ 

नाचले समरीं कबंध असंख्य रक्तनदीशतें 

चित्र, जें करिती निशाचरकीश ते हि तदीश तें

यातून पुढे येतो बीभत्स रस. २७०/५६ 

वाजिवारणमार्गरोधक मांसकर्दम सांचलें

रामलक्ष्मण संमुखागत मानुषाद न वांचलें

पान २७८छंद

विबुधप्रिय रामायणाच्या शेवटी १०५,१०६ त्यांनी शशिकला वृत्ताचा उल्लेख केला आहे. 

 ही रचना ‘अरविंद सवैया’सारखी सवाई असून अक्षरे २५,१२व्या अक्षरावर यती येतो. चालीत म्हणताना सवाई सारखीच चाल लागते. (अयि गिरिनन्दिनि) 

१७८/१०६,१०७

त्रिजगदगहर परम सुखकर चरित रघुवर वरद या

स्तविति; सुरमुनि म्हणति करि असि पशुहिवरि नच पर दया

अजितगुणयश सकळनतजनिमरणजलधिसि सुकवितें

अमरतरुहुनि अधिक शतगुण फळद बहुमत सुकवितें

पुढे सवाया रामायणाची चाहूल लागावी म्हणून हा वृत्तबदल केला असावा असेही नाही… कारण लगेच पुढच्या ओळींत विबुधप्रिया वृत्त योजले आहे.

पुष्पसें ‘विबुधप्रिया’ख्य चरित्र हें शुचि पाहिलें;

वंदुनि प्रभुच्या पदावरि मस्तकासह वाहिलें

अशी अक्षरसुमने वाहून मोरोपंत सवाया छंदात अवगाहन करतात.

 मदिरावृत्त

मदिरा याचे विविध अर्थ आहेत. इथे हे वृत्ताचे नाव आहे आणि हे सवाईमधील हे वृत्त खरंच मधासारखे गोड आहे. 

२७९ सवाया रामायण

मदिरा वृत्त २२अक्षरे

मोरोपंतांचं वृत्तबद्ध काव्य आखीव रेखीव आणि घडीव आहे. वृत्तबद्ध काव्यात फार क्वचित ते तडजोड करतात. 

बालकांड/२७९/१ यात मात्र सुरुवातीलाच मदिरेची लय बिनसते :

श्रीपति तें विधि| रावणपीडित|

विश्वसुखार्थ म्हणे नरसा हो

वृद्ध, अपुत्र न आधि सदा, ‘दश’ पूर्व ‘रथा’भिध भूवर साहो

कश्यप तेंवि, पितृत्व तुझें, रविवंशज हा शुचि सुव्रत लाहो

कश्यप तेंवि पितृत्व तुझें 

पित् चा आघात झाल्यामुळे तो गुरू होतो आणि मदिरा वृत्ताचा तोल ढळतो. पण  अर्थातच ती त्रुटी नगण्य आहे. 

मनाच्या श्लोकांमध्ये 

अहल्या शिळा राघवे मुक्त केली

पदीं लागता दिव्य होऊनि गेली

हे आपण म्हणतो. हीच कथा सवाई छंदात मोरोपंत अलंकारिकतेने कसे गुंफतात :

 २७९/४

त्यावरि तो मिथिलेसि महामुनि जाय पथीं प्रभु गौतमजाया

उद्धरि पादसरोजरजें; बहु जी भ्रमवी मन ती हरि माया

साधारणपणे त्या त्या भावनेला अनुकूल असं वृत्त योजिलं जातं. वरील पंक्तीत सकारात्मकता आहे आणि हे वृत्तही त्याला साजेसं आहे.

संतकाव्यातील आध्यात्मिकता आणि पंतकाव्यातील शब्दसौंदर्य यांच्यातील फरक अशा पंक्तीतून ठसठशीतपणे दिसून येतो. 

समर्थांच्या भुजंगप्रयाताची लय, कधी जाणवणारी तटस्थता  अथवा कारुण्य हे मनावर आध्यात्मिक दृष्टीने ठसतं, विचारमग्न करतं.  पंतकवींचं लेखन शब्दांचे विभ्रम दाखवतं. 

मोरोपंतांच्या वृत्तरचनेतील गोडी, रस शब्दांगणिक बदलतो. वरच्या ओळींत हेच वृत्त सकारात्मक ठरतं. 

पण अयोध्या कांडात मात्र दशरथाची काकुळती हेच वृत्त गहिरी करतं. २८०/३

जाणुनियां जननीप्रिय सत्य चळों चि न दे तिळ ही जनकाचें

नेसुनि वल्कल बंधुवधूसह सोडुनि धाम महाकनकाचें

तीस सदार पित्यासि, नमूनि

पुसोनि निघे न करी मन काचें

पायिंच जाय रथीं बसलें  मग तातवचें, धन ते सनकाचें||

दशरथाची व्याकूळता व्यक्त करताना ते लिहितात…

“हाय! म्हणें रघुराज रडे बहु शीघ्र भजे महिषीनिलयातें

राजवरे निघणें वरिलें लघु, जेवि करें भुजगीबिलयातें

बिळात दडून बसलेल्या सापासारखा तो बसून राहिला.

महिषीनिलय… म्हणजे म्हशीचा गोठा नव्हे… महिषी म्हणजे पट्टराणी आणि निलय म्हणजे घर…कैकेयीच्या महालात तो तिची आर्जवे करू लागला. 

पुढे अलंकारांची एक सुरेख लड ओवत मोरोपंत सवयारामायणाला आणखी उंचीवर घेऊन जातात. 

२८१/७

केकयजासुत साधु निघे, यश साधुनि घे परते मग नंदी

ग्रामिं वसे अतिखिन्न जसा  शिवपादसरोजवियोजित नंदी

शिवाच्या पायांना मुकलेला नंदी जसा खिन्न होईल तसा रामाच्या सहवासाला तो  मुकला आणि उदास झाला. 

वर एकदा ‘हुडकावयास्तव’ हे अगदी बोली मराठी संस्कृतप्रचुर भाषेच्या शेजारी ओवले आहे. सवाया रामायणातील किष्किंधा कांडातही हेच क्रियापद योजले आहे. २८३/२- दुसरी ओळ

मेळवि तो बहुकोटि महाकपि ऋक्ष, सुरांश पण प्रतिपाळीं

त्यांसि कथी हुडका महिजा कपि पाठवि अंशु जसा करमाळीं(सूर्य)

सुंदरकांडात मारुतीच्या नाट्यपूर्ण करामतींनी कथेला वेग आणि आवेश येतो. २८३/२

 रात्रि तरूपरि बैसुनि तो अवलोकि धरातनयाश्रुति शूद्रा

त्या कुमतोपगता हि सतीकृतदुर्मतिधिक्कृत मानलि रुद्रा

दिग्वदनापगमावरि वर्णुनि राजसुता  गुणरत्नसमुद्रा

संशयलेश मनीं नुरवी प्रणतिस्तुतिपूर्वक दे तिस मुद्रा

अलंकारांचा अतिरेक होऊ नये यासाठी मोरोपंत आता कथानकाला रसाची जोड देतात.   

२८४ वीररस

३-तिसरी ओळ 

पेटवी तैलपटावृत पुच्छ न शक्त असे खळ मानुनि शक्ता

त्यां फिरवा स्वपुरांत म्हणे अपमान करूनि महाप्रभुभक्ता

मोरोपंतांनी वृत्ताच्या बंधनात राहून स्वैर सोडलेली कल्पनाशक्ती…  होळी पेटवल्यावर  मारुतीने मजेत घातलेलं थैमान,  गेयता, अनुप्रास, नाट्य, हर्ष अशा विविध स्तरांवर वाचकाला हिंडवून आणते. २८४/

रावण मेघरव क्षणदाचर  सर्व हि, ‘हाय!’ म्हणे, कर चोळी

‘हा!’ वदल्या खचरी, जळतां गृह; त्याहुनिही लुगडे कच चोळी

२८६/१३ वीररस

कोपुनि वानरराज म्हणे  भटहो,  अरिचें उरलें पुर जाळा

पेटविलें गमलें सुबुभुक्षुपुढें द्रुत ओगरिला गुरु थाळा

आरडती रडती खचरी बहु, आकुळ होउनि ताडिति भाळा…

सोप्या वाटणाऱ्या शब्दांमधून एखादं कूट घालायचं आणि ते सोडवायला द्यायचं हा मोरोपंतांचा आवडता खेळ. 

२८७/

व्याकुळ मेघरवारिस ही करि, तद्विशिखांसि रघूत्तम वारी

युद्ध नवें करिति प्रभु रावण वीर महाशरकार्मुकधारी||

मेघरवारि ( मेघरव+अरि) मेघनादाचा अरि = शत्रू= लक्ष्मण)

२८८

दिग्वदनध्वजकार्मुकसारथिमस्तक खंडुनि पाडी – असे संधी सोडवायला मजा येते. 

दिशांएवढी डोकी असणाऱ्याचं (दशमुख रावण)निशाण,  धनुष्य आणि सारथ्याचं मस्तक तोडून टाकलं. 

२९०

सीतेचे पावित्र्य सिद्ध करण्याचा प्रसंग सीतेच्या मुखातून /३३

ती वदली दहनीं शिरतां जरि हे शुचि मीं तरि हा मज रक्षु

जी उचिता शुचिता नसतां असतां परकाम हुताशन भक्षु

स्त्रीच्या वाटेला येणारं हे दिव्य अतिशय व्यथित करून जातं.

यमकाचा अट्टाहास. २९०/३७

निर्जरगायकगानरवें; सुरवाद्यरवें हि दिगंतर गाजें

चंद्र चकोर पयोधर चातक ते प्रभु या करिते जन ‘आ’ जे

गाण्याचा गोडवा ऐकून आ वासला, गाणं टिपून घेतलं.  हा ‘आ वासणं’ मोरोपंतांना फार आवडतं. ते पुढे लिहितात, २९१/४१

‘सच्चरित प्रभुचें चि सदा भरलें,’

म्हणती ‘तप तापस ‘रीतें.

यासचि भी भवताप, करी नच ज्या गुरुच्या, दवताप सरीतें

चातकपक्षिकुळ व्रत घेउनि, अन्य उपेक्षुनि आप, सरीतें

तेंवि इतें चि महाकविवृंद, दुजें यश सोडुनि, आ पसरीते

चातक जसा बाकी कोणतंही पाणी न घेता आपसरी म्हणजे पाण्याच्या धारा प्राशन करतो

तसेच महाकवी  दुसर्‍या गोष्टी सोडून याचंच प्राशन करण्यासाठी आ पसरतात.

२९६/३५,३६ करुण रस 

पुढे कथानकात आनंदाचे क्षण क्वचितच येतात. 

राम विहार अशोकवनीं करि;  नित्य विलाससुखें बहु धाली

भूमिकृतें नवसें चिर न्हावुनि 

गर्भवती धरणीजनि झालीं

तिचे डोहाळे पुरवण्यासाठी राम विचारतो, 

तीस पुसे रघुनायक दोहद मोहदवांबुद  घेउनि अंकीं

(२९६/३५)

सीता मोहात पडावी यासाठी तो मोहाचा ढग झाला आणि  ‘उद्याच वनात जाऊ,’ असे त्याने तिला स्वप्न दाखवले. 

हा खोट्या कौतुकाचा खेळ त्या भोळ्या मनाला समजतही नाही. राम दूताला विचारतो, “काय म्हणती मला जन दूता” 

“बोलति  हें हि, कसी सदनाप्रति आणिलि, शत्रुसि जी वशगा ती? 

हा कथानकातला अतिशय  संतापजनक भाग आहे. पत्नीपेक्षा दूतावर विश्वास ठेवणे ही स्त्रीचारित्र्याची क्रूर विटंबना आहे. अर्थात हे त्या त्या कालानुरूप घडत असलं तरी आधुनिक मन मात्र ही घटना सहज स्वीकारू शकत नाही. 

सीताही पतिव्रतेचा आदर्श म्हणून म्हणते, २९७/३९

भूतनया वदली, ‘जन निंदिति याकरितां त्यजिलें जरि साधो

युक्त असे प्रभुला यश निर्मळ आत्मकुळोचित यावरि साधो

स्त्रीची अशी केविलवाणी  अवस्था व्याकूळ करते. 

३०३ या धक्क्यातून वाचकांना  बाहेर काढण्यासाठी मोरोपंत अध्यात्माचा आधार घेत अनुष्टुभ छंदात एक श्लोक रचत म्हणतात, श्रीरामचरितभरितश्रीरामचंद्रप्रार्थना (चाल : भीमरूपी महारुद्रा) 

 श्रीरामा! जलदाश्यामा! 

देवदेवा! दयाकरा!

धाता भवीं फळें उग्रें दे, वदे  वाद या करा 

यालाच अनुसरून हा श्लोक वाचला की कर्मफळ भोगाचा न्याय लक्षात येऊन कारुण्य कमी होऊन तटस्थता येते. 

वाद करावा अशी स्थिती राहत नाही. 

या प्रार्थनेत आर्ततेऐवजी शब्दखेळ अधिक असला तरी या  शब्दखेळामुळेच वाचक उत्सुकतने वाचतो आणि ज्ञानाची पायरी चढतो.

Author

Leave a Reply