भारतातील हस्तलिखित पोथ्यांचे विश्व इथल्या कलाविश्वासारखेच अथांग आहे. याच्या प्रारंभाबद्दल किंवा अवाक्याबद्दल आजवर बरेच संशोधन होत आले असले तरीसुद्धा या संबंधी बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत किंवा त्यांची उत्तरे नेमकेपणाने देता येत नाहीत. भारतातल्या उपलब्ध असलेल्या हस्तलिखित पोथ्यांची संख्या सुमारे पन्नास लाखांच्या घरात आहे, यावरूनही या क्षेत्राच्या आवाक्याचा काहीसा अंदाज येऊ शकतो.
इंग्रजीमध्ये पोथी लिहणाऱ्याला ‘स्क्राइब’ असे नाव आहे. याची व्युत्पत्ती पाहता, कोरणारा किंवा खरवडणारा असा अर्थ सापडतो. आधी लिहिण्याची क्रिया कोरण्यासारखीच होती – म्हणजे दगडावर, लाकडावर, भूर्जपत्रावर अक्षरे कोरली जायची. आपण ‘लिखाण’ करणारा लेखक असा शब्दप्रयोग करतो, ‘लिख्’ या संस्कृत धातूचा मूळ अर्थ कोरणे असाच आहे.
भारतात सर्वात जुन्या ज्या हस्तलिखित पोथ्या सापडल्या आहेत, त्यांचा काळ साधारण पाचव्या शतकाचा आहे. कागदावर लिखाण करण्याची सुरुवात भारतात साधारण तेराव्या शतकात झाली अशी मान्यता आहे. लिखाणासाठी आधी वापरले जायचे ते पान – म्हणजे ताडपत्र किंवा भूर्जपत्र आणि नंतर कागद वापरला जाऊ लागला. अशा पानांना एकत्रितपणे पोथी म्हटलं जायचं.

विनय नारकर यांच्या संग्रहातील भगवद्गीता
इथे आपल्याला हस्तलिखित पोथ्यांच्या इतिहासात खोलात जाण्याचे प्रयोजन नाही. या पोथ्यांच्या निर्मितीबाबत दोन रंजक काव्यं आपल्या साहित्य इतिहासात सापडतात, त्यांची माहिती करून घेणार आहोत.
पहिले आहे अर्थातच श्रीरामदास स्वामींचे. त्यांनी दासबोध या आपल्या ग्रंथात लेखनक्रियेचा ऊहापोह केला आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु महाराष्ट्रातील हस्तलिखित पोथ्यांबाबत बोलत असताना या विषयीच्या इतक्या महत्त्वाच्या लिखाणाबद्दल न बोलणे हे योग्य न वाटल्यानेच इथे हा विषय मांडत आहे. गुरुशिष्य संवादाद्वारे उलगडणारा हा ग्रंथ २० दशकांमध्ये विभागला आहे. याच्या प्रत्येक दशकात १० समास आहेत. श्रीमत् दासबोधाच्या शिकवण नामक एकोणिसाव्या दशकाचा पहिला समास आहे, ‘लेखनक्रियानिरूपण.’ यामध्ये स्वामी रामदासांनी त्या वेळची लेखनक्रिया वर्णिली आहे, जी आज आपल्याला एकटाकी दस्तऐवजीकरण म्हणून उपलब्ध आहे.
घट्य कागद आणावे ।
जपोन नेमस्त खळावे ।
लिहिण्याचे सामे असावे ।
नानापरी ॥
सुऱ्या कातऱ्या जागाईत ।
खळी घोंटाळें तागाईत ।
नाना सुरंगमिश्रित ।
जाणोनि घ्यावें ॥
नाना देसीचे बरू बोरू आणावे ।
घटि बारिक सरळे घ्यावे ।
नाना रंगाचे आणावे ।
नाना जिनसी ॥
नान जिनसी टांकतोडणी ।
नाना प्रकारे रेखाटणी ।
चित्रविचित्र करणी ।
सिसेंलोळ्या हिंगूळ संग्रहीं असावे ।
वाळले आळिते पाहोन घ्यावे ।
सोंपें भिजउनी वाळवावे ।
संग्रह मसीचे ॥
तगटी इतिश्रया कराव्या ।
बंदरी फळ्या घोटाव्या ।
नाना चित्रीं चिताराव्या।
उंच चित्रें ॥
नाना गोप नाना बासनें ।
मेणकापडें सिंदुरवर्णे ।
पेट्या कुलुपे जपणें ।
पुस्तका कारणे ॥

कलमदान : सौजन्य ‘THE WORD IS SACRED,SACRED IS THE WORD’ The Indian Manuscript Tradition – B. N. Goswamy
हस्तलिखित पोथी बनवण्यासाठी तेव्हा प्रचलित असलेली प्रक्रिया आणि लागणारे साहित्य याबद्दलचे हे काव्यात्म वर्णन आहे. आधी कागद तुरटीच्या पाण्यात बुडविले जात, याला खळणे म्हटले जायचे. तुरटीला खळी असेही म्हणतात. या खळण्यामुळे कागद लवकर भिजत नाही व बऱ्यापैकी अग्निरोधकही होतो. यासोबत ‘घोटाळी’ असाही शब्द येतो. तुरटीच्या पाण्यात खळलेल्या कागदावर कवड्यांनी, काचेच्या मोठ्या गोट्यानी किंवा अकिक (ॲगेट) या दगडाने घोटाई केली जाते. अशा कवडीला घोटाळी किंवा घोटा, घोटकवडा असे शब्द आहेत. यामुळे कागद गुळगुळीत होतो.

घोटाळी : सौजन्य ‘Calligraphy and Art of Writing’ in Jain Manuscripts – Shridhar Andhare
पुढच्या ओळीत ‘जागाइत’ असा शब्द येतो. याचा अर्थ कागदावर रेघा आखण्यासाठी उपयोगी पडते, अशी फळी. यासाठी समासफळी असाही शब्द होता
याशिवायचे आणखी महत्त्वाचे साहित्य म्हणजे बोरू. बोरू म्हणजे टाक, म्हणजेच लेखणी. बोरू हा पोकळ बांबूपासून बनवला जायचा. ही अशा बांबूची एक विशिष्ट प्रकारची जात असते. सहसा नदीकिनारी हे बांबूचे ताट सापडत असे. याचे साधारण सहा-सात इंची तुकडे केले जात. हे तिरपे तोडले जात, मग ते सोलून त्याला पातळ टोक केले जात असे. बोरूचे हे टोक वेगवेगळी रुंदी आणि कोन ठेवून तोडले जात असे. यालाच ‘टाकतोडणी’ म्हटलं जात असे… अशा वेगवेगळ्या तोडण्यांमुळे निरनिराळ्या धाटणीची अक्षरे मिळत आणि प्रत्येक सुलेखनकाराचे निराळे वैशिष्ट्य आकारास येई. म्हणजेच समर्थांच्या भाषेत, ‘नानाप्रकारे रेखाटणी’ शक्य होत असे. यासोबत समर्थांनी ‘सिसेळोळ्या’सुद्धा संग्रही ठेवायला सांगितल्या आहेत. अक्षरांच्या एकसारख्या ओळी आखून घेण्यासाठी या सिसेलोळ्या वापरल्या जात. सिसेलोळ्या म्हणजे शिसाच्या लांबट गोळ्या.
त्या काळी लिखाण हे प्रामुख्याने काळ्या रंगाच्या शाईनेच केले जायचे. काही ठिकाणी लाल रंगाचा वापर होत असे, जसे आद्याक्षरे, शीर्षक इ. या लाल रंगासाठी ‘हिंगूळ,’ ‘अळिता’ यांचा वापर होत असावा. शाईलाच ‘मषी’ असेही म्हटले जायचे. शाईने लिहिलेले पत्र म्हणजे मषीपत्र व शाई ठेवण्याचे पात्र म्हणजे मषीपात्र – म्हणजेच दौत. जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांनी मनुष्याला उपजीविकेसाठी असि, मसि, कृषि, शिल्प, वाणिज्य, विद्या ही सहा कर्मे करण्याचा उपदेश केला होता. यातील मसि म्हणजे, लेखनकार्य, हा शब्द शाई या अर्थावरूनच आला आहे.

मषीपात्र : सौजन्य ‘Calligraphy and Art of Writing’ in Jain Manuscripts – Shridhar Andhare
लेखनाची इतिश्री, म्हणजेच समाप्ती झाल्यावर सर्व पानांच्या वर-खाली लाकडी फळ्या लावल्या जात असत. या लावल्या, की ग्रंथ सिद्ध होतो. या काष्ठ आच्छादनांवर सुंदर चित्रे काढण्याची रीत होती. मराठा शैलीतील अनेक चांगल्या दर्जाची चित्रे ही या काष्ठ आच्छादनांवर काढली गेलेली सापडताता. यावर आधी लाल रंग देत, त्यावर काळ्या बाह्यरेषांनी आकृती काढत, मग यावर चित्रे – पांढऱ्या, पिवळ्या वा हिरव्या रंगांत काढली जात. यावर सहसा गणपती, रिद्धी, सिद्धी, कृष्ण, गोपी, गायी, वासरे अशी चित्रे काढली जात. ही चित्रे टिकून राहावीत म्हणून यावर रोगन लेपन केले जात असे. अशा पोथ्या बासनात – म्हणजे वस्त्र आच्छादनामध्ये व्यवस्थित बांधून ठेवली जात.

समासफळी : सौजन्य ‘Calligraphy and Art of Writing’ in Jain Manuscripts – Shridhar Andhare
लेखनासाठी त्याकाळी लागणाऱ्या ‘सामे’ म्हणजेच साहित्याचे, समर्थ रामदास स्वामींनी केलेले सुंदर काव्यात्म वर्णन हे अतिशय मोलाचे आहे.
एका संस्कृत काव्यामध्ये लेखनसामग्रीचे फार सुंदर वर्णन आले आहे. या काव्याची फार माहिती मिळत नाही. यामध्ये सर्व सामग्रीची ‘क’ पासून सुरू होणारी नावे देऊन सुरेख अनुप्रास साधला आहे.
कुंपी, कज्जल, केश, कम्बलमहो, मध्ये च शुभ्रं कुशं ॥
कांबी, कल्म, कृपाणिका, कतरणी, काष्ठं तथा कागलम् ॥
कीकी, कोटरी, कल्मदान, क्रमणे, कट्टि स्तथा कांकरो ॥
एतै रम्यककाक्षरैश्व सहितः शास्त्रं च नित्यं लिखेत ॥
कुंपी- दौत
कज्जल- शाई
कुशं- पांढरा लाकडाचा तुकडा
कांबी- मोजपट्टी
कल्म- लेखणी / बोरू
कृपाणिका- सुरी
कतरणी- कात्री
काष्ठं- लाकडाची पट्टी
कागलम्- कागद
कोटरी- लिखाण करण्याची जागा
कल्मदान- बोरू ठेवण्याची डबी
कांकरो- धार लावण्याचा दगड

काष्ठं आच्छादन : सौजन्य ‘Maharashtra-MARG PUBLICATION’
लेखन प्रक्रिया इतकी जटिल असूनही इतके विपुल लिखाण होत असे. त्या काळातील समृद्ध वस्तुसंस्कृतीचे अवशेष आपण नेहमी पाहतो. या लेखन सामग्रीतही तोच कलात्मक दर्जा पाहायला मिळतो. वाणीच्या वाङ्मयाचे ‘साहित्य’ होण्यासाठी हीच लेखनसामग्री कारणीभूत ठरते.
