संपादकीय : अमेरिका प्रवास — भाग १ :  उड्डाण

 

नुकत्याच केलेल्या अमेरिका प्रवासाच्या निमित्ताने … 
भारतातून अमेरिकेत केलेला प्रवास हे   नुसते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसते. त्याला अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आयाम असतात. याबाबतची निरीक्षणे क्रमशः …

अमेरिकेला जाण्यापूर्वी खूप पूर्वतयारी करावी लागते. विमान प्रवासाचे नियोजन हा त्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असतो. पुरेसे आधी नियोजनबद्ध बुकिंग केल्यास विमानाची तिकिटे स्वस्त मिळू शकतात. भारतातून अमेरिकेला जाण्यासाठीच्या प्रवासाचे तीन पर्याय उपलब्ध असतात : युरोपमार्गे एक थांबा घेऊन अमेरिकेत जायचे, विनाथांबा जायचे किंवा मध्यपूर्वेत थांबून जायचे. गेल्या काही वर्षांत भारतातून युरोप आणि अमेरिकेकडे होणाऱ्या प्रवासी वाहतूक व्यवसायात आखातातील विमान कंपन्यांनी खूप मोठा वाटा बळकावला आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्यांतील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे मध्यपूर्वेचे जागतिक नकाशावरील भौगोलिक स्थान. आशिया आणि अमेरिका यांना जोडणाऱ्या मार्गावर मध्यपूर्व साधारण मध्यवर्ती स्थानी येते. दुबई, दोहा आणि अबुधाबी ही मध्यपूर्वेतील शहरे आशिया आणि युरोप-अमेरिका यांच्या साधारणपणे मध्यावर येतात. मध्यपूर्वेत विमानसेवा देणाऱ्या विमान कंपन्यांमध्ये सध्या कतार एअरवेज, इमिरेट्स आणि एतिहाद या तीन महत्त्वाच्या कंपन्या आहेत. तिन्ही कंपन्यांची मालकी त्या त्या ठिकाणच्या शासनाची आहे. या सर्व स्थानिक शासनकर्त्यांनी विमान व्यवसाय करायचे ठरवले त्या वेळी त्यांच्याकडे जागेची कसलीही कमतरता नव्हती. या सर्व अमिराती तेलाचा पैसा मिळाल्याने भरपूर श्रीमंत आहेत. त्यामुळे विमान व्यवसाय सुरू करताना सर्व गोष्टी अतिशय नियोजनबद्धरित्या केल्या गेल्या. सर्वत्र भव्य विमानतळ व विमानसेवेशी संलग्न अशा सर्व सुविधांच्या उभारणीकरता अत्यंत तपशीलवार नियोजन केले गेले. शासनच मालक असल्यामुळे विमानतळ बांधणी व इतर सर्व शासकीय परवानग्या अर्थातच पटापट मिळत गेल्या.

   या विमान कंपन्यांनी आपल्या कामकाजासाठी ‘हब अँड स्पोक’ हे एक नावीन्यपूर्ण प्रारूप राबविले; म्हणजे विविध देशांमधून अमेरिकेला किंवा युरोपात जाण्यास इच्छुक असणारे प्रवासी एका ठिकाणी गोळा करायचे आणि तिथून जास्त क्षमतेची प्रवासी विमाने गंतव्यस्थानानुसार सोडायची. सर्व विमान कंपन्या नवीन असल्याने त्यांनी अत्याधुनिक विमाने घेतली. ही नवीन विमाने तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अत्यंत ऐसपैस व इंधन वाचवणारी होती. या सर्व गोष्टींमुळे युरोप आणि अमेरिकेतील पारंपरिक विमान कंपन्यांशी या मध्यपूर्वेतील कंपन्यांनी जबरदस्त स्पर्धा करून बाजारपेठ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वळविण्यात यश मिळवले; शिवाय या विमान कंपन्यांच्या मालक असलेल्या संबंधित सरकारांनी अनेक देशांशी उदार हवाई करार करून या कंपन्यांना जगभर मार्ग विस्तारण्याची मुभा मिळवून दिली. पारंपरिक युरोप-अमेरिकेतील विमान कंपन्या या मुख्यत्वे खासगी मालकीच्या असल्याने त्यांना अर्थातच असे हवाई करार सहजासहजी उपलब्ध नव्हते. नवीन कार्यक्षम व आरामदायी विमाने, उच्च दर्जाची सेवा व वाजवी दर यामुळे मध्यमवर्गीय प्रवाशांचा ओढा या आखाती विमान कंपन्यांकडे वेगाने वाढला.

   २०२६ च्या सुरुवातीस तीव्र झालेल्या इराण-अमेरिका-‘इस्रायल’  संघर्षाने या सर्व आखाती विमान कंपन्यांना जबर धक्का दिला. संघर्षाच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच या प्रदेशातील अकरा हजारांहून अधिक विमाने रद्द झाली, असे विमान वाहतूक विश्लेषण संस्था सीरिअमने नमूद केले. रद्द झालेल्या विमानांच्या या आकड्यावरून मध्यपूर्वेतील या सर्व विमान कंपन्या किती प्रमाणात व्यवसाय करत होत्या, त्याचा एक अंदाज येऊ शकतो.

   यापूर्वी मी दोनदा अमेरिकेचा प्रवास केला आहे. एकदा इमिरेट्सने व एकदा एतिहादने असे बुकिंग केले होते.  एतिहादमार्फत प्रवास केल्यास अबुधाबीलाच अमेरिकन इमिग्रेशन करता येते व अमेरिकेत पोहोचल्यानंतर तिथे द्यावा लागणारा बराच वेळ वाचतो हा  आणखी एक फायदा. ऑगस्टमध्ये अमेरिकेत जायचे आहे हे नक्की होते, त्यामुळे त्याच्या आधी तीन-चार महिने हा निर्णय घ्यायचा होता. इराण-युद्ध त्या वेळी भरात असल्याने मध्यपूर्वेतून जाण्याचा पर्याय निवडता येणार नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे युरोपमार्गे जायचे हे निश्चित केले व त्यासाठी कोणता पर्याय स्वस्त व योग्य आहे, त्याचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासासाठी ‘कयाक’ नावाचे संकेतस्थळ वापरले. त्यातून अमेरिकन एअरलाइन्सचे दर व सेवा योग्य आहेत असा निष्कर्ष निघाला. त्यानुसार बुकिंग करताना, हे बुकिंग जरी अमेरिकन एअरलाइन्सचे असले तरी प्रत्यक्षात ती सेवा ब्रिटिश एअरवेजमार्फत दिली जाणार आहे, असे निष्पन्न झाले. विमान कोणीही चालवो, आपल्याला काय फरक पडतो, असे म्हणत बुकिंग केले.

   त्यानंतर काही अपरिहार्य कारणांनी प्रवासाच्या तारखेत दोनदा बदल करावे लागले. हे बदल करताना या दोन एअरलाइन्समधील गोंधळामुळे मला त्रास झाला व प्रवासाच्या २४ तास आधी करता येणारे वेब चेक-इनही झाले नाही. त्यामुळे प्रवासाच्या ठरलेल्या वेळेच्या बऱ्याच आधी जाऊन विमानतळावर समक्ष चेक-इन करणे भाग होते. विमानतळावरील ब्रिटिश एअरवेजच्या स्वागत कक्षातील सहाय्यिकेने त्याप्रमाणे आमचे वेब चेक-इन आम्हांला करून दिले. मुंबई ते हीथ्रो हा पहिला टप्पा व हीथ्रो ते न्यू यॉर्क हा दुसरा टप्पा असा एकंदरीत प्रवास होणार होता.

   विमानप्रवासासाठी आपल्याला जो बोर्डिंग पास दिला जातो, त्यावर आपल्या तिकिटाच्या प्रकारानुसार आपला गट नमूद असतो

बोर्डिंगची उद्घोषणा झाल्यावर या गट क्रमांकानुसार प्रवाशांना क्रमशः विमानात सोडले जाते. परंतु भारतीय विमानतळांवर कारण नसताना प्रवासी बोर्डिंग गेटपाशी गर्दी करून थांबतात, असा अनुभव आहे. ही वेळही याला अपवाद नव्हती. विमानतळ प्रवेश ते प्रत्यक्ष बोर्डिंग यामधला वेळ कसा घालवायचा, हा सर्व विमानप्रवाशांसमोर एक मोठा प्रश्न असतो आणि हा वेळ घालवण्याचे व्यक्ती व प्रवृत्तीनुसार वेगवेगळे उपाय असतात. हल्ली बहुतांश लोक आपापल्या मोबाईलमध्ये डोके घालून असणे पसंत करतात. या वेळी एक थोडासा वेगळा प्रकार पाहायला मिळाला. एका आयटी कंपनीचा बराच मोठा गट आमच्याबरोबर प्रवास करणार होता. त्यांनी चक्क पत्त्यांचा डाव मांडला. त्यामुळे निदान विमानतळावरील काही डोकी तरी वर होती व आपापसांत बोलत होती, हे पाहून मला उगीचच बरे वाटले.

 विमानात दरवेळी उड्डाणापूर्वी एक सुरक्षा प्रात्यक्षिक दाखवले जाते. आपल्यापैकी बहुतेक सर्वांनी ते अनेक वेळा पाहिले असेल. पाण्यात तरंगण्यासाठी वापरायचे जॅकेट कुठे ठेवलेले असते, ते फुगवायचे कसे, ऑक्सिजन मास्क वरून खाली कसा पडतो, तो आधी स्वतः बांधायचा आणि मग इतरांची काळजी करायची वगैरे वगैरे माहिती विमान परिचारक हातवारे करत सांगतात. आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही हे माहीत असताना एकच गोष्ट यांत्रिकपणे हजारो वेळा करणे म्हणजे एक तपश्चर्याच आहे.

   ब्रिटिश एअरवेजने या तोचतोपणावर काढलेला एक नामी उपाय या वेळी पाहायला मिळाला. विमान प्रवासात आपल्या आसनासमोर करमणुकीसाठी एक पडदा असतो. त्यावर चित्रपट किंवा अन्य करमणुकीचे कार्यक्रम पाहत प्रवास पार पाडावा, अशी विमान कंपनीची अपेक्षा असते. त्यांनी चक्क या सुरक्षासूचना देण्यासाठी एक छोटी चित्रफीत तयार केली आहे व ती चित्रफीत या पडद्यावर दाखविली जाते. जुलै २०२४ मध्ये ‘Plane Eyre’ या नावाने ही चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.

सुरुवातीला “May We Haveth One’s Attention? A British Period Original Drama” (nicknamed  “Plane Eyre”) अशा शीर्षकाने ही फिल्म सुरू होते. १८ व्या शतकातील इंग्लंडमधील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्या काळातील राजे-रजवाडे व त्यांचे नोकरचाकर यांचा सर्व उमरावी डामडौल एकीकडे दिसतो, तर या ऐतिहासिक पात्रांसोबत ब्रिटिश एअरवेजसाठी वेगवेगळी कामे करणारे कर्मचारी त्यात येऊन सुरक्षा सूचना देतात. याचे दिग्दर्शन शेरॉन मॅग्वायर यांनी केले आहे. त्या ‘Bridget Jones’s Diary’ या गाजलेल्या चित्रपटासाठी सुपरिचित आहेत. ही चित्रफीत हर्टफर्डशायरमधील Hatfield House व बर्कशायरमधील Englefield House Estate या जुन्या भव्य ब्रिटिश गढ्यांमध्ये चित्रित केली गेली आहे.

कथानकात जुन्या काळातील जमीनदार, स्त्री-पुरुष तसेच घरकाम करणारे नोकर आपापली रोजची कामे करत त्या काळातले दैनंदिन जीवन जगताना दाखवले आहेत आणि त्यांना सध्याच्या काळातील ब्रिटिश एअरवेजचे कर्मचारी येऊन सुरक्षा सूचना देत आहेत  अशी चित्रफितीची अतिशय कल्पक रचना आहे. या चित्रफितीचे नाव हे ‘Jane Eyre’ या १८४७ साली लिहिल्या गेलेल्या अभिजात कादंबरीच्या नावाचा श्लेष आहे. एकंदरीत, अत्यंत कल्पक पद्धतीने थोडासा कंटाळवाणा विषय मांडल्यास तो लोकांपर्यंत पोहोचतो, असे सांगण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे.

या गढ्यांमधील अप्रतिम वास्तुकला आणि निसर्गसौंदर्य यांचे दर्शन या चित्रफितीतून झाल्याने विमान प्रवासाची सुरुवात सुखद झाली. दोन्ही वेळचे विमान चालक अर्थातच ब्रिटिश होते. नेहमीप्रमाणे त्यांनी आम्हाला विमान भ्रमणाबद्दलचा तांत्रिक तपशील सांगितला. मला त्यातले अवाक्षर कळले नाही. त्यावरून हे विमानचालक स्कॉटिश असावेत, असा एक कयास आहे!

ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रफीत पाहायची असल्यास खालील दुवा पहावा: https://www.youtube.com/watch?v=ssVe0FaBhUU

Author

One thought on “संपादकीय : अमेरिका प्रवास — भाग १ :  उड्डाण

Leave a Reply