पानगळ ………………

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा मेंदू अफाट आहे. माणसाचे क्षणोक्षणी बदलणारे विचार, त्याच्या वाढत जाणाऱ्या अपेक्षा किती वेगाने वाढतील  याचा विधात्यालासुद्धा पत्ता लागणार नाही. 

जीवन नेमके कशासाठी जगायचे ?

 जगताना आपण नेमकी दिनचर्या कशी ठरवायची ? 

आपण स्वतःला नेहमी उत्साहित, आनंदी कसे ठेवायचे?

याचा विचार मला रोज सकाळी उठल्यापासून पडतो; कारण सतत आनंदी राहण्यासारखे  व उत्सव साजरे करण्यासारखे दिवसभरात काहीतरी घडले पाहिजे ना! 

रोजचा दिनक्रम कंटाळवाणा नसावा याची मी नेहमीच दक्षता घेतो.

      आपण सामान्य माणसे रोज नवनवी स्वप्ने पाहत असतो.  त्या स्वप्नांना प्रत्यक्ष आकार देण्यासाठी अहोरात्र झटत असतो. कष्ट करत, सतत अवघड यातना झेलत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना प्रत्येक वेळी फार झुंजावे लागते तरच यशप्राप्ती होते.

         माझे  बालपण पाचगणीमध्ये गेले. पाचगणीत ब्रिटिशांनी निवासी शाळा बांधल्या. त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्लडहून नामवंत शिक्षक आणले. या शिक्षणतज्ज्ञांना  व श्रीमंत उद्योगपतींना राहण्यासाठी अलिशान बंगले बांधले. सुदैवाने पूर्वी या सर्व बंगल्यांमध्ये मला जाण्याचा योग आला होता. त्या वेळी तेथे राहणाऱ्या  स्थानिक माळ्यांची मुले शाळेत शिकायला असायची. आमच्या घरासमोर एसटी स्टॅंड होता व त्यापाठीमागे ‘दि  आर्क पॅलेस’ नावाचा नबाब बिजलीखान यांचा बंगला होता. मी व माझा मित्र घनश्याम रोज संध्याकाळी अभ्यास करायला जायचो. नबाबसाहेब मोठे प्रेमळ गृहस्थ होते. ते आमच्यासारख्या गरीब मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचे. कधी खडीसाखर, शिरा, वाटीभर दूध सर्व मुलांना देत असत. त्यांच्या बंगल्यामध्ये कलाकुसर केलेले आलिशान सागवानी सोफासेट, डेकोरेटीव्ह खुर्च्या, सागवानी ॲंटीक शिसम लाकडाचे पलंग, उंची कपाटे होती. त्यांच्या पूर्वजांची भव्य आकारातील तैलरंगातील चित्रे भिंतींना शोभा आणत असत. त्या घरात एक भव्यतेचा अहसास देणारी नीरव शांतता असे. पिवळसर रंगाचे बल्ब व आलिशान झुंबरे त्या ऐश्वर्याला शोभा देणारे होते. त्याच्या विरुद्ध वातावरण माझ्या घरी होते. पुढे दुकान असायचे – तेथे नेहमी गिऱ्हाइकांची गर्दी असायची. आतमध्ये कामगार व त्यांची कामाची गडबड,  घरात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भरपूर माणसे असत. सेपरेट बेडरूम, हॉल, अभ्यासाची खोली अशी रचना किंवा भानगडच माहिती नव्हती. सगळीकडे सतत हलकल्लोळ, आवाज व बडबड सुरू असायची. नीरव शांतता कोणालाही माहीतच नव्हती.

        ब्रिटिशांनी जाताना हे एकरात पसरलेले बंगले पारशी, इराणी, गुजराथी, बोहरी, मुस्लीम, ख्रिश्चन  श्रीमंत व्यक्तींना विकले.  आता त्या ठिकाणी हॉटेल्स, सॅनिटोरियम्स, शाळा आहेत. भव्य इमारत, उतरत्या छपरांची बांधणी, सभोवताली असंख्य झाडे, फुलांचा बागबगीचा, गुलाब व स्थानिक फुलांची सजावट केलेल्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या सर्व बंगल्यांत आजही आहेत. 

विरजी फॅमिलीचा ‘मेडस्टोन’  

अदाजानिया फॅमिलीचा ‘मेहेरबाय हाऊस’ 

बेबी पॉईंट शेजारी फर्नांडीस यांचे ‘एनफिल्ड’ 

पोलीस स्टेशन ग्राऊंडच्या मागचा सोहराब मोदींचा बंगला, 

टाटांच्या मालकीचा ‘टाटा टेक्सटाईल’ 

जिमी पंथकीचा ‘डलवीच हाऊस ‘ 

डॉ.मर्चंट यांची ‘चिस्तिया मंजील’ असे अनेक जुने बंगले मी पाहिलेले आहेत. बिलिमोरिया स्कूल, इल पलाझो हॉटेल, प्रोस्पेक्ट हॉटेल, न्यू इरा स्कूल अशा ठिकाणच्या बागा मला आजही आवडतात. सिल्व्हर वृक्षांची उंचच उंच झाडे व त्या बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर मनाला फार मोहवून टाकत असे. मग गेली पन्नास वर्षं या परिसरात राहिल्यामुळे आपलाही एखादा असा बंगला असावा अशी स्वप्ने मला पडू लागली .

         एखाद्या उद्योगपतीला, व्यापाऱ्याला, कारखानदाराला बंगल्याचे स्वप्न पूर्ण करायला अवघड नसते; कारण त्यांना आर्थिक पाठबळ व कुटुंबाची साथ असते, त्यासाठी मोठी आर्थिक गणिते असतात, ती सोडवायला मित्रमंडळी असतात; पण मी पडलो चित्रकलेच्या प्रेमात. चित्रकारांना  नियमित उत्पन्न नाही. कलाप्रेमींची साथ नाही. साताऱ्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रदर्शनासाठी एकही आर्ट गॅलरी नाही.  अशा प्रतिकूल परिस्थितीत बंगला बांधण्याचे मुंगेरीलालचे हसीन स्वप्न होते; पण स्वाती व मी हार मानली नाही. आपले स्वप्न पाचगणीत पूर्ण होणे शक्य नाही हे आमच्या खूप उशिरा लक्षात आले. मग वाईजवळ कमी बजेटमध्ये  मेणवली गावाबाहेर रस्त्यालगत आम्ही जागा घेतली व ‘निसर्ग’ बंगल्याचे स्वप्न दहा वर्षांपूर्वी पूर्ण केले.

        बंगला बांधण्याचे स्वप्न धडपड करून पूर्ण झाले; पण त्या स्वप्नांना आकार दिल्यानंतर टिकवून ठेवणेही महत्त्वाचे असते. अठरा हजार स्क्वेअर फूट  जागा, पाच हजार स्क्वेअर फुटांचे घर व बागबगीचा तयार केला. उत्साहाने आंबा, रामफळ, नारळ, चिकू, लिंबू, पाम, केळी, डाळिंबं, फणस,  सप्तपर्णी, तुती अशी अनेक प्रकारची झाडे लावली. झाडे लहान असताना त्यांना योग्य खतपाणी व  त्यांची निगा राखण्यासाठी मेहनत केल्याने झाडे भरपूर उंच झाली; पण आता त्यांची देखभाल करणे अवघड झाले आहे. जास्वंद, सदाफुली, झेंडू, सूर्यफुले यांच्या जवळपास ३०० कुंड्या! त्यांना नियमित पाणी देणे, खुरपणे, खते टाकणे अशी असंख्य कामे वाढली. त्यासाठी स्थानिक माळी किंवा एखादे छोटे कुटुंब  शोधायला सुरुवात केली पण यश मिळाले नाही. वाईला एम. आय. डी. सी. आहे. तेथे गरवारे, एचपी, मालाज जॅम, अथर्व फाउंडेशन यांसारख्या असंख्य कंपन्या आहेत. आजूबाजूच्या खेड्यांतील सर्व शेतकरी व तरुण मुले आता शेतीपेक्षा या कंपन्यामध्ये कामाला जातात. तेथे त्यांना चांगला रोजगार मिळतो. बायकानां नेण्या-आणण्यासाठी बसची सोय केली आहे. त्यामुळे शेतात बेणणी करण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा पंधरा-वीस हजार रुपये मिळत असल्याने सगळे अशा कंपनीत काम करण्याला प्राधान्य देत आहेत. मग तुमच्या घरकाम व माळीकामाला विचारतो कोण? शेवटी त्यांचे पगारांचे आकडे ऐकून आम्ही माघार घेतली. आम्ही दोघांनी कामे वाटून घेतली. आता खरी लढाई सुरू झाली.

      सकाळी उठलो, की बागेत फेरफटका मारतो आणि लगेच लक्षात येते, की आज काय काय कामे करायची आहेत. कधी पालापाचोळा पडलेला असतो, कधी झाडाची फांदी तुटलेली असते, कधी पाणी मारायचे, कधी झाडू मारायचा असतो. अशा वेळी लक्षात येते बंगल्याचे नुसते स्वप्न पाहणे हे सोपे काम आहे; पण बंगला व त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे, मेंटेनंस करणे हे कधीही न संपणारे काम आहे. पण कोणी मदतनीस नाही याची फार खंत वाटते. या मदतनीसाची वाट तरी किती दिवस पाहणार? अस्वच्छता तर पाहवत नाही;  मग आता स्वतःला ‘आत्मनिर्भर’ करणे गरजेचे ठरते. हातात झाडू घेऊन साफसफाई मेंटेनंसची कामे करावीच लागतात. कधी माळीकाम, इलेक्ट्रिक, प्लबिंग, शेतीची अनेक छोटीमोठी कामे करावीच लागतात. घरकामाला तर पर्यायच राहत नाही.

       माणसाला एकाच कामाचा लवकरच कंटाळा येतो. तसाच मलाही कंटाळा येतो. ब्रिटिशकालीन बंगला पाहण्याचे स्वप्न अंगाशी आल्याचे दुःखही होते; कारण मोकळ्या जागेत पालापाचोळा नेहमीच पडतो.

      एकदा सकाळीच लक्षात आले, की शेजारच्या कोणी शेतकऱ्याने उसाचे पाचट पेटवल्याने संपूर्ण परिसरात काळे भुसकट, तण सगळीकडे पसरलेले होते. वाऱ्याने उडून सगळीकडे पालापाचोळा काडीकचरा पडलेला होता. मोठी पानगळ झाली होती. मग लगेच झाडू घेऊन साफसफाईला सुरुवात केली आणि तीन चार तासांत पंचवीस-तीस बादल्या झाडांची पाने गोळा केली. सर्व परिसर स्वच्छ केला होता. बंगल्याच्या बाहेर मोठ्ठा सुक्या पानांचा ढीग तयार झाला होता. ती पानगळीची पाने पेटवली आणि मी काम संपवून आतमध्ये पाणी पिण्यासाठी गेलो.

         निसर्गाचा काय भरवसा नाही हे लवकरच माझ्या लक्षात आले. थोड्याच वेळात भयंकर मोठी वावटळ व वेगवान वाऱ्याचा झंझावात सुरू झाला. भरदुपारी एखादे सुनामीसारखे चक्रीवादळ सुरू झाले. जो परिसर तीन-चार तास खपून स्वच्छ केला होता तेथे पुन्हा मोठी पानगळ होत होती. पाने पावसासारखी टपाटप पडत होती. धुळीचा लोट चक्राकार फिरून फिरून या पानांना गरगर फिरवत आपटत होता. सगळीकडे हाहाकार सुरू होता. डोळ्यांना फक्त धुळीचे लोट दिसत होते. मी बाहेर येऊन तसाच स्तब्ध होऊन खुर्चीवर बसलो. माझी मती गुंग झाली होती. विचार करण्याची बुद्धी संपली होती. समोर पानांचा प्रचंड ढीग पडलेला दिसत होता. मी हतबल झालो होतो. डोक्याला हातच लावून बसलो कारण मी पूर्ण निराश झालो होतो.

सगळीकडे वाळलेली पिवळसर असंख्य पानेच पाने पडलेली होती. वाऱ्याचा झंझावात सुरूच होता. पाने पुन्हा पुन्हा पडतच होती जणू भयंकर प्रलयकाळ आताच संपलेला होता…

       अशा या भरदुपारच्या चक्रीवादळात मी सुन्न बसलेलो असतानाच अचानक चारपाच पाने माझ्या अंगावर पडली. त्यांतले एक आंब्यांचे पान होते. ते पान हातात येऊन चक्क माझ्याशी बोलूच लागले. मी तर एकदम आश्चर्यचकितच झालो. असे पान एकदम बोलू कसे शकते? नीट पाहतो तर खरेच सगळीच पाने केविलवाणी होऊन माझ्याशी बोलत होती… 

     “काय झाले मित्रा? एवढा काय निराश होऊन डोक्याला हात लावून बसला आहेस? अरे ही पानगळ होती. आता पानगळीचे दिवसच आहेत. निसर्गचक्र सतत सुरूच असते. नवी पालवी फुटणार असते, नवा चमत्कार घडणार असतो, नवी धुमारी फुटणार असते. कालचक्र सतत सुरू असते. काळ कोणासाठी थांबत नसतो… कारण पानगळ ही होणारच असते… 

      तू ज्या बंगल्याची वर्णने केलीस तेथे आता पुन्हा जा. गावच्या  रजिस्टर मालमत्ता ऑफीसमध्ये जरूर जा. तेथे असणारे सातबारा पहा. या सातबाऱ्यात तुला आता बदल दिसतील. ज्या मालकांना  तू ओळखत होतास ते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. तेथे नवे मालक आले आहेत. काही जणांनी त्यांच्या मालकीचे  बंगले विकले; तर काही जणांची नावे वारसा हक्काने आली.  नवी पिढी आली. काळाचा महिमा अपरंपार आहे. जुने जाणार – नवे येणार हे बदल सतत घडतच असतात. हे बदल  स्वीकारावेच   लागतात. काही जुनी झाडे तशीच आहेत; तर काही झाडे सरकारी माणसांनी,  काही झाडे नव्या बंगल्यांच्या मालकांनी तोडली. काही जुने बंगले तसेच आहेत; तर काही बंगल्यांना बुलडोझर लावून नव्या मालकांनी नवीन शाळा, फ्लॅट्स, हॉटेल्स बांधली आहेत. परिसर तोच असतो पण माणसे जिथे जिथे जातील तिथे तिथे नव्या गोष्टी करतील. सृष्टीचा हा नियमच आहे नव्याचा स्वीकार करत जुने पाठीमागे सोडून द्यावेच लागते.

कारण पानगळ ही होणारच असते… 

         त्या जीर्ण पानाने माझ्या डोळ्यांत पाहिले आणि विचारले, ‘किती वर्षं झाली ही झाडे लावून? दहा वर्षांपूर्वी छोट्या नर्सरीतून तू आम्हांला आणलेस, मोठ्या प्रेमाने जमिनीत लागण केलीस, खतपाणी टाकलेस, जमिनीवर विटांचे छोटे कुंपण केलेस, ऊनवाऱ्यात पडू नये म्हणून काठीचा आधार दिलास. बघता बघता आम्ही झाडमंडळींनी १० ते २० फुटांपर्यंत उंच भरारी मारली.

लहानपणी हरितद्रव्ये भरभरून मिळाली. हिरव्या रंगात नाहून निघालो. आता नीट बघ बरे!’ 

मी पान हातात घेतले. नीट पाहिले. पानाचा रंग पिवळा झाला होता. त्याच्या पर्णरेषा सुकल्या होत्या. मध्येच पूर्णपणे आरपार भोके पडलेली होती. शिरा उघड्या झाल्या होत्या. एकंदर पान म्हातारे झाले होते. त्याचा अवतार सुकल्यामुळे जीर्ण झाला होता. पान शांतपणे म्हणाले, ‘आता आकाशाशी गवसणी घालण्याचे दिवस गेले. आता या काळ्या मातीची ओढ लागली आहे. तू कसा  सगळी पाने गोळा करतोस, आम्हांला बाहेर मुखाग्नी देतोस… तेथे आमची राख होते. ही राख त्या काळ्या मातीत किंवा कृष्णेच्या पाण्यात वाहत जाते. तसेच तुमचे माणसाचेही जीवन! तुम्हीही म्हातारे होता, केस पांढरे होतात, शिरा आकसतात, चेहऱ्याचे तेज कमी होत जाते, हातपाय थरथरतात. कितीही श्रीमंत असा, कितीही पैसेवाले असा! कितीही हुशार डॉक्टर, कसलेही विज्ञान, कसलेही औषधोपचार तुमचा जीव वाचवू शकणार नाहीत. सौंदर्यांचा कितीही अभिमान असो, कितीही ज्ञानाचा गर्व असो, कितीही मोठ्या घरातला वारसदार असो  – निसर्गकालचक्र कोणालाच सोडत नाही. कधी सुनामीसारखे वादळ येईल, कधी कोरोनासारखी महामारी येईल, कधी गाडीचा, रेल्वेचा, विमानाचा अपघात होईल. कधी डॉक्टरांचे औषधोपचार चुकतील तर कधी स्वतःचेच दुर्लक्ष झाल्यामुळे कडेकपाऱ्यांतून किंवा साधे चालत असलात तरी किरकोळ अपघातात तुमची इच्छा असो वा नसो तुम्हांला हे जग सोडावेच लागेल. सृष्टीचा – कालचक्राचा – नियम कधीच कोणाला चुकत नाही.

तुझ्या मुलीची, वडिलांची, आजोबांची, पणजोबांची, खापरपणजोबांची पानगळ झालीच ना?

एक दिवस तुझीही पानगळ होणार आहे. 

तुझ्या मित्र-मैत्रिणींची त्यांच्या कुटुंबांच्या सदस्यांची पानगळ होणार आहे व सर्वांचीच पानगळ होणारच आहे.

चल, ऊठ आता, लाग कामाला. 

         आता मला पानगळीचा त्रास होत नाही, मला पानाने त्याची पूर्ण हकीकत ऐकवली आहे. त्याचा सारांश एवढाच कळला, की तुम्ही कोणीही महान व्यक्ती असा किंवा साधी माणसे असा, कोणत्याही धर्माचे असा, छोटे कर्म करणारे असा वा महान कर्म करणारे असा आपला सर्वांचा प्रवास या पानांसारखाच आहे. अलगद झाडापासून निघायचे दूरच्या प्रवासाला. कितीही अडचणी येओत निराश व्हायचे नाही. आनंदाने मजेत प्रवास करत राहायचे. माझी पानगळ होणार आहे, तुमची पानगळ होणार आहे, आपल्या सर्वांचीच कधी ना कधी पानगळ होणार आहे.

पानगळ ही होणारच असते… 

पानगळ ही होणारच असते… 

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃   

 

Author

One thought on “पानगळ ………………”

Leave a Reply