अग्रलेखांचा अस्त
नुकताच पुण्यातील एका ख्यातनाम दैनिकाने अग्रलेख थांबवण्याची रीतसर घोषणा केली. पूर्वी एखादे वृत्तपत्र वाचले जायचे ते त्यातील अग्रलेखासाठी. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून अग्रलेख आणि ते नियतकालिक घेणारे संपादक यांचे एक अद्वैत होते. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रे चालवली जायची ती आपले विचार आपली धोरणे लोकांपर्यंत पोहोचवायची या हेतूने. ती वृत्तपत्रे व मुखपत्रे अशी दोन्ही होती. ते दिवस ते अग्रलेख थांबवण्याचे दिवस यांत असे काय घडले आहे? या निर्णयाकडे आपण कसे पाहायचे? हा केवळ तांत्रिक बदल नसून, तो मराठी वृत्तपत्रसृष्टीतील एका धगधगत्या युगाचा अंत आहे. ज्या काळात वृत्तपत्र हे ‘बातम्यांचे कागद’ नसून ‘विचारांचे शस्त्र’ होते, त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका अशा वळणावर आला आहे, जिथे शब्दांपेक्षा संख्याबळाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘अग्रलेख’ हा कधीकाळी वृत्तपत्राचा ‘आत्मा’ आणि समाजाचा ‘दिशादर्शक’ मानला जायचा. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, टिळक आणि आगरकर यांच्या दृष्टीने वृत्तपत्र हे समाजपरिवर्तनाचे साधन होते. अग्रलेख म्हणजे संपादकाचे रक्ताचे पाणी करून उतरवलेले विचार असायचे. एका अग्रलेखावर सरकारे पडायची किंवा जनआंदोलने उभी राहायची. आज मात्र, वृत्तपत्रे ही ‘कॉर्पोरेट’ संस्था झाली आहेत. जाहिरातींचे गणित आणि वाचकसंख्येचा (Circulation) दबाव यामुळे संपादकीय स्वातंत्र्याची जागा व्यवस्थापकीय धोरणांनी घेतली आहे. जेव्हा नफा-तोटा हाच मुख्य निकष ठरतो, तेव्हा व्यवस्थेला अस्वस्थ करणारा अग्रलेख हा ‘जोखीम’ वाटू लागतो.
एके काळी सकाळी वृत्तपत्र आले, की लोक प्रथम संपादकीय पानाकडे वळायचे. आज घरातील वृत्तपत्र हातात येण्यापूर्वीच मोबाइलवर शेकडो ‘ओपिनियन्स’ आणि ‘ट्रेड्स’ आदळलेले असतात. सोशल मीडियावरील १०-२० सेकंदांचे व्हिडिओ आणि व्हॉट्सॲपवरील फॉरवर्ड्सनी वाचकाची एकाग्रता मारून टाकली आहे. १००० शब्दांचा व्यासंगपूर्ण अग्रलेख वाचण्यासाठी लागणारा संयम आजच्या ‘क्लिक-बेट’ संस्कृतीत दुर्मीळ झाला आहे. अग्रलेख हा केवळ लेख नसतो, तर तो संपादकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. आज ‘संपादक’ ही संस्थाच कमकुवत होत चालली आहे. अनेक ठिकाणी संपादक हे केवळ तंत्रज्ञ किंवा व्यवस्थापक झाले आहेत. ज्यांच्या लेखणीत समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे, असे संपादक अभावानेच उरले आहेत. त्यामुळे नावापुरता स्तंभ लिहिण्यापेक्षा तो बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा कदाचित पराभवाचा स्वीकार असला, तरी तो प्रामाणिक आहे.
आज आपण ज्या ‘आधुनिकोत्तर’ (Post-modern) जगात वावरत आहोत, तिथे केवळ पत्रकारिताच नाही, तर ‘सत्य’ ही संकल्पनाच धूसर झाली आहे. आजच्या ‘पोस्ट-ट्रुथ’ युगात माहितीचा महापूर आहे, पण सत्याचा दुष्काळ आहे. प्रत्येक गटाचे, प्रत्येक विचारधारेचे स्वतःचे एक ‘सत्य’ आहे. अशा वेळी संपादकाने ‘नेमके सत्य’ कोणते हे ओळखावे कसे? जेव्हा वस्तुस्थितीपेक्षा भावनांना आणि वैयक्तिक समजांना अधिक महत्त्व येते, तेव्हा एका तटस्थ आणि वैचारिक अग्रलेखाची धार बोथट होणे स्वाभाविक आहे.एके काळी अग्रलेख सत्तेला प्रश्न विचारत असे, आता अनेकदा तो केवळ सोपस्कार उरला आहे. आधुनिकोत्तर काळात वाचक इतका विभागला गेला आहे, की त्याला प्रबोधनापेक्षा स्वतःच्या पूर्वग्रहांची पुष्टी हवी असते. जर एखादा मोठा वृत्तपत्र-समूह अग्रलेख बंद करण्याचा निर्णय घेत असेल, तर त्यामागे कदाचित हीच खंत असावी, की “ज्या समाजात सत्याची व्याख्याच बदलली आहे, तिथे शब्दांचे वजन कोणाला पडले आहे? केवळ नावापुरते रकाने भरण्यापेक्षा ते बंद केलेलेच बरे. आज माहितीचे इतके स्रोत (सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्स इ.) उपलब्ध आहेत, की संपादकीय विचार त्या गदारोळात हरवून जातो. काय लिहावे आणि कोणासाठी लिहावे, हा प्रश्न जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो केवळ एका संपादकाचा नसून संपूर्ण सुजाण समाजाचा पराभव असतो. आज तर शब्दांची जागा ‘डेटा’ आणि ‘अल्गोरिदम’ने घेतली आहे. त्यामुळे, जर अग्रलेखातून समाजमन ढवळून निघणार नसेल, तर अशा काळात अग्रलेखांचा निरोप घेणे हे ‘धाडसी’ पाऊल कमी आणि एका बदललेल्या वास्तवाचा ‘प्रांजळ स्वीकार’ अधिक वाटतो.
अग्रलेखांचा अस्त हा लोकशाहीतील एका महत्त्वाच्या स्तंभाचा संकोच आहे. ही पत्रकारितेने परिस्थितीपुढे टेकलेले गुडघे आहेत. ज्या समाजात विचारवंतांपेक्षा इन्फ्लुएन्सर्सना अधिक महत्त्व मिळते, तिथे अग्रलेखांची जागा रील्सनी घेणे हे अटळ आहे. मात्र, ही पोकळी भविष्यात समाजाच्या वैचारिक दारिद्र्याला निमंत्रण देणारी ठरेल, यात शंका नाही.
