कविता : जून २०२६ 

काय विचित्र योगायोग आहे पहा, मासिकासाठी म्हणून  आठ दिवसाच्या कालावधीत तीन कविता प्राप्त झाल्या;  दोन  मराठी  ,एक इंग्रजी.  या तीन कवितांमध्ये एक दुवा होता, कर्करोगाचा! 

 कर्करोगाचे निदान झाल्यानंतर काय काय होते.  रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व एकंदरीतच रुग्णाची परिसंस्था कशी ढवळून निघते त्याचे अनुभव सांगणारे या तीन कविता आहेत. 

 हल्ली वेगवेगळ्या कारणाने माणसाचे आयुर्मान वाढते आहे. हे वाढते आयुष्य म्हणजे एक ओझे आहे असे वाटावे अशीही परिस्थिती काही वेळा निर्माण होते आहे. कर्करोगासारख्या आजारांचे निदानही वाढते आहे. निदान स्वीकारणे, उपचारांसाठी तयार होणे, उपचारांच्या  मर्यादा समजून घेणे आणि शेवटी जीवन म्हणजे काय याचा विचार करणे या सर्व कर्करोग निदान झाल्यानंतरच्या काही मानसिक अवस्था आहेत.

 या संदर्भात  वैद्यकीय व्यवस्था नक्की आपल्यासाठी काय करतात किंवा त्यांनी काय करायला पाहिजे या संदर्भातले शेकडो  प्रश्न आपल्याला वेढून उभे आहेत. शिवाय समाज म्हणून आपण या सगळ्याकडे कसे पाहिले पाहिजे हाही एक विचार करण्याचा मुद्दा आहे. या तिन्ही कविता आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लावतील एवढे नक्की. 

-संपादक 

नाहीतर सांगा हे संपणार कसे?

  कॅन्सरला कॅन्सर          

अहो, म्हणे आम्हांला, 

म्हणे आम्हांला,

  म्हणजे साक्षात कॅन्सरला कॅन्सर झाला

आम्हांला अगदी आतून, गदगदून 

(हसू, रडू) काहीतरी आले, कळले नाही 

स्वप्नात स्वप्न पडल्याचे ऐकले होते 

ते जुने, रामदासांपासूनचे 

तेच ते, आपलेच, रामदास दासबोधवाले 

आत्माराम पण लिहिणारे, तेच ते 

कदाचित पहिलेच  ‘स्वप्नात स्वप्न’ कल्पनावाले 

पण आता आम्हांला कॅन्सर ! दोन ऋणांतून एक धन?

विधायक सैन्य गुंडांचे? की विनाशक सैन्य साधूंचे?

“पण आता होणारच की काहीतरी ” एक ‘मित्र’ उद्गारले 

कदाचित   सहानुभूतीने, हे तसे आमच्या एवढेच वयाने,

सहानुभूती खरी,  पण ती कोणाला?

म्हणे, “नाहीतर हे संपणार कसे? ”, 

तर्क करकरीत हो यांचा 

म्हणे, श्रीकृष्णांनासुद्धा बाण लागावा लागला त्यांच्या (हरीणमुखी) पावलाला   

म्हणे, नाहीतर सांगा ना हे संपणार कसे?

म्हटले, खरंय, ती अडचण आहे खरी 

पण बाण विषारी होता का हो ?

अरे, निमित्य म्हणून बाण, विषारीपणाची चर्चा गौण 

आणि शिवाय, अरे, ते आपल्या सारखे  कॅन्सर  नव्हतेच नव्हते 

आम्ही साक्षात कॅन्सर, लक्षात घ्या,

आपोआप मिळविणारे, खरे फुकटे 

अगदी तसेच, आता आपलेच  शरीर, आपल्याच पेशी, 

अस्साच असे  कॅन्सर आपला!

तसे बघता आम्ही म्हातारे,

म्हातारे  खरे,  पण या युगातले, 

आम्ही मरत नाही, मरतच नाही,

हवेतर विचारा घरच्यांना 

आम्ही आपले जगतच राहतो, जाम मरत नाही

म्हणजेच आम्ही कॅन्सर!!  

कळले? कॉमन गुण सांगतोय 

आता सांगा, आम्हीच जर कॅन्सर तर कॅन्सर ची भीती कोणाला?

‘सध्या फक्त एकच  गोळी जास्त घ्या, घाबरू नका’

डॉक्टर सवयीने धीर देत म्हणाले, ‘रोज रुपये पन्नास साठची फार तर भर’

‘ते ठीक हो,’ आमच्यातून शब्द निसटले, 

नकळतच तसे, (काय ठीक कोणास ठाऊक!)

पण त्या विधानाच्या रक्षणार्थ मग आमचे

अगदीपौरुषत्वजाऊ द्या

पण निदान उरले  सुरले नरत्व जणू  आव्हानीत झाले 

शेवटी आम्ही पेंशनरतर खरेच ना?

तेच आमचे ढळढळीत कॅन्सरत्व नव्हे का

सतीच्या मळवटासारखे

“आपण काय करू,———”

 डॉक्टर आम्हांला कटात सामील करून घेत म्हणाले,

“आपण काय करू,———-” 

म्हटले, ते राहू द्या तुमच्याच खिशात,

 “काय पण करा, ”  शरीर तुमच्या ताब्यात

“पण मेडिक्लेम आहे ना?”  ते काळजीग्रस्तपणे म्हणाले,

“आहे ना, आहे!” आमच्यातला कॅन्सरच पटकन  उद्गारला,

  “डोन्ट वरी, शिवाय चिरंजीवांचा विमाही म्हणे inclussive आहे म्हणे पेरेंट्स ना !”

“ठीक, ठीक, आहे ना विमा, मग सर्व ठीक! तेवढेच फक्त महत्त्वाचे” 

काळजी मिटून डॉक्टर उद्गारले.  

“एवढीच ट्रिटमेंट डॉक्टर?” आम्ही येडपट आशेने उद्गारलो,

“छे:,छे:, ही तर सुरुवात हो नुसती,” डॉक्टर जरा अनवधानाने पट्कन  उत्तरले,

मग म्हणाले सावरून घेत, “या रोगाचे काय आहे, वेळ खूप हो हातात आपल्या,

पाहू कालांतराने कसे कसे होते ते, 

तोवर सध्या ही गोळी घ्या म्हणजे झाले”

मग ते गेले.

मग एकदम कोलाहल झाला, 

म्हणजे बिन आवाजीच आपला,

  तो झाला आमच्या गुप्त जागी,

  तसा म्हणजे मनातच आमच्या 

पण डॉक्टर लोकांना माहिती नसते ना, की असा काही अवयव आहे पेशंटला 

 म्हणून म्हणतो गुप्त, दुसरे काय?

ब्लड प्रेशर पहिले बोलते झाले, 

म्हणे, कॅन्सर बिन्सर ठीक आहे

पण मला पाहताय ना? मी पहिला रहिवासी आहे इथला,

आणि माझ्या गोळ्या आहेत किती, फक्त तीन, दोन वेळा तीन 

म्हणजे तशा फार नाहीतच, 

आणि त्याही जेनेरिक, मोदींच्या चालतात,

काय असतील दोनशे तीनशेच्या (गरीब बिचाऱ्या)

नाहीतर, होतील फार तर  रुपये पाचशेभरच्या एवढेच 

पेन्शन बक्कळ आहे ना तुला?

“हो का? पण आम्हीसुद्धा आहोत म्हटले रहिवासी जुने इथले”

मधुरता अगदीच सोडून मधुमेह सवतीच्या आवेशात म्हणाला,

(सगळी साखर जाते कुठे कोणास ठाऊक, यांचे आपले तोंड वाकडेच )

म्हणे, “आमची पण नवनवीन औषधे आहेत महाग महाग,

नाही म्हटले, जाल विसरून म्हणून सांगितले, 

आमचा हविर्भाग काढून ठेवा, वेळीच सांगतोय!”

“आमचाही संसार वाढतोय म्हटलं,” 

चिरका, किरकिऱ्या बिजागरीसारखा आवाज आला,

म्हणजे आता आमच्या संधिवाताचीही पेटली वात,

म्हणे,“रोजरोज नवे सांधे शोधायचे म्हणजे सोपे आहे का काम?

आणि आता हिंसाही फार हो, खुशाल टाका म्हणतात काढून, 

बदलून घ्या सांधे, जुने द्या नवे घ्या, चार दोन लाखांत काम!

पण लक्षात ठेवा, हा आहे  अन्याय, त्याविरुद्ध लढा उभारू,

अ‍ॅस्प्रो  /पेनकिलर ठीक, पण लढाई समकक्ष ठेवा,

आमचा  दोन-पाचशेचा रोजखर्च धरून चाला, 

नाहीतर संधी होणार नाही, फक्त वात होईल, दुःख वेदना वाढत राहतील,

सांधे तुमचे दुखतच राहतील,

तहहयात युद्ध, युद्ध, युद्ध !

“अरे यार, ते चालूच आहे ना पूर्वापार,” आम्ही म्हणणार होतो 

पण प्रत्यक्षात म्हणालो नाही, 

शब्दाने शब्द वाढतो फार आणि शिवाय उगाच 

शिवाय करकरण्यात त्याच्या, संधिवात ऐकणार होता थोडाच?

“खरेतर, मीच चालवितो चरितार्थ यांचा,” आमच्याच आतून आणखी आला आवाज, 

जरा जास्तच धीर गंभीर 

आम्ही गडबडीने तोंडावर  ठेवला हात,

आम्हांला बोलायचे नव्हते ना?

पण तरी कडवट हासण्याचा जाणवलाच आवाज 

“तोंड दाबून मला काय होणार? ओळखत नाहीस का मन की बात?

स्वतःचाच विसरलास होय श्वास?

अरे, मीच असे कर्ता  आणि करविता यांचा 

मीच केली तयार या दुखण्यांची  सेना

मीच चालवितो यांचा योगक्षेम, पण कोणी मानेल तर ना?

नादान, लफंगे, टोळीवाले, फितूर, चोरटे यांचे बांधले मुटकुळे मीच मुळात 

पण त्याची न किंमत त्या  कोणाला, मारून टाकू पाहतात  साले भक्ष्याला 

   सांगू मी पाहे यांना, की जरा सबुरीने घ्या, जगवत ठेवा आपल्या सावजाला    

पण मूर्ख आणि नादान हे ना मुळात, निर्बुद्ध साले

बळी पडतात हे क्षणिक  लोभांना  

पण फळ मिळाले बघा आज माझ्या धीरोदात्त धोरणाला ,  

श्रेयाची मी न केली कधी वासना 

करीत राहिलो मी माझे काम, काळजीने अन निष्कामपणाने 

पहा मिळाला नवा भिडू मजला सुंदर खेकडी रोगाच्या आकारात

तसा मी दयाळू मूळ स्वभावे 

आणि आता डॉक्टरही माझ्या साथीला 

जगा आणि जगू द्या असे अमुचा संयुक्त नारा 

अहिंसक वाटू द्या ध्येय आपुले 

मग ना त्याला विरोध कुणाचा 

म्हातारे कोतारे आणि शक्यतो पैसेवाले 

असेच निवडा, असेच मेळवा  

गलितगात्र आणि जे जे  परावलम्बी तेच असती पालक आपुले 

तेच खरे मित्रमंडळ आपुले 

रडत राहा, रडत राहा, जगत राहा जगत राहा 

असेच सांगा, वैद्यकाशी मैत्री करा,

  हॉस्पिटलरूपी लक्ष्मीमंदिरे उभारीत राहा   

उच्चरवे सांगा सर्वांना,

अशक्त व्हा, अशक्त व्हा,

चिरचिर, किरकिर करत राहा 

शाप जगण्याचा उपभोगत राहा,

पुरे म्हटले, पुरे जाहले हिशेब ऐकणे, काना मधले केस जळाले 

पटले पुनः, की विचार पहिला तोच खरा 

कॅन्सरमध्ये दिसू लागला खरा सखा 

पुरे म्हटले ओढणे खटारा

नाहीतर सांगा ना हे संपणार कसे 

हे संपणार कसे? 

रत्नाकर पटवर्धन 

Life is a Tree.

Not always as symmetrical and beautiful 

as the Tree of Life;

but robust, empathetic, altruistic,

giving,imparting, smiling despite imperfections,

and growing together

with those that end up in its shade

to make a wonderful forest.

Fellow trees, sharing root sap,

younger trees , learning it all. 

It is always about 

using the earthy 

and atmospheric resources well, 

and sharing them; 

growing and delighting in the 

flitting leaves,playful animals,

young sweet fruit, and occasional carpets of flowers

to impart fragrance and encouragement

in the path forward. 

The days of the woodcutter and chainsaws 

may appear to be over;

but an earth stuffed with impurities

has lately changed its sap,

which is now detrimental to the Tree. 

It is the Big C all over again

deadly Cholangial.                                                    

Medicines, sap-moving procedures,

a giving of immense support to the trunk and branches , 

getting feeble everyday. 

The once proud trunk, so supportive 

and playing with the  youngest plants, birds and squirrels,

unable now to stand on its own.

The offspring sibling trees quietly fan it. 

A long gaze across the tree top,

storing it all in a mind full of tremors,                 

80 years,  life of giving, well lived;

it is time to let go……

It is dark again. 

The last train has gone.

The dirge-whistle sounds faint millions of miles away. 

 The forest mourns……

Suranga Date 

निश्चिंत

आता कशास खारट अश्रू

आल्या आल्या रडून घेतले

स्वर्ग अथवा नरकामधुनी

खरेच मज कुणी पाठवले?

आदीचा आठव नाही

अंतानंतर काय उरे

इवलीशी स्मृती त्रिशंकू

घेरली अभेद्य अंधारे।

अखंड टकटक सुरूच होती

कोलाहलात जाणीव नव्हती

कचकन कर्क नांगी डसली

थँक्स, टक्क जाग आली।

जागृतीची स्थिती भयंकर

गहन गूढ अशक्य गुंता

विचार नुसते सुसाट सुटता

फुटती फाटे, गोंधळ पुरता।

काल अनंत मी नगण्य कण

का कालातीत अद्भुत काही

अणु-ऊर्जेचा मेळ क्षुल्लक

का असीम चिरंतन काही?

असो लौकिक वा अलौकिक

अफाट पसारा अगम्य भासे

प्रश्न असंख्य सुटका नसते

उत्तर नाही, ठाऊक असते!

केवळ मृण्मय वा चिन्मय

सारे नश्वर किंवा शाश्वत

समज नवी उमले अवचित

तेज तळपे तमास वितळत।

जग खरे का ब्रह्म सत्य

असो काहीही मी ‘ते’ सत्य

अथांग भिजता या भावात

सरल्या शंका मी निश्चिंत

प्रफुल्ल वृत्ती, प्रशांत चित्त

मृत्यू तर स्थित्यंतर फक्त।

प्रसन्न दाभोलकर 

(११/५/२०२६ रोजी सकाळी  Localized Adenocarcinoma of prostateचे निदान होऊन एक आठवडा लोटल्यावर ही कविता सुचली.) 

Authors

Leave a Reply