मुखपृष्ठ:  एप्रिल २०२६ :  चैत्रांगण

रांगोळी : सौ. शुभांगी जोशी 

चैत्र महिना सुरू झाला आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा  हा महिना सुरू झाला, की ‘चैत्रांगण’ अपरिहार्यपणे आठवते.   चैत्रांगणाचा उगम  हा लोकसंस्कृतीत  आहे.  विविध शुभचिन्हांनी नटलेली रांगोळी  चैत्र महिन्यात काढली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ही रांगोळी असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. ही माझी अत्यंत आवडती रांगोळी. या रांगोळीत  एकूण किती चिन्हे असावीत   याचा काही निश्चित संकेत नाही. चैत्रगौरीचे स्वागत हा या रांगोळीचा महत्त्वाचा हेतू.  या वेळी ही  रांगोळी काढण्याचा विचार सुरू झाला  आणि माझे  लक्ष  डॉ.भारती माटे यांनी एका वेगळ्या पद्धतीने या रांगोळीकडे पाहिले आहे, त्याकडे गेले.   आपले पारंपरिक सण व उत्सव हे निसर्ग चक्राशी बांधलेले आहेत. या  रांगोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या ६४   चिन्हांची विशिष्ट रचना त्यांनी सुचवली आहे व त्या मागचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे.  या वेळी मी ती रांगोळी त्यांच्या रचनेनुसार काढली आहे. ‘आत्म्याची रांगोळी’ असे या रांगोळीचे त्यांनी सार्थ वर्णन केले आहे.  या विषयीच्या आपल्या लेखमालिकेचे शेवटचे पुष्प गुंफताना त्या म्हणतात, “वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षयतृतीया असे म्हणतात. भारतासारख्या खंडप्राय देशात प्रत्येक प्रांतात तिथल्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे सण साजरे होतात आणि त्याप्रमाणे कथा प्रचलित होतात, तशाच अक्षत तृतीयेच्याही! 

आज ह्या अक्षय दिवशी आपल्यातील दुर्गुणांचा कायमचा त्याग करून अंतर्यामी सद्गुणांचे वरदान मागण्याची  अक्षय परंपरा आहे; त्यामुळे  आपले संस्कार किंवा आचरण बदलून आपल्या कर्मातही बदल होईल. हा बदल अक्षय टिकून राहावा म्हणून प्रार्थना करायचा दिवस म्हणजे अक्षयतृतीया. ह्यादिवशी केलेले संकल्प सिद्धीस जातात,असे मानले जाते. 

गेले ३३ दिवस चैत्रांगणाच्या रांगोळीचे अनेक पदर आणि प्रतीकांविषयी आपण चिंतन करतो आहोत. आज ह्या चैत्रांगणाच्या शेवटच्या भागात ह्या भूमातेला वन्दन करून, ह्या जगातले हे तमस दूर करण्यासाठी  वचनबद्ध होऊ या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘स्वसंवेद्या आत्मरूपा’च्या संवेदनशीलपणे आपल्या आतील असुरांकडे डोळसपणे पाहू या, त्यांना सतत वाढू न देता डोळे उघडे ठेवून आपण आपला भोवतालही  सुजलाम् सुफलाम् जन्मभूमी पाहू या. 

कमळांनी भरलेली तळी, नाचणारे मोर, मुबलक सूर्यप्रकाश, रत्नखचित आकाश, हिरवीगार वनसृष्टी, फुलाफळांनी लगडलेली झाडे, गंधित आसमंत आपण किती भाग्यवान आहोत,  या भूमीत जन्माला आलो. थोडेसे आत डोकावून पाहू या, निरामय होऊन जाऊ या.” 

त्यांची ही प्रार्थना तुमची आमचीदेखील प्रार्थना आहे,  नाही का ?

सौ. शुभांगी जोशी. 

Author

Leave a Reply