
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने २०२६ मध्ये २४ वर्षे पूर्ण केली. नुकताच हा महोत्सव पुण्यात १५ ते २२ जानेवारी या आठवड्यात थाटामाटात पार पडला. या महोत्सवात १०३ देशांतले १३० चित्रपट दाखवले गेले. स्पर्धा विभागात आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मराठी चित्रपट या दोन्हीसाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले गेले. पुरस्कारांचे परीक्षक म्हणून जगभरातील चित्रपट क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती आलेल्या होत्या. स्पर्धेच्या निवड समितीने आलेल्या चित्रपटांतून १४ चित्रपट जागतिक चित्रपट विभागात आणि ७ चित्रपट मराठी चित्रपट विभागात निवडले होते. एखाद- दुसऱ्या चित्रपटाचा अपवाद वगळता हे सर्व चित्रपट निखालस उच्च दर्जाचे होते. त्याखेरीज आजचे अनेक जागतिक चित्रपट, भारतीय आणि मराठी चित्रपट आणि पुनरावलोकन विभागात गुरुदत्त, व्ही.शांताराम, ऋत्विक घटक यांचे मास्टरपीस चित्रपट दाखवले गेले. पिफ 2026 चे आयोजनही नेटके होते (एखाद दुसराच शो रद्द झाला).
महोत्सवाची सुरुवातच ‘ला ग्रासिया’ या ‘पावलो सोरेंटो’ या इटालियन दिग्दर्शकाच्या अप्रतिम चित्रपटाने केली गेली. या चित्रपटाचा नायक आहे इटलीचा राष्ट्राध्यक्ष – एक काल्पनिक व्यक्तिरेखा. त्याची कारकिर्द संपत आली आहे; पण आपल्या उर्वरित राष्ट्राध्यक्षपदाच्या कालावधीत त्याला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. त्याच्यासमोर आहेत दयामरणाचे विधेयक आणि मृत्यदंड दिल्या गेलेल्या दोन व्यक्तींची शिक्षा माफ करण्यासाठीच्या याचिका. राष्ट्राध्यक्ष विधुर आहे. त्याची मुलगी त्याला मदत करीत आहे. कायदा आणि न्याय यांच्याशी तो बांधील आहे; पण त्याच्या प्रिय पत्नीने भूतकाळात कोणासाठी त्याच्याशी प्रतारणा केली होती याचा संशय त्याच्या विचारांवर परिणाम करीत आहे. त्याची मुलगी, त्याची जुनी मैत्रीण, पोप, सेनाप्रमुख, त्याच्यानंतर त्याची जागा घेऊ इच्छिणारा सहकारी आणि छुपा प्रतिस्पर्धी, तुरुंगात असलेले दोन मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले खुनी कैदी आणि त्याचा सचिव सर्वजण आपापल्या धारणांप्रमाणे त्याला काही सांगत आहेत, सुचवीत आहेत. या सर्व परिस्थितीतून तो योग्य मार्ग कसा काढतो हे या नेत्रदीपक चित्रपटात पाहण्यासारखे आहे. हा महोत्सव काही चांगले आणि विचार करायला लावणारे चित्रपट आपल्या पदरात टाकील याची ग्वाहीच या सुरुवातीच्या सिनेमाने दिली.
समारोपाचा सिनेमा होता ‘फादर मदर सिस्टर ब्रदर.’ ही अमेरिका, आयर्लंड आणि फ्रांसची संयुक्त निर्मिती होती – जिम जार्मुश या ख्यातनाम दिग्दर्शकाची. तीन कौटुंबिक नात्यांच्या तीन गोष्टी पण पाश्चात्त्य संस्कृतीतील. सर्वच गोष्टींत वृद्ध आई किंवा वडील एकटेच राहत आहेत. मुले आपापल्या गावी आपापल्या संसारात व्यग्र आहेत. आई-वडिलांना भेटायला कधीतरी जातात. त्यांच्यासाठी हे एक रिच्युअल आहे. ‘फादर’ या कथेत मुलगा आणि मुलगी आपल्या विधुर वडिलांना भेटायला आले आहेत. त्यांची आर्थिक आणि शारीरिक स्थिती तितकीशी चांगली नाही हे त्यांना दिसते आहे. मुलगा गरजेप्रमाणे थोडीफार आर्थिक मदत करत आला आहे. मुलगी तेही करत नाही. त्यांची भेट म्हणजे एकमेकांची औपचारिक चौकशी आणि पाणी पिणे (मुलगी मुलाने आणलेल्या वस्तू वापरून मग चहा बनवून आणते.) एवढीच काही तासांपुरती असते. वडीलही आपली आर्थिक स्थिती किती वाईट आहे (ती तितकी वाईट नसली तरी ) हे मुलांना दिसेल आणि अपराधी वाटेल हे पाहतात. मग मुलगा आणखी काही पैसे देतो. मुलांची पाठ वळल्यावर वडील लपवून ठेवलेली गाडी काढून मैत्रिणीकडे जाऊन तिला नव्याने मिळालेल्या पैशातून ट्रीट देतात! मदर या गोष्टीत दोन मुली आईला भेटायला येतात पण मनमोकळा संवाद होत नाही. धाकटी मुलगी आपले समलैंगिक संबंध दडवून ठेवते. दोघीजणी आईने ठेवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात आणि परत जातात. ‘सिस्टर ब्रदर’ या कथेतमात्र आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या घरी आलेले जुळे बहीण भाऊ गेलेल्या आई-वडिलांविषयी आणि एकमेकांविषयी प्रेम बाळगून आहेत. घरातल्या काढलेल्या जुन्या गोष्टी त्यांना भावविवश बनवतात. त्यांची आपापली वेगवेगळी आयुष्ये आहेत पण त्यांच्यातील परस्परांबद्दलची आपुलकी टिकून आहे. तिन्ही कथांमध्ये प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्यांनी कामे केलेली आहेत. इंग्रजी भाषेतील त्याच म्हणी, वाक्प्रचार तिन्ही कथांत येतात आणि गंमत वाटते. कितीही जवळचे नाते असले तरी प्रत्येक व्यक्ती आपापले जीवन एकट्याने जगत असते हे सत्य सामोरे येते. मात्र पाश्चात्त्य संस्कृती आणि आपली संस्कृती यांतील भेद आपल्याही मनात जागा झाल्यावाचून राहत नाही.
जागतिक स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट ठरला भारताचा ‘द एलिशियन फील्ड’ हा चित्रपट. प्रदीप कुरबाह या दिग्दर्शकाने खासी भाषेत निर्मिलेला. मेघालयातील खासी टेकड्यांतील या गावात आता सहाच जण राहिले आहेत. बाकी सगळे – विशेषतः तरुण पिढी शहरात गेली आहे. पण आपल्या गावात हे गावकरी एकमेकांना धरून आहेत. कुणाच्या मृत्यूचा शोक सर्वांना होतो, कुणाचा आनंद सर्वांचा आनंद ठरतो. या गावाचे अस्सल चित्र हा चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर उभे करतो.

Film Adam’s sake
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले लॉरा वॉंडेल या बेल्जियमच्या दिग्दर्शिकेला, ‘अॅडम्स सेक’ या चित्रपटासाठी. हा चित्रपट बेल्जियम आणि फ्रांस यांची संयुक्त निर्मिती होता. अॅडम हा चार वर्षांचा मुलगा कुपोषणामुळे इस्पितळात भरती केला गेला आहे. त्याला नळीने दिलेले अन्न पचनी पडत नाही. त्याला फक्त आईने बनवलेले जेवण जेवायचे आहे आणि आईजवळच झोपायचे आहे. पण त्याच्यासाठी इस्पितळाने दिलेल्या आहाराऐवजी आई तिथे येऊन आपण आणलेले अन्न लपवून मुलाला भरवते आहे. आई-वडिलांचा घटस्फोट झालेला आहे आणि मुलाचा ताबा वडिलांकडे आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आईला त्याला ठरावीक वेळेस भेटता येणार आहे. इस्पितळातील परिचारिका ल्यूसी मुलाच्या भल्यासाठी त्याच्या आईला त्याच्याजवळ थांबू द्यावे असा व्यवस्थापनाकडे आग्रह धरते आहे. नियमांवर बोट ठेवून व्यवस्थापन आईला इस्पितळातून घालवून द्यावे असे सांगत आहे. नियम पाळायचे, की मुलाला जगवायचे असा ल्यूसीचा व्यवस्थापनाला प्रश्न आहे. व्यवस्थापन न्यायालयाचा तसा आदेश मिळाला – जो मिळायला १५ दिवस तरी लागतील – की त्यानंतरच आईला भेटू द्यायला तयार आहे. जेवणाच्या वेळेनंतर आईला तेथून सिक्युरिटीमार्फत बाहेर काढायचेही आदेश दिले जातात. कसेबसे ल्यूसी त्यांना थोपवते. आई आणि मुलाला खोलीत सोडून पुन्हा व्यवस्थापनाकडे जाते. आपले इथे कोणी ऐकणार नाही असे पाहून आई मुलाला घेऊन इस्पितळाबाहेर पळून जाते. ते लक्षात आल्यावर ल्यूसी त्यांच्या मागे धावत जाते. मुलाला घेऊन पळायला लागलेली आई जिन्यावरून पडते. दोघेही जण जखमी होतात. ल्यूसी त्यांना घेऊन इस्पितळात उपचारासाठी येते. सुदैवाने त्यांना कोणतेही फ्रॅक्चर झालेले नसते. मुलाला अपघात झाला म्हणून मुलाच्या वडिलांना बोलावले जाते. तो आपल्या दुसऱ्या बायकोला आणि नवजात मुलाला घेऊन येतो. ते अॅडमजवळ रात्रीचे थांबायला तयार नसतात. ल्यूसी पुन्हा व्यवस्थापनाकडे जाते. तिथे अॅडमची आईदेखील भांडायला येते. त्यामुळे व्यवस्थापन चिडते. शेवटी ते अॅडमला, ‘तुला कोणाजवळ राहायचे आहे’ असे विचारतात. अपघातामुळे घाबरलेला मुलगा म्हणतो, “मला आई पाहिजे; पण मला जिवंतही राहायचे आहे.” या त्याच्या बोलण्याने त्याची आई व्यथित होते. मुलाच्या आईला राहू दिले म्हणून ल्यूसीवर शिस्तभंगाची कारवाई होते. ल्यूसी जवळच्या निवारागृहात एक खोली घेते. अॅडमच्या आईला मुलाचे कपडे आणण्यासाठी घरी जायचे असते. ल्यूसी तिला आपल्या कारने घेऊन निघते. पण तिला घरी न नेता निवारागृहाकडे नेऊ लागते. ते लक्षात आल्यावर अॅडमची आई रागाने चालत्या गाडीतून उडी घ्यायला निघते. शेवटी ल्यूसी गाडी थांबवते. अॅडमची आई बस स्टॉपवर जाऊन उभी राहते. ल्यूसीही तिथे येते. अॅडमची आई तिला, “तुला मुलाची माया काय कळणार?” असे रागाने विचारते. आपणही एका (मोठ्या) मुलीची आई आहोत असे ल्यूसी सांगते. ही मुलगी आपल्यापासून दुरावत चालली आहे याचेही तिला दुःख असते. शेवटी अॅडमची आई ल्यूसीबरोबर निवारागृहाकडे जायला निघते. हट्टी मुलगा, दुराग्रही आई, असंवेदनशील व्यवस्थापन या सर्वांशी ल्यूसी स्वतःच्या नोकरीची पर्वा न करता, अॅडमच्या भल्यासाठी झुंजत राहते. या चित्रपटाच्या दिग्दर्शकेला द्यावी तितकीच ल्यूसीचे काम करणाऱ्या ‘ली ट्रकर’ हिला दाद द्यावीशी वाटते.
आंतरराष्ट्रीय चित्रपटांतील ज्यूरींनी नोंद घेतलेला चित्रपट होता ‘लास्ट लँड’ – अगदी आपल्या उंबरठ्यावरचा. विस्थापित रोहिंग्यांचा – ज्यांच्याकडे आपण तिरस्कारानेच पाहतो. म्यानमारने त्यांना आपल्या देशातून हुसकावून लावले. बांगलादेशात ते आले. त्यांनाही ते नको आहेत. भारताची दारेही त्यांच्यांसाठी बंद आहेत. बांगलादेशातील निर्वासित कॅंपातील नऊ वर्षांची सामीरा आपल्या चार वर्षांच्या भावाला घेऊन, आपले कुटुंबीय भेटतील म्हणून कॅंपातून निसटून मलेशियाकडे चालत चालली आहे. अतिशय संवेदनशीलतेने रंगवलेले या निरागस छोट्या मुलांचे चित्र या चित्रपटात आहे. जपानी दिग्दर्शक आकिओ फुजीमोटो याने जपान, फ्रांस, मलेशिया, जर्मनी या देशांच्या मदतीने हा चित्रपट बनवला आहे. बातम्यांमध्ये न येणारा मानवी चेहरा हा चित्रपट आपल्या समोर आणतो.

मराठी चित्रपटांमध्ये ‘बाप्या’ या चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपटाचे आणि उत्कृष्ट अभिनेता (गिरीश कुलकर्णी) अभिनेत्री (राजश्री देशपांडे) यांची पारितोषिके पटकावली. लिंगबदलासारखा टाळला जाणारा विषय हा चित्रपट अतिशय संवेदनशीलतेने हाताळतो. गोंधळ या चित्रपटाने उत्कृष्ट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफीची पारितोषिके मिळवली. लग्नात केल्या जाणाऱ्या गोंधळ या धार्मिक विधीचा उपयोग चित्रपटातील वधू कसा कुशलतेने करून घेते ते पाहण्यासारखे आहे.

मराठी चित्रपट ‘गोंधळ’
मोहित टाकळकरांनी काढलेल्या ‘तो, ती आणि फुजी’ या सिनेमाला उत्कृष्ट पटकथेसाठीचे पारितोषक दिले गेले. दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे तो आणि ती एका ओढीने जवळ येतात, दूर जातात आणि सात वर्षांनी जपानसारख्या देशात पुन्हा भेटतात. या सर्वच गोष्टी इरावती कर्णिक यांनी आपल्या पटकथा संवादांतून अगदी जाणतेपणाने साकारलेल्या आहेत. ललित प्रभाकर या गुणी नटाच्या, यातील ‘अभिनय न वाटणाऱ्या अभिनयाचा’ ज्युरींनी विशेष उल्लेख केला. मृण्मयी गोडबोलेनेही ललितला उत्तम साथ दिलेली आहे. मोहित टाकळकर या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना घेऊन आले होते. गमतीची गोष्ट म्हणजे त्यात लहान मुलाचे काम करणाऱ्या बालकलाकाराला हा चित्रपट प्रौढांसाठी असल्याने पाहता येणार नव्हता. अतिशय बोल्ड अशी समीप दृश्ये आता ओटीटी इतकीच चित्रपटांतही येऊ लागली आहेत याची या चित्रपटाने जाणीव करून दिली.
सुतक आणि मृत व्यक्तीचा पुनर्जन्म यासंबंधीच्या गावाकडच्या अंधश्रद्धांना संबंधिताचे कुटुंबीय कसे सामोरे जातात याचे चित्रण ‘जीव’ चित्रपटात होते. याचे दिग्दर्शक रवींद्र माणिक जाधव यांचाही ज्यूरींनी खास उल्लेख केला.
पारितोषिकांसाठीच्या चित्रपटांखेरीज आजचे जगभरातले, भारतातले आणि मराठीतले निवडक चित्रपट या महोत्सवात दाखवले गेले. त्यात अनेक चांगले आणि काही फारच चांगले चित्रपट होते. ते पाहायला मिळणे हेच ‘पिफ’ला एक महोत्सव बनवतात. यात दाखवल्या गेलेल्या चित्रपटांकडे एक ओझरता दृष्टिक्षेप टाकला (सर्वच – १३० चित्रपट एका आठवड्यात पाहणे अशक्यच होते.) तर असे दिसते, की जागतिक चित्रपट युद्धाचे परिणाम आणि विस्थापन यांचे परिणामकारक दर्शन घडवीत आहेत; मग ते लेबेनॉन असो, पॅलेस्टाईन असो, सुदान असो, कोरिया असो, की अमेरिकेतील आगीमुळे होणारे विस्थापन असो. या चित्रपटांत नायजेरिया- इराकमधील हुकूमशाही आणि इराणमध्ये होणारे स्त्रियांचे दमन यामुळे सामान्य माणसावर होणारे परिणामदेखील पाहायला मिळाले. यादवी युद्धापासून लांब – तुलनेने आपण किती सुरक्षित जीवन जगत आहोत याचीही जाणीव झाली.
महोत्सवात समलिंगी संबंधांशी संबंधित अनेक चित्रपट होते. संगीतकार वादक आणि संगीत हा अनेक चित्रपटांचा गाभा होता; पण त्यांतही त्यातील भावनिक पैलूंना महत्त्व दिले गेले होते.
प्रेम हा चित्रपटांचा सनातन विषय आहे. आपल्याकडे अलीकडेपर्यंत प्रेमात पडणारे नायक नायिका, त्यांना होणारा विरोध आणि शेवटी होणारे त्यांचे मिलन हा चित्रपटांचा ठरलेला साचा होता. अलीकडे त्यात बदल होत आहेत. नायक नायिका एकत्र आल्यानंतरचे त्यांचे वैवाहिक जीवन चित्रपटांचा विषय होत आहे. पण प्रेम हा विषय सार्वत्रिक आहे. या महोत्सवातही असे चित्रपट होते. ‘सिआओ बांबिनो’या इटालियन चित्रपटाचा नायक अॅटीलो याला बापाचे कर्ज फेडण्यासाठी एका वेश्येची राखण करायचे काम करावे लागत आहे. तो त्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिला घेऊन पळून जातो. पण कर्ज फेडण्यासाठी लपत छपत परत आल्यावर त्याचा खून होतो. ‘डीजे अहमत’ या चित्रपटातील अहमत गुराखी आहे; पण त्याला डीजे व्हायचे आहे. तो जिच्या प्रेमात पडतो तिचे लग्न ठरले आहे. तो तिला आणि तिच्या मैत्रिणींना नाचण्यासाठी संगीत ऐकवतो आणि मग तीदेखील त्याच्या प्रेमात पडते. तिचा लग्न समारंभ सुरू झाल्यावर अहमत एका टॉवरवर चढतो, फाटक बंद करतो आणि रेडिओवरून समारंभात गुंतलेल्या तिला साद घालतो. मुलीचे वडील येऊन अहमतला मारहाण करतात. अहमत पुन्हा मेंढपाळी करू लागतो आणि मुलगी घर सोडून पळून जाते.
भारतीय चित्रपट विभागात राही अनिल बर्वेच्या मयसभाने लक्ष वेधून घेतले. तमिळ दिग्दर्शक प्रेम कुमारचा मेयाझगन हा चित्रपट विस्मृतीत गेलेल्या मैत्रीला भावपूर्ण उजाळा देतो. मराठी चित्रपट विभागात परेश मोकाशीची ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ ही फॅंटॅस्टिक फॅंटसीही होती.

जर्मनीतील युद्धोत्तर जगाचे अगदी वेगळे चित्रण घडवणारा ‘अमरूम’ हा सर्वांगसुंदर चित्रपट पिफमध्ये पाहायला मिळाला. नाझी आधिपत्याखालील अमरूम बेटावरील नानिंग हा बारा वर्षांचा मुलगा. हिटलरचा पाडाव झाला म्हणजे नेमके काय झाले तेही त्याला नीटसे समजत नाही. नुकत्याच प्रसूत झालेल्या आपल्या आईला हवा असलेला ब्रेडबटर मिळवण्यासाठी तो नाना कामे करत आहे. नवी राजवट आल्यावर त्यांच्या घरात असलेले तोटके चलनही चालेनासे होते आणि हे कुटुंब आपले घर – गाव सोडून जायला निघते. इथल्या सर्वांशी असलेले भावबंध आणि गतस्मृती या कुटुंबीयांना कातर करीत आहेत. चित्रपटभर दिसलेली नानिंगची जिद्द आपली दाद मिळवून जाते.
आठवडाभर पिफने चित्रपटांची मेजवानीच दिली असे म्हणावे लागेल!
