‘कोकण रेलटेल प्रोजेक्ट’ संपवून मी सोलापुरला परत आलो. इथेसुद्धा आता सोलापूर ते वाडी दरम्यान असलेल्या भागात ६०% केबल टाकून झाली होती. उरलेली केबल टाकणे आणि केबलची जोडणी इत्यादी छोटी मोठी कामे बाकी होती. हैदराबादच्या एका कंपनीला हे कंत्राट मिळाले होते. केबलची जोडणी करणारा मुलगा पोरसवदा होता पण त्याचे केबल जोडण्याचे कौशल्य खूपच उत्तम होते. OFC चे तंत्रज्ञान त्याला काहीच माहिती नव्हते. पण केबलची जोडणी यांत्रिक पद्धतीने अफलातून करायचा .त्याचे हे कौशल्य मी आत्मसात करत होतो. माणसाने कायम शिकत राहावे आणि वेळ आली की ते ज्ञान वापरावे हे माझ्या बाबांचे सूत्र मी अमलात आणत होतो. तांत्रिक बाबतीत तर हे सूत्र मला खूपच उपयोगी पडत होते.
केबलचा मार्ग लक्षात यावा आणि सुरक्षित रहावा म्हणून आम्ही प्रत्येक १०० मीटर अंतरावर OFC Cable/Rly Cable असे चिन्हांकित केलेले आखीव रेखीव/दगडी किंवा RCC मार्कर लावत असू. जसे राष्ट्रीय महामार्गावर कडेला ‘मुंबई 405 किमी’ असे लिहिलेले पिवळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगवलेले दगड असतात तसे. आमचे लाल रंगात रंगवलेले दगड मार्कर रेल्वेची हद्दही दर्शवितात. या सर्वाचा हेतू हा की रेल्वेतील व इतर लोकांना कळेल ,की ह्या मार्कर खाली Cable आहेत आणि खोदकाम करायची गरज पडल्यास योग्य ती काळजी घेता येईल. इतका साधा ते लाल दगड, मार्कर म्हणून लावण्याचा उद्देश होता. पण लाल दगड दिसला , की तो देवच आहे आणि त्याच्यासमोर फुले,उदबत्ती, कुंकू ,दक्षिणा असलीच पाहिजे असा आपल्या जनतेचा मानस. या मानसापोटी असाच एक दगडी मार्कर आता रेल्वे हद्दीतील देव झाला आहे. काही जण तिथे उदबत्ती आणि नारळ फोडतात. असो, ज्याची त्याची (अंध)श्रद्धा म्हणायला हरकत नाही.
केबल बुजवल्यावर त्या मार्गावर चालत असताना मी तुळशीच्या बिया टाकत जायचा. माती सैल झाल्यमुळे त्या तुळशीच्या बिया तिथेच रुजायच्या. त्यामुळे जिथे तुळस त्याखाली OFC cable असा एक केबलचा वेगळा मार्ग तयार झाला. वरिष्ठांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी इतर ठिकाणी जमल्यास या कल्पनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले.
सोलापूर – वाडी दरम्यान केबल टाकत असताना एक जीवघेणा प्रसंग माझ्यावर बेतला होता. एका अरुंद पुलावरून ( छोटा नाला) आम्हांला Cable घालायची होती. अशा ठिकाणी आम्ही सुरक्षेचे नियम पाळून ( तोंडी नाही,सर्व लेखी; Drawing सहित, जबाबदार प्रमुखाच्या स्वाक्षरीसहित) केबल घालत असतो. सुरक्षेच्याबाबतीत रेल्वेमध्ये कोणतीच तडजोड केली जात नाही. त्या पुलाच्या आजूबाजूला चालण्यासाठी ( Pathway ) काहीच नव्हते. पूल पार करावयाचा असेल तर रेल्वे रुळाच्या मधूनच चालावे लागायचे. सर्व संबंधित खात्यांची परवानगी घेऊनच आम्ही त्या पुलावर Cable घालण्यासाठी पोहोचलो. G.I (Galvanized Iron) Pipe मधून आम्ही Cables घालत होतो. तत्पूर्वी स्टेशनमास्तरकडून खातरी करून घेतली कि त्या मार्गावर २ तास कोणतीही गाडी येणार नाही ; कारण जर गाडी आली तर रुळावरून बाजूला होण्याइतकीसुद्धा जागा त्या पुलावर नव्हती . तो पूल स्टेशनपासून २ कि.मी दूर होता. आम्ही Cable घालत ( आम्ही एकूण चौघे जण पुलावर होतो ) पुलाच्या मध्यावर आलो असताना अचानक गाडीचा हॉर्न ऐकला. गाडीचे इंजिन दिसत होते. एका मिनिटाचाही अवधी आम्हांला ‘आता काय करायचे’ हा विचार करायला मिळाला नाही इतक्या क्षणात सगळे घडत होते. गाडी वेगाने आमच्याजवळ येत होती. आमची पाचावर धारण बसली ‘ठोका चुकणे’ या वाक्प्रचाराचा अनुभव आम्ही घेत होतो. झटकन आम्ही पाईपला धरून खाली लटकलो. जर त्या पाइपने साथ नसती दिली तर आमच्या चौघांचे काही खरे नव्हते. धडधड करीत आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढवत पुलावरून ट्रेन गेली.मग कसेबसे आम्ही पुलावर येऊन उरलेले काम पूर्ण केले, इतक्या जवळून रेल्वे कशी धावते हे पाहणारे आम्ही पहिलेच असू . आत्ताच्या भाषेत बोलायचं झाला तर “What a thrilling experience it was ! Too adventurous!” आम्ही लगेच स्टेशनकडे धावलो. मी स्टेशन मास्तरला अक्षरश: मारायला धावलो. त्याचं नशीब चांगलं म्हणून इतरांनी मला अडवले. माझ्या तोंडाने त्याचा उद्धार चालूच होता. मी शांत झाल्यवर हात जोडून त्याने माफी मागितली,”गाडी को गलतीसे Line Clear दिया.” मी हतबुद्ध झालो.
आमच्या रेल्वेत ‘संरक्षा’ विभाग असतो. प्रत्येक खात्याला तो सुरक्षा उपायांबद्दल मार्गदर्शन करीत असतो. सोमवार ते रविवार असे अनेक “संरक्षा सुविचार” त्यावेळी कार्यरत असलेलेल्या स्टेशन मास्तरच्या टेबलावर असलाच पाहिजे. आणि त्याला तो अर्थासहित माहित असलाच पाहिजे आणि त्याचे वर्तन त्या नियमाला अनुकूलच हवे असा दंडकच आहे. आणि त्या दिवशी ‘संरक्षा सुविचार’ होता, ‘सतर्क आदमी संरक्षा का सर्वोत्तम साधन है.’मी स्टेशन मास्तरकडे आणि त्या संरक्षा सुविचाराकडे बघितले. तो खजील झाला आणि परत परत म्हणाला, “गलती हो गयी सर Complaint मत करना, सरजी”. त्या दिवशीचे काम संपवून आम्ही जीपने घरी निघलो. वरिष्ठांना ही गोष्ट तपशीलवार सांगितली. त्यामुळे नंतर मला अशा प्रकारच्या पुलावरील कामासाठी सुरक्षा विभागाची दोन माणसे मिळत गेली आणि माझे काम सोपे झाले. आता हाच पायंडा पुढे चालू आहे.
दुधनी हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील स्टेशन. त्या काळी इथे बरेच काही गैरप्रकार चालत असत. आमच्या वाट्यास आलेले काही गमतीशीर किस्से.
आम्ही बऱ्याच प्रकारच्या Cable भूमिगत करत आणि त्या नंतर जोडत असू त्या Cableची टोके (Cable Ends) चोरी होऊ नये म्हणून जमिनीत पुरत असू आणि त्या केबलचे तपशील — म्हणजे ती Cable कोणत्या प्रकारची आहे तिचा ड्रम क्रमांक कोणता, सुरुवात कुठून केली आणि कोणत्या कि.मी. ला संपली. ह्याचा मी एक तक्ता तयार केला होता आणि तो कंत्राटदाराच्या मुकादमाला दिला होता. दिवस संपला, की तो Data आणि त्या दिवसाचे काम यांचा Report मला संध्याकाळपर्यंत आणून द्यायचा. मी तो माझ्या Laptop मध्ये योग्य त्या Format मध्ये नोंद करीत होतो;जेणे करून भविष्यात Cable देखरेखीसाठी तो Data उपयुक्त होईल. हे सगळे काम आम्ही जवळच्या स्टेशनवरच फलाटावर/झाडाखाली किंवा जिथे जागा मिळेल तिथे करत असू. हा तक्ता सगळा आकडेवारीचाच होता. एकदा हे काम करत असताना आमच्या कडेला हळूहळू गर्दी होऊ लागली. मला काही कळेना. मी गर्दीतील एकाला विचारले, “कशाला गर्दी करताय?” त्याने अगदी भावनावश होऊन मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला “सायेब, तुम्ही रोज सांच्याला मटक्याचे आकडे काढता असे आम्हाला कळले म्हणून आम्ही हिथं आलो हाय. आमाला उन्द्याचा आकडा सांगा की. ”मला हसावे का रडावे ते कळे ना! त्याला मी त्याच्याच भाषेत ‘सपष्ट’ सगळे सांगितले, की बाबा, ‘हे रेल्वेचे काम आहे. त्याचा आणि मटक्याचा काही संबंध नाही.’णि मटक्याचा काही संबंध नाही’.
त्या दिवशी काम संपण्यास उशीर झाला म्हणून मी तेथील एकमेव हॉटेलात थांबलो.आश्चर्याची गोष्ट आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला तेथील प्रत्येक खोलीत गेल्या दोन वर्षांत कोणते आकडे आले याचे तक्तेच लावले होते हे आढळले. महापालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गात जसे पाढ्यांचे तक्ते असतात अगदी तसे. ते पाहून येथे येणारी स्वप्नाळू जनता, मुक्काम करून उद्या काय आकडा येणार याचे गणित आखत आणि जीवनाची दिशा ठरवत होती. धन्य ते दुधनी गाव आणि तिथे येणारे सीमावासी आणि तो दूरदृष्टीचा हॉटेल मालक!

आमची Cable जोडणी पूर्ण होत आली होती .उपकरणे लावणे सुरु झाले. “तेजस” ह्या बेंगलोर मधील कंपनीची आणि “नोकिया” ( होय,Mobileचीच कंपनी ) ची उपकरणे लावून आम्ही एक एक स्टेशन ( हडपसर ते वाडी )पार करत चाललो.(Installation Testing and Commissioning) या मार्गावर कोकण रेल्वेसारखे अनुभव आले नाहीत. सर्व परिसर परिचित होता. उशीरा का होईना घरी येत होतो.
ज्या सूक्ष्मतरंग( Railway Microwave) खात्यात माझी सुरवातीला नेमणूक झाली होती, त्याच्याच मुळावर मी उठलो होतो.तंत्रज्ञान बदलल्यामुळे सर्व Microwave प्रणालीवरील दळणवळण आता OFC वर वळवले गेले .ती उपकरणे ,मी लिहिलेले पुस्तक आता कालबाह्य झाले होते. कारण रेल्वेतील Signal आणि Telecommunicationचे तंत्रज्ञान पूर्णपणे बदलले होते. त्या तंत्रबदलाचा मी एक साक्षीदार होतो.
जीवनसुद्धा असेच आहे असे वाटते. स्वत:मध्ये बदल करा नाहीतर नष्ट व्हाल.
