
प्रकाशाचे आणि लाटेचे नाते
हा फोटोग्राफ माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, हे नाते आणि भावना टिपायचा. केप कॉडचा नॉसेट समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. हा फोटो त्याच ठिकणी सूर्योदयाच्या वेळी थंडीच्या मोसमात काढलेला आहे.
सकाळची सोनेरी किरणे लाटांवर पसरून लाटा खूपच सुंदर दिसत होत्या. हे फक्त एक क्लिक नाहीये; तर लाटांचे स्वरूप आणि सौंदर्य कॅमेऱ्यात चित्ररूपात बद्ध करण्याचे एक तंत्र आहे.
एक लाट, जी फक्त क्षणभर असते, ती इतकी सुंदर आणि आकर्षक दिसू शकते. तिचे मनमोहक स्वरूप मनाला शांतता आणि आनंद देते आणि आपल्याला त्या क्षणामधे राहण्याचे ज्ञान देते.
वंदना बाजीकर
( छायाचित्रकार )
या रमणीय दृश्यावर स्वाती काळे यांना सुचलेली कविता :
आवेग मनाचा
लाटेवरती स्वार
मग किनाऱ्यासही
येतो चंचल बहर. . .
त्या फुटता लाटा
सागर लहरत गातो
अन् गाज गुणगुणत
वाराही तो मोहरतो. . .
उन्मुक्त होऊनी
लाटांवर स्वारच व्हावे
अन् जटा पिंजूनी
दर्याने तांडव गावे. . .
