आकाशवाणीचं हे ….
‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।
वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’
(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)
भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या जोरदार आक्रमणामुळे आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते; परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले. स्वतःचे ॲप तयार केले. विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व विश्वासार्हता टिकवून आहे. शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत.
भाग ७ : निर्मितीचे कामकाज
सामान्यपणे मी हा अनुभव घेतला आहे, की आकाशवाणीतले काम कसे चालते,कार्यक्रम कसे निर्माण होतात याबद्दल रेडिओ-प्रेमींच्या मनामध्ये एक उत्सुकता असते.ही उत्सुकता या अंगानेही असते, की आकाशवाणीचे उद्घोषक इतके छान कसेबोलतात! बातम्यांची भाषा किती प्रमाण भाषा असते, दर्जेदार असते! रेडिओचं हे सगळं इतकं कसं वक्तशीर असतं! आकाशवाणीतल्या मुलाखती अशा नेमक्या, मुद्देसूद कशा बनतात? वगैरे बाबींची उत्सुकता असते. वेगवेगळ्या संस्था, महाविद्यालये, परिसंवाद, पत्रकारिता विभाग इत्यादी ठिकाणी गेल्यावर असे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत. असे प्रश्न मला रेडिओवर प्रेम करणाऱ्यांचं एक निरागस मनही सांगत असतात.मुळात आकाशवाणीला आपलं कामकाज सांभाळता-सांभाळता आता शंभर वर्षंझाली. एखाद्या संस्थेच्या जीवनात व्यावसायिकता निर्माण व्हायला ही काळाची संधी मोठीच म्हणावी लागेल. १९९९ मध्ये प्रसार भारती हे स्वायत्त महामंडळ होईपर्यंत आकाशवाणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा एक महत्त्वाचा सरकारी विभाग होती. प्रत्येक सरकारी कामाची जी कालसिद्ध पद्धत असते तशीच परंपरा आकाशवाणीलाही मिळाली. सर्व पातळींवरील भरतीच्या रितसर काटेकोर प्रक्रिया होत्या. उद्घोषक -निवेदकांसाठी स्थानिक पातळीवर निवड समिती, प्रसारण निवेदकांसाठी क्षेत्र (झोन)पातळीवर स्टाफ सिलेक्शन कमिशन, अधिकारी पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोग अशा सर्व प्रक्रियांतून माणसे यायची. पत्रकारिता, साहित्य, संगीत, नाटक, लोकपरंपरा या पार्श्वभूमीची माणसं असायची. आपोआपच प्रत्येक क्षेत्रातली गुणवान माणसे आकाशवाणी हेच आपलं करिअर मानून समर्पित भावनेने कार्यरत असायची. अन्यत्र काम करतानाचा ‘नोकरी’भाव वरचढ नव्हता. अलीकडील काळापर्यंत इथे कामे करणाऱ्यांना एक वलयही होतं. काहीजणांनी आपल्या कामातून आजही ते जपलंय. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव, रत्नागिरी ही आजही जी सात प्रमुख विभागीय केंद्रे महाराष्ट्रात मानली जातात त्या केंद्रांत एक कार्यक्रम सल्लागार समिती असे. सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची नियुक्ती या समितीवर महानिदेशकांमार्फत होत असे. क्रीडा, लोककला, विज्ञान, समाज, साहित्य, संस्कृती या क्षेत्रांतील साधारण दहा ते बारा जणांची ही समिती विविध कार्यक्रम, कल्पना, विषय सुचवत असे. एका प्रकारे लोकभावनांचे समतोल प्रतिनिधित्व होत असे. दुर्दैवाने ही परंपरा खंडित झाली.
रेडिओ नाटक, शास्त्रीय, सुगम संगीत यांत सहभागी होण्यासाठी रीतसर स्वरचाचणीपरीक्षा असतात. हे सर्व नियमित होत असे. तात्कालिक गरज म्हणून जे उद्घोषक,निवेदक येतात, त्यांच्याही स्वर चाचण्या होतात. उद्घोषकांच्या बाबतीत लेखी, आवाज आणि तोंडी परीक्षांचे टप्पे असतात. ज्यांची निवड होते त्यांना सगळी कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. मध्यांतरी ७/८ वर्षे वाणी (VANI – Voice and Narration Incentives) या नावाचा अर्थपूर्ण प्रशिक्षण कोर्सही आवश्यक केला गेला होता. प्रशिक्षणात आठवडाभर २० ते २५ तासांत तज्ज्ञांकडून सर्व बारकावे शिकवले जायचे. अचानकपणे हा उपक्रम बंद करण्यात आला. बौद्धिक आणि प्रात्यक्षिक वर्गाच्या संधीचे व्यासपीठ उरले नाही.आकाशवाणीकडे खूप चांगले आवाज या प्रक्रियेतून प्राप्त झाले आणि अशी टीम एक उत्कृष्ट कार्य सातत्याने बजावत आली आहे. चांगले मानधन मिळण्याचीदेखील पद्धत आहे. एक मात्र खरं, की आवाज, प्रशिक्षण इत्यादी सर्व असलं तरी शेवटी समज, दृष्टिकोण, समयसूचकभान किंवा तत्परता या गोष्टी त्या-त्या व्यक्तीवरच अवलंबून असतात.
जळगाव आकाशवाणीत एकदा रात्री ९.३० वाजता वेश्यांच्या जीवनावर आधारित विशेष कार्यक्रम होता. ९.२८ च्या दरम्यान कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी जे वाद्य संगीत फिलर म्हणून उद्घोषकाने लावले ती ध्वनिमुद्रिका चुकीच्या गतीवर प्ले केली गेली. (त्या वेळी टर्न टेबलावर गोल एल.पी. तबकड्या लावल्या जायच्या. त्या विशिष्ट गतीवर लावणे अपेक्षित असायचे.) उद्घोषकाच्या चूक लक्षात येताच त्याने समयसूचकता दाखवत उद्घोषणा केली,“श्रोतेहो, माफ करा. आम्ही चुकीच्या गतीवर ध्वनिमुद्रिका लावल्याने आपला रसभंग झालाअसेल. समाजात अशा काही अभागी स्त्रिया असतात, ज्यांचं जीवनदेखील असं चुकीच्या गतीवर चालत असतं. ऐकू या वेश्यांच्या दुर्दैवी जीवनावर आधारित विशेष कार्यक्रम.” केवढीसमयसूचकता उद्घोषकाने दाखवली होती.
नभोनाट्य आणि संगीत कार्यक्रमांत कलाकार निवडण्यासाठी स्थानिक स्वरपरीक्षण(Local Audition Committee) असते. तज्ज्ञ मंडळी अशा समितीचे सदस्य असतात. या समितीने निवडल्यावर सामान्यपणे ‘बी’ ही ग्रेड कलावंतांना मिळते. उच्च ग्रेड (हायर दर्जा जसे – बी हाय, ए, टॉप ग्रेड इत्यादी) मिळवण्यासाठी स्वतंत्र स्वरचाचण्या होतात. झोनल किंवा नॅशनल लेवल समितीकडे कलावंतांचे ध्वनिमुद्रण पाठविले जाते. ते ऐकून ‘हायर’ दर्जा देण्याबाबत निर्णय होतो. माझ्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीतून मी हे ठामपणे सांगू शकतो, की या ‘स्वर चाचणी’ प्रक्रिया अधिकांश निःपक्षपातीपणे होतात. परीक्षार्थी कलाकार आणि परीक्षक एकमेकांना दिसतही नाहीत. स्टुडिओत फक्त आवाज ऐकू येईल अशी व्यवस्था असते. गुणवत्ता हाच निकष असतो. पूर्ण वेळ स्थायी पदे (पर्मनंट पोस्ट) सोडली तर अन्यत्र कुठेही जात-पात-आरक्षण हे मुद्दे नसतात. हीच पद्धत नभोनाट्यासाठीही असते.कलाकार निवडणाऱ्या कार्यक्रम सल्लागार तसेच स्वरचाचणी समितींवर आजवर बऱ्याच नामांकित लोकांनी काम केलेआहे. गोविंद पोवळे, दाजी भाटवडेकर, स्नेहल भाटकर,पंडित राम नारायण, ब्रिज भुषण काबरा, ज्ञानेश्वर कुलकर्णी, डॉ. अरुणा ढेरे, राजा बढे,शांताबाई शेळके अशी कितीतरी नावे यात आहेत. इंदूरच्या सल्लागार समितीवर तर एके काळी कुमार गंधर्व यांनीही काम केले होते.
स्वरचाचणी होत असताना खूप रंजक किस्से घडतात. काही उमेदवारांकडे गुणवत्ताअसूनही माईक समोर येताच त्यांची तारांबळ उडते. काही जणांना स्टुडिओ फोबिया (भीती)असतो. एकदम मूक होतात. काही जण त्यावर यशस्वी मात करतात. बाहेर वाटते तेवढे हेकाम सोपे सहज नसते. बोलण्याव्यतिरिक्त अनेक व्यवधाने पाळायची असतात. विविध संगणक, सहक्षेपणाच्या वेळा, कंट्रोल रूम, प्रसारणांची प्ले लिस्ट या सर्वांचे भान ठेवायचे असते. समोरचेमोठे घड्याळ, त्यातले मिनिट-सेकंदांचे काटे यांवर बारीक लक्ष ठेवायचे असते.पण यात खूप मजाही असते. सगळ्या यंत्रणांशी लीलया खेळत उद्घोषक, वृत्तनिवेदक श्रोत्यांच्या मनात प्रेमादाराचे स्थान मिळवतात, नावलौकिक कमावतात. हे रेडिओतच घडू शकतं. हरवलेल्या व्यक्तींविषयी निवेदन असो, सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी मदत शिबिरं असोत, दीपोत्सवातले प्रकाशपर्वाचे स्वागत असो किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीचे आवाहन असो… हे सर्व भाव आवाजातून व्यक्त करायचे असतात. ‘वाचिक अभिनयाचे’ इतके सुंदर माध्यम दुसरे कोणते असू शकते? चिंतन, भाषण, मुलाखती, चर्चा, परिसंवाद इत्यादींसाठी ज्या व्यक्तींना बोलावले जाते त्यात त्या-त्या व्यक्तीचे आपापल्या क्षेत्रातले योगदान – काम, योग्यता – पात्रता पाहिली जाते. लेखनदर्जा पाहिला जातो. विविध क्षेत्रांतल्या लेखकांची – तज्ज्ञांची, डॉक्टर, वकील,संशोधक इत्यादी मंडळींची एक सूची (आर्टिस्ट डिरेक्टरी) कार्यक्रम विभाग तयार करतात,त्यातून सहभागासाठी पाचारण केले जाते. सन्मान, पुरस्कार, विजेते इत्यादींचाही विचार प्रसंगोपात केला जातो.
साधारण विभागीय केंद्रांमध्ये त्रैमासिक पातळीवर आणि अन्य केंद्रांमध्ये मासिक पातळीवर कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. सहभागी कलाकार किंवा वक्ते यांच्यासाठी करारपत्रे पाठविली जातात. नाटक, रूपक, श्रुतिका इत्यादींच्या लेखकांना नियमानुसाररॉयल्टी दिली जाते. एखाद्या व्यक्तीला किती वेळा बोलवायचं आणि वर्षभरात अधिकाधिकमानधन किती द्यायचं याबाबत नियमांच्या मर्यादा असतात. गायन – वादन, साथसंगत इत्यादींच्या कलावंतांबाबतही त्यांच्या ग्रेडनुसार बुकिंग आणि मानधनाची मर्यादा ठरते.काही अपवादात्मक स्थिती हाताळण्यासाठी केंद्रसंचालक किंवा कार्यक्रम प्रमुखांना विशेषअधिकार असतात. पण साधारणपणे अशी स्थिती वारंवार येत नाही. त्यामुळे एकूण कामकाज वस्तुनिष्ठपणे, निःपक्षपातीपणे हाताळण्याची संधी असते.
आकाशवाणी हे निःसंशयपणे ‘ध्वनी’चे माध्यम आहे. ‘ध्वनिप्रभाव’ (साउंड इफेक्ट्स)हा विषय त्यामुळे आपोआपच महत्त्वाचा आहे. आकाशवाणीतले कर्मनिष्ठ निर्माते – सादरकर्ते आपल्याकडे उत्कृष्ट ‘ध्वनिप्रभावां’चा संग्रह ठेवतात. अशा साऊंड इफेक्ट लायब्ररीचे मोल आकाशवाणीतला कार्यक्रमकर्मीच जाणतो. त्यातही निर्माता हा नभोनाट्य – रूपक विभागाशी संबंधित असेल तर साऊंड इफेक्ट हा त्याचा जीव की प्राण. असे असूनही स्वतःची समृद्ध इफेक्ट लायब्ररी बाळगणारे खूप कमी कार्यक्रमकर्मी माझ्या पाहण्यात आले.सहज उदाहरण सांगतो. कप-बश्या, चहा ओतणे, नळाखाली बादली भरणे, रात्र, रातकिडे,पाला-पाचोळ्यावरून चालणे, सत्कार, टाळ्यांचा कडकडाट, घड्याळाची टिकटिक,गोळीबार, बॉंबस्फोट, कार जवळ येणे – दूर जाणे, हास्य, रडणे, कण्हणे, सायरन, मोर्चेइत्यादी शेकडो ध्वनींची कार्यक्रम-निर्मितीत गरज असते. आपापल्या कल्पकतेप्रमाणे अशा आवाजांचा संग्रह वाढवता येतो. अनुभवी तज्ज्ञांकरवी ‘साउंड इफेक्ट’ कसे तयार करायचे? उदाहरणार्थ : आग, स्फोट, इमारत पडणे, ग्रहताऱ्यांची गती, घोड्यांच्या टापा, युद्ध, जखमी सैनिकांचे विव्हळणे हे सर्व प्रभाव तयार करून ठेवता येतात. तसे प्रयोग बऱ्याच जणांनी करून आपापला ‘गोपनीय’ ऐवज ठेवला असण्याची शक्यता असते. फार रंजक विषय आहेहा. पु. ल. देशपांडे यांनी ‘रेडिओवरील भाषणे व श्रुतिका’ या पुस्तकात (मौज प्रकाशन) ‘युजऑफ साउंड अँड म्युझिक सॉंग्स’ हे फार सुंदर भाषण उपलब्ध केले आहे. इच्छुकांनी ते मिळून वाचावे.
एक उल्लेखनीय गोष्ट अशी, की आता सर्वच केंद्रांवर कमीत कमी ३५ मिनिटे कृषीकार्यक्रम असतोच. शेतकरी, शेतीतज्ज्ञ, कृषी संशोधक, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी, संचालक, कुलगुरू ही सर्व मंडळी यात भाग घेतात. अधिक उत्पादन, उन्नत बी-बियाणे, अन्नधान्याचे स्वावलंबन, आयात-निर्यात, कीड बंदोबस्त, गोठा व्यवस्थापनाचेआधुनिक तंत्रज्ञान, सिंचन (ठिबक-तुषार) व्यवस्था इत्यादी अनेक विषय हाताळले जातात.या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र कृषी कार्यक्रम सल्लागार समिती असते. शेतकरीच काय पणसामान्य श्रोतेही खूपदा या कार्यक्रमांचा फायदा, आनंद घेतात. अन्यत्र कमी होत असलेले मातीशी नाते या कार्यक्रममधून आकाशवाणीने टिकवले आहे. अनेक प्रगतिशील,उपक्रमशील शेतकरी आपल्या अनुभवांतून इतरांना शहाणे करून सोडतात. प्रासंगिक संकटांवर मात करण्याचा मार्ग दाखवतात. उत्पन्न वाढविण्याचे उपाय सांगतात. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारे कितीतरी चांगले कार्यक्रम आकाशवाणीने केले.‘बळीराजा, हा मार्ग तुझा नव्हे,’ ही मालिका मला आजही आठवतेय. ना. धों. महानोर,पोपटराव पवार, माधवराव चितळे, अण्णा हजारे यांसारख्यांनी त्या मालिकेतून मार्गदर्शनकेले होते.
सिन्नरजवळच्या बाळासाहेब मराळे नावाच्या एका शेतकऱ्याने निराशेवर मात करून नवा दृष्टिकोण बाळगून आपल्या शेतात शेवग्याची लागवड केली. १३ एकरामध्येशेवगा घेतला. एवढं रग्गड यश मिळवलं, की तो निर्यातक्षम बनला. त्याचा आर्थिक स्तर उंचावला. त्याचे सविस्तर अनुभव नाशिक केंद्राने प्रसारित करताच अमाप प्रतिसादमिळाला. रेडिओची ही क्षमता अनेकदा चमत्कार घडवते. प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक असो,प्रत्येक माध्यमाची स्वतःची म्हणून एक शक्ती असते. हे सत्य अनेकदा अनुभवास येते. गरज असते त्या शक्तीचा उत्तम फायदा श्रोत्यांना करून देण्याची! सण, उत्सव, सप्ताह, प्रसंग, माह, जयंती, पुण्यतिथी विशिष्ट दिवस या सर्वांचे भान ठेवून कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. कित्येक श्रोत्यांना अशा कार्यक्रमांतून संस्कृती,चालीरितींचे भान येते. काळाचे भान, समयोचितता, प्रासंगिकता हा तर कुठल्याही माध्यमाच्या आशयाचा (कंटेंट) प्राण असतो. हा प्राण सांभाळण्याचे श्रेय आकाशवाणीलाद्यावेच लागेल. या मौलिक भूमिकेतूनच एखादे माध्यम लोकांच्या गळ्यातले ताईत बनून असते – नव्हे लोकांच्या जगण्याचाच भाग होऊन जाते.
* * * * *

अंदमान रेडियो केंद्रात २००१ मध्ये स्वरचाचणीचा एक क्षण

आकाशवाणीच्या वार्ताहरांकरिता एक शिबीर २००७

आकाशवाणी ने २००५-६ मध्ये एअर इंडिया दिल्ली, कोलकाता इथे कॅबिन कर्मचाऱ्यांसाठी व्हाईस कल्चर शिबिरे आयोजित केली.

राज्यशासनाने दिलेल्या अश्या जाहिरातीतून आकाशवाणीचे तळागाळात असलेले अस्तित्व आणि उपयुक्तता अधोरेखित झाले.

सुंदर माहिती. आकाशवाणीच्या प्रेमातच आहे मी.
—किरण खळदकर