बरोबर आलेला पाढा…


महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि शाहूपुरी यांनी एकत्र येऊन सातारा जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट मर्ढे  येथील 
बा. सी.मर्ढेकर यांच्या घराचे एका सुंदर स्मारकात रूपांतर केले.  या गोष्टीला २९ जानेवारीला एक वर्ष होत आहे.  त्या निमित्ताने… 

 नव्या वर्षातला २९ जानेवारी(२०२४).

    स्थळ : मु.पो.मर्ढे.

    वेळ : हिवाळी दुपारची(पितात सारे गोड हिवाळा!).

   एक अतिशय सुंदर सोहळा अनुभवण्याचं भाग्य लिहिलं होतं सटवाईनं. मराठी कवितेला नव्या वळणावर नेणाऱ्या कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या घराचं स्मारकात रूपांतर करून ते लोकार्पण करण्याचा सोहळा मर्ढे गावी होणार होता. त्यासाठी मी आणि माझी कवयित्री मैत्रीण दीपाली दातार मर्ढ्याला गेलो होतो. पाच-सात हजार वस्तीचं मर्ढे गाव पुणे-सातारा रस्त्यावर साताऱ्याच्या अलीकडे अणेवाडी फाट्यावर आहे. मुख्य रस्त्यापासून १० किलोमीटर आत. फाट्यावरून एक लहानसा रस्ता मर्ढे गावाकडे जातो. दोन्ही बाजूंना ‘शेतमळ्यांची हिरवी गर्दी’ दिसते. आम्ही गेलो तेव्हा ज्वारी आणि ऊस लावलेला दिसत होता. आणखी थोडं पुढं गेलं, की कृष्णा नदी लागते. नदीवर लहानसा पूल आहे. एरवी जसे नदीकाठ दिसतात तसा नाही या नदीचा काठ. शांत, स्वच्छ  प्रवाह आहे. गावाच्या बाजूच्या काठावर गर्दी असेलही पण गावात शिरताना दिसणारी-भेटणारी नदी गावाकडचं नदीपण राखून आहे, अजूनतरी. पुलावरून आणखी थोडं पुढे गेलं की उजवीकडे वळायचं. किंचित चढाचा रस्ता आहे. तो संपताना एक छोटी बखळीसारखी जागा आहे. गाडी तिथे लावायची, पायउतार व्हायचं  आणि पुढे चालायचं. परवा तिथे कमान उभारली होती आणि ती झेंडूच्या माळांनी सजवली होती. देखणी रांगोळी होती. कमानीतून आत शिरलं, की उजव्या  हाताला रामाचं देऊळ. समारंभ या देवळाच्या सभामंडपात होणार म्हणून तिथंही रांगोळ्या आणि झेंडूच्या माळा. गावकऱ्यांनी आणि म.सा.प. सातारा शाखेच्या मंडळींनी दिवे, ध्वनिवर्धक यांची चोख व्यवस्था ठेवली होती. खुर्च्या मांडल्या होत्या. कार्यकर्ते तयारीवर अखेरचा हात फिरवत होते.

   आम्ही मर्ढे गावात या राम मंदिरापाशी पोचलो, तेव्हा समारंभाला  बराच अवकाश होता. त्यामुळे निवांतपणे सारा परिसर फिरून पाहता आला. साधेसे देऊळ आहे. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या  संगमरवरी मूर्ती आहेत. जमिनीत पक्की बसवलेली थोरली सहाण आणि चंदनाचं खोड आहे. तिथे खाली जायला पायऱ्या आहेत. खाली गर्भगृह आहे. त्यात पावनबुवांची समाधी आहे. मर्ढेकर घराण्याचं मूळ आडनाव गोसावी. या गोसावी घराण्याचे आदिपुरुष पावनबुवा श्रीरामाचे भक्त. समर्थ संप्रदायी. समर्थांनी स्थापन केलेलं हे मंदिर. मंदिरावर पाटी आहे – 

  श्री  समर्थ स्वामी प्रस्थापित सिद्धामृत मठ, श्रीराम मंदिर, मु.पो. मर्ढे,जि. सातारा (उत्तर). मर्ढेकर पत्र लिहिताना ‘श्रीराम समर्थ’ लिहीत आणि सही करण्यापूर्वी अनेकदा ‘समर्थात्म बाळ’ असं लिहीत, हे अचानक आठवलं आणि एकदम काही उलगडे झाले.

    हे मंदिर मर्ढेकर कुटुंबाच्या मालकीचं… म्हणजे खासगी आहे. मर्ढेकरांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अंजनाबाई मर्ढेकर यांनी मंदिराला देणग्या दिल्याचा इतिहास आहे आणि आता तर हे घर म.सा.प. सातारा शाखेला देऊन मर्ढेकरांचे सुपुत्र राघव मर्ढेकर यांनी आपल्या औदार्याचा दाखलाच दिला आहे. (ते स्वतःही कवी आहेत, इंग्रजी कवितांचा त्यांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे.) 

   या देवळाजवळ मर्ढेकरांचं घर. किती जवळ – तर त्यांच्या घराच्या पायरीवरून उडी मारली तर ती देवळाच्या पायरीवर पडेल. घर आणि मंदिर यांचा इतका निकटचा संबंध खूप काही सुचवून गेला.  त्या घराच्या पायरीवर – मर्ढेकरांच्या पायरीवर – बसून आम्ही मर्ढेकरांच्या कविता वाचल्या.

किती पायीं लागूं तुझ्या

किती आठवूं गा तूंते;

किती शब्द बनवूं गा

अब्द अब्द मनी येते.

….

कधी लागेल गा नख

तुझें माझिया गळ्याला,

आणि सामर्थ्याचा स्वर

माझिया गा व्यंजनाला!

कोणाची आळवणी, किती आर्तता! शब्दांशब्दांतून जाणवणारी व्याकुळता…अंगावर रोमांच उभे राहण्याचा अनुभव. आसपास कोणी नसताना, दुपारच्या शांततेत त्या कवितेनं मर्ढेकर उमजण्याची निराळीच वाट दाखवली. त्या घरात, त्या मंदिरात, त्या नदीत आणि तिथल्या चांदण्यात मुळं असलेला, ‘भणंग भटकत’ असतानाही  मन मर्ढ्यात सोडून गेलेला, ‘त्याच्या सामर्थ्याचा स्वर माझिया व्यंजनाला लाभो’ …म्हणून व्याकुळलेला तीव्र संवेदनशील कवी थोडा अधिक समजला असं वाटलं. जगभरची उखीर-वाखीर भ्रमंती आणि वाट्याला आलेली उपेक्षा, मनातली कोवळी श्रद्धा आणि अपार खिन्नता, प्रत्यक्षातलं अस्थिर जगणं आणि स्मरणात असलेली या परिसरातली शांती यांतून तयार झालेलं कविमनाचं रसायन काहीसं जाणवत गेलं. कवीच्या कवितेत दिसणारा श्रद्धा-अश्रद्धा यांचा झगडा, त्याच्या भाषेतला  ‘रामदासी उपरोध’ यांचा अनुभूतीच्या पातळीवरचा तो प्रत्यय केवळ अद्भुत होता! मर्ढेकरांच्या अंतर्मनावर खोल संस्कार कसे आणि कुठे झाले असावेत, याची कल्पना देणारं ते घर – ‘सावित्री सदन.’ सावित्री हे त्यांच्या आईचं नाव.  वडील सीताराम नारायण उर्फ आबासाहेब मर्ढेकर शिक्षक होते. वाङ्मय आणि तत्त्वज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय. वाचन भरपूर. घरात पुस्तकांचा संग्रह. संस्कृत रामायणाचं भाषांतर करण्याइतकी  त्यांची तज्ज्ञता आणि संस्कृतचा व्यासंग! मर्ढेकरांच्या कविता त्यांनी वाचल्या होत्या! आपल्या समीक्षालेखनाची बीजं वडिलांच्या विचारपद्धतीत आणि अभ्यासात होती, असं मर्ढेकर म्हणत असत. या घरात, या गावात मर्ढेकरांवर संस्कार झाले ते वाचनाचे,  गावाकडच्या शांत जीवनशैलीचे आणि श्रद्धेचे. त्यांच्या कवितेत कोणत्याही  देवतेचा थेट उल्लेख क्वचित आढळतो .

उदा.

येइल का कधि सीतापति,ग

चुकून तरि पण ह्या वाटेला?

घेइल का अन् रुजू करुनी

या बोरांच्या नैवेद्याला? 

पण एरवी त्यांच्या मनातील रामानं परमतत्त्वाचं निर्गुण निराकारत्व घेतलं असावं, असं वाटतं. ते परमशक्ती मानत होते, हे तर त्यांच्या अनेक कवितांत दिसतंच. ‘भंगु दे काठिन्य  माझें,’ ‘किती पायी लागू तुझ्या,’ ‘या गंगेमधि गगन वितळले,’ ‘मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी’ ही जाणीव सतत होती त्यांच्या मनात. तरी अनेकदा श्रद्धा आणि अश्रद्धा यांचं द्वंद्वही होतं. त्यांच्या मनात अश्रद्धा का निर्माण झाली असावी, हे कळत होतं;  आज श्रद्धेचा उगम समजला!   सत्य आणि सत्याभास यांच्या फार खोलात न जाता इतकंच म्हणते,  निश्चितपणे जाणवलं ते त्या परिसराचं पावित्र्य, शांतता आणि अर्थातच माहात्म्य! अननुभूत संवेदना !

    मर्ढेकरांचा जन्म खानदेशात फैजपूर-सावदे या गावचा  आणि मृत्यू दिल्ली. मधल्या काळात त्रिचनापल्ली ते कोलकाता अशी सततची भटकंती. निवृत्तीनंतर मर्ढ्याला जाऊन निवांत राहायचं, असं स्वप्न पाहणारे मर्ढेकर नाहीच जाऊ शकले परत तिथे. कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो| कितीतरी दिवसांत नाही नदीत डुंबलो…  गावाच्या नदीत डुंबणं राहूनच गेलं…चांदण्याचा स्पर्शभासही  नाहीच मिळाला. 

   खरं म्हणजे मर्ढेकरांचं सरकारी स्मारक केव्हाच व्हायचं. विजया राजाध्यक्ष यांनी ‘शोध मर्ढेकरांचा’ या ग्रंथात या न झालेल्या सरकारी स्मारकाची सविस्तर नोंद केली आहे. १९९४ मध्ये या मर्ढेकर स्मारकाचं भूमिपूजन झालं. स्मारकाचा आराखडा वास्तुविशारद श्री.उदयन श्रीनिवास कुलकर्णी यांनी केला, तो मंजूरही झाला. पण पुढे काहीच नाही. मग मर्ढेकर जन्मशताब्दी वर्षात तरी  ते काम मार्गी लागावं म्हणून स्मारकसमितीनं पाठपुरावा केला, तेव्हा ४८ लाखांचा निधी मंजूर झाला आणि ‘बांधकाम विभागाला तातडीने २५ लाख देण्याचा आदेश निघाला,’ अशी बातमी प्रसिद्ध झाली. (१६ नोव्हेंबर २००७ महाराष्ट्र टाइम्स) १ डिसेंबर २००८ ते ३० नोव्हेंबर २००९ हे मर्ढेकरांचं जन्मशताब्दी वर्ष. ते आलं आणि गेलं. स्मारक काही झालं नाही – ते आजपर्यंत. दरम्यान मर्ढेकरांच्या राहत्या घराचे पत्रे खराब झाले, घरात  गळायला लागलं, घर सांभाळणारं निकम कुटुंब आणि गावातील संवेदनशील पत्रकार अजित जाधव यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेच्या विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत, किशोर बेडकीहाळ आणि रवींद्र बेडकीहाळ इत्यादी मंडळींच्या कानावर ते घातलं. विनोद कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन निदान पत्रे तरी बदलू , असा विचार केला. पण घराची अवस्था अशी झाली होती, की गळके  पत्रे  काढले तेव्हा जुनं लाकडी काम वाळवी लागून खराब झालं होतं, ते कोसळलं. म्हणून  पैसे गोळा करून पुन्हा नव्याने बांधणी केली. मर्ढेकरांच्या नातेवाइकांचा शोध घेतला आणि रश्मी तुळजापूरकर, पाडळीकर यांच्याशी संपर्क साधून वीजजोडणी, पाणी वगैरे व्यवस्था केली. दिल्लीत असलेल्या राघव मर्ढेकरांशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी त्यांच्या आई अंजना मर्ढेकर यांच्या नावावर असलेलं ते घर बक्षीस म्हणून परिषदेला देऊ केलं. विनोद कुलकर्णी म्हणाले, “परिषदेच्या आम्ही कार्यकर्त्यांनी  विचारविनिमय करून  बक्षीसपत्र नको असं ठरवलं. आम्ही त्यांना कुलमुखत्यार पत्र मागितलं. त्यांनी त्याला मान्यता दिली आणि मग आम्ही पुढचं दुरुस्तीचं काम केलं. बांधकाम करून झाल्यावर त्याचं छोटेखानी स्मारक तयार झालं. सहा-सात लाख रुपये खर्च झाले. तरी थोडे पैसे कमी पडत होते. आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी दोन लाखांचा निधी उपलब्ध  करून दिला, त्यामुळे सरकारी नव्हे; पण लोकसहभागातून एक छोटं स्मारक तयार झालं.”

   मर्ढेकरांच्या या घराची कडी वाजवून सुप्रसिद्ध  लेखिका अरुणा ढेरे यांनी या स्मारकाचं उद्घाटन केलं. कडी वाजवली, दरवाजा उघडला, तेव्हा भिंतीवर लिहिलेल्या मर्ढेकरांच्या कवितांनी सर्वांचं स्वागत केलं. ‘गणपत वाणी’ ते ‘भंगु दे काठिन्य माझे’ पर्यंत आपल्याला माहिती असणाऱ्या, आपण वाचलेल्या आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केलेल्या कवितांनी त्या भिंती सजल्या आहेत. उजव्या बाजूच्या भिंतीत एक कोनाडा आहे, त्यात मर्ढेकरांचं सुरेख छायाचित्र आहे. त्यांचे विलक्षण बोलके डोळे लक्ष वेधून घेतात. आत गेलं, की छोटी स्वयंपाक खोली, तिला लागून आणखी एक लहानशी खोली(तिथं पूर्वी देवघर होतं.) आणि मागच्या बाजूला अंगण. उत्तुंग प्रतिभेच्या कवीचं सुबक, ठेंगणं घर.

      यानंतर एक छोटेखानी समारंभ  देवळाच्या सभामंडपात झाला. डॉ.अरुणा ढेरे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आमदार शिवेंद्रसिंह भोसले, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत, रवींद्र बेडकीहाळ, किशोर बेडकीहाळ, मर्ढेच्या सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, पत्रकार अजित जाधव इत्यादी मंडळी उपस्थित होती. गावकऱ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती.

   इतके दिवस त्या घराची देखभाल करणाऱ्या हिराबाई निकम या लोकार्पण सोहळ्याला हजर होत्या. परिषदेने आवर्जून त्यांचा सत्कार केला. बाई म्हणाल्या, “माईक द्या, मला बोलायचं आहे,” आणि त्यांनी हे स्मारक झालं, आता घर नीट जतन होईल, याचा आनंद व्यक्त केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या,  “युगप्रवर्तक कवीचं हे स्मारक आता नांदतं राहायला हवं. तिथे येणाऱ्या लोकांना मर्ढेकर या कवीविषयी अधिक काही समजेल, असे उपक्रम सुरू ठेवायला हवेत.” सरपंच सविताताई शिंगटे यांनी भिलार या पुस्तकांच्या गावासारखं मर्ढे हे कवितेचं गाव व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. म.सा.प. शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष  विनोद कुलकर्णी यांनी स्मारकाचा प्रवास मांडला. आमदार भोसले यांनी स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं, मदतीसाठी उभं राहण्याचं आश्वासन दिलं आणि यथोचित अध्यक्षीय समारोप प्रा. मिलिंद जोशी यांनी केला. 

  एके काळी खूपच मोठं काम केलेल्या माणसांच्या कुटुंबीयांनाही ते महत्त्व जाणवावं, असं वाटत असतं आपल्याला. तो सामाजिक-सांस्कृतिक ठेवा त्यांनी जतन करावा, अशी आपली अपेक्षा असते. मर्ढेकरांची  मोठी बहीण म्हणजे कमलताई. विवाहानंतरच्या  पाडळीकर. मर्ढेकरांना हे एकच सख्खं  भावंडं. दोघा भावंडांत अपार प्रेम होतं. त्याचं प्रत्यंतर या सोहळ्याच्या निमित्तानं आलं. हीदेखील फार आनंद देणारी गोष्ट. या कमलताईंना चार मुलगे. त्यांची मुलं, मुली म्हणजे मर्ढेकरांची नातवंडं असे १० जण या समारंभाला आवर्जून आले होते. सगळ्यांची वयं ७० ते ९०!  रश्मीताई तुळजापूरकर म्हणजे मर्ढेकरांच्या बहिणीची नात, यांनी समयोचित आणि हृद्य मनोगत व्यक्त केलं. आपल्या घरातील या थोर कवीविषयी वाटणारं कौतुक आणि अभिमान तर त्यात होताच; पण वेळ, पैसा खर्चून  हे स्मारक तयार करणाऱ्या मंडळींविषयी कृतज्ञतादेखील होती. सगळ्या उपस्थितांसाठी  त्या तिळगूळ घेऊन आल्या  होत्या.  घरातल्या या संचिताचं महत्त्व मर्ढेकरांच्या पुढच्या पिढ्यांना आहे, याचं समाधानही  या कार्यक्रमानं उपस्थितांना दिलं.    

  “संत दुष्काळामुळे गांजलेले तर मर्ढेकर industrialisation मुळे. ही यंत्रयुगातली संत कविताच आहे.”  हे पु. लं. चे उद्गार किती यथार्थ  आहेत! मर्ढेकरांच्या कवितेत संतत्व कसं निर्माण झालं असावं, त्याचा प्रत्यय त्या घरात उभं असताना पुन्हा आला. शासकीय स्मारक होईल तेव्हा होवो…मर्ढेकरांच्या घराचं स्मारक तर  झालं!

अशा येथल्या संसारांत

जगण्याचाही चुकला पाढा;

आणि शेवटीं परिस्थितीचा

गळ्याखालती उतरे काढा.

मर्ढेकरांनी या ओळी लिहिल्यानंतर आज कितीतरी वर्षांनी जणू चुकलेला पाढा बरोबर आला!! मर्ढे गावात मर्ढेकरांच्या घराचं स्मारक झालं! आता लोक ते पाहायला जातील, गावकरी  कौतुकानं पाहुण्यांना ते दाखवतील! नव्या पिढीला आपल्या गावाचा मोठा कवी म्हणून अभिमान वाटत राहील! 

***********

हा लेख ‘ललित’ मासिकाच्या मार्च २०२४ च्या अंकातून साभार पुनर्मुद्रित.  

प्रस्तुत लेखामध्ये मर्ढेकरांच्या शासकीय स्मारकाचा उल्लेख आहे.  या वेळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात संपन्न झाले.  त्या अनुषंगाने महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी.  
 

या बातमीची दखल मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी घेतली आणि स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वतीने त्यांनी दिला आहे.  पाहूया काय होते ते.. संपादक
 


Author

Leave a Reply