पाखरांच्या कविता
नजरेत संपूर्ण मावणारे
मेघाच्छादित कुंद आकाश
हिरव्यागार झालेल्या
वनराईच्या अगणित
पोपटी पानांना
संथ गतीने
अविरत भिडणाऱ्या
रिमझिम जलधारा
झाडाझाडांच्या पानांवर
पंख पालवून पाणी झटकत
संथ विसावणारे असंख्य पक्षी
हळू-हळू एकत्र येऊन
आपल्या चोचीने
पानांच्या शिरांखाली
बसतात लिहीत
असह्य वेदनांमुळे
मेघाश्रुंनी दाटून गेलेल्या
आभाळाच्या डोळ्यावरील
अगम्य कविता…
जखम
लपत छपत आलीस
मजला भेटायला
सुख दुखाच्या नेहमीच्या
त्या गप्पा झाल्या
आणि अचानक
तव नयनातून सांडू लागले अश्रू
हिरव्या गवतावर झाले
त्या अश्रुंचे दवबिंदू
गव्हाळ वर्णाच्या
तव नाजुकशा पायांवर
मोरपिसाने रेखीव केलेली
ती फिकट तांबडी
मोहक मेंदी
जाऊ लागली
कोरीत कोरीत
मम हृदयावर
तव विरहाने हुरहुरणारी
जखम स्मृतीची …
