कथा : भाजीवाल्याची बायको 

नितीनने खिडकीतून डोकावून बघितलं. समोरच्या दुकानासमोरची जागा मोकळी होती. तो चरफडला. त्याने मागे वळून भिंतीवरचं घड्याळ बघितलं. संध्याकाळचे पाच वाजत आले होते. एव्हाना शंकरने दुकान मांडायला हवं, आणखी उशीर झाला तर गिऱ्हाईक कमी होईल त्याचं, कळत कसं नाही याला? नितीन चिडचिडत राहिला. 

“अहो, बरोबर पाचच्या आसपास खिडकीपाशी का उभे राहता हो रोज तुम्ही?” मागून अरुणा ओरडली. 

“तुला काय करायचंय?” नितीन मागे वळून न पाहता पुटपुटला. 

“काय पुटपुटलात? दम असेल तर मोठ्याने बोला की!”

“दम नसायला काय झालं?”

“मग बोला की,” अरुणाने डिवचलं 

नितीनने आता मागे वळून तिच्याकडे बघितलं. विजयी मुद्रेने त्याच्याकडे बघत ती दाताखाली ओठ दाबून उभी होती. ही तिची आणखी एक सवय. त्याला आताशा आवडेनाशी झालेली. त्याला डिवचून ती दाताखाली ओठ गच्च दाबून त्याच्याकडे बघत उभी राहायची. सुरुवातीला त्याला फार आवडे हे. मग तिच्याजवळ जाऊन तो बोटाने अलगद ओठ सोडवत असे. त्यावरून हळुवार बोट फिरवत असे. मग जरा जोराने जरासा तिचा ओठ कुस्करत असे. तिचा तापलेला श्वास त्याच्या हातावर येई. मग तसेच तिला जवळ ओढून घेई तो. आताही त्या आठवणीने त्याला चाळवल्यासारखं झालं; तरीही तो जागचा हलला नाही. ती तशीच कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे आव्हानात्मक नजरेने बघत उभी होती. त्याने मान फिरवली. तो पुन्हा खिडकीतून बाहेर बघायला लागला. ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. तो अस्वस्थ झाला. नेमकी ही शेजारी असताना शंकर यायला नको, नाहीतर हिला कळेल म्हणून त्याने चोरून अरुणाकडे बघितलं. ती त्याच्याचकडे बघत होती. तो चमकला. पट्कन खिडकीपासून बाजूला झाला. एका ढांगेत त्याने पलंग गाठला आणि तो पलंगावर बसून राहिला. अरुणाने त्याच्याकडे बघितलं आणि बरंच काही बोलायचं असल्यासारखं तिनं तोंड उघडलं. मग काहीच न बोलता त्याच्याकडे जळजळीत नजरेने बघून ती खोलीबाहेर पडली. 

बाहेर गाडी मागे घेत असल्याचा आवाज आला. तो ताड्कन उठून खिडकीपाशी गेला. 

शंकरच आला होता. शंकरने टेंपोच्या पुढच्या दारातून खाली उडी मारली. तो चपळाईने मागच्या बाजूला गेला. त्याने आडव्या अर्ध्या फळीचा अडसर काढला आणि हात पुढे केला. त्याचा हात धरून तिने खाली उडी मारली. उडी मारताना एका हाताने तिने ओढणी छातीपाशी गच्च धरली होती. उतरल्याबरोबर तिने हौद्यात कडेला ठेवलेली चप्पल खाली टाकली. ती पायांत सरकवून तिने भाजीच्या पाट्या उतरवायला सुरुवात केली. तिच्या हालचालीत सहज चपळाई आणि सफाईदार लय होती. पाट्या उतरवून घेऊन ती दुकानाकडे वळली. दुकान म्हणण्यापेक्षा चार दुकानांच्या शेजारची मोकळी जागा त्यांची होती. त्या जागेला शंकरने एक मोठा पत्रा लावून घेतला होता. पत्र्याखाली तीन पायऱ्यांचा मोठा लोखंडी स्टॅंड होता. तेच त्याचं दुकान होतं. तिथे भाजी लावली की तो शेवटी टेंपोतून वजनकाटा काढे. त्याची बायको त्याला हळदकुंकू आणि चार फुलं वाही आणि मग दुकान सुरू होत असे. रोज सकाळ-संध्याकाळ यात बदल नसे. मग येताजाता लोक कोपऱ्यावर गाडी थांबवून कधी गाडीवरूनच भाजी घेत. अरुणाही कधी कधी खिडकीतून काय भाजी आली ते बघत असे. बरी वाटली तर ती खाली जाऊन घेऊन येत असे. का कोण जाणे पण तिने कधीही आत्तापर्यंत नितीनला शंकरकडे भाजी आणायला पाठवलं नव्हतं. त्याचं नाव शंकर आहे हे तिनेच नितीनला सांगितलं होतं. 

नितीन खिडकीतून त्या दोघांकडे बघत होता. भाजीवाल्याच्या बायकोने मान वर करून मध्येच त्याच्याकडे पाहिलं आणि रोखून पाहिलं. ती दाताखाली ओठ दाबून हातात पाटी धरून उभी होती. नितीनचं रक्त तापलं. त्याच्या खिडकीतून ती स्पष्ट दिसत होती. तिचा घामाने डवरलेला चेहरा, मानेवर सुटलेले केस, खांद्यावर पिन लावलेली असली तरी घसरणारी ओढणी – सगळं त्याला नीटच दिसत होतं. त्याचा श्वास फुलला. पाय जमिनीत रुतले. दोन्ही हातांच्या पंज्यांनी त्याने खिडकीचे गज दाबून पकडले. तिच्या ओठाच्या कोपऱ्यात हसू उमटलं असावं. त्याच्याकडे बघून हसल्या न हसल्यासारखं करत ती गर्रकन वळली. 

नितीन मागे सरकला आणि भानावर आला. पलंगाचा काठ पकडून त्याने मोठे मोठे श्वास घेतले. त्याच्याने उभं राहवेना. तो धपकन पलंगावर बसला. खिशातून रुमाल काढून त्याने खसखसून चेहरा पुसला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. काय होतंय हे त्याने स्वतःला विचारलं. हे बरं नाही असं स्वतःला सांगून तो बसून राहिला. जराशाने त्याला शांत वाटलं. त्याने रुमालाची व्यवस्थित घडी करून तो खिशात सारला. मान वर केली आणि तो दचकलाच. अरुणा हातात चहाचा कप घेऊन तिथे उभी होती. ही किती वेळ अशी उभी आहे माझ्याकडे बघत, त्याच्या मनात भीती उमटली. त्याला तिच्याकडे बघता येईना. ती पुढे झाली. तिने पलंगाच्या शेजारच्या छोट्या स्टुलावर चहाचा कप ठेवला आणि त्याच्याकडे न बघता ती निघून गेली. 

नितीनने सुटकेचा श्वास सोडला. आपण इतका वेळ श्वास रोखून धरला होता हेही त्याच्या लक्षात आलं नाही. तो कप घेऊन उठला आणि खिडकीत उभा राहिला. शंकर आणि त्याच्या बायकोने आता दुकान लावलं होतं. काट्याची पूजाही करून झाली होती. हळूहळू त्याच्याकडे गर्दी वाढू लागली. तिन्हीसांजा काळवंडल्या तसा नाइलाजाने नितीन खिडकीपासून बाजूला झाला. चहाचा रिकामा कप त्याने स्टुलावर ठेवला. डोळ्यावर हात घेऊन तो पडून राहिला. शंकरच्या बायकोचा आजचा पंजाबी ड्रेस छान होता. हिरव्या रंगाच्या ड्रेसवर गुलाबी पिवळं भरतकाम होतं आणि त्यावर पिवळी ओढणी. छान दिसत होती ती. सुरुवातीला ती शंकरबरोबर येई तेव्हा ती पंजाबी ड्रेस घालत नसे. छान साड्या नेसत असे. नितीनला फार आवडे तिचं ते चापून चोपून साड्या नेसणं. तेव्हा शंकरचा छोटा भाऊही मदतीला असे. भाऊ की मुलगा, त्याला नीट आठवेना. कुणी का असेना येत होता एवढं पुरेसं आहे, त्यानं स्वतःची समजूत काढली. मग तो जो कुणी होता तो यायचा बंद झाला. शंकरला मदतीची गरज लागायला लागली. त्याची बायको मदतीला यायला लागली. तेव्हापासून मग तिने साड्या नेसणं बंद केलं आणि सरळ पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली. नितीन जरा खट्टूच झाला होता तेव्हा. साडीचा पदर खोचून ती उभी राहिली की तिची कंबर उठावदार दिसायची. तिच्या त्या कमानी वळणावरून नितीनने मनातल्या मनात कितीदा तरी बोट फिरवलं होतं. ती ड्रेस घालायला लागली ते त्याला फारसं आवडलं नव्हतं ते त्यामुळेच. पण त्याने चालवून घेतलं. तिला ड्रेस जास्त छान दिसतो असं त्याने ठरवूनही टाकलं. आजही तिला छानच दिसत होता ड्रेस. एका बाजूला ओढणी घेऊन तिने कमरेपाशी ओढणीची गाठ मारली असेल, बघायला हवं, त्याच्या मनात आलं; पण उठायचा त्याला कंटाळा आला. असेलच मारलेली गाठ तिने, तिची सवयच आहे तशी, तो पुटपुटला. 

खसकन लाईट लागला. अरुणा येऊन खोलीत दिवा लावून गेली होती. ही कधी येते कधी जाते कळतच नाही काही. नितीन बावचळला. त्याला परत श्वास लागला. घाईघाईने स्टुलावरच्या तांब्यातून त्याने दोन घोट पाणी प्यायलं. तो परत खिडकीपाशी येऊन उभा राहिला. शंकरने आता दुकानात दिवा लावला होता. त्या सौम्य प्रकाशात त्याच्या बायकोच्या ड्रेसवरच्या टिकल्या चमकत होत्या. किती मजा येईल त्या टिकल्या मोजायला, नितीनच्या मनात आलं. एक  अन् एक टिकलीवर बोट ठेवून मोजायला पाहिजे. एक दोन तीन पंधरा सव्वीस… “अगं थांब वळू नकोस!  चुकेन ना मी… अगं थांब”  नितीनला हसू फुटलं. तो पलंगावर पडून हसू लागला. अरुणा येऊन उभी राहिली तरी तो खुदुखुदु  हसतच होता. 

अरुणाने स्टुलावर ताट ठेवलं. 

“अहो जेवून घ्या!” 

नितीन तिच्याकडे बघत होता. तिने त्याच्या दंडाला धरून गदागदा हलवलं. 

“अहो जेवून घ्या!”

“हो, हो, जेवतो,” नितीन खुदुखुदु हसत म्हणाला. 

त्याने जेवायला सुरुवात केली. अरुणा त्याचं जेवण होईपर्यंत तिथे उभी राहिली. जेवण झाल्यावर त्याने पानातच हात धुतले. रुमालाला तोंड पुसून तो उभा राहिला. 

“छान झालं होतं सगळं!” तो मनापासून म्हणाला. 

अरुणाने त्याच्याकडे बघितलं. डोळ्यांतलं पाणी लपवून ती वेगाने खोलीबाहेर पडली. नितीन परत खिडकीशी उभा राहिला. शंकरने दुकान आवरायला सुरुवात केली होती. त्याची बायकोही आता पटापट सामान आवरायला मदत करत होती. नितीनला वाटलं खाली जाऊन त्याला मदत करावी. तो वळला पण मग त्याला कंटाळाच आला एकदम. शंकर करेल तिला मदत, त्याने विचार केला आणि तो पडून राहिला. तिच्या ड्रेसवरच्या टिकल्या मोजत होता तो कितीतरी वेळ. त्याला कधी झोप लागली त्याला कळलंही नाही. 

सकाळी अरुणा चहा घेऊन आली तेव्हा त्याला नुकतीच जाग आली होती. तिला जवळ ओढावी आणि पलंगावर घेऊन तिच्यावर स्वार व्हावं असं त्याला तीव्रतेने वाटलं. काय छान लाजायची अरुणा, आता काही हळुवार शिल्लकच नाहीये आपल्यात, त्याला मनापासून वाईट वाटलं. 

“अरुणा मी खूप वाईट वागतो ना गं तुझ्याशी?” 

“चहा घ्या. असल्या गप्पा मारायला वेळ नाही मला,” तिने त्याला तोडून टाकलं एकदम. 

त्याने मुकाट्याने कप उचलला आणि तो खिडकीशी उभा राहिला. भाजीवाल्याची बायको लगबगीने हातात दोन पिशव्या घेऊन समोरच्या इमारतीत शिरताना त्याला दिसली. तिकडे कुठे गेली ही, असा तो विचार करतच होता आणि ती बाहेर आली. त्याने निरखून पाहिलं. शंकर आणि त्याचा टेंपो दिसत नव्हता. 

“शुक शुक” त्याने वरतून हाक मारली. तिने वर बघितलं. 

“भाजी आणून द्याल का वर?” नितीनने विचारलं 

“काय हवीय?” 

“कुठलीही द्या. तीन-चार द्या पाव पाव किलो” नितीन ओरडला. 

तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं आणि तीन ताज्या भाज्या पिशवीत भरल्या. नितीनचा आनंद मनात मावेना. त्याने लगबगीने नवा शर्ट चढवला आणि तो भांग पाडून दारापाशी उभा राहिला. ती वर आली आणि दारात उभी राहिली. जिने चढून आल्याने तिचा श्वास वरखाली झाला होता. दाताखाली ओठ दाबून ती दारात उभी होती. नितीनचं भान सुटलं. तो पुढे झेपावला. त्याने तिला दारातून आत ओढली. बोटाने तिच्या दाताखालचा ओठ त्याने सोडवला आणि जरासा कुस्करला. पटकन त्याने तिच्या ओठावर ओठ टेकले आणि तिच्या कमरेवरून तो बोट फिरवणार इतक्यात ती जोरात ओरडली. 

अशी काय करते ही, त्याच्या मनात विचारांचं रान पेटलं. किती आवडायचं तुला हे अरुणा, थांब ना अगं, मला टिकल्या मोजू दे ना, त्याला सांगावंसं वाटलं अधिकारानं. पण त्याच्या तोंडून शब्द फुटे ना! ती ओरडतच होती. मागून अरुणा धावत जिना चढताना त्याला दिसली. त्याने तिचा हात सोडला आणि तो भिंतीला चिकटला. अरुणा त्याच्या आणि भाजीवाल्याच्या बायकोच्या मध्ये उभी राहिली. आसपासचे लोक जमा व्हायला लागले. भाजीवाल्याची बायको रागानं, शरमेनं थरथरत होती. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. अरुणाने त्याच्या खोलीला बाहेरून कडी घातली. तो दाराला कान लावून उभा राहिला. 

“ताई, मी पदर पसरते, त्यांना माफ करा हो.” त्याला अरुणाचा रडणारा आवाज ऐकू आला. तो भिंतीवरून घरंगळत खाली बसला. 

“अपघात… डोक्याला मार लागलाय त्यांच्या… अरुणा गेली… त्याचाही परिणाम… मी काम करते इथे… नाही औषध नाहीये… थोडेच दिवस शिल्लक…”

त्याच्या कानावर तुकडे पडत होते. अंधार दाटून येत होता. ड्रेसवरच्या टिकल्या मावळत विझत होत्या.  

Author

Leave a Reply