या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत साताऱ्याच्या मनस्विनी लाटकर. त्या स्वतःविषयी सांगतात :
मी मनस्विनी लाटकर, सातारा. मी फाईन आर्ट्स घेऊन पुण्याच्या भारती विद्यापीठामधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मी freelancing करायचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात २०१७ पासून केली. लोकांना माझं काम माहीत होण्यास थोडासा वेळ लागला.
पहिलं काम कसं मिळालं?
मी पाचगणीला MRA सेंटरच्या ‘Lead for change’ या कार्यशाळेला गेले असताना माझी चित्रकला शैली पाहून तेथील संचालकांनी मला त्यांच्या एका प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतले. ते काम होते पुण्यातील एका शाळेसाठी ‘पालकत्व’ या विषयावर हस्तपुस्तिका बनविण्याचे.
सामाजिक काम
सातारा, पुणे, आसाम या ठिकाणी कार्यरत असलेल्या ‘परिवर्तन’ या संस्थेत रुग्णांना चित्रकला शिकवताना डॉ. हमीद दाभोलकर सरांकडून ते चालवीत असलेल्या ‘सुइसाईड हेल्पलाईन’वर पोस्टर्स करायचे काम मिळाले.
सातारच्या आझाद कॉलेजमध्ये पोस्टर painting workshop घेतले.
बाकी महत्त्वाची कामे
‘चिकूपिकू’ या मासिकात ड्रॉ करायची संधी मिळाली.
पुण्याच्या राजेंद्र झुंजारराव यांच्या ‘लहान मुलांसाठीच्या कवितांवरील’ पुस्तकात चित्रकार म्हणून वाटा होता.
डॉ. प्रसन्न दाभोलकर यांच्या ‘चिमुकल्यांची गाणी’ या पुस्तकात चित्रकार म्हणून सहभाग दिला.
चित्रकला – माझा छंद
मला लहानपणापासून कविता लिहिणे व चित्र काढणे यांची आवड होती. रोज नवीन काहीतरी निर्मिती करायचे… त्यात accuracy नसली तरी आनंद होता. मला खेळापेक्षा अधिक समाधान चित्रकला व कवितेतून मिळायचे.
माझे चित्रकलेबद्दल मत :
आधी मला लाख वाटायचं, की इतरांप्रमाणे एखादी पूर्ण वेळ नोकरी घ्यावी; पण माझं मलाच समजलं, की आपण एकटीने एखादे काम जास्त छान करू शकतो आणि आजही मला रोज नवीन काहीतरी रेखाटायचं असतं, चित्रकलेमधील नवीन तंत्रे माहिती करून घ्यायची असतात आणि माझ्या मते, याला कसलीच मर्यादा नाही. क्वचित प्रसंगी आपलं काही चुकलं तरी, “मला कुठे काय येतं?” असं न म्हणता कलेत रमून जायचं असतं. स्वतःच्या चुका स्वतःला माहीत हव्या किंवा त्या इतर कुणी दाखवून दिल्या तर त्या सकारात्मकतेने स्वीकारायच्या असतात.
इतर ॲक्टिव्हिटीज
अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत असते. त्यात कधी एखादं चित्र विकलं जातं; तर कधी पहिला नंबर येतो आणि कधी मेहनत वायासुद्धा जाते; पण मी स्पर्धेत भाग घेताना मला एक वेगळी नवी संधी मिळणार आहे असं म्हणून उत्साहाने या अशा स्पर्धांमध्ये भाग घेते.
शिवाय मी सध्या लहान मुलांना चित्रकला शिकवण्याचे काम करत आहे.
त्यातून मला हे कळतंय, की मी चित्रकार तर आहेच पण आता हळूहळू मी लहानग्यांना आवडणारी चित्रकला शिकवणारी एक शिक्षिकाही होत आहे. यातून मला मिळणारा आनंद व समाधान खूप वेगळे आहे.
मनस्विनी लाटकर
७३५०२८११०९
