आकाशवाणीचं हे…
‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।
वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’
(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे. ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)
भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या जोरदार आक्रमणामुळे आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते; परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले; स्वतःचे ॲप तयार केले; विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व विश्वासार्हता टिकवून आहे. शतकपूर्तीच्या या वळणावाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत.
भाग २
जनमानसात खोलवर
खरं म्हणजे ‘रेडिओ माध्यमाची १०० वर्षे…’ अशा काही गंभीर विषयाचा लेखाजोखा
आणि अभ्यास मांडावा असा माझा आणि संपादकांचा हेतू आहे, असे प्रामाणिकपणे मला वाटत नाही. भारतीय जनमानसात या माध्यमाने कशा रंगच्छटा उमटवल्या आहेत, हे माध्यम समाजजीवनाशी किती समरूप, समरस झाले आहे, तो अंतर्नाद ऐकावा अशीच फक्त अंतस्थ इच्छा आहे.
आत्ता या क्षणी माझ्या लेखन बैठकीत अलीकडची काही पुस्तकं माझ्या आसपास आहेत. ही पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांच्या जीवनात रेडिओचे किती स्थान होते हे ओघाने आलेला संदर्भ पाहणं मोठं गमतीशीर आहे. आकाशवाणी या माध्यमाचा समाजजीवनाशी जो संगम झाला आहे त्याला बोलकं करणारे हे संदर्भ आहेत. एखादं माध्यम ‘आपलं’ म्हणून समाज दीर्घकाळ स्वीकारतो – केवळ इतर पर्याय नाहीत म्हणून नव्हे; तर आपल्या इच्छा, आकांक्षांचे प्रतीक म्हणून, आपल्या मनातले, आपल्या इच्छेसारखे काही सांगितले जाते म्हणून, आपणही त्यांच्यामार्फत काही सांगावे म्हणून आणि हे सगळं ऐकणाऱ्यांची दैनंदिनी न बिघडवत, श्रोत्यांच्या जीवनशैलीत हस्तक्षेप न करता – फिलॉसॉफर फ्रेंड म्हणून, हितचिंतक मित्र म्हणून.
सुप्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकर यांना रेडिओ फार प्रिय. त्यांचे बंधू डॉ. के.रं.शिरवाडकर, ‘तो प्रवास सुंदर होता’ या पुस्तकात लिहितात, की रात्रभर तात्या उशाशी ट्रांझिस्टर चालू ठेवून झोपत. जागे असतील तर काटे फिरवीत पडत. तात्यांना आपल्या परिवारात – मित्रवर्गात – रेडिओ भेट देण्याचे जणू वेड होते. ‘आनंद’ या गाजलेल्या चित्रपटाचे जे मूळ पुस्तक त्यांना हृषिकेश मुखर्जी यांनी दिले होते, त्यावर आधारित हृदयस्पर्शी नाटक कुसुमाग्रजांनी लिहिलं. या नाटकातील आनंद, दुसरे एक पात्र बाजीराव यांना आपण अनेकांना रेडिओ कसे भेट देतो हे एके ठिकाणी सांगत आहे.
आनंदचे उद्गार फार समर्पक आहेत. तो म्हणतो, “बाजीराव काका, मी एखाद्याला ट्रांझिस्टर देतो तेव्हा त्याला काही दोनशे-तीनशे रुपयांचे यंत्र देत नाही! मी देतो त्याला कुमार गंधर्वांचा राजसी स्वर, भीमसेन जोशींची मनभरी मैफल! देशोदेशींच्या लता-आशांच्या गीतगंगा मी त्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवतो. स्वतः हात कोंडलेल्या जिवाला मी साऱ्या दुनियेचा रिश्तेदार बनवतो. अरे! ट्रांझिस्टरचे काटे इकडे तिकडे फिरवून पहा, पृथ्वीच्या गोलावरचे सारे समाज आपल्या कमऱ्यामध्ये दाखल होतात.” तात्यासाहेब आनंदच्या मुखातून जणू त्यांच्याच भावना बोलतायत.
‘गीत रामायण’ हा आकाशवाणीच्या इतिहासातला मानाचा तुरा आहे; मोरपीस आहे.
शरद तळवळकर, सई परांजपे यांच्या जीवन-अनुभव कथनात पुणे आकाशवाणीत ‘गीत रामायण’ घडत असतानाचे साक्षीदार म्हणून सांगितलेले अनुभव आहेत. त्या वेळेचे सारे चित्र साक्षात बाबूजींच्या (सुधीर फडके) आत्मचरित्रात, ललिता फडके यांच्या लेखात
विस्ताराने अनुभवायला मिळते. ‘जगाच्या पाठीवर’ या अपूर्ण आत्मचरित्रात बाबूजी बहुधा गीत रामायणापर्यंत आलेले नाहीत; पण ललिताबाईंच्या आठवणींत गीत रामायणाच्या
आठवणी आहेत. आकाशवाणीच्या लोकप्रियतेत तेव्हा गीत रामायणाने बजावलेली भूमिका आजतागायत चालू आहे. त्या वेळी रेडिओच्या भोवती बसून गीत रामायण सुरू होण्यापूर्वी संचाला हार घालणे, समोर उदबत्ती लावणे हे प्रकार व्हायचे. एखादे माध्यम जनमानसात किती खोलवर रुजते त्याचे यापेक्षा उत्तम उदाहरण असू शकत नाही.
‘नादब्रह्म स्वरयोगी’ या पंडित राम मराठे चरित्र ग्रंथात मुंबई आकाशवाणीवर १५ जुलै १९८७ रोजी झालेल्या बालगंधर्व जन्मशताब्दी निमित्तच्या कार्यक्रमाची फार छान आठवण कृष्णराव चोणकरांनी सांगितली आहे.
गंधर्व कंपनीच्या कार्यक्रमाच्या वेळी समोरच्या दोन जागा नेहमी खाँसाहेब अल्लादिया खाँ यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या असायच्या. ‘संगीत स्वयंवरा’चा प्रयोग एवढा सुंदर झाला आणि सगळी सुप्रसिद्ध नाट्यगीतं एवढी रंगली, की तिसरा अंक संपताच खाँसाहेब साश्रू नयनांनी आत आले. बालगंधर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. खाँसाहेब त्यांना म्हणाले, “तुम्ही जे गाऊ शकता ते आम्ही गाऊ शकत नाही.’’ आकाशवाणी अशा अनेक प्रसंगांची साक्षीदार तर आहेच; पण नामवंतांच्या आठवणी जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम रेडिओ
कार्यक्रमांनी केले आहे. कवी पद्मश्री सुधांशु, प्राचार्य म. द. हातकणंगलेकर यांनीही सांगली
आकाशवाणी बाबतच्या आपल्या हृद्य आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. सांगली केंद्राविषयीच्या स्मरणिकेत त्या वाचायला मिळतात. ‘दत्त दिगंबर दैवत माझे,’ ‘गुरुदत्त पाहिले कृष्णातटी,’ ‘जयजय दत्तराज माउली,’ ‘इथेच आणि या बांधावर’ ही सगळी आकाशवाणीवरून घराघरांत गेलेली प्रसिद्ध गाणी सुधांशू यांचीच. त्यांनी या बाबतीत आकाशवाणीचे ऋण शब्दातीत असल्याचे म्हटले आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते शरद तळवलकर यांनी आपल्या आयुष्यातल्या अनेक आठवणी‘ऋणानुबंध’ या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत. १९५३-५४ दरम्यान गीत रामायणाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तळवळकर तिथे अनेकदा होते. त्या काळी अनेक श्रुतिका आणि नाटकांत भाग घ्यायला शरद तळवळकर पुणे आकाशवाणीत जायचे. माडगूळकर, पु. ल., सीताकांत लाड यांच्या हृद्य आठवणी सांगताना तळवळकर आपली पुणे विद्यापीठातील नोकरी सांभाळून
रेडिओतले काम कसे करायचे, तिथले वातावरण कसे जिव्हाळ्याचे होते वगैरे उल्लेख केले आहेत. वाचताना ते वर्णन ७५ वर्षांपूर्वींचे आहे, यावर विश्वास बसत नाही. आकाशवाणी ही कर्तृत्ववान लेखक, प्रतिभावान कलाकार, संवेदनशील अधिकारी या सर्वांची मांदियाळी होती – असायलाच हवी! निर्मितिशील वातावरणात अनेक अर्थपूर्ण कार्यक्रम हसत खेळत तयार व्हायचे. अशाच वातावरणाचे वर्णन सई परांजपे यांच्या ‘सय’ या आत्मचरित्रात आहे. सई परांजपे यांनी ‘रेडिओतले दिवस’ असे स्वतंत्र दीर्घ प्रकरणच पुस्तकात लिहिले आहे.
आकाशवाणी पुण्याच्या जुन्या जाणत्या निवेदिता रंजना पंडित यांच्या ‘दरवळ’ या आशयसंपन्न पुस्तकासाठी मुलाखत देताना संगीतकार आणि भावगीत गायक गजानन वाटवे यांनी आकाशवाणीचा फार गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितलेल्या प्रसंगाचा काळ १९५१ चा आहे – म्हणजे ७५ वर्षांपूर्वीचा. ते सांगतात, “१९५१ पासून रेडिओवर मी चाली द्यायला सुरुवात केली. केशवराव भोळेंसारखा मोठा माणूस तिथे संगीतकार होता. इथेच जोत्स्ना भोळे, माणिक वर्मा, सुमन हेमाडी म्हणजे सुमन कल्याणपूर, कुमुदिनी पेडणेकर यांच्यासारख्या गोड गळ्याच्या गायिका मिळणं हे संगीतकार म्हणूनच माझे भाग्य होते.”
वाटवे यांच्या उद्गारांनी आकाशवाणीचे एक सुंदर स्टुडिओ चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हे
चित्र अशा बऱ्याच ठिकाणी होते.
मुंबई आकाशवाणीत मो. ग. रांगणेकर, वा.रा.कांत, मंगेश पाडगावकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, करुणा देव आदी मान्यवर माणसं आपापली काम करण्यात मग्न आहेत – या दृश्याची कल्पनाच किती सुखद वाटते!
अगदी अलीकडे २०१८ मध्ये कोल्हापूरचे प्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि सहृदयी वक्ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ‘आकाश संवाद’ पुस्तकात आपल्या एकूण घडण्यात आकाशवाणीचा किती मोठा वाटा आहे, याचे प्रांजळ कथन केले आहे. ‘आकाशवाणी ही वक्ता घडविणारी दुर्मीळ पाठशाळाच आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
साहित्य, संगीत, नाटक विश्वातले इंद्रधनुषी रंग स्टुडिओत उतरवण्याचे ते दिवस होते. हे इंद्रधनुष्य श्रोत्यांना अनुभवायचे होते, ते मात्र शब्द आणि ध्वनिरूपात. श्रोत्यांनी हा
आनंद बऱ्याच प्रमाणात उपभोगला. ती परंपरा पुढे किती – कधी विस्तारत किंवा कधी – किती- कशी संकोचत गेली ते पाहणे, हा या माध्यमाच्या सामाजिक इतिहासाचा भाग ठरणार आहे.
* * * * *
महात्मा गांधी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी प्रसारण भवनात, दिल्ली.
सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या व्यावसायिक वाटचालीचा श्रीगणेशा पुणे आकाशवाणीतून झाला. १९५५ दरम्यानचा हा फोटो. लहान मुलांसाठी कार्यक्रम सादर करताना सईताई. मागे गोपीनाथ तळवलकर.
खांडवा ( मध्यप्रदेश) आकाशवाणीची टीम एका खेड्यात शेतकरी आणि गावकरी यांचे ध्वनिमुद्रण करताना. समवेत – उत्सुक गावकरी.
(काळ साधारण २००३)
पुणे आकाशवाणीतर्फे ६ मार्च १९५८ रोजी आयोजित एका संगीत मैफिलीत गझल सम्राज्ञी बेगम अख्तर
