प्रत्येक प्रांतात कुठल्या ना कुठल्या श्रेष्ठ विभूती होऊन गेलेल्या असतात आणि त्यांचा सार्थ अभिमान तेथील जनतेला असतो. त्यात काहीच गैर नाही. ‘यांची तेजस्वी परंपरा म्हणजे मी’ ही जाणीव कुठल्याही समाजात एक अस्मिता निर्माण करते आणि समाजाच्या सांस्कृतिक घडणीसाठी तशी सामूहिक अस्मिता आवश्यकही असते. म्हणूनच एखादा प्रांत नीट समजून घेण्यासाठी तेथील लोकांच्या अस्मितेचे विषयही समजून घेणे उपयुक्त असते. ओडिशाचा असा एक मानबिंदू म्हणजे बिजू पटनाईक. त्यांचा ठसा राज्यभर उमटलेला आहे. भुबनेश्वर येथील विमानतळालाही बिजू पटनाईक यांचेच नाव दिले आहे. दुर्दैवाने आपल्या अनेक वाचकांना त्यांच्याविषयी फारच कमी माहिती असते.
५ मार्च १९१६ रोजी जन्मलेले बिजयानंद उर्फ बिजू पटनाईक आधुनिक ओडिशाचे निर्माते होते असे म्हणता येईल. कटकमधील एका प्रतिष्ठित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून ते अतिशय धाडसी म्हणून प्रसिद्ध होते. कटक ते पेशावर हा भारताच्या दोन टोकांमधला २१०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी चक्क एका सायकलवरून केला होता. देशभर त्या काळी हे साहसी कृत्य खूप गाजले होते. एरोनॉटिक्समध्ये परदेशी शिक्षण घेऊन ते १९३६ साली ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्समध्ये फायटर पायलट म्हणून दाखल झाले. दुसर्या महायुद्धातदेखील त्यांनी पायलट म्हणून महत्त्वाचा भाग घेतला होता. हिटलरच्या फौजांनी जेव्हा स्टॅलिनग्राडला वेढा घातला होता, तेव्हा शहरात अडकून पडलेल्या रशियन जनतेसाठी विमानांतून रसद टाकणार्या मिशनमध्ये त्यांचाही समावेश होता. त्यांच्या या धाडसी कृत्याबद्दल रशियन सरकारने १९४९ साली ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ हा पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सन्मान केला होता.
पायलट म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यालाही शक्य तितकी मदत केली होती. विख्यात स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न अरुणा असफ अली १९४२ साली जेव्हा भूमिगत होत्या, तेव्हा पटनाईक यांनी त्यांना आपल्या कटकमधील घरात आसरा दिला होता. त्या वेळी अरुणा असफ अली यांचा ठावाठिकाणा सांगणार्या व्यक्तीला ब्रिटिश सरकारने ४०,००० रुपयांचे इनाम जाहीर केले होते. (त्या रकमेचे आजचे मूल्य कदाचित वर आणखी दोन पुज्ये इतके असेल!) जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्याशी त्यांची निकटची मैत्री होती. आपल्या विमानातून ते भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना गोपनीय माहिती पुरवणारी पत्रके आकाशातून जमिनीवर टाकून वितरित करत असत. ते उघडकीला आल्यावर पटनाईक यांना १९४३ ते १९४६ तुरुंगवास भोगावा लागला होता.
इंडोनेशियन नेत्यांनाही डच सरकारविरुद्धच्या त्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात पटनाईक यांनी मदत केली होती. दुसर्या महायुद्धानंतर डच सरकारने सुलतान सह्यरीर खान व डॉक्टर मुहम्मद हट्टा या दोन मोठ्या इंडोनेशियन नेत्यांना जावा येथे नजरकैदेत ठेवले होते. पंडित नेहरू यांच्या विनंतीवरून २२ जुलै १९४७ रोजी आपले खासगी विमान घेऊन पटनाईक जावा येथे गेले, बंदिस्त नेत्यांचा पत्ता त्यांनी शोधून काढला (गूगल मॅप नसतानाच्या त्या काळात!) व त्यांना आपल्याबरोबर विमानात घेऊन सिंगापूरमार्गे भारतात आणले. भारतात आल्यावर इतर जागतिक नेत्यांशी ते इंडोनेशियन नेते संपर्क साधू शकले व इंडोनेशियातील सत्य परिस्थिती जगाला समजू शकली. डच सरकार त्यामुळे बरेच चिडले होते. जागतिक हवाई इतिहासात एक धाडसी उड्डाण म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व धाडसाबद्दल ‘भूमिपुत्र’ हा आपल्या देशातील सर्वोच्च सन्मान इंडोनेशियन सरकारने पटनाईक यांना दिला; शिवाय आपल्या देशाचे सन्माननीय नागरिकत्वदेखील बहाल केले. विशेष म्हणजे देशाच्या या सर्वोच्च सन्मानासाठी वापरलेला शब्ददेखील संस्कृत आहे! इंडोनेशियातील सुलतान व राणीसाहिबा यांनी ते भारतात आले असताना ७ मार्च २०१९ रोजी पुरीला जाऊन जगन्नाथाचे दर्शन घेतले होते. एका मुसलमान सुलतानाने व राणीने असे जाहीररीत्या हिंदू देवाचे दर्शन घेणे हे खूप दुर्मीळ होते. वृत्तपत्रातील बातमीनुसार त्या वेळी राणीसाहिबा म्हणाल्या होत्या, “जगन्नाथ हा आमचा देव आहे. माझ्या लोकांसाठी व देशासाठी मी त्याचे आशीर्वाद घेतले.”
प्राचीन काळात तमिळनाडू-आंध्रमधील पल्लवा व चोला राजांप्रमाणे ओडिशाच्या गंग राजांची जहाजेही सररास परदेशी जात. ओडिशाहून पूर्वेच्या दिशेने जाणारी व्यापार्यांची जहाजे पार जावा, सुमात्रापर्यंत म्हणजे आताच्या इंडोनेशियापर्यंत जात असत. त्यांनीच हिंदू आणि बौद्ध हे धर्म त्या देशांत नेले. हातात तलवार न घेता केला गेलेला तो धर्मप्रसार आणि संस्कृतिप्रसार होता. आताचे इंडोनेशिया (पूर्वीचे जावा, सुमात्रा), कंबोडिया (पूर्वीचे कंबूज द्वीप), थायलंड (पूर्वीचे सयाम) या राष्ट्रांवर हिंदू संस्कृतीचा जो प्रभाव आढळतो त्याचे श्रेय आपल्याला पल्लवा आणि चोला राजांप्रमाणे किंवा सम्राट अशोकाप्रमाणे ओडिशाच्या तत्कालीन राजांनाही द्यावे लागेल. प्राचीन संस्कृत साहित्यात थायलंडचा उल्लेख ‘सुवर्णभूमी’ असा केलेला आहे आणि आजही बँकॉक विमानतळाला सुवर्णभूमी हेच नाव आहे. रामायणातील चित्रे थायलंडमधील अनेक सार्वजनिक ठिकाणांच्या भिंतींवर आजही जागोजागी दिसून येतात.
इंडोनेशियाचे प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या बालीमध्ये आपल्याला ओडिशा संस्कृती पदोपदी दिसते. रस्त्यावरून जाताना दरशेदोनशे फुटांवर एखाद्या पौराणिक पात्राचा मोठा पुतळा दिसतो. कृष्ण, बलराम, सुभद्रा, अर्जुन, धर्म, भीम, हनुमान, राम, लक्ष्मण, सीता यांचे इतके भव्य पुतळे भारतातही क्वचितच आढळतील. इथे मी चक्क घटोत्कचाचाही मोठा पुतळा बघितला होता; तोही एका मोठ्या चौकात. भीम आणि हिडिंबा यांच्या या पुत्राला इथे खूप मानाचे स्थान आहे. तेथील लोकांची चेहरेपट्टी ओडिशातील लोकांशी मिळतीजुळती आहे. त्यांची राहणीदेखील उडिया पद्धतीचीच आहे. पाहुण्याचे स्वागत करताना तेही हात जोडून ‘नमस्ते’ म्हणतात. बऱ्याच घरांना लागून एखादे तळे आणि घराच्या आवारातच एखादे देऊळही असते. केळीच्या किंवा कमळाच्या पानाची प्रतीकात्मक होडी करून ती इथे नदीत किंवा समुद्रात सोडली जाते. जुन्या दर्यावर्दी परंपरेची ती आठवण असते. रोजच्या जेवणात मासे आणि भात यांच्यासोबत खायच्या पालक, केळफुले या भाज्या दोन्ही ठिकाणी सारख्याच लोकप्रिय आहेत. चेना पोडा हा गोड पनीरसारखा पदार्थ दोन्ही ठिकाणी आवडीने खाल्ला जातो. केळीचे कोवळे कोंभ सजावटीसाठी दोन्ही ठिकाणी वापरले जातात. जेवणानंतर दोन्ही ठिकाणी सुपारी खातात. जगन्नाथ (कृष्ण), बालभद्र (आपला बलराम) आणि सुभद्रा या तीन भावंडांचे पुतळे आणि त्यांची मंदिरे ओडिशाप्रमाणे बालीतही मोठ्या संख्येने आहेत. इस्लामिक राष्ट्र असल्याने सार्वजनिकरीत्या तिथे पूजाअर्चा होत नाहीत, पण घरात पूजा करायला सरकारचा काहीही विरोध नसतो. बालीमध्ये असंख्य भव्य देवळे असून एकही देऊळ कधी पाडले गेलेले नाही. त्यांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रामायणावर आधारित असतात. लोकांची नावे सररास संस्कृतजन्य असतात. सगळ्याच भारतीय लोकांना इंडोनेशियामध्ये ‘कलिंग्ज’ असेच संबोधले जाते. इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकवस्ती असलेला आणि इस्लाम हाच एकमेव अधिकृत धर्म असलेला देश आहे, पण तिथे जगन्नाथाची एकवीस मोठी मंदिरे आहेत. त्यांच्या चलनाला ‘रुपया’ असे म्हणतात आणि नोटांवर इंद्राच्या वाहनाचे म्हणजे गरुडाचे चिन्ह असते. त्यांच्या अधिकृत विमान कंपनीचे नावही ‘गरुडा एअरवेज’ आहे. आपला हा हिंदू सांस्कृतिक वारसा त्यांनी नाकारलेला नाहीच; पण उलट अगदी कसोशीने जपला आहे. तो वारसा ही ओडिशाने इंडोनेशियाला दिलेली देणगी आहे.
इंडोनेशियाचे सर्वोच्च नेते आणि राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांच्याशीतर बिजू पटनाईक यांची वर्षानुवर्षे मैत्री होती. इंडोनेशिया आणि ओडिशा यांच्यातील प्राचीन संबंधांबद्दल दोघांनाही आदर होता. सुकार्नो यांची आई बाली बेटावर राहणारी हिंदू होती. सुकार्नो यांच्या कन्या मेघावती पुढे २००१ ते २००४ सालात इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष होत्या. ‘माझा जन्म झाल्यानंतर माझे नाव मेघावती ठेवावे ही सूचना बिजूंनी माझ्या वडिलांना केली. मेघावती म्हणजे मेघाची कन्या आणि कालिदासाच्या मेघदूत नाटकातील एका मुलीचे ते नाव होते, असेही बिजू म्हणाले होते. माझ्या वडिलांना ते नाव आवडले आणि त्यांनी मला तेच नाव ठेवले,’ असे मेघावती यांनी स्वतः नमूद केले आहे.
बिजू पटनाईक यांच्या जीवनातील आणखी एक विलक्षण धाडसी प्रसंग म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीरमध्ये पाकिस्तानी फौजांनी आक्रमण केले त्या वेळचे श्रीनगर येथे यांनी केलेले उड्डाण. काश्मीरचे महाराज त्या वेळी श्रीनगरमध्ये नव्हते आणि भारतीय सैनिकही तिथे नव्हते. पाकिस्तानी फौजा मात्र तेवढ्यात श्रीनगरच्या अगदी वेशीवर येऊन पोचल्या होत्या. कुठल्याही क्षणी श्रीनगरमध्ये घुसून शहराचा ताबा घ्यायची त्यांनी तयारी केली होती. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्या दिवशी पंडित नेहरूंच्या सूचनेवरून पटनाईक आपले डाकोटा विमान घेऊन दिल्लीहून निघाले. बरोबर सोळा सशस्त्र शीख जवान घेऊन. तो दिवस होता २७ ऑक्टोबर १९४७. पाकिस्तानी सैनिकांनी पॉवर स्टेशन उडवून दिल्याने सगळीकडे अंधार होता. अराजकसदृश परिस्थिती होती. अगदी कमी उंचीवरून विमान उडवत पटनाईक यांनी सगळी पाहणी केली आणि अत्यंत कौशल्याने आपले विमान श्रीनगर विमानतळावरील एकमेव हवाईपट्टीवर सुखरूप उतरवले. बरोबरच्या सैनिकांना तिथे सोडून ते लगोलग आणखी सैनिक आणण्यासाठी पुन्हा भारतात परतले. श्रीनगरमध्ये पोचलेले ते पहिले भारतीय सैनिक. अर्थात नंतर लगेचच भारतीय फौज तिथे येऊन दाखल झालीच.
पटनाईक १९६१ मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री बनले. पण पुढच्याच वर्षी कामराज योजनेनुसार इतर वरिष्ठ काँग्रेसनेत्यांप्रमाणे त्यांनीही पदत्याग केला व पक्षकार्याला वाहून घेतले. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर बर्याच घडामोडी घडल्या आणि शेवटी १९६९ मध्ये पटनाईक यांनी काँग्रेस पक्ष सोडला व उत्कल काँग्रेस स्थापन केली. पुढे ते जनता दलात गेले व पुन्हा एकदा ओडिशाचे मुख्यमंत्री बनले. ओडिशाच्या विकासासाठी त्यांनी खूप कष्ट प्रयत्न घेतले. ते एक मोठे उद्योगपतीदेखील होते. कलिंग एअरवेज या नावाची त्यांची एक विमानकंपनीही होती. ओडिशातील पारादीप बंदर त्यांच्याच पुढाकारातून तयार झाले. १७ एप्रिल १९९७ रोजी बिजू पटनाईक यांचे निधन झाले. ते एक मोठे उद्योगपतीदेखील होते. त्यांच्या पत्नी ग्यान देवी या शीख होत्या. लाहोरमध्ये राहणार्या; विशेष म्हणजे त्याही पायलट होत्या. लग्नानंतर अनेक उड्डाणे या पतिपत्नींनी एकत्र केली आहेत. कलिंग एअरवेज या नावाची त्यांची एक विमानकंपनीही होती. ओडिशातील पारादीप बंदर तसेच भुबनेश्वर आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यांच्याच पुढाकारातून तयार झाले. १७ एप्रिल १९९७ रोजी बिजू पटनाईक यांचे निधन झाले. त्यांच्या आंतरराष्ट्रीय मान्यतेचे एक द्योतक म्हणजे मृत्यूनंतर त्यांच्या शवासोबत भारतीय ध्वजाप्रमाणे इंडोनेशिया आणि रशिया या देशांचे ध्वजही त्या-त्या देशांच्या विनंतीनुसार ठेवले गेले होते.
त्यांचे अविवाहित चिरंजीव नवीन पटनाईक आज बिजू जनता दलाचे प्रमुख नेते असून ते सलग चोवीस वर्षे ओडिशाचे मुख्यमंत्री होते. सिक्कीम सोडल्यास अन्य कुठल्याही भारतातील राज्यात एकाच व्यक्तीने मुख्यमंत्रीपद सलग इतकी वर्षे भूषवलेले नाही. पूर्वी त्यांना राजकारणात रुची नव्हती, ओडिया भाषाही त्यांना धड बोलता येत नव्हती; पण मग वडलांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा मुलानेच चालवायला हवा असा लोकांचा प्रचंड आग्रह झाल्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजीव गांधी यांच्यासारखाच काहीसा हा प्रकार झाला होता. खरेतर कला आणि साहित्य यांच्यात त्यांना अधिक रुची होती. इनटॅक (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज) या सांस्कृतिक क्षेत्रातील विख्यात स्वयंसेवी संस्थेच्या कामात त्यांचा प्रथमपासून सक्रिय सहभाग होता. ते इंग्रजीत लेखनही करत. त्यांचे शिक्षण डेहराडून येथील विख्यात डून हायस्कूलमध्ये झाले होते. संजय गांधी यांच्याच वर्गात आणि राजीव गांधी यांच्या तीन वर्षे मागे ते होते. पण एकदा राजकारणात पडल्यावर त्यांनी उत्तम कारभार केला. स्थानिक भाषा येत नसतानाही त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. विशेष म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कधीच केला गेला नाही. नम्रता, सुसंस्कृत वर्तन आणि साधी राहणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आजच्या राजकारणात हे तसे खूप दुर्मीळच आहे. व्ही. के. पांडियन या प्रामाणिक आणि कर्तबगार तमीळ आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. यंदाच्या निवडणुकीत मात्र ‘ओडिया अस्मिता’ हाच मुद्दा विरोधकांनी खूप नेटाने लावून धरल्याने आणि नवीन-पांडियन जोडी ‘पुरेशी ओडिया’ नसल्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार झाल्याने अगदी अनपेक्षितरीत्या नवीन पटनाईकांना भाजपाकडून पराभव पत्करावा लागला. हे अगदीच अनपेक्षित होते; कारण तशा अर्थाने नवीन पटनाईक कधीच ‘कट्टर ओडिया’ नव्हते; ओडिया भाषेत भाषण करतानाही त्यांचे भाषण रोमन स्क्रिप्टमध्ये लिहिलेले असे; पण तरीही जनतेने त्यांना पूर्ण पाठबळ दिले होते. गेल्या पाच-दहा वर्षांत मात्र लोकमानस खूप पालटले आहे. निवडणुकीच्या राजकारणात आज इतर कुठल्याही घटकांपेक्षा स्थानिक अस्मिता जोपासणे आणि लोकानुनय करणे हेच घटक किती महत्त्वाचे ठरतात याचे हे एक द्योतक आहे.
बिजू पटनाईक यांच्या कन्या गीता मेहता या इंग्रजीतील प्रख्यात लेखिका होत्या. Karma Cola : Marketing the Mystic East, Serpent and Snakes आणि A River Sutra ही त्यांची काही विशेष गाजलेली आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली पुस्तके. त्यांचे वास्तव्य दिल्ली आणि न्यूयॉर्क येथे असे. त्यांचे यजमान म्हणजे सॉनी मेहता. Knopf Doubleday Publishing Company या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे ते प्रमुख होते. आज गीता मेहता व सॉनी मेहता दोघेही दुर्दैवाने हयात नाहीत.
आजही ओडिशामध्ये फिरताना बिजू पटनाईक यांचा ठसा जागोजागी जाणवतो आणि ओडिशा समाजात त्यांना अतिशय मानाचे स्थान आहे.
भुवनेश्वर : रविवार, ५ मार्च २०२३ रोजी भुवनेश्वर येथील बिजू पटनाईक विमानतळावर (Biju Patnaik Airport) दिग्गज नेते बिजू पटनाईक यांच्या ‘डकोटा’ विमानाचे अनावरण सार्वजनिक प्रदर्शनासाठी करण्यात आले. (पीटीआय फोटो)
