महुद ते ह्यूस्टन : लेख ५

 माझी शेल कंपनीतील कारकिर्द : (पूर्वार्ध) 

ह्यूस्टन व शेलच्या अमेरिकेतील रिफायनरीज  (सप्टेंबर १९८८ ते ऑगस्ट २००६)

ह्या काळात बऱ्याच घटना घडल्या. त्यांतील कामावरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी व आव्हानं, तसेच घरगुती घटनांचा आढावा घेतोय.  माझ्या शेलमधल्या २९ वर्षांच्या एकूण कारकिर्दीचे चार ठळक टप्पे  होतील; त्यांतले पहिले दोन या लेखात  बघू या.

टप्पा १. संशोधन आणि विकास (R & D) इंजिनीयर, सुरुवातीचा रोमांचक काळ (सप्टेंबर १९८८ ते १९९८)

तेल आणि वायू कंपन्यांमधील   एका  सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या  अशा  शेल कंपनीत निवड झाल्याने माझी ‘कॉलर ताठ’ झाली होती. तेल शुद्धीकरणाच्या एका महत्त्वाच्या तंत्रज्ञानात ‘Catalytic Reforming (CR)’ मी काम सुरू केले. मी ज्याच्या बदल्यात काम करणार होतो त्याचं नाव कार्ल यूटॉफ. त्याने २९ वर्षे CR मध्ये Model Fitting ची नोकरी केली होती व तो एक महिन्यात निवृत्त होणार होता. मला सगळं लवकरात लवकर शिकावं लागणार होतं. वाचून, निरीक्षण करून, टिपण काढून व न कळलेल्या गोष्टींवर प्रश्न विचारून! आणि त्या वेळात कार्ल त्याचा शेवटचा प्रकल्प संपवत होता.

पहिल्या महिन्याच्या प्रशिक्षणानंतर   माझ्यावर दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या : एक, कार्लचं मॉडेल फिटिंगचं काम व दुसरं प्रायोगिक catalyst selection चं काम. शेलच्या मालकीचं kinetic मॅाडेल आम्ही वापरत होतो. काम आव्हानात्मक तर होतंच; पण त्याबरोबर शिकायला पण मिळत होत्या खूप गोष्टी. Pilot plant च्या प्रयोगात शेल आणखी एका प्रसिद्ध UOP (Universal Oil Products) या कंपनीबरोबर (CR ची लायसेन्सर) संशोधन करत होती. आम्ही UOP, इंगेलहार्ड व क्रायटेरियन या तीन कंपन्यांचे उत्प्रेरक वापरत होतो. 

एक चांगली गोष्ट म्हणजे माझा पहिला व्यवस्थापक जॉर्ज हार्पर हा अत्यंत चांगला मित्र झाला लवकरच. तो माझा शेलमधला पहिला गुरू! त्याशिवाय आमच्या डिपार्टमेंटमध्ये १०-२५ वर्षांचे अनुभवी बरेच वरिष्ठ इंजिनीयर्स होते : जितेंद्र पटेल, जॅान ग्लेन, जॅार्ज स्टेफानिडाकीस, एबल डिसूझा, हालुक बिल्गिच व जॅार्ज हाजिजॅार्ज. त्या सर्वांची खूप मदत मिळाली पहिल्या १-२ वर्षांत! कारण तेव्हा ‘open door’ धोरण होतं. मी आठवड्यातून सरासरी ५०-६० तास काम करत होतो, जेव्हा पगार ४० तासांचाच मिळायचा – व्यावसायिक – ताशी दर नव्हे. कधी-कधी शनिवार-रविवारीपण कामावर जावं लागायचं – प्रयोगात काही अडचण (alarm) आल्यास. 

आमच्या मुलाचा जन्म १५ फेब्रुवारी १९८९ ला झाला. तेथे बाळाचं नाव २४ तासांच्या आत ठेवावं लागतं. ‘निमिष’ असं नाव ठरवलं. राधिकेचं सिझेरियन ऑपरेशन झालं होतं म्हणून बारशाचा कार्यक्रम २० एप्रिलला केला. २०० च्या वर मित्रमंडळी उपस्थित होती. मी दादा कोंडकेच्या सुप्रसिद्ध ‘ढगाला लागली कळ’ या चालीवर दहा कडव्यांचं गाणं लिहून ४ PhD विद्यार्थ्यांच्या कोरस संगे म्हटलं. त्यांतली काही कडवी अजून आठवतात :

जसं जीवात येतंय बळं

तशी वाढतीया वळवळ

तुझ्या डोळ्यांना डोळं माझं मिळं

अन् हृदयात काहीतरी हालं

वर ढगाला लागली कळ, बाळा निमिषांत वळ ॥ध्रु.॥

होती आम्हा हवी दोघांनाही मुलगी

केली मोठी नावांची यादी 

पाहिलं तुला खूप आनंद झाला 

कुणीही चालतं असावं हेल्दी

तू आमचं पहिलं बाळ ॥१॥

चार पौंडी केवळ बाबा जगला हे नवल

आता दोनशेवर काटा

तुझं बर्थवेट सात पौंड that’s great

पुढे कसं होईल ही चिंता

मोठेपणी डायट सांभाळ ॥२॥

बाबाची ख्याती कुंभकर्ण जाती

‘गजरा’तही मी घोरतो

घरी पहिल्या रात्री तुझ्या प्रत्येक ‘उं उं’नी

दचकून उठत होतो

आयुष्यात केलास बदल ॥३॥

आणि शेवटचं कडवं

समारंभाला  जमली २०० मंडळी

साजरं करती तुझं बारसं

हुशारीला संगत परिश्रम अविरत

नुसतं नशीब नाही करत फारसं

दोन्ही घराण्यांचं (पारिपत्यदार-प्रभुदेसाई) नाव कर भलं ॥१०॥

पहिल्या वर्षी मी एक ‘Quality’ वरील प्रशिक्षण अभ्यासक्रम केला (Crosby पद्धतीचा). त्याच्या प्रकल्पासाठी मी ‘डेटा इनपुट’चा वेळ वाचवणे हे ध्येय ठेवले. कार्ल मॉडेलचे निर्णय मिळालेले शेकडो नंबर कंप्युटर प्रिंटआउट घेऊन स्वहस्ते ‘Excel’ स्प्रेडशीटमध्ये भरायचा. मी दोन आठवड्यांत त्याचं ऑटोमेशन करून तो वेळ ८ तासांवरून १५ मिनिटांचा केला. 

प्रयोग व डेटा विश्लेषण करून मी CR मॉडेलमधील उत्प्रेरकाचा ‘दीर्घकालीन क्रिया-घट’ दर्शविणारा एक महत्त्वाचा घटक बदलला. मी एका वर्षातच  युजर मॅन्युअल अद्यतन (update) केलं. त्याशिवाय रिफायनरीत फक्त नवीन ‘मॉडेल फिट’ व parameters देण्यापेक्षा मी त्याबरोबर रासायनिक प्रक्रियांचा वापर करून स्पष्टीकरण देऊ लागलो. मी उत्कृष्ट संशोधनदेखील करत होतो. त्यामुळे ३ वर्षांच्या आतच ऑगस्ट   १९९१मध्ये मला पहिली बढती मिळाली. 

१९९३ मध्ये मी एका आंतरविभागीय प्रकल्पावर काम केलं. Environmental Protection Agency (EPA) अनुसार हायड्रोजन सायनाईड (HCN) हा एक महत्त्वाचा प्रदूषक होता.  Fluidized Catalytic Cracking (FCC) च्या वेगवेगळ्या चलांचा HCN च्या उत्पादनावर (ppm level) काय संबंध आहे ते शोधायचं कठीण काम होतं. प्रयोगांचं डिझाईन करायला संख्याशास्त्र वापरतात म्हणून मी एका महिन्यात संख्याशास्त्राचे दोन अभ्यासक्रम – प्रत्येकी एका आठवड्याचे – पूर्ण केले. 

१९९३ नोव्हेंबरपासून पुढील २ वर्षे जॅार्जकडून मला वार्षिक ‘कामगिरी मूल्यमापन’ चर्चांमध्ये एक गंभीर अभिप्राय मिळू लागला. मी माझ्या तांत्रिक कामात व सादरीकरणात उत्तम होतो; पण कर्मचारी बैठकीत आणि इतर सामान्य चर्चांमध्ये अजिबात भाग घेत नव्हतो. मी लाजाळू नव्हतो; पण इंग्रजी बोलणं कच्चं म्हणून ‘काहीतरी गाढवासारखं चुकीचे बोलेन’अशी भीती वाटायची. बाकीच्या व्यवस्थापकांच्या मते मी विभागात खूप वर्षे काम करायला लायक नव्हतो. 

१९९४ मधीलआयुष्य बदलणाऱ्या’ दोन घटना 

१ माझ्या सुदैवाने १९९४ च्या ऑक्टोबर महिन्यात आमच्या संशोधन केंद्रात एक नवीन ‘Toastmasters’ चा क्लब सुरू झाला. माझी एक वरिष्ठ सहकारी – कॅमी कू (ती हॉंगकॉंगची होती व तिने Ph. D. सुप्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठातून केली होती. ) मला म्हणाली की तिला यापूर्वी २ वर्षांत एका रिफायनरीतील याच क्लबचा खूप फायदा झाला होता, ज्यामुळे तिचं इंग्रजी संभाषण सुधारलं व ती चर्चेत खूप धीट बनली! मी क्लबचा ‘संस्थापक सदस्य’बनलो. खूप मनःपूर्वक शेकडो तासांचे परिश्रम (लेखन व बोलण्याची प्रॅक्टिस) घेऊन मी पहिल्या  ९  महिन्यांत १० भाषणं केली (५-७ मिनिटांची). सर्वात पहिलं – त्याला ‘icebreaker’ म्हणतात – माझी ओळख सभासदांसाठी, ज्याचं शीर्षक होतं ‘A Diamond in the Rough.’हेच माझ्या आगामी पुस्तकातल्या (Becoming the Best You) १५ व्या प्रकरणाचं शीर्षक आहे.

२ ऑक्टोबर १९९४ मध्येच माझी एका बाहेरील गुरूने (mentor)  निवड केली. त्याचं नाव सतीश रेड्डी. त्याने IIT मद्रासमधून बी. टेक. केलं होतं व तो डेट्रॅाईटमध्ये एका start-up कंसल्टंट कंपनीत होता. त्याने मला आर्थिक कौशल्ये शिकवली, मालमत्ता वाढवली, व नेतृत्व गुण वाढवून त्याच्याप्रमाणे इतर लायक लोकांची निवड कशी करायची याचं शिक्षण दिलं. सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शन मिळालं ‘वैयक्तिक विकास’ करण्यासाठी कुठली पुस्तकं वाचायची.

१९९५ अखेरीस माझा आत्मविश्वास एवढा वाढला की मी विभागीय चर्चांमध्ये भाग घेऊ लागलोच; पण त्याशिवाय आमच्या विभागाच्या ‘सुरक्षा समिती’चा अध्यक्ष झालो. पुढील ३-४ वर्षांत मी आमच्या क्लबच्या काही नवीन सभासदांचा मार्गदर्शक झालो. माझ्या प्रगतीचा एक ठोस पुरावा : आमच्या R&D केंद्रातील एका मोठ्या मीटिंगमध्ये (५००+ श्रोतृवर्ग) मी शेल कंपनीच्या अध्यक्षांना एक प्रश्न विचारू शकलो.

घरच्या घडामोडी

नोकरीच्या पहिल्या ४ वर्षांत मला खूप प्रवास करायला जमलं नाही कारण अमेरिकेत पहिल्या पाच वर्षांत फक्त  दहा दिवस (दोन आठवडे) रजा मिळत होती. त्यामुळे १९८९-९० ला (लंडन व भारतात) आणि १९९४-९५ ला (हॉंगकॉंग-सिंगापूर व भारतात) मी २ वर्षांच्या सुट्ट्या एकत्र करून  कुटुंबासह जाऊ शकलो. याव्यतिरिक्त काही सुट्टीचे (holiday) दिवस जोडून सप्टेंबर १९९० मध्ये यलोस्टोन नॅशनल पार्क (NP), डिसेंबर १९९० मध्ये हवाई, जुलै १९९१ मध्ये कोलोराडो राज्यातील रॉकी माउंटन NP आणि ऑगस्ट १९९२ मध्ये कॅलिफोर्निया राज्यात योसेमिटी NP बघून झाले. प्रत्येक NP पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. 

१९९३-९४ मध्ये राधिकेच्या आई-वडिलांना ग्रीन कार्ड मिळाले. ते पुढील ४-५ वर्षे ६ महिने भारतात व ६ महिने आमच्याबरोबर राहत होते. निमिषला त्यांचा सहवास व प्रेम तर मिळालेच; पण तो चांगले मराठी बोलायला शिकला! जून १९९७ मध्ये आम्ही मुंबईत त्याची मुंज केली नातेवाइकांच्या उपस्थितीत. १९९८ पासून माझी रजा वर्षाला ४ आठवडे झाली व आम्ही दरवर्षी भारतात येऊ लागलो. 

१९९५ पासून शेलने आम्हांला ९/८० शेड्यूलचा पर्याय दिला, म्हणजे सोमवार ते गुरुवार ८ ऐवजी ९ तास काम करायचे व त्याबदल्यात एक-आड-एक शुक्रवारी सुट्टी! (वर्षातून २६ दिवस extra). मी त्याचा फायदा घेऊन निमिष प्राथमिक शाळेत – पहिली ते पाचवी – असताना दर पंधरवड्यात त्याच्या वर्गात जाऊन शिकवू लागलो. (गाणी, गोष्टी सांगणे, खेळणे, पुस्तके वाचणे, इ.) मुलं खूश (नवीन काहीतरी), शिक्षिका त्याहून अधिक खूश (त्यांचं तपासणं, प्लॅनिंग करू शकत). बाप-लेकांत एक छान बंध तयार झाला. 

टप्पा . कारकिर्दीतील एका गंभीर आव्हानावर मात आणखी एका तंत्रज्ञानात संक्रमण (१९९९ ते ऑगस्ट २००६)

मला FCC विभागात सर्वात कमी अनुभव होता. बाकीचे सर्व FCC मध्ये १५ ते ३० वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ होते. १९९७ अखेरीस व त्यानंतर दरवर्षी फ्रॅंक मला ‘खराब’ मूल्यमापन देऊ लागला. माझ्यापुढे सर्वात मोठे आव्हान आले १९९९ मध्ये, जेव्हा शेल कंपनीने टेक्साको व सौदी आराम्को या कंपन्याशी भागीदारी करून दोन नवीन रिफायनींग कंपन्या प्रस्थापित केल्या. अशा वेळी बरेच लेऑफ होतात. फ्रॅंकने मला मार्च २००० मध्ये सांगितले, “शिरीष, गेली काही वर्षे तुझ्या कामावर मी खूश नाही. तेव्हा मिळतेय ती ४० आठवड्यांची VR घे (अमेरिकेत त्याला voluntary severance म्हणतात).”  मला हा खूप मोठा धक्काच होता! कारण ३६०-अंश मूल्यमापनांत, ज्यात माझे तंत्रज्ञ, सहकारी व वरिष्ठ इंजिनीयर सर्वेक्षण भरत होते, मला खूपच चांगले गुण मिळाले होते त्याच दोन वर्षांत. 

मी खालील मार्गाने माझ्या आयुष्यातील या मोठ्या संकटावर मात केली :

अ. मी माझ्या विभागातील एका वरिष्ठ मित्राचा सल्ला घेतला. तो म्हणाला की माझ्या पातळीवर माझी कामगिरी चांगली आहे. फ्रॅंक हीच खरी ‘समस्या’आहे; पण मोठ्या कंपन्यांत व्यवस्थापकाकडेच सगळी सत्ता असते. 

ब. मी सक्रियपणे माझ्या ‘life-coach’ सतीशला सल्ला विचारला. त्याने, “CV अद्यतन कर. तुझ्या नेटवर्कमधील मित्रांशी बोलून त्यांच्या कंपनीत अर्ज पाठव. तसेच शेलमध्येच दुसऱ्या कुठल्या विभागात काम मिळतंय का ते पण बघ,”असा बहुआयामी सल्ला दिला. 

क. एका महिन्यातच मला कळलं की एका वरिष्ठ इंजिनीयरला (नाव : पेरी कोल) थोडी अर्धवेळ मदत हवी होती. पण काम वेगळ्याच तंत्रज्ञानात होतं – sulfuric acid alkylation (SAA). 

ड. जून २००० मध्ये मी SAA शिकायला सुरुवात केली. माझ्या मागची फ्रॅंकची ब्याद गेली – निदान आणखी दोन वर्षे मिळाली मला. पेरीने मला SAA प्रोसेस गाईड वाचायला सांगितले होते. त्याशिवाय आणखी छान संधी होती शिकायला : शेल SAA TechNet (technology network) ची कॉन्फरंस होती २०-२३ ऑगस्टला लॉस एंजेलिस रिफायनरीत.

घरात महाभयंकर संकट

राधिकेच्या वडिलांना (आम्ही त्यांना ‘भाऊ’ म्हणायचो.) नोव्हेंबर १९९९ पासून काहीतरी होत होतं. घरातच ते दोन वेळा उभ्या-उभ्या पडले. दुर्दैवाने काही डॅाक्टरांच्या चुकांमुळे त्यांच्या रोगाचे निदान लांबणीवर पडलं.  मार्च २००० मध्ये त्यांना लेव्हल ४ चा मेंदूचा कर्करोग झाल्याचं कळलं व तो खूप मोठा धक्काच होता आम्हांला. तज्ज्ञांनी ६ ते ८ महिने जगतील असं सांगितलं. रेडिएशन उपचार केले; पण क्लेशकारक व वेदनादायक कीमोथेरपीला आम्ही नकार दिला. 

मार्च ते सप्टेंबर २०२० मध्ये मला खालील आव्हानांना सामोरे जावे लागले :

i) शेलमधल्या नोकरीची शाश्वती नाही, ९ तास काम करायचं, नवीन तंत्रज्ञान शिकतोय, त्यातच मला रात्री भाऊंबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या रुग्णालयांतील खोल्यांत राहावे लागले. दरतासाला नर्सेस येणार, रक्ताचे नमुने घ्यायला किंवा देखरेख ठेवायला. आठवड्यातून ६ दिवस मी १-२ तासांच्या झोपेवर राहिलो. 

ii) जूनमध्ये २ आठवडे मी त्यांना मेक्सिकोत मॉंटेरे शहरातील एका रुग्णालयात नेले. तेथे एक अपारंपरिक magnetic therapy उपचार केले, पदरचे $३०,००० खर्चून. मला त्यांना उचलणे, अंघोळ घालणे, कपडे घालणे, जेवायला भरवणे, इ. सर्व करावे लागले. जरी त्यांना १६ सप्टेंबरला झोपेतच देवाज्ञा झाली; तरी आम्हांला एक समाधान मिळाले, की एवढा मोठा ट्यूमर असूनही ते कधीच ‘दुखतंय’ म्हणाले नाहीत. परमेश्वराने कृपा केली म्हणायचं.

कारकिर्दीचे ‘U’ वळण 

मी फार तपशिलात न शिरता पुढील ६ वर्षांत माझी कारकिर्द १८० अंशांत कशी बहरली ते थोडक्यात सांगतो. मी या कालावधीत एक उत्कृष्ट नेता बनलोच; पण कंपनीत अनेक सहकारी, वरिष्ठ इंजिनीयर व सर्व थरांतील व्यवस्थापकांकडून मला आदर मिळाला. 

* मी २०००-२००१ मध्ये अर्धवेळ काम करतानासुद्धा SAA टेकनेट ला बक्षिसे मिळवून देण्यात हातभार लावला. पेरीने व्यवस्थापकांशी झगडून मला २००२ मध्ये SAA तंत्रज्ञानात पूर्ण वेळ आणले. तो माझा आणखी एक मेंटर बनला व आमची दृढ मैत्री झाली, जी तो २००९ मध्ये निवृत्त होईपर्यंत वृद्धिंगत राहिली.

 

आगामी आकर्षणः माझी शेलमधील कारकिर्द (उत्तरार्ध)

Author

Leave a Reply