झुकझुक आगीनगाडी : ४

माझे सोलापूर आणि रेल्वे.

सर्व सोपस्कार आटपून मी सोलापूर मंडळ (Division) कार्यालयात रुजू झालो. मला आता हिंदी बोलण्याची चांगलीच सवय झाली होती. येथील सर्व स्टाफ मला बाहेरचाच समजत होता. सोलापूर हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे मंडल (Division) असल्यामुळे इथल्या कामाची व्याप्ती चांगलीच मोठी होती. माझ्या वरिष्ठांनी मला सोलापूरची माहिती घ्यायला सांगितली. सोलापुरातील उपकरणे इतरांच्या तुलनेत जराशी वेगळीच (आय. टी. आय. ITI बेंगलुरू आणि अमेरिकन कंपनीची  होती ) पण मूलभूत संकल्पना तीच असल्यामुळे मला रुळायला फार वेळ लागला नाही. मला लगेच उपकरणे परिचित झाली. माझी आर आर बीतर्फे थेट नेमणूक झाल्यामुळे सोलापूर डिव्हिजनमधील आधीपासून कार्यरत असलेल्या तंत्रज्ञांना/फोरमनना विभागीय परीक्षेद्वारे होणारी पदोन्नती मिळू शकली नाही त्यामुळे साहजिकपणे त्यांनी माझ्या नेमणुकीवर नाराजी व्यक्त केली. आगीत तेल म्हणजे माझी नेमणूक त्यांचा सिनियर म्हणून झाली होती, त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे, “कालचं पोरगं आम्हांला शिकवतंय.” अर्थात यात माझा काहीच दोष नव्हता; पण माझ्याकडे या सर्वांकडे दुर्लक्ष करण्यावाचून आणि सहन करण्यावाचून काही पर्याय नव्हता. यातून माझ्या वरिष्ठांनी मार्ग काढला. त्यांनी मला वाडी ते सोलापूर ह्या  चार स्टेशनांचे  प्रमुख केले ( यात प्रत्येक स्टेशनाची शिफ्ट ड्यूटी, तेथील कर्मचारी, त्यांची रजा आणि सर्व प्रकारच्या  उपकरणांची दुरुस्ती /देखभाल माझ्यावरच सोपवली.)  मी माझ्या परीने व्यवस्थित काम करत होतो. मला योग्य वाटतील अशा काही सुधारणाही करत होतो.  थोडक्यात मी हळूहळू रुळायला लागलो होतो. 

एकदा अचानक मला पहाटे  ०२:०० वाजता  निरोप मिळाला  ( घरी फोन नव्हता म्हणून घरात Walky-Talky बिनतारी  संच ठेवला होता.) गाणगापूर रोड स्टेशनपासून १६ कि.मी आणि २ कि.मी डोंगर चढून गेल्यावर एक चौडापूर नावाचे  Micro-Waveचे (सूक्ष्म-तरंग) स्टेशन बंद पडले होते. २-३ महिन्यांपूर्वीच मी तिथला बॅटरी संच बदलला होता, तरीही ते स्टेशन बंद पडले होते. कारण कळायला काही मार्ग नाही. एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. जीपमधून मी आणि माझा स्टाफ  निघालो. तेथे पोचल्यावर कळले की  उपकरणाला विद्युत पुरवठाच होत नाहीये. तांत्रिक तपासणी केल्यावर लक्षात आले की त्या उपकरणाला विद्युत पुरवठा करणारा  बॅटरी संच खराब झाला होता. सिकंदराबाद डिव्हिजनशी बोलून वाडीतील एक बॅटरी संच तत्काळ मागवून घेतला. मुंबई – चेन्नई मार्गावरील ते  एक महत्त्वाचे स्टेशन असल्याने दुपारपर्यंत दळणवळण चालू करणे अतिशय गरजेचे होते.  तसे न झाल्यास त्या मार्गावरून  जाणाऱ्या सगळ्याच गाड्या पुढे लेट झाल्या असत्या. बऱ्याच खटाटोपानंतर बॅटरी बदलली  आणि दुपारपर्यंत स्टेशन दळण-वळण चालू केले. सुदैवाने  बीएसएनएलचे परिपथ मदतीला होते. परिपथ म्हणजे Alternative Communication Path. त्यामुळे आमच्या रूटवरून जाणाऱ्या गाड्या  लेट झाल्या नाहीत; पण नवीन बदलेला बॅटरी संच  बंद पडल्याचे  मला खूप वाईट वाटले. मी शोध केल्यावर लक्षात आले की  सर्व बॅटऱ्यांमध्ये sludge, Precipitation तयार झाला होता. याचा अर्थ नवीन लावलेला बॅटरी  सेटच खराब होता किंवा अन्य काही; पण असाच सेट अक्कलकोट  स्टेशनला व्यवस्थित चालत होता. मग कारण काय? मी खूप विचारात पडलो होतो. अचानक मला १२वीतील  रसायन शास्त्रातील प्रात्यक्षिक  आठवले. जड पाणी आणि हलके पाणी ओळखण्याकरता  आम्ही त्यात सिल्व्हर नायट्रेट  रसायनाचे स्फटिक घालत असू. पाणी उत्तम (Distilled) असेल तर त्यात साका/Sludge/Precipitation तयार होत नाही आणि पाणी अशुद्ध – खनिज विरघळलेले – उदा.  कूपनलिकेचे पाणी असेल तर त्यात Sludge/साका  होतो आणि लगेच कळते. आता मला अशुद्ध पाण्यामुळेच  बॅटरी संच खराब झाल्याचा उलगडा झाला होता.  मी वरिष्ठांना सदर प्रकार सांगितला आणि सविस्तर रिपोर्ट बनवला आणि मुंबईला पाठवला. मला आता नेमके कारण कळले होते त्यामुळे स्वतःचीच पाठ मी थोपटून घेतलीप; पण खराब पाणी बॅटरी संचामध्ये गेले कसे याचा सुगावा काही केल्या लागत नव्हता म्हणून प्रकरणाच्या मुळाशी जायचे मी ठरविले. 

बॅटरी संचाची नित्य देखभाल करण्यासाठी अशा प्रकारच्या बॅटरी संचात साधारणतः दोन ते तीन दिवसांनी  डिस्टिल्ड वॉटर घालावेच लागते. ते आम्ही सोलापुरात तयार करून प्रत्येक स्टेशनाला ३०/४० लिटरच्या ड्रममधून पाठवत असू. अक्कलकोट स्टेशनला जाणे-येणे सोपे होते. डिस्टिल्ड  वॉटर नेणारा कर्मचारी बिनतक्रार पाण्याचे ओझे वाहत होता. चौडापूरचे  स्टेशन मात्र  चांगलेच लांब होते. कोणत्याही  रेल्वेची   मायक्रोवेव्ह स्टेशन्स ही MSL( Mean Sea Level) समुद्रसपाटीनुसार निश्चित केलेली  असतात. त्यामुळे ती कधी रेल्वे स्टेशनाजवळ असतात किंवा  रेल्वे स्टेशनापासून दूर असतात. तर दूर असलेल्या स्टेशनांपैकी एक चौडापुरचे स्टेशन होते. तिथे पाण्याची ने-आण करणे चांगलेच जोखमीचे काम होते. बॅटरी-संचात घातले जाणारे पाणी जड पाणी आहे की हलके आहे, हे तपासण्यासाठी मी मुद्दाम सिल्व्हर नायट्रेट  आणि एक परीक्षानळी आणून गुप्तपणे चौडापूर स्टेशनला ठेवली आणि सर्व शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना सांगितले, “सोलापुरातून बॅटरी संचाकरिता पाठवलेले पाणी वरील पद्धतीने तपासूनच बॅटरी संचात घालणे आणि ते पाणी आणणाऱ्या व्यक्तीला कळता कामा नये.” 

ज्या वेळी चौडापूरला (Distilled Water)  घेऊन एका सहायकाला पाठवले, त्या वेळी त्या महामानवाने कष्ट वाचवण्यासाठी गाणगापूर रोड स्टेशनवर उतरल्यावर ते पाणी ओतून दिले आणि रिकामे ड्रम घेऊन चौडापूरला गेला (चौडापूर स्टेशन हे गाणगापूर रोड स्टेशन पासून सोळा कि. मी. लांब आहे आणि दोन किलोमीटर  डोंगरचढाई करावी लागते.) आणि चौडापूरच्या आसपासचे बोअरचे पाणी ड्रममध्ये भरले आणि तेथील कार्यरत कर्मचाऱ्याला  नेऊन दिले. ठरल्याप्रमाणे तेथील कर्मचाऱ्याने पाणी तपासून मला सांगितले की पाणी अशुद्ध आहे.मी  लगेच त्याला  सांगितले बॅटरीमध्ये घालू नकोस! आणि मोठा अनर्थ टळला. त्या पाणी नेणाऱ्या कर्मचाऱ्याची  मोठी चौकशी झाली आणि त्याचेवर मोठी Disciplinary and Appeal Rule,1968 प्रमाणे  (Major Chargesheet) दंडात्मक कारवाई झाली.  मी परत एकदा उजळून निघालो आणि माझी ही अतिशय साधी सोपी सुलभ  पद्धत संपूर्ण रेल्वेमध्ये अमलात आणण्यासाठी मुंबईहून  तांत्रिक परिपत्रक निघाले. मला आमच्या रेल्वे वीकमध्ये मुख्य अभियंत्याचे पारितोषिक मिळाले.

   सर्व काही सुरळीत चालले होते. दुपारी एकदा मी गुलबर्ग्याहून सोलापूरला येण्यास निघालो होतो तेव्हा  स्टेशनवर एक व्यक्ती येऊन मला विचारून गेली की, ‘हुसैन सागर एक्स्प्रेस गेली का?’ मला जरा अजबच  वाटले; कारण हुसैन सागर एक्स्प्रेस ही सकाळीच ७:३० ते ८ च्या दरम्यान गुलबर्ग्याहून सिकंदराबादला जात असते. काही वेळाने उद्घोषणा  झाली की, हुसैन सागर एक्स्प्रेस फलाट क्र. ३ वर येत आहे. गाडी आल्यावर बराच गोंधळ चालू असलेला मी पाहिला. मी जाऊन पाहतो तर काय! ज्या व्यक्तीने चौकशी केली होती त्याच व्यक्तीने स्वतःला गाडीखाली झोकून दिले होते. खिन्न मनाने मी घरी आलो. जेवण झाल्यावर आईने सांगितले की वर्तमानपत्र दोन दिवस झाले आले नाही. म्हणून मी जवळच असलेल्या वृतपत्र विक्रेत्याच्या घरी गेलो. त्याच्या भावाने सांगितले की त्याने आत्महत्या केली आहे म्हणून पेपर टाकला नाही. जेवून उशिराच झोपलो. पहाटे  ०३ – ०० वाजता कोणीतरी दार वाजवले. आईने दार उघडले. आमच्याच कॉलनीतील एक गृहस्थ होते, त्यांनी विचारले हेमंत आहे? मी आतल्या खोलीत  होतो, काहीतरी गडबड आहे असे आईला जाणवले म्हणून आईने परस्पर  सांगितले, “नाही तो वाडीला असतो.” ते गृहस्थ निघून गेले. सकाळी आईने सांगितले त्यांच्या कुणा नातेवाइकाचा अपघात रेल्वेरुळावर झाला आहे जालन्याला, तर डेड बॉडी आणण्याकरता तुला चल म्हणत होते. आईने केले ते बरोबर का चूक, मला कळले नाही; पण दुसर्‍या दिवशी मी चांगलाच आजारी पडलो. पाठोपाठ  झालेल्या प्रसंगांमुळे झाले असावे. रेल्वेरुळावर होणार्‍या अपघातांची ही बाजू मात्र मला न झेपणारी आणि समजुतीच्या बाहेरची होती.

———————————————————————————————

आम्हांला  जिथे प्रशिक्षण  दिले जाते ते रेल्वेचे college:  https://iriset.indianrailways.gov.in/

Author

One thought on “झुकझुक आगीनगाडी : ४

Leave a Reply