प्रकाशन वृत्तांत – शेवटचा दिस गोड व्हावा

डॉ.अनिल जोशी लिखित ‘शेवटचा दिस गोड व्हावा!’ या पुस्तकाचा प्रकाशन वृत्तांत.

   राजा असो वा रंक, आयुष्याचा शेवट गोडच व्हावा, क्लेशदायक, दुःखदायक असू नये हीच प्रत्येक मनुष्यप्राण्याची कायम इच्छा असते आणि अर्थातच  तसा शेवट सर्वांनाच मिळतो असे नाही; मग आपण उगाच त्यातही एक उतरंड लावतो. पुढच्या पिढीचे चांगले दिवस पाहून समाधानाने आणि रोगाविना मनुष्य गेला म्हणजे फारच पुण्यवान; खूप महिने शुश्रूषा करूनही रोगाने गेला तर इथले कर्म इथेच भोगावे लागले असे म्हणणार आणि अगदी मस्त व्याधिरहित जीवन अनेक वर्षं जगला तरी, “काय बाई, अजून काय पाहायचे राहिले यांचे!” अशी भावना येते मनात. 

मृत्यूबद्दल एक अनिश्चितता सतत आपल्या मनात असतेच; मग कोणाचे अकाली किंवा  रेंगाळलेले आजारपण पाहून यातून कधी किंवा कशी सुटेल ती व्यक्ती आणि आपल्यावर अशी वेळ आलीच तर आपण काय करू हा विचार आजकाल येतोच डोक्यात. या संबंधी काही ना काही आपल्या कानांवरून किंवा नजरेखालून गेलेले असतेच : कधी इच्छामरणाविषयी असलेल्या सिनेमातून, कधी बातम्यांतून! पण हे नक्की काय असते, कोणी/  कधी / कसे अमलात आणायचे, परवानगी कोणाला आहे किंवा नाही, कायदे काय आहेत असे सगळे प्रश्न समोर येतात आणि मग हे काहीतरी फार अवघड असेल  अशा समजुतीने सामान्य माणूस थबकतो; पण हे सगळं वास्तव एखाद्या डॉक्टरने उलगडून दाखवलं तर कदाचित आपल्याला आकलन होऊ शकेल, किमान आपण यात कुठे आहोत हे तरी कळू शकेल. तर असाच ‘इच्छामरण’ या संकल्पनेचा, त्याच्या जागतिक वास्तवाचा  संपूर्ण आढावा घेणारे पुस्तक मराठी पुस्तकविश्वात दाखल झाले आहे : डॉ. अनिल जोशी लिखित ‘शेवटचा दिस गोड व्हावा.’ त्याचबरोबर त्यांच्या २००० साली प्रकाशित झालेल्या ‘अपार्थिव’ या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही दाखल झाली आहे. 

या दोन्ही पुस्तकांचा दिमाखदार प्रकाशन सोहळा दिनांक २६/०१/२०२५ रोजी लेखकाची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या पंढरपूरमध्ये संपन्न झाला. प्रकाशनाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ.शिरीष प्रयाग, ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ.प्रसन्न दाभोलकर आणि अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, संपादक श्री.भानू काळे लाभले होते. सोहळा अनेक कारणांनी दिमाखदार होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकतर ज्या विषयावर पुस्तक आहे त्या विषयामध्ये काम केलेले, अनुभवसंपन्न असे पाहुणे प्रकाशनाला लाभले होते. कुठल्याही लेखकाला अतिशय कृतार्थ वाटेल अशी जवळपास पाचशे श्रोत्यांची उपस्थिती कार्यक्रमाला होती. लेखक डॉ. अनिल जोशी हे पंचवीस वर्षं पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी होते. वारी नियोजनाचा त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. अशा लेखकाच्या पुस्तक प्रकाशनाला असलेली उपस्थितीच लेखकाच्या कारकिर्दीबद्दल सर्वकाही सांगत होती. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेखक डॉ.अनिल जोशी यांनी  दोन्ही पुस्तकांबद्दल मनोगत व्यक्त केले. पहिल्या पुस्तकाची नवीन आवृत्ती काढताना विशेष समाधान त्यांनी व्यक्त केले. डॉ.अनिल जोशी यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात न्यायवैद्यकशास्त्र विभागात त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणादरम्यान आणि त्यानंतरही काही काळ काम केले. तिथे कामाचा भाग म्हणून प्रामुख्याने चालणाऱ्या शेकडो शवविच्छेदन प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने प्रत्ययास आलेले माणसांचे, विविध यंत्रणांचे अनुभव त्यांनी ‘(अ)पार्थिव’ या पुस्तकात शब्दबद्ध केलेले आहेत. मराठी पुस्तकविश्वात या प्रकारचे कथन पूर्वी झालेले नसल्याने पहिल्या आवृत्तीलाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि आताही तो तसाच मिळेल याची खातरी पुस्तक वाचून नक्कीच वाटते. हे पुस्तक वाचताना सतत जाणवते, की न्यायवैद्यकशास्त्र विभागात काम करणे ही केवळ वैद्यकीय ज्ञानाची परीक्षा नसून, त्या डॉक्टरला एकूणच सामाजिक परिस्थिती, गुंतागुंतीचे राजकारण यांचे असलेले आकलन, समयसूचकता, प्रसंगावधान, संभाषण कौशल्य या सगळ्याची परीक्षा असते आणि यामध्ये चांगला गुरू किती गोष्टी नकळत शिकवतो याचेही डॉक्टरांनी उत्तम उदाहरण मांडले आहे. 

नव्याने प्रकाशित होणारे पुस्तक – ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ – यामागची भूमिका मांडताना डॉक्टर स्वतःच्या व्यवसायाकडे अधिक तटस्थपणे पाहताना दिसतात. एक डॉक्टर म्हणून मृत्युशय्येवर असलेल्या रुग्णाला मृत्यूची अपरिहार्यता समजावून सांगणे, त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करणे हे मोठे अवघड काम असते. काही असाध्य आजार आणि वार्धक्य यांपुढे मरण अपरिहार्य असते; तरीही अनेकदा कृत्रिम प्रयत्न करून असे मरण लांबवण्याचे, सुसह्य करण्याचे मार्ग अवलंबिले जातात. अशा  मरणासन्न अथवा मरणप्राय वेदनेने ग्रस्त असलेल्या रुग्णाला जगाचा निरोप घेण्यासाठी कोणतीही कायदेशीर आणि वेदनारहित प्रक्रिया आज उपलब्ध नाही. एखादी गंभीर घटना घडली की (मगच) सुखमरणाच्या चर्चा एखाद्या चित्रपटातून आपल्या देशात होतात. 

प्रत्यक्षात या बाबत काय कायदे, प्रक्रिया  असावी या संबंधीचे ठोस उत्तर अजून कोणत्याही सरकारने दिलेले नाही. या संबंधी एकूणच वैद्यकीय विश्वात असलेले या बाबतचे अनुभव, थोडा इतिहास, इतर देशांतली परिस्थिती आणि या प्रश्नांचे भवितव्य यांवर लेखकाने या पुस्तकात चिंतन केले आहे. अशा प्रकारचे पुस्तकही मराठी साहित्यात आधी न आल्याने एक वेगळा आणि अत्यंत गरजेचा विचार करायला लावणारे पुस्तक म्हणून नक्कीच याची चर्चा होईल. 

   यानंतर कार्यक्रमात सातारा येथील ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रसन्न दाभोलकर यांनी आपले विचार मांडले. वाढणारे आयुर्मान आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न यांचा गुंता सोडवताना अनेकदा मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळे कालांतराने तो गुंता अधिक जटिल होतो. यापेक्षा असाध्य आजार किंवा वार्धक्य यांकडे पाहायची दृष्टी बदलली तर प्रश्न सोपे होऊ शकतात हे त्यांनी अधोरेखित केले. दृष्टी बदलणे म्हणजे काय – पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की परिस्थितीचा स्वीकार करा आणि पुढे महत्त्वाचे  म्हणजे आध्यात्मिक व्हा! एक ‘दाभोलकर’ असे काय सांगत आहेत याने अचंबित होताच  आध्यात्मिक होण्याची सुरेख व्याख्या त्यांनी सांगितली ती म्हणजे, ‘मी’चे वर्तुळ मोठे करणे. ऐकायला किती सोपी पण अवघड आहे ही व्याख्या खरेतर! वय वाढते तसे हे ‘मी’चे वर्तुळ मोठे झाले तर मानसिक स्थिती अगदी सहज आणि स्वाभाविक राहील हे खरेच; पण आजकाल माणसांना आपण इतक्या लहानलहान व वेगवेगळ्या वर्गांत विभागलेले असते की हे वर्तुळ मोठे होण्यापेक्षा लहानच होत चालले आहे. पण ही अध्यात्माची फार सुंदर व्याख्या आहे हे मनापासून पटले. त्यापुढील पायरी म्हणजे त्यांनी सांगितले, की आपण उत्तम शारीरिक, मानसिक मनःस्थितीत असतानाच सुखांतपत्र अर्थात ‘लिविंग विल’ करून ठेवणे; जेणेकरून आपल्या कुटुंबीयांना आपल्या असाध्य आजारात अथवा परिस्थितीत निर्णय घ्यायला अवघड वाटू नये आणि शक्य तितके सुखकारक मरण आपल्या निवासस्थानी, कुटुंबीयांच्या उपस्थितीत यावे. अर्थात हा अत्यंत विवेकाने आणि सुदृढ शरीर आणि मन  असलेल्या माणसाने घ्यावयाचा निर्णय आहे.  ही आताच्या उपलब्ध परिस्थितीत किमान एक दिशादर्शक गोष्ट म्हणावी लागेल. त्यांनी  पुस्तकाच्या प्रस्तावनेतही समाज म्हणून आपल्या सर्वांच्या वृद्ध, अपंग, रुग्ण यांप्रती असलेल्या जबाबदारीचा केलेला उल्लेख विचार करावयास भाग पडतो. 

कार्यक्रमात यानंतर डॉ. शिरीष प्रयाग, ज्येष्ठ आणि विख्यात अतिदक्षता विभागतज्ज्ञ तसेच प्रसिद्ध प्रयाग हॉस्पिटलचे सर्वेसर्वा, यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पुणे शहरात प्रथमच अतिदक्षता विभागाची केलेली  सुरुवात आणि त्यानंतर अनेक ठिकाणी अतिदक्षता विभाग चालू झाल्यानंतर घ्यायची काळजी आणि संयोजन यांबाबत त्यांचा किमान चाळीसहून अधिक वर्षांचा असलेला अनुभव याची प्रचिती त्यांच्या बोलण्यातून येत होती. मृत्युशय्येवर असलेले अनेक रुग्ण अतिदक्षता विभागातल्या डॉक्टरांना खूप जवळून बघावे लागतात. पर्यायाने अनेक निर्णय घ्यावे लागतात, रुग्णांशी सतत संवाद साधावा लागतो, मानसिक परिस्थिती जपावी लागते आणि तरीही मरणाच्या कटू सत्याला भिडताना कधी त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाइकांच्या संतप्त प्रतिक्रियांनाही सामोरे जावे लागते. प्रत्येकाची इच्छा असतेच की आपल्याला कृत्रिम प्रयत्नांनी जगावे लागू नये; तसे झाल्यास मरण यावे; पण डॉक्टर प्रयाग यांनी यातली सीमारेषा किती धूसर असते आणि हे निर्णय घेताना रुग्ण आणि डॉक्टर या दोघांच्याही संयमाचा आणि विवेकाचा कसा कस लागतो हे सोदाहरण स्पष्ट करून सांगितले. अतिदक्षता विभाग म्हणजे कायमच मरणाची पायरी नव्हे; तर कधी ते वरदानही ठरते आणि म्हणूनच इच्छामरण /सुखमरण याकडे बघताना अशा डॉक्टरांची जबाबदारी कित्येक पटीने वाढणार आहे याकडेही लक्ष वेधले. 

कार्यक्रमाचा समारोप आणि अध्यक्षीय भाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक भानूजी काळे यांनी असे दोन वेगळे विषय मराठी साहित्यात आणल्याबद्दल लेखकाचे कौतुक केले आणि समाधान व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्याने असे वैविध्यपूर्ण साहित्य मराठीत  आणण्याची जबाबदारी लेखकांनी घेतली पाहिजे आणि वाचकांनीही आवर्जून असे साहित्य वाचले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ या पुस्तकामुळे इच्छामरण /सुखमरण या विषयाची, व त्याबाबतच्या प्रश्नांची विविध ठिकाणी चर्चा व्हावी असेही मत त्यांनी व्यक्त केले. श्री. अभय जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.  

तुकोबारायांच्या “याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा” या ओळी कानांत साठवतच कार्यक्रमाचा शेवट झाला. अर्थात आपण कितीही विचार केला तरी शेवटी ‘मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो’ अशीच आपली अवस्था मृत्यूकडे पाहताना असणार आहे हेही खरेच पण आपल्या गोड दिसाच्या इच्छेसाठी आपणही थोडा अट्टाहास धरला पाहिजे हे डॉ. प्रसन्न दाभोलकर यांचे शब्द कृतीत आणावे लागतील, तर या पुस्तकाला न्याय दिला जाईल.  

प्रकाशक सौ.शुभांगी अनिल जोशी, अर्थात लेखक डॉ. जोशी यांच्या सुविद्य पत्नी, अक्षर रचनाकार श्री.समीहन आठवले आणि मुद्रक श्री. पत्की यांचा विशेष उल्लेख एक उत्तम लिखाण तितक्याच उत्तम प्रकारे छापून प्रकाशित केल्याबद्दल! सौ. शुभांगी जोशी यांनी केलेले मुखपृष्ठही अतिशय समर्पक झाले आहे.

डावीकडून डॉ.प्रसन्न दाभोलकर, डॉ.शिरीष प्रयाग, भानू काळे, लेखक डॉ. अनिल जोशी 

पुस्तक नोंदणी : 

 डॉक्टर अनिल जोशी लिखित :

१ शेवटचा दिस गोड व्हावा   :  मूल्य रुपये

 २०० /- 

‘इच्छामरण’ या संकल्पनेचा घेतलेला आगळावेगळा  वेध 

२ (अ) पार्थिव ( दुसरी आवृत्ती) :  मूल्य रुपये २००/-

 शवागारातील एका विलक्षण विश्वाचा परिचय

आपण सोबतचा QR  कोड वापरून पैसे पाठवू शकता  किंवा ९४२२६४७२८३ या क्रमांकावरती कोणत्याही माध्यमातून( जी पे ,फोन पे किंवा तत्सम कोणतेही माध्यम )पैसे पाठवू शकता. 

पैसे पाठवल्यानंतर कृपया ९४२२६४७२८३  या क्रमांकावरती  पैसे भरल्याचे  पटलचित्र (  स्क्रीन शॉट)  व आपले पूर्ण नाव, पत्ता, ईमेल, संपर्क क्रमांक आदी तपशील पाठवावा. 

पुस्तक/ पुस्तके त्या पत्त्यावर आमच्या खर्चाने  पाठविली जातील . 

धन्यवाद . 

Author

2 thoughts on “प्रकाशन वृत्तांत – शेवटचा दिस गोड व्हावा

  1. अनिल च्या या प्रकाशन समारंभास उपस्थित रहायचे अन् अनिल-शुभांगीचा पाहुणचार उपभोगायचे भाग्य आम्हास लाभले. पुस्तके प्रकाशित तर झालीच परंतु प्रकाशन सोहळ्यापेक्षाही तो एक आनंद सोहळा जास्त होता….चिरंतन स्मृतीत राहील असा !

Leave a Reply to डाॅ. अ. भा. हरकेCancel reply