‘देव चालले’ ही दि.बा. मोकाशी यांच्या लेखणीतून उतरलेली १९६१ मधील एक अजरामर कादंबरी! अजरामर अशासाठी की तब्बल सहा दशके होऊन गेली तरीही आजही ती सर्व वयांच्या वाचकांना खिळवून ठेवते; कारण लेखक पुस्तकाच्या प्रारंभीच म्हणतो तशी ‘ज्याला आदि नाही नि अंत नाही’ अशा परमेश्वराची ही गोष्ट आहे. खरंतर परमेश्वराचे रूप असलेला घरातील तीनशे वर्षांचा नरसिंह हा गोष्टीचे केवळ निमित्त आहे. पण या नरसिंहाच्या साकार मूर्तीभोवती आकारलेले ‘पळसगाव’ या छोट्या खेड्यातील एका मोठ्या कुटुंबातील भावभावनांचे, ताण-तणावांचे, आकांक्षा-उपेक्षांचे अनोखे चित्रण या कादंबरीतून मोकाशी वाचकांसमोर उभे करतात. साठच्या दशकात शहरीकरणाला झालेली सुरुवात, पोटापाण्याच्या-व्यवसायाच्या शोधार्थ पळसगावासारखी अनेक प्रातिनिधिक गावे , त्यांत अनेक पिढ्या एकत्र नांदणारी संयुक्त कुटुंबे (joint families) आणि या सगळ्या कुटुंबांना कवेत घेणारा ‘नरहरी-नरसिंह’ हा केवळ कुटुंबाचाच नाही तर सर्व गावगाड्याचाच एक अविभाज्य हिस्सा. अशा कुटुंबातील होणारी अपरिहार्य पांगापांग, त्यातील प्रत्येक कर्त्या-धर्त्याचे कुवतीप्रमाणे झालेले उत्कर्ष-अपकर्ष आणि या चढाओढीत गावातील घर- कुटुंब विसकळीत होताना ‘नरहरी’ कोणाच्या सोबतीला जाणार – खरंतर हा ‘कुळाचार’ कोण पुढे चालविणार? हा कथेचा विषय. तो विषय मांडताना दि. बा. मोकाशी मानवी भावना, श्रद्धा, सुख-दुःख, आसक्ती-परिग्रह यांचा गुंता आपणांसमोर मांडतात. तो वाचताना कोण बरोबर कोण चूक याचा निवाडा ते करत नाहीत. उलट अत्यंत भव्य अशा तात्त्विक उंचीवर जाऊन लिहितात, “परमेश्वर आणि माणूस यांचे नाते विचित्र आहे…. एक किंवा अनेक कारणांनी माणसाला परमेश्वराची गरज आहे… पण परमेश्वराला माणसाची गरज आहे का, हे सांगता येणार नाही.” अशी ही माणसांची व परमेश्वराची गोष्ट!
- या भाषांतराचा अजित कानिटकर यांनी केलेला अल्पपरिचय. याचा कन्नड अनुवाद पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्रसिद्ध झाला आहे.
बंगळूर-निवासी साहित्यिक प्रा. चंद्रकांत पोकळे यांनी या पुस्तकाचे कन्नडमध्ये भाषांतर केले. २६ जानेवारीला या व अन्य लेखकांच्या सहा पुस्तकांचे बेंगलोर येथे प्रकाशन झाले.
हे पुस्तक कन्नडमध्ये येण्यासाठी प्रो.डॉ.गणेश देवी यांनी पुढाकार घेतला.
हार्दिक अभिनंदन !
अंतर्नादचे लेखक विवेक गोविलकर यांनी लिहिलेल्या स्टीव्हन हॉकिंगच्या चरित्राला महाराष्ट्र शासनाचा २०२३ साठीचा
न.चिं. केळकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्टीव्हन हॉकिंग यांच्या संशोधनकार्याचा आणि जीवनाचा परिचय मराठी वाचकांना उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम नक्कीच स्वागतार्ह आहे. स्टीव्हन हॉकिंग यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी असाधारण होते. यांतले एक अंग म्हणजे विज्ञानातील अत्युच्च श्रेणीचे कार्य, दुसरे म्हणजे त्यांच्या दिव्यांगामुळे आलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन; किंबहुना त्यावर विजय मिळवून त्यांनी प्राप्त केलेले देदीप्यमान यश आणि जीवनाला सामोरी जाणारी त्यांची दुर्दम्य ऊर्जा, त्याचबरोबर त्यांना मिळालेली अमाप प्रसिद्धी आणि प्रसार माध्यमांमध्ये त्यांचे झालेले कौतुक. त्यांचे हे अनेकविध पैलू वाचकांसमोर आणण्यात लेखक विवेक गोविलकर यशस्वी झाले आहेत. कधीकधी अशा व्यक्तिमत्त्वाचे विभूतिकरण करणारे एक अवाजवी चित्र मांडले जाऊ शकते. हे टाळून लेखकाने त्यांचे एक यथार्थ व्यक्तिचित्र रेखाटण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. त्यामुळे मराठी वाचकांसाठी हे एक रंजक, प्रेरक आणि बोधक पुस्तक ठरेल याची मला खातरी आहे.
• डॉ. अतीश दाभोलकर
डिरेक्टर, अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्स (ICTP), इटली
(प्रस्तावनेमधून)
