‘विराणी’ हा शब्द वाचला की संत ज्ञानेश्वर आठवतात… मीराबाई आठवते… लता मंगेशकर आठवतात… मग आठवतो त्यातील विरहिणीचा आर्त, व्याकूळ भाव. मन कातर कातर होतं; तरी कुठेतरी उदात्त असं, अलौकिक असं काही उरात दाटूनही येतं. पण कवी अनिलांची ‘विराणी’ वाचली – मन खिन्न, उदास उदास होऊन गेलं. अनिलांच्या या विराणीत मिलनाची आस जागवणारी विरहवेदना नाही; तर उजाड, वैराण आयुष्यातला घट्ट दाट काळोख आहे. माणसाचं स्वत्व शोषून घेऊन त्याच्या जगण्याला मरणकळा आणणारं एक भीषण वास्तव आहे. कवी अनिलांच्या विराणीमधला एक एक शब्द अगदी काळीज कापणारा. आयुष्यातल्या मी यॅंव अन् मी त्यॅंवच्या चिंध्या करणारा. जगण्याच्या लढाईतली हतबल निराशा मनावर चाल करून येते आणि सावकाश आपली दृष्टी आत वळते. एरव्ही आभाळ नि मेघ खरंतर सर्जनाचे दूत – हवेहवेसे वाटणारे; पण ‘विराणी’तलं हेच आभाळ मात्र नकोसं वाटतं. खाली वाकलेल्या, आपल्याला गुदमरून टाकणाऱ्या आभाळाला दूर ढकलून द्यावं असं वाटायला लावतं. ‘विराणी’तील मेघही कसे? तर क्रूर काळे – निर्मम – गळा आवळणारे! निराशा तर घट्ट शाईच्या लेपासारखी मनाला वेढून घेते अगदी! आशेची इवलीही वीज उमटू देत नाही. ही निराशा, हे असं स्वतःचंच स्वतःपासून दूर जाणं…असं एकदम होतं का हो? अचानकच? नाही हो, मुळीच नाही. अंधार दाटू लागला आणि आसमंत काळवंडू लागला की लावतोच ना आपण दिवा! हातांची ओंजळ असो की पदराचा शेव… फडफडणाऱ्या वातीला जिवाच्या आकांताने जपतोच आपण. मनातली आशा तेवत ठेवतोच…निदान धडपड तरी करतो तशी. पण कधी कधी थिटे पडतो आपण. निसर्ग म्हणा, नियती म्हणा… काय नाव द्यायचं ते द्या… पण वाटतं, तोच खरा बळवान. कितीही जपलं तरी भणाण वाऱ्यापुढे इवल्याशा वातीचा काय पाड? विझतेच ती आणि मग सर्वत्र काळोख पसरतो.
हाती दिवा होता त्याची
कधीच विझून गेली वात
कशानेही उजळत नाही
अशी काळीकुट्ट रात
अशा वेळी माझी शक्ती पुरे पडत नाही असं वाटलं की आपण कुणाचा तरी हात शोधू लागतो. वाटतं, आहेत – हे हात आहेत माझ्यासाठी… अगदी सदैव! पण गाफील असतो हो आपण. माझ्यासाठी कुणीतरी आहे या विश्वासातला फोलपणा जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र हादरून जातो आपण… उभे खचतो अगदी. लढाई हरतो तेव्हा हरल्याचं शल्य तर असतंच पण अवसानघाताने हरवल्याचं शल्य फाऽर जीवघेणं असतं.
अनिलांची ही विराणी वाचताना मला बाबूरावांची आठवण आली. बाबूराव बाबांचे परिचित. अर्धं वय उलटून गेलेले साधारणसे शेतकरी. बायकोच्या जिवघेण्या आजारावर खर्च फार झाला. घरातलं किडूकमिडूक विकून झालं. उधार उसनवार झालं. मग कर्ज घेतलं. कर्जाची चक्रवाढ सुरू झाली आणि बाबूरावांच्या बायकोने अखेरचा श्वास घेतला. सगळी धडपड वाया गेली. आता या कर्जाचं काय करू? या विचाराने खचले पण डोळ्यांतलं पाणी निरपत बाबूराव पुन्हा उठले. कशाच्या बळावर कोण जाणे; पण दु:ख गिळलं; शेतात गेले; ढेकळांवरून हात फिरवला. बैलांबरोबर स्वतःलाही औताला जोडून घेतलं. नांगरणी, खुरपणी, पेरणी… पुन्हा सगळं सुरू झालं. सुगी चांगली दिसू लागली तसे पुन्हा त्यांच्या मनात आशेचे अंकुर फुटू लागले. यंदाच्या सुगीवर बॅंकेचं कर्ज फेडून टाकीन म्हणून लागले आणि तिकडं ती नियती का कोण आभाळामागे तोंड घालून हसू लागली. पाऊसकाळ नसतानाही रात्रभर बेफाम पाऊस पडला– भीती वाटावी असा – जणू प्रलय आला. सकाळी केव्हातरी पाऊस थांबला. अम्माच्या भाषेतला निलाजरा पाऊस एकदाचा थांबला. थांबला; पण आपल्याबरोबर सगळं घेऊन गेला. काळ्या रानात गुडघा गुडघा चिखल झाला. उभी जवारी कंबरेत मोडली. टपोरलेली कणसं चिखलात लोळली. घरं-दारं उदासली. दुसऱ्या दिवशी बाबूराव आले. पार खचून गेलेले. बाबांच्या गळ्यात पडून रडू लागले. ‘मी पार नागडा झालो हो वकीलसायेब…पार नागडा झालो…’ हमसाहमशी रडणाऱ्या बाबूरावांना पाहून त्या शाळकरी वयातही हलून गेले होते मी. बाबूरावांचं रडणं सहन होत नव्हतं मला. अनिलांची विराणी वाचली आणि त्या दिवशीच्या नागडा शब्दातलं भयंकर भीषण नागडेपण मनावर चरचरून उमटलं. बाबूरावांनी त्यानंतर अंथरूण धरलं आणि गेलेच नंतर ते. अनिलांच्याच शब्दांत सांगायचं तर…
हारल्याची हरवल्याची
जाणीव सलत राहते
अशा वेळी काळोखात
विरून जावे वाटते.
माणसाला सर्वात प्रिय काय – तर त्याचं असणं – त्याचं अस्तित्व! पण इथे तर कवीला काळोखात विरून जावंसं वाटतंय. कोणतीही तक्रार नाही, आक्रोश नाही…आहे फक्त स्वतःशीच काढलेला उद्गार! कुठे असूच नये, कुणाला दिसूच नये असं काहीतरी… बस्! विरून जावं! काळोखात विरून जावं! काळोखात विरून जावंसं वाटणं ही हरलेपणाची परिसीमा वाटते मला. हरल्यानंतर क्लांत होणं आणि मग काळोखात विरून जावं असं वाटणं म्हणूनच ही विराणी. वैराण, विराण वाटणं त्या अर्थाने ही विराणी. अनिलांची ‘विराणी’ ही कविता दशपदी या काव्यरचना प्रकारातील पहिली कविता. दहा ओळींत बांधलेली म्हणून दशपदी. अंतःसूत्र समान असलं, बीज एकच असलं तरी प्रत्येक ओळ तशी स्वतंत्र. विराणी वाचत असताना तिच्या आशयापासून जसं दूर जावंसं वाटत नाही तसंच तिच्या रचनात्मक अंगाकडेही दुर्लक्ष करवत नाही. शब्दांची योजना, मांडणी, यमकांतून आलेली लयबद्धता… सगळंच कसं देखणं! कवीच्या भावजीवनातून उतरलेलं एक सुरेख शब्दशिल्पच जणू.
आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी ‘अनिल.’ मराठी भाषेतील एक भावकवी. दशपदी, मुक्तछंद या काव्यप्रकारांचं पितृत्व त्यांच्याकडे जातं. आपली ‘प्रयोगशील कवी’ अशी ओळख त्यांना फारशी आवडत नसे कारण एक प्रयोग म्हणून कवितानिर्मिती होत नसते असं त्यांना वाटे. सबंध दशपदी हा एक उद्गारच आहे असं ते म्हणतात.
‘विराणी’च्या या दशपदीतून कवीचा हा उद्गार आपल्या अगदी मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतो आणि तो तिथे तसाच रुतून राहतो हे मात्र खरं!
विराणी
आभाळ खाली वाकलेले
मेघ काळे क्रूर
गुडघा गुडघा चिखल
आणि ओढ्यांनाही पूर
नुसता गडद अंधकार
वीज चमकत नाही
काळी माती काळे रान
मला मीही दिसत नाही
हाती दिवा होता त्याची
कधीच विझून गेली वात
कशानेही उजळत नाही
अशी काळीकुट्ट रात
आहे ओळखीचे पुष्कळ
काही दूर जवळ काही
असून नसून सारखेच
मी कुठे हे कळत नाही
हारल्याची हरवल्याची
जाणीव सलत राहते
अशा वेळी काळोखात
विरून जावे वाटते
कवी अनिल (दशपदी)
