हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये(१)

हिंदी चित्रपट संगीत हे भारतीयत्वाचे एक अविभाज्य अंग आहे.  अनेक गायक, कवी,संगीतकार यांच्या प्रतिभेच्या  स्पर्शाने नटलेले हे संगीत आहे. त्याने  आपले जीवन  सुसह्य व समृद्ध केले आहे. या संगीतप्रकाराकडे बघण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हिंदी चित्रपट संगीतात सादर केल्या  गेलेल्या   कथ्थक नृत्य  प्रकारावर  आधारित काही  गाण्यांचा  रसास्वाद घेत आहेत दिनेश शिंदे. 

गाण्यांप्रमाणेच नृत्य हा भारतीय चित्रपटांचा अविभाज्य भाग  आहे. भारतात कथ्थक, ओडिसी, मणिपुरी आणि भरतनाट्यम हे मुख्य ‘शास्त्रीय’ नृत्यप्रकार. केरळचे मोहिनीअट्टम पण यांत धरायला हवे. हिंदी चित्रपटांत लोकनृत्ये, पाश्चात्त्य नृत्यप्रकार यांशिवाय या प्रकारातील नृत्ये सादर झालीच. या लेखात काही उत्तम कथ्थक नृत्यांची ओळख करून घेऊ.

ज्या प्रमाणे चित्रपटगीते जरी एखाद्या रागात बांधलेली असली तरीही त्यात स्वातंत्र्य घेतलेले असतेच, त्यामुळे त्यांना रागावर ‘आधारित’ असेच म्हटले जाते – तसेच नृत्याच्या बाबतीत. अगदी शुद्ध शास्त्रीय नृत्य चित्रपटात क्वचितच दिसते. चित्रपटातील प्रसंग, त्या गाण्यातील शब्द, सादर करणारे कलाकार आणि अर्थातच दिग्दर्शक यांवर बरेच काही अवलंबून असते. 

एखाद्या कथ्थक कलाकाराचा रंगमंचावर झालेला आविष्कार आणि चित्रपटातील सादरीकरण यांत काही फरक आहेत. आताचे क्लोज सर्किट टीव्ही सोडले तर पूर्वी नृत्य बघताना त्या कलाकाराचे संपूर्ण शरीर डोळ्यांसमोर असे. चित्रपटात मात्र जर भावदर्शन असेल तर चेहऱ्याचा क्लोजअप, तत्कार असतील तर पायांचा क्लोजअप आणि अधूनमधून इतर कलाकारांच्या प्रतिक्रिया असे सर्व टिपले जाते; त्यामुळेच ते जास्त खुलते. 

चित्रपट संगीतात गायक कलाकार हा एक महत्त्वाचा घटक असतो (रंगमंचावर दुय्यम असतो.) आणि जर लता मंगेशकर, आशा भोसले असतील तर गायनातूनच बराचसा ‘अभिनय’ करून झालेला असतो; तरीपण लताची काही गाणी अशी आहेत, की ज्यावर उत्तम कथ्थक नृत्य होऊ शकले असते; पण चित्रपटात तसे झालेले नाही. आठवतात ती दोन उदाहरणे म्हणजे, ‘अनुराधा’ चित्रपटातील ‘सांवरे सांवरे, काहे मोसे करे जोराजोरी’ (संगीत : पं. रविशंकर, राग : भैरवी) आणि ‘दस्तक’ चित्रपटातील ‘बैंया ना धरो, ओ बलमा’ (संगीत : मदनमोहन, राग : चारुकेशी) 

चित्रपटात नर्तकीचे कौशल्य हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. आशा पारेख, पद्मा खन्ना, माधुरी दीक्षितसारख्या काही कलाकार मुळातच उत्तम कथ्थक नर्तकी होत्या; पण दुर्दैवाने पद्मा खन्नाला चित्रपटात क्वचितच कथ्थक सादर करायची संधी मिळाली. ती गोपीकृष्ण यांची शिष्या होती आणि आज प्रसिद्ध असणाऱ्या काही नर्तकी तिने त्यांना नृत्याचे धडे दिल्याचा आवर्जून उल्लेख करतात. दक्षिण भारतातून आलेल्या पद्मिनी, रागिणी, बी. सरोजादेवी, वैजयंतीमाला, मद्रास सिस्टर्स, हेमामालिनी, श्रीदेवी, जयाप्रदा, मधू, विद्या बालन  वगैरे बहुतेक अभिनेत्री आधीच भरतनाट्यममध्ये पारंगत होत्या; पण प्रसंगानुरूप या सर्व जणींनी कथ्थक नृत्ये लीलया सादर केली आहेत.

हिंदी चित्रपटांत भरतनाट्यमपेक्षा कथ्थक जास्त वापरले गेले कारण भरतनाट्यम प्रकाराला भक्तीचे वलय आहे, तसे कथ्थकला नाही. राधा-कृष्णांची गाणी जरी या प्रकारात सादर होत असली तरीही शृंगाररस प्रामुख्याने जास्त दिसतो. तसेच दरबारी नृत्य, मुजरा यालाही कथ्थकचाच पाया असतो आणि हे नृत्यप्रकार तर चित्रपटात हवेच. भरतनाट्यमपण वापरले गेलेच; पण ओडिसी, मणिपुरी आणि मोहिनीअट्टम तर अगदीच क्वचित. माझ्या आठवणीत तर अगदी एकेकच गाणे आहे. 

(‘आये सूर के पंछी आये’ चित्रपट : सूरसंगम, नर्तकी : जयाप्रदा, ओडिसी), 

(‘झनक झनक पायल बाजे’ शेवटचे गीत, नर्तकी : संध्या, मणिपुरी) 

(‘मुकाबला हम से ना करो,’ चित्रपट : शतरंज, नर्तकी : वैजयंतीमाला, मोहिनीअट्टम) 

या तिन्ही गाण्यांतील काही भागांतच हे नृत्यप्रकार आहेत. मीनाक्षी शेषाद्री, इशा देओल या दोघीही निष्णात ओडिसी नर्तकी होत्या; तरी चित्रपटांत त्यांना तशी संधी मिळाली नाही. 

याशिवाय त्या काळातील अनेक अभिनेत्री उदा. नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, माला सिन्हा, सुचित्रा सेन, नूतन, नंदा, शर्मिला टागोर, राखी नृत्यकुशल नव्हत्या तरीही त्यांनी उत्तम नृत्ये सादर केलीच. 

आता आपण कथ्थक शैलीतील काही नृत्ये बघू.

  1. १मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे (चित्रपट : मुगल-ए-आझम, गायिका : लता मंगेशकर, संगीतकार : नौशाद, नर्तकी : मधुबाला )

हे गाणे मुळात रंगीत नव्हते – पण आता रंगीत बघताना जास्त खुलून दिसते. राग गारामधली ही रचना लताने सुंदरच गायली आहे. मुघल दरबारातील नृत्य असल्याने कथ्थक शैली अगदी नैसर्गिकरित्या आली आहे. मधुबालाने सुंदर प्रयत्न केला आहे. अभिनयकुशल तर ती होतीच त्यामुळे मुद्राभिनयाचा प्रश्नच नव्हता; पण यात तिचा पायांचा क्लोजअप नाही. पायांत नेहमी असतात तसे घुंगरूदेखील नाहीत. कथ्थककुशल नर्तकी असती, तर ‘नैनों से जादू किया’ या ओळीवर भुवयांची एक विशिष्ट हालचाल केली असती. आपण कथ्थकच्या नजरेतून हे बघतो आहोत, म्हणून हे तपशील लिहीत आहे. गाणे सुंदर आहेच!

https://www.youtube.com/watch?v=h8gDs2CmHP8

  1. तोरे नैना लागे (चित्रपट : ममता, गायिका : संध्या मुखर्जी, संगीतकार : रोशन, नर्तकी : सुचित्रा सेन )

ममतातील गाणी अविस्मरणीय आहेत. या चित्रपटाची नायिका (डबल रोलपैकी एक) तवायफ असली तरीही यात मुजरा मात्र एकच आहे. (चाहे तो मोरा जिया लै ले) तोदेखील सुचित्रा सेननेच सादर केला आहे. (लताच्या गायनापुढे हे नृत्य तितकेसे प्रभावी वाटत नाही.)  पण केवळ दीड मिनिटांसाठी असलेली ही संध्या मुखर्जी यांनी गायलेली  ठुमरी आणि सुचित्रा सेनचा मोहक आविष्कार जरा वेगळा आहे… ही नेत्रपल्लवी कितीही मोहक दिसत असली तरी त्यात कथ्थकची अस्सलता नाही. सुचित्रा सेन अर्थातच कुशल नर्तकी नव्हती.

  1. थाडे रहियो ओ बॉंके यार रे (चित्रपट : पाकीज़ा, गायिका : लता मंगेशकर, संगीतकार : गुलाम मुहम्मद, नर्तकी : मीनाकुमारी आणि पद्मा खन्ना)

पाकीज़ा चित्रपटातील गीते आणि सादरीकरण यांनी एक आदर्श घालून दिला आहे आणि पुढे अनेक चित्रपटांत त्याची नक्कल झाली, अगदी अलीकडच्या हिरामंडी या मालिकेतदेखील ती झाली! संगीतकार गुलाम मुहम्मद यांनी या चित्रपटासाठी अनेक गाणी रेकॉर्ड केली होती; पण ती चित्रपटात वापरलीच गेली नाहीत. (सुदैवाने ती आता यू ट्यूबवर उपलब्ध आहेत.) त्याशिवाय नौशादने या चित्रपटाचे पार्श्वसंगीत करताना ‘कौन गली गयो श्याम’ (बेगम परवीन सुलताना), ‘मोरा साजन सौतन घर जाये’ (वाणी जयराम), ‘नजरिया की मारी’ (राजकुमारी) अशा तीन ठुमऱ्या रेकॉर्ड केल्या होत्या. चित्रपटात त्या पार्श्वभूमीवर वाजतात. (यांपैकी नजरिया की मारी ही ठुमरी, हिरामंडी या मालिकेतदेखील वापरली आहे.)

हे गाणे लिहितानाच त्यात नृत्याला वाव मिळेल असे लिहिले आहे आणि अर्थातच लताने ते सुंदरच गायले आहे. 

त्यात लताने द्रुत लयीत ‘धा धित ता, धा धित ता, धा धा गित ता, गित धा धित ता, धा गित धित ता, धा ना धा ना धा, धा गित धित ता, धा ना धा ना धा, धा गित धित ता’ असा एक तुकडा गायला आहे. (माझ्या आठवणीत तरी तो एकमेव आहे.) 

मीनाकुमारीदेखील कुशल नर्तकी नव्हतीच.  या गाण्यात तिने बरीच मेहनत घेतली आहे. मी वर पद्मा खन्नाचे नाव घेतले आहे कारण या चित्रपटातील बऱ्याचशा नृत्यांत आणि ‘चलो दिलदार चलो’ या गाण्यात ती मीनाकुमारीची बॉडी डबल म्हणून वावरलेली आहे. या गाण्यातदेखील तत्काराचे दोन शॉट्स तिच्या पायांचे आहेत; पण कुशल संकलनामुळे ते लक्षात येत नाहीत; तरीही अनेक शॉट्स मीनाकुमारीने स्वतः दिले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=rnsnOAQL7dY

  1. कान्हा  मैं तोसे हारी (चित्रपट : शतरंज के खिलाडी, गायक आणि संगीतकार :  ब्रिजमोहन नाथ मिश्रा उर्फ प्रख्यात कथ्थक नर्तक बिरजू महाराज,  नर्तकी : शाश्वती सेन)

आता आपण अगदी अस्सल कथ्थक नृत्य बघू. सत्यजित राय यांचा हा चित्रपट. मुन्शी प्रेमचंद यांच्या एका कथेवर आधारित होता. (पण शेवट बदलला होता.) एखादा निष्णात कलाकार असेल तर नृत्य किती उंचीवर पोहोचते त्याचे हे उदाहरण आहे. बिरजू महाराज कथ्थकमधल्या लखनौ घराण्याचे जनक आहेत. त्यांनी इतरही काही चित्रपटांसाठी काम केले आहे.  शाश्वती सेनदेखील प्रख्यात नर्तकी आहे. (त्या वेळी मात्र ती विद्यार्थिनी होती आणि प्रथमच तिने चित्रपटासाठी नृत्य सादर केले होते.) भैरवी रागातील ही ठुमरी आहे. ठुमरीत मोजकेच शब्द असतात पण त्यापलीकडचे सांगण्यासाठी स्वरांचा आधार घेतला जातो. इथे तर नृत्य हे माध्यम आहे त्यामुळे शब्दांत नसलेले बरेच काही मुद्रांतून दिसते. दिग्दर्शकीय बारकावा म्हणायचा तर या गाण्यात नर्तकीचे जे साथीदार आहेत ते उभ्याने वादन करत आहेत कारण त्या काळात त्यांना कमी दर्जाचे मानले जात असल्याने दरबारात त्यांना बसण्याची मुभा नसे.

  1. जा मैं तोसे नाहीं बोलू (चित्रपट : सौतेला भाई, गायिका : लता मंगेशकर, संगीतकार : अनिल विश्वास, नर्तकी : रानीबाला आणि जीवनकला)

हे गाणे म्हणजे लताला काहीही अशक्य नव्हते याचा पुरावा आहे. असा दमसास, अशा द्रुत लयीतल्या ताना आणि तरीही सुरेल असे हे गाणे आहे. अडाणा आणि थोडाफार काफी असे राग आहेत. पडद्यावर दोन नर्तकी असल्या तरीही गायिका एकच (एकमेव लता!) आहे. या चित्रपटात दुसरे एक गाणे आहे (लागी नाही छुटे) ते लता आणि मीना कपूर या दोघींनी गायले आहे. पण या गाण्यात मात्र तिचा एकटीचाच आवाज आहे. 

यातला लताचा तुच्छतेचा हुंकार तर शब्दातही लिहिता येणार नाही मला. 

या नृत्यातील बहुतांश भाग बसूनच केलेला आहे; तरी दोघींचे हातवारे आणि डोळ्यांच्या अदा ते जाणवू देत नाहीत. रानीबालाबद्दल फारसे माहीत नाही; पण जीवनकला काही मराठी चित्रपटांतही झळकली होती.

  1. जा जा रे जा बालमवा (चित्रपट : बसंतबहार, गायिका : लता मंगेशकर, संगीतकार : शंकर जयकिशन, नर्तकी : कुमकुम)

कुमकुम एक अत्यंत कुशल नर्तकी होती. अनेक सुंदर गाण्यांवर (मधुबन में राधिका नाचे रे, हो मोरा नादान बालमा, दगा दगा वई वई वई, दिया ना बुझे री) तिने उत्तम नृत्ये सादर केली आहेत. प्रस्तुत गाण्यात तिच्या डोळ्यांच्या, भुवयांच्या हालचाली मुद्दाम बघण्यासारख्या आहेत. हे अस्सल कथ्थक; शिवाय गाण्यातील प्रत्येक शब्द हावभावांतून दाखवणे हेही यात आहेच. 

मुद्दाम बघा,  त्या काळात कॅमेरा फारसा हलवत नसत आणि अनेक दीर्घ सलग शॉट्स यात आहेत. अर्थातच त्यासाठी कुशल नर्तकी आणि सराव दोन्ही आवश्यक होते. 

  1. आ भी जा रसिया (चित्रपट : फूलों की सेज, गायिका : लता मंगेशकर आणि मन्ना डे, संगीतकार : आदि नारायण राव, कलाकार : वैजयंतीमाला आणि गोपीकृष्ण )

तीन भागांत हे गाणे आहे. या गाण्यात गायनात मन्ना डे आणि लता यांची जुगलबंदी आहे; तर नृत्यात गोपीकृष्ण आणि वैजयंतीमाला यांची. वैजयंतीमालाने जरी भरतनाट्यमचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले होते तरीही तिला कुठलाही नृत्यप्रकार वर्ज्य नव्हता. या गाण्यात गोपीकृष्णांच्या तोडीस तोड तिने पदन्यास केला आहे. अक्षरशः नजर ठरत नाही; पण तरीही एक बाब तुम्ही लक्षात घ्या, तिच्या चेहऱ्यावरचे भाव हे सात्त्विकच आहेत – हे भरतनाट्यमचे संस्कार. वरच्या कुमकुमच्या नृत्याशी तुलना केल्यास तुमच्या हे सहज लक्षात येईल.

  1. मनभावन के संग जाये गोरी (चित्रपट : चोरी चोरी, गायिका : लता मंगेशकर, आशा भोसले, संगीतकार : शंकर जयकिशन, नर्तकी : साई आणि सुबलक्ष्मी )

या दोघी भरतनाट्यम नर्तकी होत्या आणि अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी नृत्ये सादर केली आहेत. (उदा. अपलम चपलम – चित्रपट : आजाद) या नृत्यात जरी वरकरणी कथ्थक शैली दिसत असली तरी त्यातले भरतनाट्यम लपत नाही. भारतातील सर्वच शास्त्रीय नृत्यप्रकार भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित असले तरीही त्यांत शैलीचे भेद आहेतच; पण त्याच वेळी हे खरे आहे, की एका प्रकारात निष्णात असलेले कलाकार दुसरे प्रकार थोड्याफार प्रयत्नाने सादर करू शकतात. (निदान चित्रपटात तरी!) हे गाणे नृत्यगीत असावे असे ऐकताना वाटत नाही तरीही यावरचे नृत्य अगदी विसंगतदेखील वाटत नाही.

https://www.youtube.com/watch?v=eVGy9z38KCU

Author

Leave a Reply