मुखपृष्ठाविषयी : जानेवारी २०२५ 

या वेळच्या   मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत मुंबई  येथील राधिका कुंटे… आपल्या छायाचित्राविषयी त्या  म्हणतात : 

सदाफुली

परवाच जवळच्या एका बागेत गेले होते तर ही दिसली – ‘सदाफुली.’

बागेत असो किंवा कुंडीत, ती नेहमीच दिसते एकदम टवटवीत नि तजेलदार… 

अगदी नावाप्रमाणंच! 

लगेच तिला म्हटलं ‘हॅलो’… 

आम्ही एकमेकींची खुशाली विचारली;  मग फेरी मारताना तिच्या आणि तिच्या बहिणींविषयीची आठवण मनात दाटली. जणू आठवणींची पालवीच फुटली… 

आठवली आणखीन एकीशी झालेली पहिली भेट… 

मैत्रिणीसोबत गेले होते एका प्रदर्शनाला. चिक्कार गर्दी होती – माणसांची आणि पानाफुलांचीही… अचानकच आपलं लक्ष एकमेकींकडं गेलं. आम्ही दोघी क्षणभरातच तुमच्याकडं वळलो… 

तू नि तुझ्या काही मैत्रिणी माझ्यासोबत आणि तुझ्या काही  मैत्रिणी मैत्रिणीसोबत असे आपले दोन गट झाले. घरी आल्यावर निगुतीनं तुझ्यासाठी छानशी जागा केली. तुला खाऊपिऊ घातलं. रोज क्षणभर गप्पा मारल्या…दिवस जात राहिले.  

बॅक टू द  प्रेझेंट … अजूनही घरातल्या कुंडीत ती नावाप्रमाणंच कायम प्रफुल्लित, हसतमुख वावरते आहे; बहरते, फुलते आहे… सुखातही… दुःखातही… कुणी कौतुक केलं तरीही नि नाक मुरडलं तरीही… आपसूक काहीएक शिकवून जातं ‘सदाफुली’चं वागणं. 

Author

2 thoughts on “मुखपृष्ठाविषयी : जानेवारी २०२५ 

  1. छानच लिहिले आहेस राधिका ! सदाफुली जीवनात सकारात्मक रहायला शिकवत राहते नेहमीच …

  2. खूप छान पैकी लिहिलं आहे.
    वाचून खूप आनंद झाला. मन भरून आलं.
    शुभ सकाळ.🙏

Leave a Reply