मुलाखत या शब्दाला हिंदीमध्ये ‘साक्षात्कार’ म्हणतात. मुलाखत म्हणजे नक्की काय हे समजावून घ्यायचे असेल तर हा साक्षात्कार हा शब्द योग्य आहे. मुलाखत म्हटले की कोणीतरी कुणाला तरी प्रश्न विचारायचे असा सर्वसाधारण प्रकार. म्हणजे ती फक्त उत्तर देणाऱ्याचीच परीक्षा असते असे काहीसे वाटू शकते. प्रत्यक्षात माझ्या मते ती प्रश्न विचारणाऱ्याचीही परीक्षा असते. बहुतांशी मुलाखत यशस्वी होते का नाही हे प्रश्नकर्त्यावरच अवलंबून असते. मुलाखत जवळपास सर्व माध्यमांवर घेतली जाते आणि घेता येते. छापील मासिके,नियतकालिके, दृक्श्राव्य माध्यमे, नुसती श्राव्य माध्यमे अशा अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मुलाखती पाहायला मिळतात. मुलाखतकारामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना कीर्ती किंवा काही वेळेला अपकीर्ती मिळते.
मुलाखतकारासाठी संपूर्ण मुलाखत ऐकावी, पाहावी असे एक आघाडीचे नाव म्हणजे करण थापर. आधी हार्ड टॉक या नावाने व नंतर दि इंटरव्यू व डेविल्स ॲडव्होकेट या नावाने झालेले आणि होणारे त्यांचे कार्यक्रम खूप लोकप्रिय आहेत. इंग्रजी वर्षाच्या अखेरीला ते एक मनोरंजक प्रयोग करतात – म्हणजे भूमिकांची आलटापालट करतात. कोणीतरी त्यांची मुलाखत घेते. या वेळी तृणमूल काँग्रेसच्या तडफदार खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांची अशीच मुलाखत घेतली आहे.
बऱ्याच वेळा उत्तरांपेक्षा तुमचे प्रश्नच लांबलचक असतात असे तुम्हांला वाटत नाही का? असे विचारले गेल्यावर थापर यांनी सांगितले की लोक ज्या वेळी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन तुमचा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम पाहतात त्या वेळी तुमची जबाबदारी खूप वाढते. लोक काहीतरी खातरीची माहिती मिळेल या अपेक्षेने तुमचा कार्यक्रम बघत, ऐकत असतात. एखादा प्रश्न जो मुलाखत देतोय त्याला आणि प्रेक्षकांना – दोघांनाही अतिशय स्पष्टपणे समजला पाहिजे असे मला वाटते. त्यासाठी त्या प्रश्नाशी निगडित सर्व कंगोरे थोडक्यात सांगून मग तो प्रश्न विचारायचा अशी माझी पद्धत आहे. त्यामुळे माझे प्रश्न थोडेसे लांबतात हे खरे आहे.
एखादा माणूस मुलाखत देत असताना त्याचे उत्तर तुम्ही बऱ्याच वेळा मध्ये तोडता त्याचे कारण काय? यावर थापर यांनी चार महत्त्वाची कारणे सांगितली… पहिले म्हणजे उत्तर देणारा प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करतो, दुसरे म्हणजे उत्तरात वैचारिक गोंधळ असतो, तिसरे म्हणजे उत्तरात काही शब्द असे वापरले जातात की त्याचा अर्थ ऐकणाऱ्यांना माहीत नसण्याची शक्यता असते आणि चौथे म्हणजे मुलाखत रंगात आली की किंवा भावनेच्या भरात प्रश्नकर्ता व उत्तरकर्ता दोघेही एकाच वेळी बोलू लागतात आणि कुणाचेच नीट ऐकायला येत नाही.
करण थापर बऱ्याच वेळा मुलाखत घेताना बो टाय ( Bow tie) वापरतात त्याचे कारण काय, असे विचारले असता, ‘ही सवय मला मी केंब्रिजमध्ये असताना लागली. भारतात अशा पद्धतीचा टाय फारसा वापरला जात नाही असे लक्षात आल्यानंतर मी जाणीवपूर्वक हा टाय वापरायला सुरुवात केली; त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण व्हायला मदत होईल असे मला वाटले आणि तुमच्या प्रश्नावरून माझा हा हेतू सिद्ध झाल्यासारखे वाटते,’ असे त्यांनी हसत सांगितले.पाश्चात्त्य विश्वात हा टाय म्हणजे परंपरा नाकारण्याचे प्रतीक समजला जातो. येथे करण थापर यांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायला हवे : ते केंब्रिज युनियन या केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न अशा एका ऐतिहासिक संस्थेचे अध्यक्ष होते. विचारस्वातंत्र्याला वाहिलेली ही एक वादविवाद संस्था आहे. थापर यांनी बेनझीर भुत्तो यांची घेतलेली मुलाखत खूप गाजली होती. त्या ‘ऑक्सफर्ड युनियन’ या अशाच प्रकारच्या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. इंग्लंडमधील या दोन ऐतिहासिक विद्यापीठांमध्ये एक चांगली स्पर्धा असते. त्याची या निमित्ताने आठवण झाली.
करण खापर यांना तीन बहिणी आहेत आणि ते स्वतः सगळ्यात धाकटे आहेत. ‘त्यामुळे माझ्या कुटुंबात मी बराचसा लाडावलेला होतो,’ हे त्यांनी मान्य केले. निवासी शाळेत राहिल्यामुळे मी स्वतंत्र विचार करायला शिकलो, प्रतिकूल गोष्टींचा सामना करायला शिकलो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विचार व वर्तणूक यांत मी धर्म -जात निरपेक्ष झालो असे त्यांनी सांगितले.
केंब्रिज विद्यापीठातील शिक्षण संपल्यानंतर तेथील ख्यातनाम अशा ‘लंडन टाइम्स’ या वृत्तपत्रात त्यांनी नोकरीला सुरुवात केली. नायजेरियाची राजधानी लागोस येथे त्यांची नेमणूक झाली. तेथील एक मनोरंजक घटना त्यांनी सांगितली. नाताळ सुट्टीला येण्यापूर्वी ते त्यांच्या काही मित्रांसोबत तेथील एका सुप्रसिद्ध उपाहारगृहात जेवायला गेले असताना त्यांनी घरी परतताना नायजेरियन परराष्ट्र खात्याच्या इमारतीला लागलेली भीषण आग पाहिली. ही इमारत समुद्रकिनारी होती; खूप भव्य होती आणि तिला लागलेली आग अक्राळ- विक्राळ झालेली होती. अग्निशमन दल तेथे येऊन पोहोचले होते परंतु ते त्यासाठीच्या पाईपमध्ये अक्षरशः बादलीने पाणी भरत होते आणि ते मोटारने उचलून त्या आगीवर मारण्याचे केविलवाणे प्रयत्न चालू होते. याची बातमी केली आणि पाठवली. ती प्रसिद्ध झाली. त्या बातमीवर आधारित वार्तांकन बी बी सी वरही प्रसिद्ध झाले. दुसरे दिवशी नायजेरियन परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला बोलवून या बातमीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मी नाताळच्या सुट्टीसाठी भारतात आलो. मला अचानक माझ्या वृत्तपत्राच्या लंडन कार्यालयातून दूरध्वनी आला. नायजेरियाने माझी हकालपट्टी केली होती. (Persona Non Grata).
मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्याच्या करण थापर यांच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर नाराज झालेल्या लोकांची यादी खूप मोठी आहे.
त्यामध्ये नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, कपिल सिबल, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
त्यांच्या निर्भिडपणाची ही पावती समजायची का ?
