मेंदूचे आरोग्य आणि स्वास्थ्य

माझा एक न्युरॉलॉजिस्ट मित्र आहे; त्याच्याशी गप्पा मारत होतो. तो म्हणाला, “हृदयविकारावर प्रतिबंधक     उपायांसाठी ‘प्रिव्हेंटिव्ह कार्डिऑलॉजी’ ही शाखा आहे, तशीच पोटाच्या विकारांवरही असेल; पण मेंदूच्या विकारांच्या प्रतिबंधासाठी अशी शाखा नाही.”

 त्यावर मी म्हणालो “अरे हृदयविकारांवरचे प्रतिबंधक उपाय मेंदूच्या विकारालाही लागू आहेत.”

“तू म्हणतोस ते थोडेफार खरे आहे पण पूर्णपणे खरे नाही. मेंदू हा सगळ्यात गुंतागुंतीचा अवयव आहे; त्यामुळे त्यावरचे प्रतिबंधक उपाय थोडे निराळे आहेत,” असे म्हणून त्याने शोधनिबंधांचे काही संदर्भ दिले आणि माहिती सांगितली. ती पुढील प्रमाणे –                                                           काही आकडेवारी                                                                                                    जागतिक आरोग्य संघटनेने जगावर रोगाचे ओझे असा एक प्रकल्प राबवलेला आहे (Global Burden Of Disease Project) 

त्यानुसार जगात ९७ कोटी   लोकांना मेंदूच्या विकृतीचा त्रास आहे. अंदाजे जगातील १० पैकी एकाला मेंदूचा रोग असण्याची शक्यता आहे. लकवा, डिमेनशिया, अर्धशिषी =Migraine, कंपवात = Parkinson, फीट येणे = Epilepsy आणि मेंदूला दुखापत ही काही महत्त्वाची नावे मुद्दाम सांगितलेली आहेत. ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या हे त्याला लाभलेले एक परिमाण आहे.                                       

यांतील प्रत्येक रोगावरचे प्रतिबंधक उपाय सांगणे हा या लेखाचा उद्देश नाही; पण सर्वसामान्यपणे मेंदूचे आरोग्य आणि स्वास्थ्य राखण्याकरता काय केले पाहिजे हे विविध शोधनिबंधांतून सांगितले आहे त्याचा हा आढावा आहे. अशी काळजी घेतली  तर मेंदूच्या बऱ्याच विकृती टाळता येतात असे संशोधकांनी प्रयोगसिद्ध केले आहे. मेंदूच्या आरोग्याची सुरुवात जीवनात केव्हापासून होते याचे भान आणून देणारे निबंधही मेंदूतज्ज्ञानी लिहिले आहेत.  कुपोषित माता, कुपोषित मुले                                                                                 महिला गर्भार होण्याआधी तीन महिने फॉलिक ॲसिड  हे जीवनसत्त्व = व्हिटॅमिन घेऊन ते बाळाचा जन्म होईपर्यंत घेत राहणे महत्त्वाचे असते. गर्भधारणा म्हणजे बीजारोपण झाल्यापासून तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात चेतासंस्था = नर्व्हस सिस्टिम आकार घेऊ लागते. याला न्युरल प्लेट आणि नंतर न्युरल ट्यूब असे म्हणतात. यांच्या विकास व वाढीसाठी फॉलिक ॲसिड या जीवनसत्त्वाची फारच गरज असते. या गर्भवाढीच्या काळात जर हे जीवनसत्त्व मिळाले नाही तर मेंदूत अनेक दोष निर्माण होण्याची शक्यता असते. या न्युरलट्यूबपासून मेंदू, मज्जारज्जू = स्पायनल कॉर्ड आणि मज्जातंतूंचे शरीरभर पसरणारे जाळे  तयार होणार असते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील एका निबंधात ब्रिटिश सरकारने प्रत्येक धान्यपिठात फॉलिक ॲसिड हे जीवनसत्त्व मिसळण्याची सूचना उद्योजकांना केली आहे. यावरून फॉलिक ॲसिड हे जीवनसत्त्व माता पोटुशी असताना तिला मिळणे किती गरजेचे आहे हे लक्षात येईल. मेंदूच्या आरोग्याची सुरुवात येथपासून होते.                                    

 जागतिक भूक निर्देशांकातील आकडेवारी धक्कादायक आहे. ‘भुकेचा हुंकार कोण ऐकणार,’ डॉ. अमोल अन्नदाते, मुंबई महाराष्ट्र टाइम्स २९ ऑक्टोबर २०२४ यांच्या लेखातून ही आकडेवारी घेतली आहे. 

‘नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांकात १२७ देशांपैकी भारत १०५ क्रमांकावर आला आहे. अपेक्षित गुणांकन ९.९ एवढे आहे. भारताचे गुणांकन २७.३ आहे. हे गंभीर आहे. हा निर्देशांक काढताना मुख्य चार घटक मोजतात.                        

 १ पाच वर्षांखालील दीर्घकालीन कुपोषणामुळे उंची वयापेक्षा कमी असलेल्या मुलांचे प्रमाण  ३५.५ टक्के                                                            

२ कमी पोषण किंवा गरजेपेक्षा कमी उष्मांक = कॅलरीज मिळणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण १३.७ टक्के.                                                          

३ पाच वर्षांखालील वय व उंचीच्या प्रमाणात वजन कमी असलेल्यांचे प्रमाण १८.७ टक्के.      

४ बालमृत्यू म्हणजे पाचव्या वाढदिवसाआधीचे मृत्यू ३ टक्के.                                               

या आकडेवारीच्या तपशिलात जाण्याची गरज नाही. याचा गोळाबेरीज अर्थ काय होतो हे बघितले पाहजे. समाजात इतके कुपोषण असेल तर त्याचा वाईट परिणाम प्रथम बालकांच्या विकसित होणाऱ्या मेंदूवर होईल. या मेंदूवर होणाऱ्या परिणामांचे  विपरीत प्रभाव दूरगामी असून प्रौढ वयात ते त्या व्यक्तीला त्रासदायक ठरतात.                                                                             क्रांतिक काल = क्रिटिकल पिरियड                                                                              गर्भधारणेपासून दोन वर्षांपर्यंत = ‘पहिले १००० दिवस’  आणि दोन वर्षांपासून वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत = ‘पुढचे १००० दिवस’ हा  बालकाच्या जीवनातील काळ शरीराच्या तसेच मेंदूच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या काळात बाळकांचे योग्य पोषण होणे हे निकडीचे असते. या काळाला पोषणासाठीची संधी ( ‘विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी’) म्हणतात.लॅंसेट या जगप्रसिद्ध विज्ञानपत्रिकेत १८ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन महत्त्वाचे शोधनिबंध प्रकाशित  झाले आहेत. त्यांत मध्यम उत्पन्न असणारे  देश आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या देशांतील आकडेवारी दिली आहे. इथे सगळी आकडेवारी देण्याची गरज नाही. वानगीदाखल एकच महत्त्वाची आकडेवारी देत आहे. मिडल इन्कम आणि लो इन्कम देशांतील (भारत मिडल इन्कम देशात मोडतो) फक्त २५% बालकांचे पोषण योग्य पद्धतीने होते. याचा अर्थ बहुसंख्य बालके कुपोषित रहातात. त्यांच्या मेंदूची वाढ खुंटते. याचा विपरीत प्रभाव मुलांच्या बोधनक्षमतेवर, बुद्ध्यंकावर होतो. बाळकांचे पोषण ही उत्तम नागरिक निर्मिण्याकरता खर्च फलदायी = कॉस्ट इफेक्टीव गुंतवणूक असते.                                                                                                                   शिक्षण आणि मेंदूचे आरोग्य                                                                      बालशिक्षणापासून मेंदूच्या आरोग्याची सुरुवात होते. शिक्षण या प्रक्रियेमुळे मेंदूतील चेतापेशींचे = न्यूरॉन्सचे जाळे वाढण्यास सुरुवात होते. चेतापेशींतील जोडण्या घट्ट होत जातात याचे चांगले परिणाम बाळपणापासून दिसू लागतात.  शिक्षण ही पायरी-पायरीने, टप्प्या-टप्प्याने, मेंदूवर प्रभाव पाडणारी क्रिया आहे. मेंदूसुद्धा टप्प्याटप्प्याने वाढत असतो. माणसाचा मेंदू त्याच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत सातपट मोठा असतो; पण त्यातील ‘न्यूरॉन्स’ मात्र खूपच सूक्ष्म असतात. खालच्या स्तरावरील इतर सस्तन प्राण्यांत (नर-वानरगण सोडून) न्यूरॉन्सचा आकार मोठा असतो. दोन न्यूरॉन्समध्ये जागा जास्त असते त्यामुळे त्यातील संदेशवहन वेगाने होत नाही म्हणून अशा प्राण्यांची बुद्धी कमी असते. माणसाच्या मेंदूतील न्यूरॉन्स सूक्ष्म, त्यांतील अंतर कमी म्हणून संदेशवहन वेगवान  म्हणून बुद्धी तेज असते. मेंदूच्या क्षमतांचा  विचार करताना मेंदूच्या सूक्ष्मरचनेचा विचार लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. शिक्षणाने क्षमता आणि कार्यकुशलता दोन्ही विकसित करावयाच्या असतात. शिक्षण हे शाळा-कॉलेजांत जाऊन घेतले जाते कारण तेथे ते विशिष्ट आकृतिबंधांत मिळते. शाळा सोडलेल्या, कॉलेज सोडलेल्या (ड्रॉप आऊट्स) काही व्यक्ती यशस्वी झालेल्या दिसतात; पण हे अपवाद असतात, तो नियम नाही. Megan Nolan (जन्म १९९०) लंडन येथे राहणाऱ्या आयरीश सुप्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार आहेत. त्या कॉलेज ड्रॉप आऊट आहेत; पण कॉलेज अर्धवट सोडल्यामुळे आपण काय गमावले हे त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितले आहे; त्याचा थोडक्यात आशय असा : ‘मला नंतर उमगले, ‘स्वत:ला वाटणे =To Feel’ एवढेच फक्त मला कळले होते, शिस्तबद्ध विचार कसा करायचा हे मी शिकले नव्हते, आता ते मी शिकू शकेन असे मला वाटत नाही. मी एक कच्चा मेंदू आहे, माझ्या विचारप्रक्रियेत सफाईदारपणा नाही. माझ्या मेंदूत जो विचारांचा साठा आहे त्याला प्रमाणबद्ध लय नाही.’ माणसाच्या मेंदूत दोन गोष्टी सतत चालू असतात : to feel = वाटणे, अनुभवणे आणि to think = विचार करणे. माणूस अनुभवातून शिकतो आणि बदलतो, त्याचप्रमाणे विचार करतो, शिकतो आणि बदलतो. या दोन्ही क्रिया परस्परपूरक झाल्या पाहिजेत. प्रत्येक माणूस सगळे अनुभव घेऊ शकत नाही, तसेच सर्व बाजूंनी विचार करू शकत नाही. शाळा कॉलेजातील शैक्षणिक वातावरणामुळे  हे घडते आणि यात मेंदूच्या आरोग्याची बीजे साठवलेली असतात म्हणून शिक्षण महत्त्वाचे.                                                      निरंतर शिक्षण                                                                                                       शिक्षण ही सतत चालू राहणारी प्रक्रिया जीवनात असणे मेंदूच्या स्वास्थ्याकरता महत्त्वाचे असते. म्हातारपणातसुद्धा काहीतरी नवीन शिकणे, ही मेंदूचे आरोग्य टिकवण्यासाठीची एक गरज आहे. पदवी, नंतर पदव्युत्तर शिक्षण, मग पी एच. डी., मग पोस्ट डॉक शिक्षण अशा पायऱ्या काहीजण चढत असतात. याचा मेंदूवर काय परिणाम होतो याबद्दल संशोधन चालू आहे. शिक्षण कमी असलेल्या माणसात ‘डिमेनशिया’ आणि ‘अल्झायमर-विकार’ यांचे प्रमाण जास्त असते. उच्चशिक्षितांमध्ये या दोन्ही न्युरोडिजनरेटिव = मेंदूच्या ऱ्हासाच्या विकारांचे प्रमाण कमी असते आणि हे विकार जीवनात बऱ्याच उशिरा सुरू होतात. असे का घडत असावे यावर संशोधन जारी आहे. म्हातारपणातसुद्धा मेंदूचे आरोग्य टिकवून ठेवण्याकरता कुतूहल जागृत ठेवून सतत काही नवीन शिकत रहाणे हा चांगला उपाय आहे असे मेंदूतज्ज्ञांचे मत आहे. ‘वृद्धत्वी निज शैशवास जपणे’ असे कवी केशवसुत सांगून गेले आहेत.                                                                                    झोपेचे महत्त्व                                                                         

बालपणापासून म्हातारपणापर्यंत मेंदूच्या स्वास्थ्य-आरोग्याकरिता झोप आवश्यक असते. पाळण्यात बाळ १६ ते १८ तास झोपते.पुढे झोप हळूहळू कमी होत जाते. वयाच्या साठी नंतर ६ तास झोप लागते. बालपणी झोपेत मेंदूची वाढ आणि विकास होत असतो हे सगळ्यांना माहीत आहे; तरीसुद्धा झोप हा मेंदूविज्ञानाकरिता अजूनही अज्ञात प्रदेश आहे; पण आधुनिक तंत्रज्ञानाने त्यावर प्रकाश पडत आहे. झोपेत आपली तर्कबुद्धी, आपले मेंदूवरील नियंत्रण, तार्किक निर्णय, आवेगावर नियंत्रण हे सगळे ‘switched off’ असते. झोपेत उद्दीपनांवर = stimuli प्रक्रिया करण्याची मेंदूची पद्धती जागेपणापेक्षा निराळी असते असे संशोधनात आढळून आले आहे. Electroencephalogram = E E G चा शोध लागला. मेंदूतील विद्युतलहरींचे मुद्रण सुलभ झाले. जागेपणातील मेंदूच्या विद्युतलहरी आणि झोपेतील विद्युतलहरी यांत खूपच फरक असतो हे इ इ जीमुळे लक्षात आले. जागेपणातील मेंदूतील क्रिया आणि झोपेतील क्रिया यांत खूप फरक असतो याचा हा एक पुरावा होता. झोपेत मेंदू स्वस्थ बसलेला नसतो. त्याचे उद्योग चालू असतात. त्यांतील एक ठळक उदाहरण म्हणजे ‘memory consolidation’ = स्मृतींचे दृढीकरण = आठवणींचे मजबूतीकरण. हे कसे होते ते पाहू : आठवणी झोपेत मजबूत होतात या विचाराची मुळे काळात खोलवर गेलेली आहेत. पहिल्या शतकातील रोमन विचारवंत Marcus Fabius Quintilian याने लिहून ठेवले होते, ‘एका रात्रीची झोप स्मृतींची ताकद खूपच वाढवते.’ विज्ञानाने आज हे दाखवून दिले आहे. माणूस दिवसभरात अनेक गोष्टी अनुभवत असतो, त्यांतून अनेक स्मृती – आठवणी तयार होत असतात; पण सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत – काहीच राहतात आणि काही माणूस विसरून जातो. दिवसभरात येणारी माहिती मेंदूतील ‘hippocampus’ या केंद्रात साठवली जाते. माणूस निवांत झोपला म्हणजे मेंदू कामाला लागतो. या माहितीतील जी माहिती त्या व्यक्तीला म्हणजे त्या मेंदूला महत्त्वाची वाटते ती निवडली जाते आणि इतर माहितीचा त्याग केला जातो. आता निवडलेली माहिती पूर्वीच्या स्मृतींशी म्हणजे ज्ञानाशी सांधली  = integrate  जाते. हे एकात्मीकरण cerebral cortex म्हणजे मेंदूच्या उच्च केंद्रात घडते आणि तेथेच दीर्घकालिक स्मृती म्हणून साठवली जाते. हे सगळे विद्युतरासायनिक पद्धतीने घडते. या सगळ्या घडामोडींचे चित्रण positron-emission tomography म्हणजे पि इ टि स्कॅन या तंत्रज्ञानाने केले आहे. हे नुसते शब्द नसून या घडामोडी विज्ञानाने चित्रित केल्या आहेत. झोप ही स्मृती आणि बोधन या दोन्हींसाठी जरुरीची असते. यावरून मेंदूचे स्वास्थ्य आणि आरोग्य यासाठी झोपेची नितांत गरज स्पष्ट होईल. 

इतर घटक                                                                                                             योग्य आणि नियमित शारीरिक व्यायाम, वयानुसार बैठे आणि शारीरिक खेळ, योग्य आहार यांचे महत्त्व नव्याने सांगायला नको. प्रदूषण म्हणजे हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांचा मेंदूच्या आरोग्यावर बालपणापासून म्हातारपणापर्यंत जीवनातल्या सगळ्या टप्प्यांवर वाईट परिणाम होत असतो हेसुद्धा संशोधनाने सिद्ध झाले आहे.                                               

                                                                                                 

Author

Leave a Reply