पुनर्भेट नॅशनल पार्कची १४

   माणूस आणि निसर्ग 

 दि.  ३.१२.२०२४

                जंगलातील गवत सुकू लागलं. त्याचा रंग काळपट तपकिरी होऊ लागला. या सुकलेल्या गवतात काय पाहावं? असा विचार करत असतानाच त्या गवतातून गडद निळ्या रंगाची दशमुळीची फुलं डोकावू लागतात. निळ्या फुलोऱ्यामुळे  दशमुळीची एखाद फूट उंचीची रोपटी डोळ्यांत भरू लागतात. दशमुळीची  फुलं दोन ते तीन सेंटीमीटर  व्यासाची, पाच पाकळ्यांची असतात. फुलांच्या मध्यभागातून पिवळ्या रंगाचे पुंकेसर बाहेर आलेले असतात. डिसेंबर हा दशमुळीचा फुलण्याचा महिना आहे. निळ्या रंगाच्या दशमुळीच्या  बरोबरीने हिरव्या रंगाची रानअबोली सगळीकडे फुललेली दिसते. ही रोपटी व फुलं आकाराने आपल्या नेहमीच्या बागेतील  अबोलीप्रमाणे असतात; फक्त फुलांचा रंग  फिकट हिरवा असतो; परंतु दशमुळीची  फुलं सुकलेल्या गवतात  उठून दिसतात तशी ही फुलं पटकन दिसत नाहीत. माझ्या एक लक्षात आलं आहे की दशमुळीची  रोपटी एकेकटी किंवा क्वचित प्रसंगी दोन-तीन रोपटी एकत्रित दिसतात;  परंतु रानअबोली मात्र पाच ते सहा चौरस मीटरवर समूहाने फुलते. याच्या  फुलांचा रंग आजूबाजूच्या हिरवाईत मिसळून जातो. या रोपट्याच्या कोवळ्या बिया माकडांना आवडत असाव्यात. बॉनेट माकडं कळपाने उतरून रानआबोलीच्या कोवळ्या बिया खाताना डिसेंबर महिन्यात हमखास नजरेस पडतात.

१०.१२ .२०२४ 

      जसजसा डिसेंबर पुढे सरकू लागला तसतशी उद्यानात कडाक्याची थंडी पडू लागली. संध्याकाळी चार वाजताच गारठा जाणवायला सुरुवात होऊ लागली. रात्री हुडहुडी भरू लागली; परंतु थंडीच्या रात्री निरभ्र आकाशात लखलखत्या चांदण्या दिसतात. निःशब्द रात्री तुलसी तलावाच्या शांत पाण्यात पडलेलं पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब न्याहाळणं हा एक विलक्षण अनुभव असतो.   

१४.१२.२०२४ 

  या महिन्यात आमच्याकडे दोन-तीन लक्षात राहणाऱ्या घटना घडल्या. रस्टी स्पॉटेड मांजरीची पंधरा दिवसांची दोन पिल्लं कोल्हापूर वनविभागाला सापडली. रस्टी स्पॉटेड कॅट किंवा मराठीतील वाघाटी ही जगातील सर्वात लहान मांजर आहे.  हिचं वजन जेमतेम दीड किलो असतं. पिल्लं तर खूपच छोटी असतात. ही पिल्लं कोल्हापूरवरून आमच्याकडे २९.११.२०२४ या दिवशी आणली तेव्हा जेमतेम दीडशे ग्रॅमची होती आणि जेमतेम पंधरा दिवसांची होती. त्यांचा  रंग करडा होता आणि अंगावर काळ्या रंगाचे  पट्टे होते. आईपासून दुरावलेल्या या पिल्लांना काहीच कळायचं नाही. उबेसाठी ती एकमेकांना घट्ट चिकटून बसायची. मांजरांसाठी असलेल्या  दूधपावडरीमध्ये कोमट पाणी घालून आम्ही त्यांना पाजायचो. पहिल्यांदा त्यांना काहीच कळायचं नाही. दुधाची बाटली तोंडात सरकवली तरी त्यांना ती तोंडात पकडता यायची नाही; मग आमच्या संगोपन पथकातील मयूर झिरवे त्यांना मांडीवर घ्यायचा. एका हाताने त्यांच्या अंगावर हात फिरवत राहायचा आणि दुसऱ्या हाताने बाटली हळूच तोंडात सरकवायचा. स्पर्शाची भाषा वैश्विक असते असं म्हणतात याचा अनुभव त्या वेळी यायचा. मयूरच्या उबदार स्पर्शाने त्यांना सुरक्षित वाटायचं मग ती हळहळू बाटलीने दूध प्यायला शिकली. सुरुवातीला  एकमेकांना मागच्या दोन पायांच्या मध्ये चुपत बसायची. या अशा चुपण्यामुळे त्यांच्या मागच्या दोन पायांमध्ये लाल झालं होतं. मग त्याला खोबरेल तेल लावून आम्ही रात्रीच्या वेळी त्यांना वेगवेगळं ठेवू लागलो. हळहळू त्यांची ती सवय गेली. मग आम्ही त्यांना सकाळी खेळण्यासाठी मोठ्या  पिंजऱ्यात ठेवू लागलो. छोट्याश्या खेळण्यासारखी दिसणारी ती पिल्लं आमच्या पायांचा आवाज ऐकत मागे मागे पळायची. हळूहळू त्यांचं वजन वाढू लागलं. पिंजऱ्याच्या जाळीवर नखं रोवत  सरसर वर चढायची. मला ते बघून नवल वाटायचं. कधी कधी थोडी धडकीही भरायची. एवढ्या वरून ही पिल्लं पडली तर…! असं वाटत राहायचं; परंतु ती कधीच पडली नाहीत. उंच झाडावर चढणं ही त्यांची अंतःप्रेरणा असावी. ही मांजरं जंगलात झाडांच्या ढोलीत राहतात; परंतु  इथे या पिल्लांना हे शिकवणारी आई त्यांच्या सोबत नव्हती. सुरुवातीला आईच्या विरहाने व्याकूळ होऊन ओरडत राहणारी ती दोन्ही पिल्लं हळहळू आमच्या अस्तित्वाला सरावली आहेत. मयूरने  पिंजऱ्याच्या समोर हाताने टकटक आवाज केला  की त्यांना बरोबर कळतं की आता आपल्याला दूध मिळणार आहे. ती आवाजाच्या दिशेने उड्या मारत येतात.  

२९.११.२०२४ ते  १२. १२.२०२४ 

 वन्यप्राण्यांमध्ये  काम करताना कधी अनाथ पिल्लांच्या संगोपनात मग्न व्हावं लागतं; तर कधी अडचणीत सापडलेल्या प्राण्याला बरं करून पुन्हा त्याच्या कळपात सोडावं लागतं. एक दिवस आम्हांला वसईच्या तुंगारेश्वर मंदिरातून फोन आला. मंदिराच्या आजूबाजूला जी माकडं आहेत त्यांतील एका माकडाच्या गळ्यात पट्टा दिसतो आहे. आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो. मंदिर टेकडीवर वसलं आहे. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या  आजूबाजूला उंच उंच झाडं आहेत. त्या झाडांवर माकडांचा कळप होता. त्यात एका माकडाच्या गळ्यात लाल रंगाचा मातीने मळकट झालेला पट्टा दिसत होता. त्या पट्ट्याने माकडाचा गळा जवळजवळ आवळलेला होता. बॉनेट जातीच्या त्या माकडाचं वजन जेमतेम दोन-तीन  किलो वाटत होतं. आम्ही मंदिरातील लोकांना त्या माकडांना चणे टाकायला सांगितलं. चणे टाकल्याबरोबर सगळा कळप  खाली उतरला; त्यात ते पट्टेवालं  माकडसुद्धा होतं.  मी त्याचा बेशुद्धीचा डोस तयार केला. बेशुद्धीचं  औषध भरलेली बंदूक राजा भोईरच्या हातात दिली. राजाने त्या माकडाच्या मांडीवर नेम धरला. सिरिंजची  सुई त्या माकडाच्या मांडीत घुसली; तसा झालेल्या आवाजाने कळप घाबरून विखरला. एक माकडीण मात्र त्याच्या मागेच बसून राहिली. ते माकड औषधाच्या परिणामाने पेंगायला लागलं. त्याचा पाय घसरू लागला. त्याच्या मागे उभी असलेली ती  माकडीण जणू त्याला सावरायला त्याच्याकडे सरकली.  राजाने मोठा आवाज केला तशी घाबरून ती दूर पळाली. आता ते माकड जमिनीवर मान टेकवून बेशुद्ध झालं. झाडावरून त्याचा कळप एकटक त्याच्याकडे मोठ्या काळजीने बघत होता. मी  पुढे होऊन बेशुद्ध माकडाला उचलू लागले… एवढा वेळ शांत असलेला कळप मोठमोठ्याने चीर चीर असा आवाज करत माझ्या  अंगावर धावून येऊ लागला; तसे आमच्या पथकातील दिनेश गुप्ता आणि राजा भोईर काठ्या घेऊन त्या माकडांना  हुसकू लागले. आम्ही त्या बेशुद्ध माकडाला  बाजूला घेतलं. सगळ्यात प्रथम त्याच्या गळ्यातील पट्टा कापला. त्या पट्ट्यामुळे त्याच्या गळ्याला खोल जखम झाली होती. कोणीतरी ते माकड पाळलं असावं आणि तसंच पट्ट्यासकट जंगलात सोडलं असावं. त्या माकडाला  पट्ट्याच्या किती वेदना झाल्या असाव्यात या विचाराने माझ्या मनाला असंख्य इंगळ्या डसल्या. प्राण्यांशी वागताना माणूस  किती क्रूर होऊ शकतो याचं एक उदाहरणच माझ्यापुढे होतं. गळ्याची  जखम मोठी असल्याने आम्ही त्याला आमच्या इस्पितळात थोडे दिवस ठेवण्यासाठी घेऊन आलो. ती जखम थोड्याच दिवसांत बरी झाली. पिंजऱ्यात पौष्टिक खाणं मिळाल्याने त्या माकडाची तब्येतही चांगलीच सुधारली. त्याला त्याच्या कळपात सोडण्यासाठी आम्ही पुन्हा तुंगारेश्वरला घेवून गेलो. जिथे त्याला पकडलं होतं त्याच ठिकाणी पुन्हा आम्ही पिंजऱ्यासकट आलो. आपला ओळखीचा भाग दिसल्यावर ते माकड पिंजऱ्याच्या गजाला  हात  पकडून मोठमोठ्याने चित्कारू लागलं. आपल्या सवंगड्यांना जणू बोलावत होतं. झाडावरची माकडही  आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. आम्ही पिंजऱ्याचा दरवाजा उघडला तसं ते माकड टुणकन उडी मारून बाजूच्या कट्ट्यावर गेलं. झाडावरून बाकीची माकडं जणू त्याच्या स्वागताला कट्ट्यावर उतरली. सगळी त्याच्याकडे टकमक बघत होती. दोन वयस्कर माद्या  माकडाच्या दोन बाजूंना येऊन बसल्या. तोंडाने  ‘खाक खाक’ असा आवाज काढत होत्या. बऱ्याच दिवसांनी गावात येणाऱ्या नातवंडाला आज्या जशा प्रेमाने बघत राहतात तशा  त्या दोन्ही माद्या त्याच्याकडे बघत होत्या. ते माकड आनंदाने चित्कारत आमच्याकडे आणि पिंजाऱ्याकडे बघत होतं. मागच्या वेळी आमच्यावर हल्ला करायला येत असलेला माकडांचा  कळप या वेळी आनंदातिशयाने आमच्याकडे बघत होता. गळ्याला पट्टा आवळून सोडून देणारा क्रूर माणूस त्यांनी पहिला होता; पण आपल्या साथीदाराला बरं करून पुन्हा त्यांच्याजवळ  सोडणाऱ्या माणसांना ती माकडं आज बघत होती. माणूस जातीवरचा त्यांचा विश्वास त्या दिवशी घट्ट झाला असेल यात शंका नाही.

          निसर्ग आणि माणूस यांच्यातील नातं  बहुरंगी आणि बहुपेडी असतं. दोघंही एकमेकांवर अवलंबून असतात. निसर्ग हजारो हातांनी माणसाला सतत देतच असतो. माणसाने आपले दोन हात काही काळासाठी तरी निसर्ग संवर्धनासाठी जोडले तर हे नातं परस्परविश्वासाने अधिकाधिक दृढ होत जातं .  

Author

One thought on “पुनर्भेट नॅशनल पार्कची १४

  1. हक्क दाखवायचा माणसाला भारी शोक. माकडाला पट्टा बांधुन तो कुण्या मानवाने पुरा केला पण ही जबाबदारी आपण पेलू शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आले असेल तेव्हा त्या माणसाने त्या माकडाला सोडून दिले असेल. आपण त्या प्राण्याची बंधनातून सुटका केलीत आणि त्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेत या बद्दल आपले आभार.

Leave a Reply