गोव्यातील एक आघाडीचे उद्योजक चिराग दत्ता नायक यांनी आपले वडील – कोकणी व मराठीतील ख्यातनाम साहित्यिक दत्ता दामोदर नायक – यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कोकणी भाषा मंडळाला एक कोटी रुपयांची देणगी देत असल्याचे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या रकमेच्या व्याजातून कोकणी भाषा मंडळ दरवर्षाआड ‘चित्रंगी महिला मेळावा’ व सामाजिक परिषद आयोजित करेल. (चित्रंगी हे गोव्यात उमलणारे सुंदर फूल आहे)
एखाद्या विख्यात कोकणी लेखकाच्या साहित्यावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करावी असेही देणगीदाराने सुचवले आहे.
समाजातले जे घटक कोकणीत लिहू शकत नाहीत त्यांच्या अनुभवांचे शब्दांकन करून त्यावर पुस्तक प्रकाशित करावे अशीही सूचना त्यांनी कोकणी भाषा मंडळाला केली आहे.
राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे ज्या प्रकारे हिंदी, संस्कृत व गणिताच्या परीक्षा घेतात त्याप्रमाणे भाषा मंडळाने कोकणीसाठी बालबोधिनी, प्रवेश, प्रबोध, प्रवीण व पंडित अशा पाच स्तरांवरील परीक्षा आयोजित कराव्यात असेही चिराग नायक यांनी सुचविले आहे
उरलेल्या निधीतून उत्कृष्ट कथांवर लघुपट करावेत अशी विनंती त्यांनी कोकणी भाषा मंडळाला केली आहे.
‘आपला उद्योगसमूह पाच कोटी रुपयांचा फौंटनहेड चॅरिटेबल ट्रस्ट स्थापणार आहे. ह्या निधीच्या व्याजातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येतील.
प्रा.भास्कर नायक ह्यांच्या अध्यक्षतेखालील ह्या ट्रस्टमध्ये सुशीला सावंत मॅडीस, विजय हेदे व प्रशांत नायक ह्यांचा समावेश असेल,’ असेही पत्रकार परिषदेत चिराग नायक यांनी जाहीर केले.
दत्ता दामोदर नायक यांना अंतर्नाद परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !
दत्ता दामोदर नायक
