नराणां नापितो धूर्तः
पक्षिणां चैव वायसः
चतुष्पदां शृगालस्तु
स्त्रीणां धूर्ता च मालिनी
नारद, नापित आणि माळणी यांना घटनांचा प्रसार करणारे असं संबोधलं आहे. बातम्या मिळवण्यासाठी हेरांची नेमणूक करणे अगदी आत्ताच्या काळातही महत्त्वाचे आहे. मोगल काळात त्यांना वाक़िआ नवीस म्हणत असत. वाक़िआ म्हणजे घटना आणि नवीस म्हणजे लिहिणारा. घटना लिहिणारे म्हणजे अर्थातच तत्कालीन पत्रकार.
(फडनवीस – इथे पुढे अनुनासिक आल्याने अरबी शब्दाला संस्कृत नियम वापरून ( ड चे अनुनासिक ण म्हणून फडणवीस, चिटणवीस( चिटणीस) असे झाले आहे.)
असो… हा थोडा विषय बदल झाला.
६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. या स्मृतिप्रीत्यर्थ ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो.
पत्रकार दिनानिमित्त हे छोटेसे कोडे.
यात ३ विभाग केले आहेत.
पहिल्या विभागात एकच प्रश्न आहे
१)भारतातील पहिली स्त्रीसंपादिका कोण ?
दुसरा विभाग आहे
या ‘करां’ना डर नाही.
खालील वाक्यात आडनाव ओळखायची युक्ती दिली आहे. युक्तीने पत्रकार ओळखा बरं
२)केसरी आणि मराठाची जबाबदारी लोकमान्यांच्या तुरुंगवासाच्या वेळी हिमतीने पेलणारे
३)वाङ्मयप्रेमी, प्रखर राष्ट्राभिमानी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी असणारे तत्कालीन ‘भारताचे तरुण’
४)वृत्तपत्रांनी फोटोचा योग्य उपयोग करून घ्यावा, त्याने प्रसंग हुबेहूब उभा राहतो याचा जाणीवपूर्वक विचार करून फोटोग्राफिक सोसायटी ऑफ महाराष्ट्र ची स्थापना करणारे
५)तरुण भारतचे हे ऋषितुल्य संपादक जे राजकारणातील बजबजपुरीत रमलेच नाहीत.
‘बंधुतेचे श्रेष्ठ नाते हृदय हृदया जोडिते
भेदभावा तोडुनिया ऐक्य तेथे नांदते…
६)मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक
७)भ्रमंतीकार भटके
८)प्रसन्ना या टोपणनावाने महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रासंगिक सदर लिहिणारे महाराष्ट्र टाइम्सचा कायापालट करणारे आणि टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही लेखन केलेले. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे
९)तावून सुलाखून निघाले तरी संघर्षमय वंचित आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ५ वेगवेगळी नियतकालिके सुरू करणारे
१०)दीनबंधु, दीनमित्र, अंबालहरी यांतून प्रसिद्ध होणारे यांचे ‘भाल्यासारखे’ तीक्ष्ण लेख
११)पद्मश्री, पहिल्या लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित अग्रलेखांचे बादशहा
१२) भूक – जी श्रीमंतांना लागत नाही आणि गरिबांची भागत नाही;
रस्ता – मोटारीखाली मरण्याची जागा;
विद्या – भिकेचे लक्षण असं उपहासगर्भ लेखन असलेले.
तिसरा विभाग
अ‘रे’ ला का‘रे’ पत्रकार
शीर्षक काळजीपूर्वक वाचलंत की पटापट उत्तरं येतील.
१३)फाळणीविरोधी पत्रकार. काँग्रेसच्या नेत्यांनी फाळणीची चूक केली याबद्दल माझे काँग्रेस नेत्यांशी भांडण नाही पण आपण चूक केली असे काँग्रेस नेत्यांना वाटतच नाही, ह्याविरुद्ध आक्षेप आहे, ” अशा स्पष्ट शब्दांत सुनावणारे…
१४)श्याम या पाक्षिकाचे संपादक, स्वतःच्या वृत्तपत्रांतून मार्मिकपणे प्रश्न मांडणारे, उडालेल्या कल्लोळाचा निर्भीडपणे सामना करणारे
१५)मोठं व्हायचंच नाही असं एकदा स्वीकारलं, की आपोआपच आपल्या शत्रूंची संख्याही मर्यादित होते. एका माणसावर एका वेळेस तीन-चार माणसंच हल्ला करू शकतात आणि बाकीची हल्ला करणाऱ्यांच्यावरच हल्ला करीत असतात, तसंच हे आहे. लहान पत्रकाराची लढाई सोपी असते. असे विचार सोबत घेऊन मार्गक्रमणा करणारे
