हा इवला देहच माझा
बघ सांग कसा फुलवावा
जरी दाही दिशांनी साऱ्या
तो वारा धावून यावा
मी गाणे गाते फुलता
रेशमी धुक्यातून आता
मग सूरही ते पानांचे
मज साथ सुगंधी करीता
शोधूच नका कुणी मजला
रानात हरवूनी गेले
मी रानफूल हो आहे
विसरून मला मी गेले
कुणी आनंदाने यावे
अन् मला हळूच भेटवे
फुलपाखरू येता जवळी
रंगांनी उधळून जावे
त्या हरीत तृणांच्या कुशीत
मी मुक्त राहूनी जगते
अन् दवबिंदूंच्या राशी
उधळून मनाने झुलते
वाटेवरी कोणी आले
तर नका मज कुणी तुडवू
वळवून पाऊले आपली
प्रेमाने जवळी घेऊ
मी आहे किती दिन आता
तरीही आनंदे जगते
अन जगात साऱ्या मी पण
सोडून चांदणे लुटते

केवळ अप्रतिम कविता. मला आधी वाटले की ही इंदिरा संत ह्यांचीच कविता आहे की काय? परंतू नंतर खाली नाव वेगळेच दिसले. फारच सुंदर व अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद !
खूपच सुंदर . कासच्या पठारावर जाऊन आल्यासारखे वाटले